Sunday, September 2, 2018
एक काल्पनिक वाढदिवस
आज 2 सप्टेंबर. ही तारीख खास महत्त्वाची आहे. या तारखेला दर वर्षी अत्यंत महत्त्वाच्या घटना घडतात. अत्यंत म्हणजे जागतिक महत्त्वाच्या. आता कुणी म्हणेल, यूएस ऑफ अमेरिका या देशाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या घटनांना जागतिक महत्त्वाच्या काय म्हणून म्हणायचं? तर ते तसंच आहे. ज्या विशिष्ट जगात 2 सप्टेंबर ही महत्त्वाची तारीख आहे, त्या जगासाठी अमेरिका हे जगाचं केंद्र तर आहेच; शिवाय ते जगाचं इंजिन आहे, जगाचा मेंदू आहे, संपूर्ण जगाचा भार उचलणारी एकमेव शक्ती आहे.
त्याचं असं झालं. मी जेव्हा बँकेत कारकुनी करत होतो, त्या काळात एकेका कारकुनाला बँकेत काम कमी असायचं. मी होतो मेन ब्रँचला. तिथे तर अगदीच कमी. पण पैशाच्या उलाढालीच्या हिशेबात मी दिवसभरात जेवढं काम करत होतो, तेवढं दुसरी सामान्य ब्रँच महिन्याभरात करत नसेल. कारण मी मुंबईत. बाहेरच्या साध्याशा ब्रँचमध्ये जे काम एक कारकून करत असेल, ते करायला मुंबईच्या मेन ब्रँचमध्ये दोन डिपार्टमेंट लागत असत.
माझंही काम किचकट होतं. पण मला ते नेहमीचं होतं. पटकन होऊन जायचं. पण पुढचं काम घेऊन कस्टमर कधी येऊन उभा राहील याचा नेम नव्हता. त्यामुळे मला जागा सोडून वाटेल तसं भटकता येत नव्हतं. मग मी जागेवर बसून पुस्तकं वाचत असे. त्याबद्दल बोलणी खात असे.
एके दिवशी सुरेन्द्र पाटकर आला आणि त्याने माझ्या समोर एक जाडजूड पुस्तक ठेवलं. “इतकं वाचतोस, हे वाच.” तो म्हणाला, “लायब्ररीतून आणलं आहे. लवकर वाचून संपव.”
मग मी हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि पाटकरने दिलेलं जाड पुठ्ठ्याच्या बांधणीचं सुमारे बाराशे पानांचं पुस्तक उघडलं.
"Who is John Galt?"
"Why do you say that?" Eddie asked irritatedly.
"But why does it disturb you?"
"It doesn't." Eddie snapped.
अशी काहीशी सुरुवात होती. काही कळलं नाही. पण जसजसं वाचत गेलो, तसा हिप्नॉटाइज झाल्यासारखा अडकत गेलो. पुस्तकात घातलेली मुंडी मला वर करता येईना. पाच सहा दिवसात मी ती बाराशे पानं संपवली. इतक्या वेगाने मी दुसरं कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही. वाचून भयंकर अस्वस्थ झालो. आयन रँडचे फॅन क्लब्ज आहेत; जगभरातले फॅन्स एकमेकांच्या संपर्कात आहेत; तिच्या चाहत्यांना तिचा प्रचंड अभिमान वाटतो; आपल्याला - आणि तमाम जगातल्या दुसर्या कोणालाही - अक्कल असण्याचं-नसण्याचं गमक आयन रँडवर प्रेम असणे आणि नसणे हे आणि एवढंच आहे आणि ज्यांनी आयन रँड वाचलेलीच नाही, they simply don't exist; यातलं मला तेव्हा काही एक माहीत नव्हतं.
मी वाचनच काय; श्रवण, दर्शन, सगळंच अत्यंत सीरियसली घेणारा माणूस आहे. आयन रँड जे ठामपणे मांडत होती, ते उडवून लावता येत नव्हतं आणि तोपर्यंतच्या जगण्यात जे मनावर बिंबलं होतं, तेही फेकून देता येत नव्हतं. दोन्ही घेऊन जगणं माझ्यासारख्या सगळं सीरियसली घेणार्या भाबड्या माणसाला झेपत नव्हतं.
