सतीश तांबेने
साक्षात्काराची कळ लावली आणि पुढे घनघोर चर्चा झाली. त्याचा एकूण अविर्भाव आणि
अधल्या मधल्या कॉमेंटींना उत्तर देतानाची शब्दयोजना; यांच्यामुळे चर्चा रुळावर
राहिली, पांचटपणाकडे घसरली नाही. मीसुद्धा हात धुवून घेतले. ’हात धुवून घेतले’ असं
म्हणायचं कारण, मला असल्या विषयावरच्या चर्चा पूर्ण फिजूल, वांझ वाटतात. तरीपण
काहीतरी लिहावंसं वाटलं. आणि चर्चा थिल्लर नसल्याने संयमपूर्वक लिहावं लागलं.
असो. पण यामुळे मलाच
आलेले काही अनुभव आठवले! त्यातला एक मला स्वतःला साक्षात्कारी वाटतो. तो शेवटी
सांगतो. अगोदरचे दोन जास्त इंटरेस्टिंग आहेत.
गोष्ट जुनी आहे,
लग्नाअगोदरची. चरस घेण्यात अप्रूप राहिलं नव्हतं पण त्या दिवशी मला लागला. उभं
रहाणं सोडा, डोळे उघडे ठेवणं अशक्य झालं. दुपारी लंचटाइममध्ये केलेले उद्योग.
माझ्या सांगण्यावरून मला बागेत आडवा सोडून मित्र निघून गेला. मी पडून.
आपली शुद्ध हरपली होती,
हे मला शुद्ध येऊ लागल्यावर कळलं. काय तो अनुभव! सुरुवात झाली ती एका संपूर्ण nothingness मधून. प्रकाश नाही, ध्वनी नाही,
काही नाही. ज्ञानेद्रियाद्वारे कसल्या अनुभूतीचं ग्रहणच नाही. अर्थात अस्तित्वाची
जाणीवही नाही. शून्य.
मग मला त्वचेवर अगदी
अस्पष्ट, हळुवार, सुखद झुळूक जाणवू लागली. वार्याची झुळूक. अस्पष्ट. सुखद गारवा.
तोपर्यंत मी ’मी’ नव्हतो. मी असं काही नव्हतं. त्या झुळुकीने मला अस्तित्व दिलं.
तरी ते तेवढंच होतं. मला मन नव्हतं, शरीर नव्हतं, इच्छा-वासना नव्हत्या. त्या मंद,
सुखद गार, अधून मधून येणार्या झुळुकीचा अनुभव घेत मी नुसता होतो.
मग तशाच प्रकारे गुपचुप
आवाज आले. संगीत. अनाहत संगीत. अमुक असं कुठलं वाद्य नाही. पण पक्ष्यांचे आवाज
होते. तेसुद्धा अस्फुट. दुरून येणारी चिवचिव जशी. कोकिळा अजिबात नाही.
मग प्रकाश आला. रंग आले.
हिरवळ आली. निळं, ढगाळ आकाश आलं. मी त्या अवकाशात होतो; पण खाली किंवा वर असा काही
नव्हतो. आणि तिथे मनुष्यप्राणी नव्हता. प्राणीच नव्हता. गंधाचं काय ते आता आठवत
नाही. पण हे असं चालू राहिलं आणि कुठल्यातरी क्षणी मला आवाज ओळखू आले. तेव्हा कुठे
त्या अनुभवात पहिल्यांदा शब्द आले. मग मात्र भराभर माझी जाणीव जागी होत गेली आणि
मी डोळे उघडले.
गवतात आडवा होतो.
डोळ्यांजवळ गवताची पाती होती. अतीव आनंदाचा अनुभव घेतल्याची भावना होत होती. तो
अनुभव संपला, आपण पुन्हा जगण्याच्या जाणिवेत आलो, याचं दुःख होत होतं.
माझा अनुभव मी शब्दांत
मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो शतांशानेही आलेला नाही. त्या अनुभवात तपशील,
असं काही नव्हतं; त्यामुळे ते आठवण्याचा प्रश्न नाही. पण ती अस्तित्वशून्य शांतता
मला पक्की आठवते.
काय़ अर्थ लावावा याचा?
