Sunday, March 17, 2019
विज्ञानाचे बिनरहस्य
या लोकांना विज्ञान म्हणजे काय हेच मुळात कळलेलं नाही. किंबहुना विज्ञानाविषयी पूर्ण आचरट कल्पना, हे आपल्या समाजाचं एक लक्षण आहे. ‘तुझा विज्ञानावर विश्वास आहे की धर्मावर?’ असा प्रश्न उभा करणे, हे या लक्षणाचं एक रूप. जणू काही एका बाजूला धर्मग्रंथ आहे आणि दुसरीकडे विज्ञानाचं पुस्तक. परमेश्वराने, प्रेषिताने, ‘ज्ञानी पुरुषां’नी लिहून ठेवलेली काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली अमोघ वचनं एकीकडे आणि स्वतःच्या चुका सतत काढत बसलेलं वैज्ञानिक संशोधन दुसरीकडे. यातून निवड करायची आहे, असा हा चतुर पेच.
स्टीफन हॉकिंग याचं निधन झालं. एक मोठा वैज्ञानिक, मोठा विचारवंत गेला. त्यांच्यापाशी मर्म वेधण्याची आणि संवाद साधण्याची मोठी क्षमता होती. त्यांचं A Brief History of Time हे एक थोर पुस्तक आहे. इतक्या कमी जागेत आणि इतक्या सोप्या शब्दांत केलेलं इतकं सुंदर विवेचन माझ्या वाचनात नाही. एका ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, अॅरिस्टॉटलने समष्टीची विभागणी दोन भागात केली. चार द्रव्यं आणि त्यांवर काम करणारी दोन बलं. एक बल द्रव्यांना खाली खेचणारं (gravity) आणि दुसरं वर नेणारं (levity). मला हे खुळचट वाटलं. अॅरिस्टॉटलला जगाची, जग कसं चालतं याची फार कमी माहिती होती, पण लॉजिकची मोठी हौस होती; त्यामुळे बिचार्याने त्याच्या अल्पमाहितीनुसार काहीतरी मांडणी केली, असं मला झालं होतं. पण हॉकिंग म्हणतात, हे असे दोन भाग पाडणे, यात अॅरिस्टॉटलची प्रतिभा दिसते. त्यांनी असं म्हटल्यावर मला जाणवलं, की आपण अतिपरिचयाने गोष्टी गृहीत धरतो. Matter आणि forces यांचा वेगळा विचार आता आपण आपोआप करतो. पण आता मळून गेलेल्या या वाटेवर पहिलं पाऊल अॅरिस्टॉटलने टाकलं. आणि ती वाट विज्ञानाची पायाभरणी करणारी ठरली.
असं म्हटलेलं न आवडणारे लोक आहेत. आपल्या प्राचीन पूर्वजांना हे सर्व ज्ञान होतं आणि त्यांनी ते लिहूनही ठेवलं आहे; आपण करंटे म्हणून तिकडे लक्ष देत नाही, असं त्यांना वाटतं. मग पायथोगोरसचा काटकोन त्रिकोणाचा नियम कसा आपल्या गणितींनी अगोदरच वापरलेला होता, डाल्टनच्या कित्येक शतकं अगोदर कणादाने अॅटमची थिअरी कशी मांडली होती हे ते सोदाहरण सांगू लागतात. अलीकडेच न्यूटनच्या गतिविषयक नियमांचं मूळ संस्कृतात सापडल्याचा दावा करण्यात आला. या दाव्याचा वेगळेपणा असा, की ते संस्कृतातलं इथून ब्रिटनमध्ये न्यूटनकडे कसं पोचवण्यात आलं, याची कहाणीसुद्धा त्या दाव्याला जोडण्यात आली होती. बिनतोड पुरावा. तत्त्वज्ञानात आणि अध्यात्मात आपण ‘त्यांच्या’ पुढे आहोतच; विज्ञानातही होतो, अशी एकूण मांडणी. आपली आपण पाठ थोपटण्याचा प्रकार.
य
ा लोकांना विज्ञान म्हणजे काय हेच मुळात कळलेलं नाही. किंबहुना विज्ञानाविषयी पूर्ण आचरट कल्पना, हे आपल्या समाजाचं एक लक्षण आहे. ‘तुझं विज्ञानावर विश्वास आहे की धर्मावर?’ असा प्रश्न उभा करणे, हे या लक्षणाचं एक रूप. जणू काही एका बाजूला धर्मग्रंथ आहे आणि दुसरीकडे विज्ञानाचं पुस्तक. परमेश्वराने, प्रेषिताने, ‘ज्ञानी पुरुषां’नी लिहून ठेवलेली काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली अमोघ वचनं एकीकडे आणि स्वतःच्या चुका सतत काढत बसलेलं वैज्ञानिक संशोधन दुसरीकडे. यातून निवड करायची आहे, असा हा चतुर पेच.
विज्ञान पुस्तकांत असतं काय? विज्ञानाला पूर्ण स्वीकारल्याशिवाय या जगात काहीही करणं कोणाला तरी शक्य आहे काय? आपण रोज जेवतो. आज जे खाल्लं, ते पचलं, अंगी लागलं; ते उद्या आपल्याला विषकारक ठरणार नाही, हा विश्वास धरून आपण अन्न खात राहतो. कुठल्या विश्वासावर? बाजारातून आपण भाजी आणतो. काल एका किलोत जितकी साखर बसली, तितकीच आजही बसणार, हे आपण गृहीत धरतो. कशाच्या आधारावर? ‘आज जिन्याने न उतरता देवाचं नाव घेत खिडकीतून उडी घेऊ; तो नक्की आपल्याला सुखरूप खाली पोचवेल,’ असा प्रयोग आपण करत नाही - अशा भाकडकथा कितीही ऐकलेल्या असल्या तरी. उलट बाजूने झोपडीपासून गगनचुंबी इमारतीपर्यंत केलेलं बांधकाम वादळ, भूकंप असल्या अघोरी शक्तिमान घटनांविना स्वतः होऊन, सहज उडून जात नाही वा ढासळत नाही, याचं आपल्याला नवल वाटत नाही. का? तसं झालं, तर त्याची कारणं शोधण्याची इच्छा आपल्याला होते, ती तरी का? विश्वाचे व्यवहार आपल्याला नित्य अनुभवास येणार्या नियमांना धरून चालत राहतील या गृहितावर आपलं संपूर्ण जीवन आधारलेलं असतं. त्या नियमांचा भंग झाला, की आपल्याला पुन्हा कारणं शोधावीशी वाटतात. का म्हणून?