मग मी माझ्या परिचयातल्या एकेका ‘ज्ञानी’, ‘अभ्यासू’, ‘सामाजिक थिअरीची खोलवर चिकित्सा करणारे’ अशा मित्रांकडे माझी ही डिफिकल्टी घेऊन गेलो. एखाद्या विद्यार्थ्याने अडलेला रायडर वा आयडेंटिटी (हे असतं काय अजून शाळकरी गणितात?) विचारत फिरावं तसा फिरलो. एकही जण उपयोगी पडला नाही. कोणी मला उडवून लावलं, कोणी आयन रँडला; कोणी ती वाचलीच नव्हती, तर कोणाला ती माहीत होती आणि ती आपल्या विचारांची कडवी विरोधक आहे, हे माहीत असण्याबरोबर तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही, हेसुद्धा कळलेलं होतं. तेव्हा फेसबुक असतं, तर तिथे पोस्ट टाकली असती आणि डझनाने सल्ले आले असते.
फेसबुकामुळे काय लोक एम्पॉवर झालेत! परवा ‘कोसला’ ही कादंबरी कशी कच्ची आहे, तिच्यावर संपादकीय संस्कार व्हायचे कसे राहून गेले आहेत, अशी एक फेसबुकीय चर्चा वाचनात आली. असलं भारी धारिष्ट्य अंगी येणे ही फेसबुकाची करामत. आपल्याला जे वाटतं ते आपण लिहू शकतो आणि ते दुसर्या कोणाहीप्रमाणे छापून येतं आणि आपल्या कंपूतले का होईना, लोक त्यावर चर्चा करतात; हे अत्यंत एम्पॉवरिंग आहे. रोज स्वत:चे फोटो टाकणे आणि त्यावर रोज नव्याने कॉमेंट्स मिळवणे यातून आत्मविश्वासाच्या फुग्यात प्रचंड हवा भरते. मग त्या आत्मविश्वासापोटी एकेक जण आपली दैनंदिन चाकोरी, आपला, बायकोचा, नवर्याचा, मुलामुलीचा, ह्याचा-त्याचा वाढदिवस, काय वाटेल ते छापून आणतो आणि महाभारत-रामायणापासून चालत आलेल्या अक्षरवाङ्मयात भर घालतो.
असो, असो. आयन रँडची ही कादंबरी - ॲटलास श्रग्ड - वाचली, तेव्हा फेसबुक नसल्यामुळे मला असा आत्मविश्वास कमावता आलेला नव्हता आणि मित्रांपलिकडे आणखी कोणाकडे जाऊन आयन रँडचं कोडं सोडवण्याची विनंती करावी, ही हिम्मत मला झाली नाही. हळूहळू माझा मीच त्या कोड्याचा एकेक धागा सुटा केला. खूप वेळ लागला.
पण कादंबरीसारख्या ललित लेखनाला केवळ तात्त्विक बाजू कधीच नसते. त्यात पात्रं असतात, प्रसंग असतात, एक प्रवाह असतो आणि प्रवाहाबरोबर पुढे सरकताना मस्त टेन्शन वाढत जातं. चांगल्या साहित्यात असंही होतं की दुसर्यांदा वाचताना त्या प्रवाहातली बारीक वळणं सापडतात. ती जास्तच मोहवतात. आणखी वळणं शोधावीशी वाटतात ... कधी तेवढंही नसतं. ती पात्रं, ते प्रसंग यांच्या जर गारुडात (प्रेमात म्हणणार होतो, पण त्यापेक्षा गारुड जास्त बरोबर आहे) सापडलो, तर पुन्हा पुन्हा वाचायला होतं. पात्रांची माणसं होतात. ती दिसायला लागतात. त्याहून वाईट म्हणजे ज्या जगात आपण जगत असतो, तेच जग त्या पुस्तकातल्या जगाची कच्ची, कमकुवत प्रतिमा वाटू लागतं.
Atlas shrugged आणि Fountainhead या कादंबर्या मी पन्नास पन्नास वेळा वाचल्या असतील. त्यांचं गारुड केव्हाच उतरलं; पण अजूनही 2 सप्टेंबर ही तारीख आली की ‘आज काय होणार?’ असा, एक प्रकारे भाबडा, बावळट विचार मनात येतोच येतो.
आयन रँडबद्दल आणखी नंतर केव्हातरी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment