मित्र द्वारकानाथ उर्फ पपू संझगिरी
महिन्याभरात एखादा गाण्यांचा कार्यक्रम करतो, हे आता सर्व मित्रांना माहीत आहे. अलीकडच्या
काळात त्याने शंकर जयकिशन, हेमंत कुमार, यांच्यावर कार्यक्रम केले. ते मी
पहिले-ऐकले नाहीत. त्याचा गुरुदत्तवरचा कार्यक्रम मी पाहिला होता. जास्तीत जास्त
लोकांना कसं खूष करता येईल, हा हिशेब करत तो कार्यक्रम करतो. त्याच्या लताची
'वेगळी' गाणी सदर करणाऱ्या कार्यक्रमात तर मी सहभागीच झालो होतो. मजा आली होती.
असले कार्यक्रम करण्यासाठी तो भरपूर रिसर्च
करतो, हे मला माहीत आहे. हा रिसर्च गाण्यांविषयी असतो; तसाच गाणारे, संगीतकार,
तेव्हाची एकंदर सिनेसृष्टी, अशा अनेक अंगांनी केलेला असतो. तो किस्से सांगतो,
बारीक सारीक खुब्या वर्णन करतो; पण त्यातल्या प्रत्येक गोष्टीला आधार असतो. उगीच
इकडल्या तिकडल्या वावड्या तो उगाळत बसत नाही. त्याचंप्रमाणे एखाद्या किश्शाचं
पितृत्व तो ज्याचं त्याला देतो; ढापत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आख्खा
कार्यक्रम तो 'डिझाईन' करतो. त्याचं 'स्क्रिप्ट' तयार करतो. फारच कमी भाग extempore असतो.
हे स्क्रिप्ट बनवताना सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. गाणं वादकांना अजिबात
अपरिचित असून चालत नाही. गायकाला तर नाहीच नाही. ते गाणं बहुसंख्य श्रोत्यांना माहीत
नसलेलंसुद्धा त्याला चालत नाही. लोक नाराज होतात, असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा या
विषयातला दीर्घ अनुभव लक्षात घेता हे बरोबर असावं. या सगळ्या हवं-नकोतून कुठली
गाणी घ्यायची, कुठली नाही; हे बरंचसं ठरतं; पण पूर्ण ठरत नाही. कारण सगळी गाणी
मूडच्या दृष्टीने एकीकडे कललेली असून चालत नाही. दुःखी, संथ गाणी जास्त असूनही
चालत नाही. जास्तीत जास्त संगीतकारांना सामावून घ्यावं लागतं. 'चांगलं' किंवा
'अत्यंत थोर' गाणं हा एकमेव निकष तर कधीच होऊ शकत नाही.
आणि एवढं सगळं
झाल्यावर निवडलेल्या गाण्यांना एका सूत्रात ओवावं लागतं. सभागृहातला प्रत्येक
श्रोता जरी स्वतःला संगीतातला, गाण्यांमधला दर्दी मानत असला; तरी तसं नसतं, हे भान
आपण बाळगायचं पण तसं श्रोत्यांना वाटू द्यायचं नाही, ही कसरत तर करावीच लागते. त्यासाठी
नुसती चांगली गाणी एकामागून एक सादर करून चालत नाही. काहीतरी रचावं लागतं. त्या
रचनेत वळणं असावी लागतात, सुखद धक्के योजावे लागतात, वगैरे. दोन गाण्यांमधलं बोलणं
कार्यक्रमाची रंगत वाढवणारं असावं, रसभंग करणारं नसावं; त्या बोलण्याने कधीही,
कधीही प्रत्यक्ष गाण्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये, हे पथ्य अत्यंत
दक्षपणे पाळावं लागतंच लागतं!
आपण जातो आणि
प्रत्यक्ष कार्यक्रम बघतो. कधीतरी कोणीतरी गायलेली लोकप्रिय गाणी सादर करणे, हे
किती दुय्यम काम आहे, असं नाकही काही जण मुरडतात. पण हे 'दुय्यम' काम सफाईदार
करण्यासाठी भरपूर विचार आणि कष्ट करावे लागतात!
आज हे सांगण्याचं
कारण म्हणजे परवा पपूने सादर केलेला तलत महमूदवरचा कार्यक्रम. तसं पाहिलं तर लता, आशा,
रफी यांच्या तुलनेत तलतच्या गाण्यांची संख्याच कमी आहे. म्हणजे तलतची गाणी निवडणं
तुलनेने सोपं आहे. शिवाय यच्चयावत सगळ्या पार्श्वगायकांमध्ये खराब गाण्याचं प्रमाण
सर्वात कमी असलेला गायक पुन्हा तलत. कुठलंही गाणं निवडा, ते चांगलं असण्याची
शक्यता जास्त! यावरून असं भासतं की तलतवर कार्यक्रम करणे सोपं असणार. पण तसं नाही.
एक कारण, तलतच्या गाण्यांमध्ये 'ब्लू मूड'वाल्या गाण्यांची संख्या खूप जास्त.
हॉलमध्ये माणसं बसवून त्यांच्यासमोर रडक्या, उदास गाण्यांच्या मालिकेचा कार्यक्रम
रंगतदार होत नाही! दुसरं असं की वागाबोलायला एकदम अदबशीर असलेल्या तलतचे 'किस्से'
कमी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तलतच्या जगावेगळ्या आवाजाच्या जवळ जाणारा
आवाज शोधणे!