कारण जगाचे व्यवहार नियमांनी बांधलेले असतात, हे आपण सर्वजण धरून चालतो. झाडावरून तुटलेलं फळ खालीच पडणार, ते वर उडून जाणार नाही, हे ज्ञान काल चालायला लागलेल्या पोरालाही असतं.
हेच विज्ञान. ‘जगाचे व्यवहार नियमांनी बांधलेले असतात,’ ही जाणीव म्हणजे विज्ञानाची सुरुवात. व्याध हा तारा पहाटेच्या वेळी क्षितिजावर दिसू लागला, की उन्हाळा येण्याची वेळ आली, असं इजिप्तमधल्या शेतकर्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी व्याधाच्या दिसण्यावर त्याचं कॅलेंडर बांधलं. इथून विज्ञानाचा जन्म झाला, अशी एक थिअरी आहे. हे लक्षात येण्यासाठी अगोदर अनेक वर्षं त्या शेतकर्यांनी ते अनुभवलं असणार. गेल्या वर्षी झालं, तसं या वर्षी होईल का, ही उत्सुकता त्यांना वाटली असणार. तसं झाल्यावर त्यांचा विश्वास वाढला असणार. मग कोणीतरी त्यानुसार वागायचं ठरवून काही नियोजन केलं असणार. त्याचा आडाखा पुन्हा बरोबर ठरल्यावर इतरांनी त्याचं अनुकरण केलं असणार. वर्षानुवर्षं असं होत राहिल्यावर एका गावातून हे लोण दुसर्या गावात गेलं असणार. तिसर्या गावात पोचलं असणार. एक वैज्ञानिक नियम जन्माला आला, हे मात्र कोणाला सुचलं नसणार.
या साध्या सरळ साखळीचं रूपांतर आजच्या आपल्या समाजात थेट उलट कसं झालं, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. रोज सूर्य उगवतो, याला परमेश्वरी कृपा मानणारे आणि त्या कृपेमुळे उचंबळून येऊन कृतकृत्य होणारे अध्यात्मवादी सहज भेटू शकतात. आणि विज्ञान म्हणजे काहीतरी गहन, अवघड, अचाट; उदाहरणार्थ रॉकेट उडवणे, अणुबॉम्ब बनवणे, इंटरनेट, असं तर जवळपास सगळेच मानतात. निसर्गात नियम असतात, ते शोधता येतात, शोधून त्यांचा उपयोग करून घेता येतो, तसं करताना नियम अधिक पक्का सापडत जातो, त्या नियमाला एखादा फाटा फुटू शकतो, त्या फाट्याने पुढे गेल्यास असंख्य वाटा समोर येतात आणि शंभर वेळा रस्ता चुकल्यावर त्यातली एक वाट आपल्याला हवं तिथे घेऊन जाते. - हे विज्ञान! हेच विज्ञान. तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेलं हेच तर विज्ञान. आपण हा सरळ रस्ता सोडून का दिला? कधी सोडला? ‘विज्ञान म्हणजे अद्भुत, विज्ञान म्हणजे बुद्धिमंतांचं काम, विज्ञानाचा आपला संबंध नाही, आपण गाय, बैल, शेळ्या आणि मेंढ्या यांच्याच सारखे आहोत, विचार करणं आपलं काम नाही, विचारांचा पाठपुरावा करणं तर नाहीच नाही;’ असे बैलप्रकृतीचे स्वतःला आपण का मानतो?
वैज्ञानिक संशोधन करणारे कुणीतरी खास लोक असतात, आपल्यापेक्षा वेगळे असतात; असं मनात घट्ट बसलं, की प्राचीन संस्कृतात अमुक अगोदरच लिहून ठेवलेलं आहे, यावर विश्वास सहज बसतो. मुळात आपले पूर्वज आपल्यापेक्षा कितीतरी जास्त बुद्धिमान होते, ही आपली ठाम श्रद्धा. आणि विज्ञान हे बुद्धिमंतांचं काम, हे विधान त्या श्रद्धेला जोडलं की पुरे. आपण विज्ञानात जगतो आणि वैज्ञानिक शोध ही एक हळूहळू पुढे सरकणारी साखळी आहे, ही जाणीव आपल्या समाजातून कशी नष्ट झाली? बौद्धिक आळसातून झाली, की वस्तू आणि उत्पादनं यांवर अग्रहक्क सांगण्यासाठी सामान्य जनांना गाफील ठेवण्याच्या कावेबाज हितसंबंधातून झाली? की आपली भूमाता आपल्यावर कृपा करत राहिली आणि विचार करून, धडपडून नव्या वाटा शोधून जगणं सुसह्य करण्याची इथल्या बहुसंख्यांना गरजच पडली नाही, म्हणून?
येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतरच्या एक हजार वर्षांच्या काळाला युरोपच्या इतिहासात ‘Dark ages’ - कृष्ण युग - म्हणतात. या काळात बायबलशी विसंगत विधान करणे म्हणजे अधर्म, असा कडक दंडक होता. या गुन्ह्यासाठी अनेकांना जिवंत जाळलं गेलं. हाल हाल करून ठार मारण्यात आलं. चर्चची भयंकर दहशत होती. स्वतंत्र विचार, स्वतंत्र निरीक्षण मांडण्याची हिम्मत कोणामध्ये नव्हती. जवळ जवळ एक हजार वर्षं अशी वैचारिक अंधःकारात गेल्यावर चर्चची पकड सैल होऊ लागली. निकोलस कोपर्निकसचा जन्म 1473 मधला. ईश्वराने स्वतःची प्रतिमा म्हणून मानवाला घडवलं, या धार्मिक श्रद्धेला अनुसरून मानवाचा निवास असलेली पृथ्वी सर्व विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि चंद्र-सूर्यासह सर्व ग्रह तारे पृथ्वीभोवती फिरतात, असं त्या काळी मानलं जात असे आणि तसंच शिकवलं जात असे. कोपर्निकसने केलेल्या निरीक्षणांमधून त्याचं मत वेगळं पडलं. त्याच्या मते सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, असं जरी भासलं, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण धर्मविरोधी ठरवून ठार मारतील, या भयाने तो गप्प राहिला. अगदी मरायला टेकला, तेव्हा त्याने ही मांडणी करणारं त्याचं पुस्तक प्रसिद्ध करायला परवानगी दिली.
