Saturday, February 24, 2018

गुजरात : एक स्वल्पदर्शन




मुंबईहून बडोद्याला ट्रेनने जाणे आणि तिथे तीन दिवस राहून परत येणे आणि जाता येता ट्रेनच्या डब्यातून जे दिसेल ते चौकसपणे पाहणे आणि बडोद्यातल्या मुक्कामी असंच बारीक लक्ष ठेवून असणे; याला मी ‘गुजरातदर्शन’ म्हणणार नाही. त्यामुळे आता मी जे काही म्हणणार आहे, ते गुजरातवरील भाष्य होय, असा दावा मी अजिबात करणार नाही. तरीपण जे दिसलं ते दिसलं. ते अपुरं, तोकडं असेल; पण ते दिसलंच नाही, असं तर म्हणता येत नाही. तेव्हा मी जे सांगणार आहे, ते आणि तेच सत्य, असं न मानता त्याला कोणी सप्रमाण खोडून काढणार असेल, तर त्याचं/तिचं स्वागत आहे.

आमचा मुक्काम अलकापुरीतल्या एका हॉटेलात होता. तिथून स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भरपूर कचरा, घाण असे. संध्याकाळी त्या मुळात अरुंद असलेल्या रस्त्याला आडव्या जाणाऱ्या गल्लीमधून एक बाई आली आणि हातातल्या डब्यातला कचरा नाक्याशी रिकामा करून गेली. तो तिथला अधिकृत उकिरडा असावा. असे उकिरडे पाहण्याची मला मुंबईत सवय होती; पण आमच्या नव्या मुंबईने पंतप्रधानांचं स्वच्छता अभियान फारच मनावर घेतलं आहे. भाजी बाजारात ओला कचरा – सुका कचरा असे वेगवेगळे सुबक सुंदर डबे सर्वत्र मांडले – वाटले आहेत. प्रत्येक हाउसिंग सोसायटीला ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती करण्यात आली आहे आणि ती अमलात येताना मला दिसत आहे. कचरा नेणारी घंटागाडी येते, ती घंटा वाजवत येत नाही; स्वच्छतेचे गुणगान करणारी गाणी गात येते. फुटपाथवरच्या फेरीवाल्यांना वारंवार हाकलण्यात येत असल्यामुळे भय्यांबरोबर कोळणी हवालदिल झाल्या आहेत – पण गाव स्वच्छ, चकचकीत दिसू लागलं आहे!

तिथून थेट बडोद्याला गेल्यावर तिथली अस्वच्छता माझ्या डोळ्यांना फारच खुपली. विशेषतः गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान सुरु करणाऱ्या मोदींच्या गुजरातमध्ये वेगळी अपेक्षा होती. आणि दुसऱ्या बाजूने बडोद्याच्या ऐतिहासिक – आणि अजून टिकून असलेल्या डेमोग्राफिकसुद्धा – मराठीपणामुळे मला ते बरं वाटलं नाही. कोणीतरी मला प्लीज सांगा की ती अस्वच्छता तेवढ्या एका गल्लीपुरती मर्यादित होती!

पण आम्ही गेलो ते पहिलं हॉटेलही धुळीने भरलेलं होतं! रस्ते पानाच्या पिकांनी रंगलेले होते! एकूणच बकाली जाणवत होती!

आणखी एक अनपेक्षित बाब म्हणजे पहाटे ऐकू आलेली खणखणीत अजान! लाउडस्पीकरवर सारा परिसर दुमदुमून टाकणाऱ्या आवाजात.

रेल्वे रुळांच्या बाजूने गरिबांच्या झोपड्यांच्या दरिद्री रांगा असणे, यात माझ्यासारख्या जुन्या मुंबईकराला खटकण्याचं काहीच कारण नाही. पण मुंबईतल्या बहुतेक झोपड्या आता पक्क्या भिंतींच्या झाल्या आहेत. बऱ्याच जागी त्यांच्यावर माडीदेखील चढली आहे. तुलनेने गुजराती गरीब फार गरीब भासले. रेल्वेलगतची बकाली डोळ्यांना खुपणारी होती.