सोपं उत्तर म्हणजे मला स्वप्न पडलं. मी माझ्याशी म्हणतो की मी मेलो आणि परत आलो.
माझ्या स्वतःसाठी ती अनुभूती इतकी प्रत्ययकारी होती की माझ्यापुरती मला काहीही
शंका नाही. आणि म्हणून मला चक्क माहीत आहे की मला स्पर्श, ध्वनी आणि प्रकाश
यांच्यामधून जे स्वर्गीय सुंदर वातावरण जाणवलं, ते म्हणजे मेल्यानंतरचा स्वर्ग
नव्हे. ते मृत्यूच्या अलिकडचं आहे. मृत्यू म्हणजे पूर्ण शांतता. मृत्यू म्हणजे
अस्तित्वशून्यता. मृत्यू म्हणजे विश्व नामक अस्तित्वात संपूर्णपणे विलीन होणे.
न-असणे.
पण त्या अनुभवाने जरी मी
थक्क झालो, मला निखळ, आशयशून्य आनंदाचा दुथडी भरून अनुभव जरी मिळाला, तरी मी एक
टक्कासुद्धा जास्त शहाणा झालो नाही. मला काय झालं हे मी मित्राला सांगायचा प्रयत्न
केला. काय सांगू, किती सांगू असं झालं आणि काहीच सांगता येत नाही, असंही झालं. आज
मला त्याची आठवण अशी येत नाही. कारण ’हे असं काही तरी असतं,’ या सदैव जागृत ज्ञानासह
मी जगत आलो आहे.
दुसरा अनुभव इतका
नाट्यपूर्ण नाही. मध्ये बरीच वर्षं गेली. माझा गडचिरोलीचा मुक्काम संपत आला आणि
मला जाणवलं की मी आसपासचा परिसर अजिबात बघितलेला नाही. मग मी एकदा हेमलकसाला जाऊन
आलो. आणि मग जुजबी चौकशा करून थोडक्या अंतरावरची राज्याची सीमा ओलांडून मध्य
प्रदेशात (आता छत्तीसगड) जायचं ठरवलं. राजनंदगाव. त्याच्याजवळचं डोंगरगाव. तिथली
देवी.
गेलो. राजनंदगावला
पोचलो. गडचिरोलीतले रस्ते गुळगुळीत होते. सीमा ओलांडल्याबरोबर ते एकदम बेकार झाले.
माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेळ लागला. डोंगरगावला ट्रेन जात होती. मला एक
गाडी मिळू शकत होती. तिला खूप वेळ होता म्हणून मी बीयर प्यायचं ठरवलं. गडचिरोलीत
दारूबंदी. राजनंदगावात नाही. चला, साजरं करूया.
एका बारमध्ये गेलो. किंग
फिशर ही एकच बीयर होती. पण स्ट्राँग होती. मला स्ट्राँग मुळीच नको होती. मी बार
बदलला. तिथेही तेच! तिसर्यांदा तसं झाल्यावर विचारणा केली. तर कळलं की तिथे स्ट्राँग
बीयरची फॅक्टरी आहे म्हणून ती मुबलक मिळते; पण फक्त तीच मिळते.
आलिया भोगासी ... असं
म्हणत स्ट्राँग मागवली. पण च्यायला उभ्या हयातीत कधी बियरच्या एका बाटलीवर थांबू
शकलेलो नाही, ते तिथेही शकलो नाहीच. परिणामी शेवटची गाडी गेली. दोन स्ट्राँग बीयर
मला चढली. एकट्याने प्यायलो म्हणून असेल किंवा पुष्कळ दिवसांचा उपास सोडला म्हणून
असेल पण मला धड चालता येईना. जेवतो कसला, स्टेशनच्या आवारातल्या एका झाडाच्या
पारावर आडवा झालो तो झोपच लागली.
सकाळी जाग आली तेव्हा
मनाशी चडफडत होतो. ’आता गाडी उशीरा, ती पकडून वर जाऊन हिंडून फिरून परत येऊन
गडचिरोली गाठणं शक्य नाही, आणि परत तर जायलाच पाहिजे, हे काय झालं, बीयर नडली,’
वगैरे. तोंडावर पाणी मारून चहा प्यावा म्हणून उभा झालो.