तरी त्या पुस्तकात ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते,’ असं म्हटलेलं नव्हतंच! पुस्तकात म्हटलेलं होतं की वास्तवात सूर्य पृथ्वीभोवती फिरत असला तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असं गृहीत धरून जर गणितं केली; तर मिळणारी उत्तरं निरिक्षणांशी जुळतात!
ही गोष्ट 1543 मधली. जोहान्स केपलरचा जन्म 1571चा. केपलर वयात येईपर्यंत कोपर्निकसच्या मांडणीवर युरोपातल्या विचारवंतांमध्ये घनघोर चर्चा झाली होती. उलट सुलट वाद झाले होते. गणितापुरतं खरं मानायचं आणि व्यवहारात वेगळंच धरायचं; यातला भोंदूपणा सामान्यांच्याही लक्षात येऊ लागला होता. विश्वाचं केंद्र पृथ्वीच, हा हट्ट सैल पडू लागला होता. ‘खर्या’ म्हणण्याला मान्यता मिळू लागली होती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असं म्हणणार्याला मृत्यूदंड न होण्याची शक्यता निर्माण झाली होती. केपलर खगोलशास्त्रज्ञ होता. कोपर्निकसचं पुस्तक अर्थातच त्याने वाचलेलं होतं. जेव्हा टायको ब्राहे या नामांकित खगोल निरिक्षकाने मरताना सगळे उच्चवर्गीय मदतनीस, शिष्य सोडून गरीब, सामान्य घराण्यातल्या केपलरच्या हवाली आपली निरिक्षणं केली; तेव्हा त्याच्या आसपासच्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. उमराव असलेला टायको ब्राहे सामान्य कुळातल्या केपलरशी प्रेमाने, बरोबरीच्या नात्याने वागत नसे. पण त्याने केपलरची योग्यता ओळखली असावी. केपलरने टायको ब्राहेचा विश्वास सार्थ ठरवला. पृथ्वी आणि इतर ग्रह यांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षा त्याने शोधून काढल्या. त्या कक्षांना गणितात बसवलं. केपलरच्या मांडणीमुळे कोणता ग्रह कधी कुठे होता आणि भविष्यात कुठे असेल, हे सांगता येऊ लागलं. ग्रहाला प्लॅनेट म्हणतात. प्लॅनेट म्हणजे भटक्या. आकाशातल्या गोलांपैकी काही गोल वर्षातल्या ठराविक दिवशी ठराविक ठिकाणीच असतात; पण काही नसतात. आपली जागा सोडून जाणार्या गोलांना ग्रीकांनी प्लॅनेट हे नावं दिलं. हे प्लॅनेट्ससुद्धा सूर्याभोवती फिरतात आणि त्यांची सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग हा असा असा आहे, असं गणितात मांडणारा केपलर पहिला. केपलरचा शोध तेव्हा अर्थातच महान मानला गेला.
कोपर्निकसच्या मांडणीने एका महान शोधाला प्रेरणा दिली होती.
केपलरच्या काळी खगोल ज्योतिषाला प्रतिष्ठा होती आणि खगोलशास्त्रीय गणितांना तितकीशी नव्हती. केपलरने ती मिळवून दिली. ग्रहांच्या कक्षांचं गणित मांडून केपलर स्वस्थ बसला नाही. ग्रहाची कक्षा कशी ठरते, ते अमुकच मार्गाने का फिरतात, हा प्रश्न त्याला सतावत होता. आणखी वीसेक वर्षं चिकाटीने संशोधन करून केपलरने शोधून काढलं की ग्रह सूर्याभोवती फेर्या मारत असताना त्याच्या प्रवासातले कोणतेही दोन बिंदू सूर्याशी जोडले, तर दोन सरळ रेषा आणि एक वक्र रेषा यांच्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ मिळतं, ते ग्रहाच्या वेगाशी जुळतं. ग्रह ठराविक काळात ठराविकच क्षेत्रफळ कापतो. म्हणजे, ग्रहाची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहे. आणि सूर्याच्या जवळ असताना ग्रहाचा वेग जास्त असतो. सूर्यापासून दूर गेल्यावर वेग कमी होतो. यामुळे वर दिलेलं क्षेत्रफळ समान राहतं.
केपलरच्याच एका शोधाने दुसर्या, अधिक खोल जाणार्या शोधाला वाट दाखवली होती.
विज्ञानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणा एकाचं नसतं. ‘मला साक्षात्कार झाला, तुम्हाला नाही झाला त्याला मी काय करू?’ असलं, बोलणार्याला भ्रमिष्ट ठरवू शकणारं भंपक विधान विज्ञान करत नाही. केपलरच्या गणितांना ग्रहांच्या परिभ्रमणाशी वारंवार ताडून बघितलं गेलं. केपलर बरोबर ठरला. म्हणून मग पुढचा प्रश्न उभा राहिला. ग्रह याच कक्षेत का फिरतात? खगोल वैज्ञानिकांचं सर्व विश्व या प्रश्नाच्या मागे लागलं. अनेक उत्तरं सुचवली गेली. पण विज्ञानात कशाचा स्वीकार करायचा आणि कशाचा नाही, हे सांगणारा किती वयस्क आहे, किती उच्चपदावर बसलेला आहे यावर ठरत नाही. ते थेट कॉमनसेन्सवर ठरतं. जे उत्तर निरिक्षणांशी जुळतं, ते स्वीकाराच्या उमेदवारीत पहिली परीक्षा पास होतं. त्या उत्तराचा उपयोग करून जर भविष्यातल्या घटनेचं नेमकं भाकीत करता आलं, की दुसरी परीक्षा पास. मग आणखी अचूक उमेदवार येईपर्यंत हे उत्तर ग्राह्य धरलं जातं. तसं उत्तर शोधण्याची धडपड चालू राहिली. विज्ञानात आणखी असं होतं, की चुकीची उत्तरं बिनकामाची ठरत नाहीत. ‘काय नाही’ हे त्यातून स्पष्ट होत जातं. समोर असलेल्या शंभर रस्त्यांपैकी एक एक बाद ठरत जातो. पुढच्या संशोधकांसाठी शोध अधिकाधिक सुलभ होत जातो.