एका दिवशी आम्हाला परतायला उशीर झाला. अकरा वाजत होते. आणि रस्त्यावर कानठळ्या बसतील अशा आवाजात डीजे वाजत होता. डोळ्यांपुढे अंधारी येईल, असे प्रखर झोत सोडले जात होते. बाजूच्या मंडपात काहीतरी विधी चालू होते. लग्नाचे की आणखी कसले, हे आम्ही शोधलं नाही. एक जण म्हणाला, काल या लोकांनी झोपू दिलं नाही यार. फार उशिरापर्यंत वाजत होतं. त्याचं खरं असावं. कारण त्यानंतर थोड्याच वेळात ठो ठो फटाके सुरू झाले. ती वस्ती अर्थात सुखवस्तू नव्हती. पण हौसेला मोल इथे नसतं, तर तिथे का असेल? अपेक्षा वेगळी होती, हे मात्र खरं.

एक ‘उलटं’ निरीक्षण. उतरल्यापासून, म्हणजे स्टेशनातून बाहेर पडताना रिक्षावाल्यांकडून घेरलं जाण्याच्या क्षणापासून ते थेट परतीच्या प्रवासात स्टेशनवर येईपर्यंत एकही रिक्षावाला उर्मट, फसवणारा मिळाला नाही! असं कुठे असतं? माझ्या संपूर्ण आयुष्यात मला भेटलेले सर्वात नम्र आणि सचोटीचे रिक्षावाले बडोद्यात आढळले, असं सर्टिफिकेट मी देऊन टाकतो.

पण कसं होतं, बाकीच्या अनुभवांमुळे हे लक्षण सुसंस्कृततेचं ठरवण्याची इच्छा होत नाही. हे लोक गरीब आहेत; इतके, की गरिबीतून दबलेले आहेत. जसे यूपीत, जुन्या दिल्लीत भेटणारे गरीब लोक. सायकलरिक्षावाले ; असं ठरवण्याकडे कल होतो.
असंही असेल की सुबत्तेचं मोजमाप करताना ‘आपण’ अशी जी मांडणी होते, त्यात हे लोक मोजले जात नसावेत. झाडं, इमारती, कुत्रे आणि शेळ्या यांच्याप्रमाणे ते पार्श्वभूमीचा – कॅनवासचा – भाग मानले जात असावेत.

परत येतानाची गाडी सगळीकडे थांबत आली. वापी येण्याअगोदर नाकात वाईट वास शिरला. गाव येताच आसमंत गढूळ होऊन गेलं. तिथे जास्त काळ राहिलं तर गुदमरायला होईल, असं वाटलं. हे औद्योगीकरणाचं सुचिन्ह नव्हे; दुश्चिन्ह आहे.

सुबत्तेत महाराष्ट्राशी स्पर्धा करू पाहणाऱ्या गुजरातेत असं का असावं? कदाचित मी पाहिली ती केवळ शहरी गरिबी असेल. ग्रामीण भागात चित्र उजवं असेल. मराठवाड्यातलं उदास दारिद्र्य मी पाहिलं आहे. मुंबईपुण्याबाहेर महाराष्ट्राच्या प्रगतीची लक्तरं माझ्या माहितीची आहेत. गुजरातेतले शेतकरी कदाचित तुलनेने सुस्थितीत असतील. ते शेतकरी आणि हे शहरी गरीब एकत्र केल्यावर सरासरी वर जात असेल.

असेलही. पण सुस्थितीतलं आयुष्य सोडून शहरी बकालपणाची निवड कोण कशाला करेल? गुजरातेतल्या विषमतेला ग्रामीण-शहरी असा रंग नसून वेगळा रंग आहे; असं तर नाही?

No comments:

Post a Comment