तरी कार्यक्रम चांगला
झाला. तलतच्या आवाजाला गौरव बांगियाने बऱ्यापैकी 'न्याय दिला'. सुरुवातीला तो
चुकला. गातानाही तलतची नक्कल करतो आहे, असं वाटत राहिलं. पण नंतर त्याचा आवाज
'लागला'. 'हमसे आया न गया' उत्तम गायला. सगळ्यात चांगलं हेच गाणं गायला, असं
म्हणायला हरकत नाही. पण मी त्याला शेवटच्या 'गमकी अंधेरी रातमें' या गाण्यासाठी
सर्वात जास्त मार्क देईन. हे गाणं तलत-रफी द्वंद्वगीत आहे. दोघांच्या तोंडी असलेले
शब्द विरुद्ध मूडचे आहेत. आणि या गाण्यात रफीने कमाल केली आहे. मला तर कधी
म्हणावसं वाटतं, रफीने या गाण्यात तलतवर मात केली आहे! गौरव एकटाच दोघांचे आवाज
काढत गायला. तसं करताना रफीचा पुरुषीपणा (कधी उथळपणा) अधोरेखित कर; तलतचा मुलायम
कंप ठळक कर, असलं काही त्याने केलं नाही. दोघांच्या गायकीतला फरक धरून तो गायला.
शब्दांना प्रामाणिक रहात गायला. या गाण्यात त्याची maturity दिसली.
कार्यक्रमात चारेक
बाई-बुवा ड्यूएट्स होती. त्यासाठी प्राजक्ता सातर्डेकर होती. ही लहानशी मुलगी
भयंकर महत्त्वाकांक्षी असावी. ती गाताना तिचा 'attitude' नाही
प्रोजेक्ट होत. सगळं लक्ष गाण्यावर केंद्रित करून ती गाते. लतासारखा आवाज
काढण्याचा प्रयत्न करावाच लागतो, लोकांना वेगळ्या जातीचा आवाज चालत नाही; पण ही
मुलगी लताची गायकी पकडू बघते! एक गाणं होतं, 'दिलमें समा गये सजन'. सज्जादच्या या
गाण्याची सुरुवात तलत नाही तर लता करते. ती सुरुवात अचाट आहे. लताला झिंदाबाद
करावं की 'सज्जाद अमर रहे' अशी घोषणा द्यावी की सज्जादच्या अद्भुत orchestration च्या पाया पडावं, असं सगळं एकाच वेळी वाटायला लावणारी गाण्याची सुरुवात आहे.
पण लता जे काही करते, त्यानेच घायाळ व्हायला होतं. आणि प्राजक्ताने तोंड उघडून हा
अनुभव जसाच्या तसा दिला! बापरे! ऐकताना अंगावर काटा आला. 'प्राजक्ताला आवाजाची
दैवी देणगी आहे,' असं म्हणणे हा तिचा अपमान आहे. लता-सज्जाद ही जादू नेमकी पकडणे,
हुकमी पकडणे, orchestra सुरूच झालेला नसताना, त्याच्या आधाराविना पकडणे, यासाठी
प्राजक्ताने किती कष्ट घेतले असतील! पुढे 'समा' आणि त्याला समांतर अशा प्रत्येक
शब्दोच्चारात लता जी फिरकी लीलया घेते, ती प्राजक्ताने हुबेहूब घेतली, हे मग
सांगायला नको.
सिनेसंगीताच्या
गाण्यांचा कार्यक्रम समर्थ वाद्यमेळाविना यशस्वी होऊ शकत नाही आणि अजय मदन यांच्या
टीमचा उल्लेख न करणे अडाणीपणाचं ठरेल. 'आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये'
हे गाणं काय उचललं त्यांनी! ठेका आणि वाद्य, कुठेच काही कमी पडलं नाही. हे जेव्हा
कमी पडतं, तेव्हा कार्यक्रमाचा विचका होतो. अजय मदन यांच्यावर पपू पूर्ण विसंबू
शकतो.
या वाद्यमेळाचा
कमीपणा म्हणून नाही; तर विलायत खान यांची कलाकारी म्हणून एक उल्लेख करावासा वाटतो.
'मेरी यादमें तुम ना आसू बहाना' या गाण्यामध्ये सतार वाजते. तलत पुन्हा गाऊ लागण्याअगोदर एक नाजुक छोटासा आलाप आहे. तो
काही या कार्यक्रमातल्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांवर उमटू शकला नाही. विलायत खान यांची
सतार मनातच वाजली!
कार्यक्रमाबद्दल
पपूला धन्यवाद. आणि एक कबुली. मला गतकातरता – nostalgia – हा रोग नाही. मागचं फार आठवतही नाही; त्या
आठवणींचे कढ येणं दूर राहिलं.
'जुनी गाणी' आजही गुणगुणतो, प्रेमाने ऐकतो, एन्जॉय करतो; पण त्या गाण्याचं कसलं
असोसिएशन भूतकाळातल्या कसल्या घटनेशी, आठवणीशी नाही. गाणं गाणं म्हणून एन्जॉय
करतो; त्यातून रम्य भूतकाळ जागा होतो म्हणून नाही. पण च्यायला एका मागून एक तलत
ऐकताना गडबड झाली. कॅफे स्वीमिंग पूलचे दिवस आठवले! आभाळभर ब्लू मूड पसरल्यासारखं
झालं. अत्यंत अस्वस्थ वाटलं.
तलतराव, तुमचं लेबल
आमच्या त्या दिवसांवर लागलं आहे, हे नव्याने कळलं हो!
No comments:
Post a Comment