केपलर 1630 मध्ये मरण पावला. आयझॅक न्यूटन 1642 मध्ये जन्मला. मानवाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक कोण, असा प्रश्न काही वर्षांपूर्वी जगातल्या थोर वैज्ञानिकांना विचारण्यात आला होता. त्यात न्यूटन पहिला आणि आईनस्टाईन दुसरा आला होता. तर, त्या आयझॅक न्यूटनने ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या कक्षांचं रहस्य उलगडलं. त्या रहस्याचं नाव अर्थात गुरुत्वाकर्षण. अवकाशातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकींना आकर्षित करतात आणि ते आकर्षण त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या सम प्रमाणात असतं; तर त्या वस्तूंमधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. सूर्याच्या आकर्षणामुळे ग्रह सरळ सूर्यावर जाऊन आदळत नाहीत, कारण ते गतिमान असतात. दगड हातात घेऊन सोडला तर तो सरळ रेषेत जमिनीकडे जातो. पण तोच दगड जर वेगाने भिरकावला, तर ताबडतोब खाली न जाता वक्र मार्गाने प्रवास करतो; तसंच.
केपलरच्या गणिती मांडणीने इतिहासातल्या एका महान शोधाला प्रेरणा दिली होती.
विज्ञानातल्या शोधाला कोणीही, तुम्ही किंवा आम्ही आव्हान देऊ शकतं. न्यूटनच्या शोधाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा ज्ञात असलेल्या प्रत्येक ग्रहाच्या कक्षेचं बारीक निरीक्षण करून न्यूटनच्या गणिताने येणार्या उत्तराशी ते निरीक्षण ताडून बघण्यात आलं. शनी की युरेनस, माहीत नाही; पण कुठल्यातरी एका ग्रहाचं भटकणं (planet या शब्दाचा अर्थ ‘भटक्या’ असा आहे, हे वर सांगितलंच) न्यूटनच्या गणिताशी जुळेना. उत्तर न जुळण्याची दोन कारणं शक्य होती. एक म्हणजे, गणित चुकीचं आहे. पण बाकीच्या ग्रहांच्या बाबतीत न्यूटन इतका बरोबर होता, की त्याचा नियमच चुकीचा आहे, असं ठरवण्यापूर्वी दुसरं कारण तपासणं गरजेचं होतं. ते जरा गोंधळाचं होतं. म्हणजे असं की शनीच्या पलीकडे आणखी एक वस्तू आहे, जिच्या आकर्षणामुळे शनी / युरेनस यांच्या फिरण्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे शनीची कक्षा गणितापेक्षा थोडी वेगळी सापडते आहे. समजा, असलं काहीतरी असलंच, तर ते नेमकं कुठे असेल? न्यूटनचं गणित जर पक्कं असेल, तर हेसुद्धा कळायला पाहिजे! किचकट गणित करून त्या अज्ञात वस्तूचं स्थान निश्चित करण्यात आलं. मग त्या दिशेने दुर्बीण लावली गेली.
हो, तिथे एक ग्रह होता. तोवर माहीत नसलेला. सूर्याभोवती फिरणारा. स्वतःच्या वस्तुमानामुळे जवळच्या फिरत्या वस्तूंच्या कक्षांवर सूक्ष्म का होईना, परिणाम घडवून आणणारा. त्याला नाव देण्यात आलं, नेपच्यून.
हा नवीन ग्रह अगोदर कागदावर आणि मग अवकाशात शोधण्यात आला. एका नवीन ग्रहाचा शोध एका वैज्ञानिक मांडणीच्या अचूकपणामुळे लागला.
तर लोकहो, विज्ञानात शोध हे असे लागतात. एक जण उभा रहातो. त्याच्या खांद्यावर दुसरा चढतो. त्या वरच्याला जास्त दूरवरचं दिसतं. हे दोघे स्थिर झाले की मग तिसरा येतो आणि दुसर्याच्या खांद्यांवर उभा राहतो. आपोआप आणखी दूर पाहतो. हे अर्थात चटपट होत नाही. सहज होत नाही. खांद्यांवर चढताना अनेक जण धडपडतात. ठेचकाळतात. पडतात. वर चढून दूर पाहणार्याचं नाव होतं. पण त्याच्या यशामागे अनेकांनी ‘काय केल्याने यश मिळत नाही,’ हे सांगणार्यांचं योगदान असतं.
तर लोकहो, एक कोणीतरी सकाळी उठला आणि संस्कृतात काहीतरी महान महत्त्वाचं बडबडला आणि झोपी गेला आणि ते बडबडणं म्हणजे वास्तवात एक महान शोध होता, असं जर कोणी सांगू लागला तर तो तुम्हाला मूर्ख समजतो आहे, असं समजा. न्यूटन होण्यासाठी अगोदर केपलर होऊन गेलेला असावा लागतो. केपलर शक्य होण्यासाठी कोपर्निकसची गरज असते. कोपर्निकस, केपलर, न्यूटन सगळ्यांनी आपापलं संशोधन लॅटिन या भाषेत मांडलं. युरोपभर सगळे असंच करत होते. त्यामुळे पोलिश कोपर्निकस, जर्मन केपलर आणि इंग्लिश न्यूटन अशी एक परंपरा घडू शकली. स्वतःला लागलेला शोध सर्वांच्या माहितीसाठी खुला करण्यातून. माहिती सर्वत्र पसरण्यातून. विचारांची देवाण घेवाण होण्यातून.
कोणीही स्वयंभू नसतो. आमचे पूर्वज स्वयंभू होते, कोणत्याही पूर्वपरंपरेविना, अगोदरच्या कोणीही पायाभरणी केलेली असल्याविना त्यांनी महामहान शोध लावून ठेवले आहेत आणि ते शोध संस्कृत पोथ्यांमध्ये घोरत पडले आहेत, असं सांगणारा मूर्ख आहे, असं निःशंकपणे समजा.