आणि कल्पनातीत थक्क
झालो. मी चक्क डोंगरगाव स्टेशनात होतो!
कसा आलो? ट्रेन पकडली?
कुठली? ट्रेनमध्ये कसा चढलो? खिशात तिकीट बिकीट मुळीच नव्हतं. मला नीट आठवत होतं
की मी खालच्या स्टेशनच्या आवारात एका झाडाखाली बसून ’आता काय करावं?’ असा विचार
करत होतो. नकळत आडवा झालो आणि पुढची जाणीव ही आत्ता सकाळी उठल्याची.
मग वर कसा आलो? एकटाच तर
आहे. दुसर्या कोणी आणलं असणं शक्य नाही. खूप डोक्याला ताण दिला. काहीही आठवलं
नाही. नाही, हे बरोबर नाही. नीट आठवलं की आपण खालच्या स्टेशनवरच बसल्या बसल्या
आडवं होऊन झोपलो.
आता हे काय आक्रीत?
चहा प्यायलो आणि
देवळाकडे गेलो. परिसर बरा होता. देवळात देवीच्या दर्शनाला मोठ्ठी रांग होती.
तिथपर्यंत जात असताना मनात आलं की देवीने आपल्याला वर आणलं. हा काही तरी संकेत
आहे. आता देवीचं दर्शन घेणं भाग आहे.
पण खरं सांगतो, ती लाईन
बघून माझा मूड गेला. एवढी होती देवीची इच्छा तर तिने मला देवळात लवकर प्रवेश
मिळवून देण्याचीदेखील व्यवस्था करायला हवी होती, असं म्हणून मी देवळात न शिरताच
परतलो.
पुढे काही नाही. हे
इतकंच.
तिसरा अनुभव थेट
साक्षात्काराचा. पण या दोन अनुभवांच्या तुलनेत अगदी मिळमिळीत. तो क्षण मला अगदी
नीट आठवतो. वरच्या दोन अनुभवांच्या मधला काळ. नोकरी सोडली होती आणि काहीच करायचं
ठरवलं नव्हतं. पूर्ण अनिश्चित. बायकोभरोसे (ती नोकरी करत होती). तर मी मुतारीत
शिरलो आणि चक्क सू करताना मला लख्ख लक्षात आलं की पैसे मिळवण्याचा आणि अक्कल
असण्याचा, अंगी हुन्नर असण्याचा, कष्ट करण्याचा काही एक संबंध नाही. दुनियेला जे
हवं आहे, ते दिलं की दुनिया पैसे देते. लता मंगेशकरला देते आणि सिगारेट कंपनीलाही
देते. या पलिकडे कसलंही गणित नाही. काही चांगलं वाईट नाही. उगीच अन्याय बिन्याय
असलं काही चिकटवू नये. ’त्याच्या बुद्धीचं चीज झालं नाही,’ म्हणू नये. आणि अर्थात
पैसे मिळवण्यावरून जगात कोणाचीही किंमत करू नये.
याचं लॉजिक मी नंतर
रचलं. पण जेव्हा हे कळलं, ते आतून कळल्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी अजिबात शंका
नव्हती. ज्ञान होणं आणि माहिती असणं यातला फरक इथे असतो. माहिती विसरते, कमी जास्त
होते, ज्ञान एकदा झालं की भागच होतं अस्तित्वाचा. सायकल शिकल्यासारखं. पण हे ज्ञान
असं घट्ट ठसल्याचा परिणाम पुढे अनेक वर्षांनी जेव्हा जाहिराती, मार्केट यांची ओळख
झाली तेव्हा जाणवला. हे हरामी गरज मॅन्युफॅक्चर करतात! आणि ती पुरवून पैसे करतात.
याचा मला भयंकर राग आला. निसर्गाला धंद्याला लावण्याइतकं हे बेकार वाटलं.
पण ते पुढचं.
साक्षात्कार तो तेवढाच. त्याला इंट्यूशन म्हणयची मुभा तुम्हाला आहेच. मनाच्या आत
चालू असलेल्या मंथनाचं नवनीत अचानक उसळलं आणि मी त्याला साक्षात्कार म्हणालो.
असेल. तसंही असेल.
सगळ्या साक्षात्कारांचंसुद्धा तसंच असेल.
No comments:
Post a Comment