Wednesday, September 6, 2017

परंपरा, हौस, रीतिरिवाज आणि कर्मकांड

‘कर्णिकां’कडे गणपती यायचा. पण माझ्या आजोबांचे मोठे बंधू आमच्याच चाळीत पहिल्या माळ्यावर रहायचे, ते (आणि त्यांच्या नंतर त्यांची मुलं) आणत. शेजारी प्रधानांकडे येणारा गणपती बघून काकाने लहानपणी हट्ट धरला असावा आणि आम्हीही गणपती बसवू लागलो. आरास करणे, हे एक रात्री उशीरापर्यत जागून करण्याचं आवडीचं काम होतं; ज्यात मी आणि भाऊ काकाला मदत करत असू.

पुढे माझा देवावरचा विश्वास उडाला आणि वडील गेल्यानंतर ताबडतोब मी गणपती आणणं बंद करून टाकलं. काका किंवा भाऊ यांनी ती जबाबदारी घ्यायला नकार दिला आणि मला ते लोढणं वाटत होतं. असो.

तर गणपती जसा घराण्याची परंपरा असतो; तसाच हौसही असू शकतो. आणला, आणला; नाही आणला, नाही आणला.

माझा मामा पुण्याहून मुंबईला आला आणि गणपतीची स्थापना (की प्रतिष्ठापना?) करायला पहिल्या दिवशी भटजी वेळेवर येईनात. मग पूजेचं पुस्तक समोर ठेवून माझी बायको (मी किंवा ती जन्माने ब्राह्मण नसून) पूजा सांगू लागली. विसर्जनाच्या वेळीसुद्धा. ही हौस नव्हे. ती साग्रसंगीत सांगते. संस्कृत उच्चारही बरे आहेत तिचे.

तर परंपरा लवचिक असते. वाकवता येते.

माझ्या परिचयातल्या एका मुलीने लग्न जमवलं, तर तिच्या होणार्‍या नवर्‍याचे वडील निधन पावलेले. हिची आई घटस्फोटित. लग्न तर विधिवत करायचं. वर आणि वधू, दोघींना वडील नाहीत म्हटल्यावर त्यांच्या आया एक पाऊल पुढे गेल्या आणि त्यांनीच सर्व विधी पार पाडले, जे ज्ञानप्रबोधिनी (वा तत्सम, नक्की आठवत नाही) मधून आलेल्या पुरोहितबाईंनी सांगितले.

या वेळीदेखील परंपरा वाकली, हे खरं; पण पारंपरिक संकेतांचं पालन झालं का? पण हे ठरवण्याचा अधिकार आपल्या समाजात - किमान शहरी, पांढरपेशा उच्चवर्णीयांच्यात - कोणाला नाही. ‘आम्हाला चालतंय, तर तुम्ही कोण नाक मुरडणारे?’

कोणीही नाक मुरडलं नाही, हेदेखील खरं.

सलमान खानच्या घरी गणपती येतो. त्याची आई, मला वाटतं, हिंदू आहे. तसलं काही नसलेल्या एका मुसलमान कुटुंबात गणपती आणत, हे मला माहीत आहे. त्यांना कोणीच आडकाठी आणली नाही. (सगळीकडून विषारी झालेल्या अलिकडच्या वातावरणात काय स्थिती आहे, कल्पना नाही.)

सार्वजनिक गणपतीचं पितृत्व कोणाहीकडे असो; आज मुंबईतला सार्वजनिक गणपती मुळीच ‘ब्राह्मणी’, रूढीसंलग्न राहिलेला नाही. पूजा सांगायला ब्राह्मण लागत असावा; पण त्या पूजेची ‘शुद्धता’ संशयास्पद आहे. आणि बाकी कुठलाही गुणविशेष परंपरेला धरून नाही. हा उत्सव, पर्यायाने हा देव ब्राह्मणांच्या, उच्चवर्णीयांच्या ताब्यातून सटकलेला आहे. “काय ही देवाची विटंबना!” असा विलाप उच्चवर्णीयांमध्ये आणि उच्चवर्गीयांमध्ये प्रकर्षाने ऐकू येतो.

आणखी एक पाऊल पुढे जायचं, तर गणपती आणण्याची रीत ‘धार्मिक’ न रहाता ‘सांस्कृतिक’ झाली आहे. जन्माधिष्ठित जात तर बदलता येत नाही, पण समाजातल्या सर्वसाधारण व्यवहारांना रूप देणारा वर्ग बदलता येतो; या विश्वासाने वरच्या वर्गात उडी मारू इच्छिणारे ज्या अनुकरणाच्या कृती करतात; त्यात उच्चार, रहाणी यांबरोबर रीतिरिवाजही येतात. गणपती येतो. म्हणजेच तो सांस्कृतिक आहे.

किती सीरियसली घ्यावं हे गणपतीचं कर्मकांड? काही वर्षांपूर्वी दादर चौपाटीपाशी अनपेक्षितरित्या एक मित्र भेटला. “काय रे, तू इकडे कुठे?” असं विचारल्यावर म्हणाला, “अरे, मुलगी फारच हट्ट करू लागली म्हणून घरी गणपती आणला, आरास केली, आरत्या बिरत्यासुद्धा केल्या. त्याचं विसर्जन करायला आलोय.”  हा एकटा, सोबत कुणीच नाही; हे पाहून मी गोंधळलो. विचारलं, “पण आहे कुठे गणपतीची मूर्ती?”

खिशात हात घालून त्याने एक लहानशी मूर्ती बाहेर काढली आणि म्हणाला, “ही काय.”

(पहिली व तिसरी गणपती प्रतिमा गूगलवरून.)
 

No comments:

Post a Comment