विज्ञान असं नसतं. ते मुळात महानतेत गुंडाळलेलंच नसतं.
आणखी उदाहरणं पाहू.
या देशात श्रद्धेचं, विचारशून्यतेचं इतकं स्तोम माजलेलं आहे की आपली जशी धर्मावर, धर्मग्रंथातल्या वचनांवर श्रद्धा असते; अगदी तशीच श्रद्धा विज्ञान मानणार्यांची विज्ञानावर असते. या विज्ञानाला श्रद्धेचा विषय बनवणार्यांचा देव असतो, आइनस्टाइन. कारण त्याने ‘सापेक्षता’ नावाची अद्भुत गोष्ट शोधून काढली. आजवरचा सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक कोण, ही पहाणी भारतात केली असती, तर आइनस्टाइनला न्यूटनपेक्षा खूप जास्त मतं मिळाली असती, यात शंका नाही. कारण न्यूटनचं गुरुत्वाकर्षण, त्याचे गतीचे नियम, प्रकाशाचं पृथक्करण, वगैरे गोष्टी ‘कळतात’, जगताना त्यांची प्रचिती घेता येते. सापेक्षता म्हणजे निव्वळ गूढ. (ही भावना सार्वत्रिक आहे. किती? एडिंग्टन नावाच्या फिजिक्सच्या वैज्ञानिकाला एकदा कोणीतरी विचारलं, ‘का हो, सापेक्षता समजणारे जगात फक्त तीनच लोक आहेत, असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?’ अहंकारी एडिंग्टन उत्तरला, ‘एक आइनस्टाइन, एक मी; तिसरा कोण असावा बुवा?’ असो.) तर आइनस्टाइनने सापेक्षतेचा शोध कसा लावला, याची सर्वसामान्य कल्पना अशी असते की स्वित्झर्लंडमधल्या एका पोस्ट ऑफिसात कारकुनी करत असताना आइनस्टाइन चिंतन करत असे. त्यातून सुचलेलं कागदावर उतरवत असे. आणि असं करता करता एके दिवशी त्याला साक्षात्कार झाला आणि सापेक्षतेचं समीकरण त्याच्यासमोर उभं राहिलं! जवळ जवळ दैवी देणगी म्हणावी अशी गोष्ट त्याला प्राप्त झाली! पण स्वर्गातली गंगा अंगावर घेणं जसं एका शंकरालाच शक्य होतं, तसंच आइनस्टाइनचं होतं. त्याच्या अचाट बुद्धिमत्तेमुळेच हे शक्य झालं. दुसर्या कुणाला हे ज्ञान झेपलंच नसतं.
असं काय जगावेगळं होतं सापेक्षतेत?
पदार्थ वेगाने प्रवास करू लागला की पदार्थाची लांबी कमी होऊ लागते!
पदार्थ वेगाने प्रवास करू लागला की कालप्रवाह मंद होऊ लागतो!
याचा अर्थ गणितात लागत असेल, विज्ञानकथांमध्ये दिसत असेल; पण तुम्ही आणि आम्ही कसं काय हे पचवायचं?
असो. आपण सापेक्षतेचा सिद्धांत कसा घडला, याविषयी विज्ञानाचा इतिहास काय सांगतो, हे पाहू.
1786 मध्ये गॅल्वनी या इटालियन वैद्याला असं आढळलं की मेलेल्या बेडकाच्या पायाला सुरीने स्पर्श केला की तो पाय झटकतो. गॅल्वनीला वाटलं, बेडकात, म्हणजेच प्राण्यांमध्ये एक प्रकारची विद्युतशक्ती असते. (या शोधाला प्रसिद्धी मिळाली आणि अमाप लोकप्रियतादेखील मिळाली. या ‘प्राणिज’ विद्युतशक्तीच्या सहाय्याने प्रयोगशाळेत सजीव निर्माण करण्याची कल्पना त्या काळातल्या लेखक लोकांना फारच पसंत पडली. मेरी शेलीने लिहिलेली कादंबरी तर आजतागायत लोकप्रिय आहे. त्या कादंबरीत असा प्रयोग करून फसणार्या शास्त्रज्ञाचं नाव आहे, फ्रँकेन्स्टाइन.) पण सहाच वर्षांनी वोल्टा, या दुसर्या इटालियन वैज्ञानिकाने दाखवून दिलं की सुरी आणि बेडकाला ज्यात ठेवलं आहे, ते ताट: हे वेगवेगळ्या धातूचे असले की बेडकाच्या ओल्या शरिरामुळे वीज तयार होते. बेडूक महत्त्वाचा नाही, वेगळे धातू आणि ओलेपणा, यांना महत्त्व आहे.
ही होती, प्रवाही विद्युतशक्तीची सुरुवात. वैज्ञानिकांना काही नवीन सापडलं की हुरूप येतो! दोन प्रकारचा. एक म्हणजे, त्या शोधाला काही उपयुक्त अंग आहे का, याचा शोध घेण्याचा. आणि दुसरा प्रकार म्हणजे, ठीक आहे, पुढे काय?
तर फॅरडेने विद्युतप्रवाहाचे नियम शोधले. वीज आणि चुंबकत्व यांचा संबंध दाखवून दिला. तारेच्या वेटोळ्यामधून लोहचुंबक मागेपुढे केलं (किंवा चुंबक एका जागी ठेवून तारेचं वेटोळं मागेपुढे केलं) की तारेत विजेचा प्रवाह तयार होतो, हे त्याने प्रयोगाने सिद्ध केलं. फॅरडे केवळ प्रयोग करणारा वैज्ञानिक नव्हता. एकमेकांशी घट्टपणे जोडलेली ही वीज आणि चुंबकीय शक्ती केवळ चुंबक आणि वेटोळं, यांच्यापुरती नसते; तर सभोवतीच्या अवकाशात पसरलेली असते, असंही त्याने मांडलं.
ही गोष्ट 1830-40 ची. फॅरडेचं म्हणणं तेव्हा कोणी फार मनावर घेतलं नाही. फॅरडे तर असंही म्हणाला होता की वीज, चुंबक आणि प्रकाश यांचा जवळचा संबंध असावा! त्याचं म्हणणं बाजूला ठेवून वैज्ञानिक लोक चुंबक आणि वीज कोणत्या स्थितीत कसे वागतात, त्यांच्या वागण्यात काही नियमितता आहे का, वगैरे शोधण्याच्या मागे लागले. गाउस आणि अॅम्पियर यांनी यात मोठं काम केलं. आणि चुंबकशक्ती, विद्युतशक्ती, प्रकाश या सगळ्यांची एकत्र मोट बाधण्याचं काम मॅक्सवेलने केलं. जेम्स क्लार्क मॅक्सवेल फिजिक्सवाला होता आणि गणितवालासुद्धा होता. त्याने गुंतागुंतीची समीकरणं मांडून म्हटलं की विद्युतचुंबकीय लहरी आणि प्रकाश वेगळे नाहीत, एकच आहेत.
हे गणितात ठीक होतं; पण प्रत्यक्षात एक प्रॉब्लेम होता: प्रकाश अंतराळातून प्रवास करतो. अंतराळात हवा नाही, काहीच नाही. मग तिथे लहरी निर्माण होतात, त्या कशात? काहीतरी हवंच की ज्याच्यात लाटा तयार होतात आणि त्यातून प्रकाश पुढे सरकतो.
यावर वैज्ञानिकांनी एक उत्तर शोधलं. ते म्हणजे इथर. आपल्याला दिसत, जाणवत नसलं तरी संपूर्ण अवकाश इथरने व्यापलेला आहे. त्या इथरमध्ये प्रकाशाच्या लहरी उठतात.
वैज्ञानिकांची गोची अशी की ते पक्के अश्रद्ध. त्यांना सगळ्या गोष्टींचं प्रमाण लागतं. एखादा नियम जोपर्यंत बरोबर उत्तरं देतो आहे, जोपर्यंत अचूक आडाखे बांधतो आहे, तोपर्यंत तो नियम बरोबर आहे, असं धरून चालायचं. पण म्हणून स्वस्थ बसायचं नाही, त्याचं ठोस प्रमाण शोधत रहायचं. मॅक्सवेलचे नियम 1860 मधले. ते विद्युतचुंबकीय शक्तीला, वीजप्रवाहाला, प्रकाशाला अचूक लागू होतात, हे निर्विवाद सिद्ध झालं; पण म्हणून वैज्ञानिक शांत झाले नाहीत.
सर्व विश्व इथरने भरलेलं आहे, ही संकल्पना तशी जुनी. रोमर या डॅनिश वैज्ञानिकाने पॅरिसच्या वेधशाळेत काम करत असताना 1676 साली मांडलं की आपल्याला तसं वाटलं तरी प्रकाशाचा वेग अनंत नाही. ज्या क्षणी प्रकाश निघतो, त्याच क्षणी तो अवकाशात सगळीकडे पोचतो, असं नाही. लांब अंतर कापायला प्रकाशाला जास्त वेळ लागतो. हा शोध त्याने गुरु या ग्रहाभोवती फिरणार्या चंद्रांच्या (पृथ्वीभोवती जसा चंद्र फिरतो, तसे गुरु या ग्रहाभोवती अनेक ‘चंद्र’ फिरतात. त्यातले चार मोठे आहेत. दुर्बिणीतून सहज दिसतात.) ग्रहणांचं निरीक्षण करून लावला. पॅरिसच्या वेधशाळेच्या संचालकाने जरी तो मान्य केला नाही तरी न्यूटनसारख्यांनी त्याला मान्यता दिली. मग प्रश्न आला, प्रकाश इथून तिथे नेणारं माध्यम काय? उत्तर सुचलं, इथर. तोपर्यंत पृथ्वी अखिल विश्वाच्या केंद्रस्थानी नाही, हे वैज्ञानिकांनी, जगभरच्या विचारवंतांनी स्वीकारलं होतं. त्यामुळे हे इथर पृथ्वीच्या भोवती स्थिर असतं आणि त्याचमुळे बाकी सर्व आकाशस्थ ग्रहगोलांच्या बाबतीत प्रवाही असतं, याला मान्यता मिळाली नाही. पण याचाच अर्थ असा होत होता की सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेत कधीतरी पृथ्वी इथरच्या दिशेने आणि कधी विरुद्ध जात असली पाहिजे. खूप प्रयोग झाले. पण त्या काळातली मोजमाप करणारी यंत्रं फारशी बिनचूक नसल्यामुळे सापडलेल्या उत्तरांना काही अर्थ नव्हता. लक्षात घ्या, प्रकाशाचा वेग पृथ्वीच्या वेगाच्या एक लाख पटीपेक्षा जास्त आहे! म्हणजे प्रकाशाच्या वेगाचं मोजमाप एक टक्का जरी कमीजास्त होणार असेल, तरी येणार्या उत्तराला अर्थ उरत नाही.
पुढे. मायकेलसन आणि मोर्ले या वैज्ञानिकांनी शोध नाही लावले; पण बिनचूक मोजमाप घेण्यात या दोघांचं विज्ञान जगतात मोठं नाव होतं. 1881 मध्ये जर्मनीत मायकेलसनवर इथरचं अस्तित्व शोधण्याच्या प्रयोगाची जबाबदारी सोपवण्यात आली. मायकेलसनने 1881 मध्ये हा प्रयोग जर्मनीत केला. 1886 मध्ये दोघांनी पुन्हा अमेरिकेत केला. त्यांच्या तयारीविषयी, प्रामाणिकपणाविषयी कोणाला शंका नव्हती. त्यामुळे प्रकाश सोडणारी वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत असो की पृथ्वीपासून दूर जात असो; दोन्हीकडून येणारा प्रकाश एकाच वेगाने पृथ्वीवर पोचतो, असं उत्तर जेव्हा मिळालं, तेव्हा वैज्ञानिक बावचळून गेले. प्रयोगात कमी-जास्त होत असतं. मायकेलसन-मोर्ले यांच्या प्रयोगातही झालं. पण त्यांनी वापरलेली उपकरणं, त्यांनी अवलंबलेली कृती आणि त्यांचं गणित हे सर्व लक्षात घेता, इथरच्या अस्तित्वावर प्रकाश टाकेल, असा पुरावा मिळत नसल्याचंच त्यांना जाहीर करावं लागलं. फिजिक्सच्या इतिहासातल्या फसलेल्या प्रयोगांपैकी सर्वात जास्त गाजलेला प्रयोग, अशी कीर्ती मायकेलसन-मोर्ले यांच्या या प्रयोगाला मिळाली!
पृथ्वीचा इथरमधून प्रवास करण्याचा वेग मोजण्याचे प्रयोग होत राहिले. प्रकाशाचा वेग तेवढाच का निघतो, याची उत्तरंही मांडली जात राहिली. पण पूर्ण समाधानकारक उत्तर हाती यायला वीस वर्षं जावी लागली. दरम्यान लोरेन्झ आणि पॉइनकार यांनी भलतंच काही तरी सुचवलं. ते म्हणाले, वेगाने प्रवास करणार्या वस्तूची लांबी (प्रवासाच्या दिशेने) कमी होते! ते असंही म्हणाले, कालप्रवाहाचा वेग मात्र कमी होतो!
आइनस्टाइनने हेच तर म्हणतो त्याच्या सापेक्षतेत!
(वास्तविक ऑलिवर हीविसाइड याने 1888 मध्येच शोधून काढलं होतं की स्थिरविद्युत क्षेत्राची लांबी गतीच्या दिशेने कमी होत असते! पण तेव्हा सर्व पदार्थांच्या अंतरंगी विद्युतशक्तीने भारलेले - व न भारलेले - कण असतात, याचं स्वप्नही कोणाला पडलं नव्हतं. त्यामुळे हीविसाइडचा शोध लोरेन्झचं लक्ष जाईपर्यंत पडून राहिला!)
म्हणजे आइनस्टाइनने जगावेगळं, तोपर्यंत कोणाला अजिबात न सुचलेलं, केवळ ईश्वरी साक्षात्काराशी तुलना करता येईल, असं काहीतरी सांगितलं, यात तथ्य नाही! त्याने फक्त प्रयोगांमधून हाती येणार्या निरीक्षणांचा तर्कशुद्ध खुलासा करणारं फर्मास गणित मांडलं. इतकं फर्मास की ते धुडकावून लावणं विज्ञान जगताला शक्य नव्हतं. आइनस्टाइन हा ‘देव’ वा साक्षात्कारी पुरुष नव्हे! इतर सर्व वैज्ञानिकांप्रमाणे तोसुद्धा अगोदरच्या वैज्ञानिकांच्या खांद्यावर उभा राहून अधिक दूर बघणारा बुद्धिमान वैज्ञानिक होता. त्याचा मोठेपणा हा की कॉमनसेन्सला न पटणारं गणित चोख मांडण्याचं - म्हणजे स्वत:च्या तर्कावर ठाम रहाण्याचं - धाडस त्याच्याकडे होतं.
गॅलिलिओने सुरुवात केली, पुढचं पाऊल कोपर्निकसने टाकलं. कोपर्निकसच्या खांद्यावर केपलर उभा राहिला. केपलरने घातलेल्या कोड्याची उकल न्यूटनने केली. अशीच साखळी गाउस, रीमान, मॅक्स्वेल, मायकेलसन-मोर्ले यांच्यातून आइनस्टाइनपर्यंत जाणारी. कोणीही स्वयंभू नाही. कोणाचाही शब्द ‘अंतिम’ नाही.
आपल्याकडे भास्कराचार्य की आणखी कोणी ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे किंवा ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान केलं आहे, असं म्हणतात. भास्कराला हे कुठून सुचलं? तो कोणाच्या खांद्यावरून हे म्हणाला? भास्कराने गणितात, तर्कात मांडणी केली की कविकल्पना मांडली? त्याच्या प्रतिपादनाचं पुढे काय झालं? काहीच झालं नाही? का काहीच झालं नाही? त्याला तेव्हाच्या तथाकथित वैज्ञानिकांनी वेड्यात काढलं का? की लक्षच दिलं नाही? आपल्याकडे ज्ञान तपासण्याची रूढी होती की नव्हती? आपल्याकडे ज्ञान मिळवण्याची रीत काय होती?
पाठांतर? पाठांतरातून जे अगोदर आहे, तेच पक्कं घोटवलं जाणार. नवीन कसं काय मिळणार? नवीन काही शोधणं सापडणं राहिलं दूर; पाठांतरामुळे माहीत असलेलं घोकून विचार करण्याची कुवत सुकून सडून जाते. कुणीतरी अगोदर लिहून ठेवलेलं, करून ठेवलेलं असेल, तरच ते पाठ करता येणार ना! पाठांतरात स्वत:ची भर घालण्याला बंदी असते. पाठांतर करणारा त्या अगोदर करून ठेवणार्याच्या मळल्या वाटेनेच जाणार. नवीन विचार, नवीन वाट, नवीन शोध काही नाही. पाठांतर हा हळू हळू बुद्धी भ्रष्ट करून ज्ञानापासून दूर नेणारा रस्ता आहे.
दिव्यदृष्टी? जे अजून विज्ञानाला सापडलेलं नाही, ते आपल्याकडच्या दिव्यदृष्टीधारकांना सांगता येईल का? म्हणजे अणू फोडून जेवढी ऊर्जा मिळते, त्यापेक्षा खूप जास्त ऊर्जा दोन अणू एकत्र येतात तेव्हा बाहेर पडते. प्रचंड काळ प्रचंड प्रमाणात ऊर्जा फेकत असलेल्या सूर्याच्या अंतरंगात हेच होत असतं. पण या प्रक्रियेला दावणीला कसं बांधायचं, हे अजून वैज्ञानिकांना जमलेलं नाही. ते कुणी साक्षात्कारी बुवा वा माताजी उलगडून दाखवेल का?
कोणीतरी सूक्ष्म देहाने मंगळावर जाऊन येतो आणि त्याच्या अनुभवाचं पुस्तक प्रसिद्ध होतं. ठीक आहे, जगाला माहीत असलेल्या भौतिकशास्त्रात हे बसत नाही. आपण म्हणू, हे कृत्य भौतिक नाही. सूक्ष्म देहाने अंतर ओलांडणे म्हणजे आख्खा वस्तुमानाने भरलेला देह घेऊन इथून तिथे जाणे नव्हे. ठीक आहे; काय नाही हे कळलं; काय आहे, हे कुणी सांगेल का? हे कसं साध्य होतं, याची प्रोसेस विशद करेल का? मला तो अनुभव घ्यायचा असेल, तर मी काय करायला हवं?
यावर सांगण्यात येतं, ही सिद्धी आहे. ती सोम्यागोम्याला प्राप्त होत नाही. त्यासाठी मोठी साधना लागते. किंवा कुण्या सिद्धपुरुषाची कृपा व्हावी लागते.
याला विज्ञान म्हणत नाहीत. विज्ञान तपासता येतं. विज्ञान सगळ्यांचं असतं. विज्ञानाची रीत सांगता येते आणि कुणालाही करून बघता येते. आपल्याकडे ‘ज्ञान’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘आत्मज्ञान’ असा आहे. जे एकेकाला होतं. आपल्या संस्कृतीत विज्ञान नाहीच. त्यामुळे आपल्या लोकांच्या मानसिकतेत विज्ञान रुजतच नाही. लोकांना साक्षात्कार कळतो, अनुग्रह समजतो, गुरुकृपा कळते; पण विज्ञान काही केल्या डोक्यात शिरत नाही.
तळपदे यांनी राइट बंधूंच्या अगोदर मुंबईत चौपाटीवर विमान उडवण्याचा प्रयोग केला, असं सांगितलं जातं. तेव्हा न्यायमूर्ती रानडे आणि इतर प्रतिष्ठित लोक हजर होते, असंही सांगितलं जातं. त्यांची उपस्थिती हा या घटनेच्या विश्वसनीयतेचा पुरावा. तळपदे यांच्या विमानाचं डिझाइन हा जास्त खरा पुरावा नाही का? कुठे आहे ते डिझाइन? तळपद्यांनी लिहून ठेवलेलं असेल ना? एडिसनने लाइट बल्बचा शोध लावला. वापरता येईल असा बल्ब सापडेपर्यंत त्याने शेकडो प्रयोग केले होते. शेकडो अपयशांनंतर त्याला यश मिळालं. तळपद्यांनी विमान तयार करताना काय प्रयोग केले? विज्ञानात प्रयोग करताना नोंदी ठेवण्याला फार महत्त्व असतं. तळपद्यांनी ठेवल्या असतील ना नोंदी? त्यांचं विमान खेळण्यातलं, हातात मावण्याएवढं असतं, तर त्याकडे कोणी ढुंकून पाहिलं नसतं. म्हणजे ते मोठं असणार. कुठे ठेवलं होतं ते? एकदा उडवल्यावर पुढे काय केलं त्याचं? त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न नाही केला?
आता शाळा-कॉलेजांमधल्या विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये आपल्या भूतकाळातल्या वैज्ञानिक शोधांविषयी, मांडणीविषयी माहिती असणार आहे. चांगली गोष्ट आहे. त्या माहितीत शोध लावण्याची प्रोसेससुद्धा असायला हवी. कुणीतरी ऋषी ध्यान लावून बसला आणि हा किंवा तो किंवा तो तिसरा देव प्रसन्न होऊन त्याने त्या ऋषीला ज्ञान दिलं, असं नको. जेम्स वॉटला चहाच्या किटलीतून बाहेर पडणार्या वाफेकडे बघून इंजिनाची कल्पना सुचली. कोंडलेल्या वाफेत प्रचंड ऊर्जा असते, इथून त्याने सुरुवात केली आणि वाफेवर चालणारं इंजीन शोधलं. न्यूटनच्या म्हणे डोक्यात झाडावरून सफरचंद पडलं आणि ‘हे खालीच का पडलं?’ हा प्रश्न त्याला पडला. तिथून म्हणे तो गुरुत्वाकर्षणापर्यंत पोचला. अत्यंत सूक्ष्म पदार्थांच्या निरिक्षणासाठी वापरला जाणारा सूक्ष्मदर्शक (थोडाफार बदल करून) गॅलिलिओने आकाशाकडे धरला आणि त्याला गुरुचे चंद्र आणि शनीची कडी यांचं दर्शन घडलं. तिथून तो ग्रहगोलांच्या भ्रमंतीकडे गेला.
एक गोष्ट ज्ञात होती; तिथून सुरुवात झाली आणि नवीन, अज्ञात गोष्टीकडे माणूस गेला.
आपल्याकडे हेच घडलं का? हीच रीत होती का इथल्या ज्ञानसंपादनाची? मग हेसुद्धा कुठेतरी लिहून ठेवलेलं असेलच ना? ते सांगा. आणि ही रीत नसेल, तर कोणती रीत होती, ते सांगा. आपण त्या रीतीचं पेटंट घेऊ. ती रीत जर प्रयोग, तपासणी, पुन्हा प्रयोग, जाहीर उलटतपासणी, परत प्रयोग, पडताळणी, या रूढ रीतीपेक्षा शॉर्टकट देणारी असेल, तर आपण वेगाने इतरांच्या पुढे जाऊ.
पण रीत हवी! साक्षात्कार नको! ज्ञान म्हणजे मूठभरांची मक्तेदारी नको. ज्ञान म्हणजे कुण्या एकाला मिळणारं घबाड नको. ज्ञान म्हणजे थोतांड नको. ते खूप झालं. रामायण-महाभारतातली अस्त्रं आणि वर-शाप नको. ते थोतांड नको. अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथांमधला उडता गालिचा आणि अं
गठीतला राक्षस यांना अरब ‘गोष्टी’ म्हणतात. आपण का थोतांड कवटाळून बसलो आहोत?
अगदी गाभ्याचा प्रश्न आहे, ज्ञान मिळवण्याची प्रोसेस काय असते?
Subscribe to:
Post Comments (Atom)
नीट दिसत नाहीये... fontची काहीतरी गम्मत येतेय. फफ, क्रोम मध्ये. दोन्हीकडे पाहिलं.
ReplyDelete