Sunday, April 11, 2021

.पिफ २०२१ (भाग १)

फेसबुक हे व्यसन आहे. आणि हे विधान व्यंगात्मक नाही, ते पूर्णांशाने खरं आहे. व्यसनाचे सर्व पैलू फेसबुकविषयी वाटणाऱ्या आकर्षणाला लागू पडतात. तर, फेसबुकच्या नादात गुरफटून ब्लॉग साफच मागे राहिला. काही शहाणी मित्रमंडळी फेसबुकावर नाहीत, त्यांच्यापर्यंत पोचण्याचा ब्लॉग, हा एक मार्ग होता, त्यावर गंज चढला.

तर पुन्हा एकदा ब्लॉग. नवीन काही नाही, फेसबुकावर टाकून झालेला मजकूरच इथे टाकणार आहे. पुढे कदाचित इथे अगोदर आणि फेबुवर नंतर, असंही होऊ शकेल. बघू.

सुरुवात पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (पिफ) २०२१ ने करतो आहे. यातले बावीस चित्रपट मी घरी, ऑनलाइन बघितले. त्यातल्या प्रत्येकावर स्वतंत्र लिहिलं आणि सगळ्यांचा मिळून आढावा घेणारा लेखसुद्धा लिहिला. ते स्वतंत्र लेख अगोदर ब्लॉगवर प्रकाशित करत आहे. स्वत:चा ब्लॉग आणि त्यावर मजकूर टाकण्याला ‘प्रकाशित करणे’ असा शब्दप्रयोग आगाऊ वाटतो!

१.

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू झाला! घरच्या घरी बसून लॅपटॉपवर सिनेमे बघतो आहे.

पण हे काही खरं नाही. फिल्म फेस्टिवलचं अर्धं आकर्षण तिथलं वातावरण, तिथे भेटणारे-दिसणारे सिनेमावाले, त्यांच्याशी होणारी चर्चा, यात असतं. गोव्यात आणि पुण्यात किती फरक! पुणेवाले जास्त चिकित्सक. त्यांची निवड उजवी, चित्रपटीय दृष्टीतून जास्त समावेशक. त्याच वेळी निष्ठावंत पुणेकर दोन दोन तास सिनेमा हॉलच्या बाहेर रांगा लावणार. तुम्हाला पाय मोकळे करायचे असतील, कोणाला भेटायचं, वगैरे असेल; तर हवा तो चित्रपट बघायला मिळण्याची खात्री नाही. ती खात्री हवी असेल, तर तुम्हीसुद्धा रांगेत उभं रहाण्याची तपश्चर्या करा.

असो, घरबसल्या बघताना हे नाही आणि समर नखातेंच्या मागे मागे फिरणारा तरुण सिनेशौकिनांचा, एफटीआयआयवाल्यांचा घोळकाही नाही.

पण चित्रपट तर आहेत! सजावट नसेल, मखर नसेल; मूर्ती तर आहे!

काल पहिला चित्रपट पाहिला, लैला इन हायफा. इस्राएलमधल्या हायफा या बंदरगावात घडणारं कथानक. बंदरगाव म्हटलं, तरी हायफा हे इस्रएलमधलं एक मोठं शहर आहे. तिथल्या एका क्लबात रात्रभरात ही गोष्ट घडते. तो क्लब म्हणजे तिथल्या उच्चभ्रू लोकांची विरंगुळ्याची जागा असते. तिथे एक आर्ट गॅलरी असते आणि एक गे बारही असतो. मुख्य म्हणजे तिथे पॅलेस्टेनियन आणि इस्रायली मोकळेपणाने एकत्र येत असतात. लैला त्याची मालकीण. पॅलेस्टेनियन. तिचा नवरा धनाढ्य. आर्ट गॅलरीत एका इस्रायली फोटोग्राफरने काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन सुरू होत  असतं. (फोटो पोलिसांचे नाहीत; केवळ पॅलेस्टेनियन बंडखोरांचे) त्याची आणि लैलाची बऱ्यापैकी सलगी दिसते. तिथे त्याला त्याची सावत्र बहीण भेटायला येते आणि नवरा लक्ष देत नाही; त्याच्या कामात मला रस नाही, हे त्याला सहन होत नाही, अशी तक्रार करते. पुढे तिथल्या एका पॅलेस्टिनियन तरुणीला रिलेशनशिप म्हणजे काय, हे सुनावते आणि तिच्या ओठांचं चुंबन घेऊन दूर होते. आणखी पुढे एका अरबाशी फ्लर्टिंग करते आणि ताबडतोब क्लबशेजारी उभ्या केलेल्या गाडीत शिरून दोघे सेक्स करतात. लैलाच्या नवऱ्याकडे एक जण खंडणी मागते पण त्याने धुडकावल्यावर निघून जाते. क्लबमध्ये एक अनोळखी स्त्री-पुरुष डेटवर भेटतात, त्यात ती इस्रायली पण वयस्क आणि तो तरुण पण अरबी, असे असतात.

वगैरे.


 

चित्रपटातली मुख्य पात्रं केवळ तरल, संवेदनशील वचनं एकमेकांना फेकून मारतात, हे खटकलं. कदाचित चित्रपटाचा नीट आस्वाद घेण्यासाठी राजकारण, सामाजिक ताणतणाव, सरकारी धोरण आणि वैयक्तिक संबंध यांच्यातला विरोध, असल्या स्थानिक गोष्टींची नीट माहिती असणं आवश्यक असेल. तरी इस्रायल आणि पॅलेस्टाइन आणि तिथलं वातावरण यांच्याविषयीचे रोमँटिक समज पातळ व्हायला अशा चित्रपटांची मदत होतेच.

२.

घरी बसून स्वत:च्या फुरसतीने सिनेमे बघण्याचे फायदेतोटे असतात. एक म्हणजे खरंच स्वत:ची सोय बघता येते, सिनेमा अर्जंट कामांच्या आड येत नाही. पण मन चटकन याला निर्ढावतं आणि अर्जंट बिर्जंट विसरून सगळी छोटी-मोठी, महत्त्वाची-क्षुल्लक कामं उरकण्याकडे कल होतो. कारण रात्र आपलीच असते! आणि मोकळी असते. परिणामी रोज अपरात्र होते. हे वारंवार झेपत नाही. मन आणि शरीर यांच्यात द्वैत होणं परवडत नाही.

असो. फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी चार चित्रपट पाहिले. पहिली एक डॉक्युमेंटरी होती. ‘ब्लू आइज अँड कलरफुल माय ड्रेस’. एक दोन किंवा तीन वर्षांची मुलगी एकटी बागडते आहे. बाहेर. बागेत, मैदानात, खेळाच्या कोर्टवर, इमारतींच्या आवारात, क्वचित रस्त्याच्या फूटपाथवर. कधी एकटीच चेंडूशी खेळते, कधी गुणगुणते, कधी कोणाही मुलामुलीशी सलगी करून दोघांचे खेळ खेळते, कधी दुसऱ्याचं खेळणं घेते, वगैरे. या डॉक्युमेंटरीला व्हॉइसओव्हर नाही. म्हणजे कॅमेऱ्यात येणारी पात्रं (जी अर्थातच सगळी खरी आहेत) जे बोलतील, आवाज काढतील; तेच आपण ऐकतो. कुठल्याही दृश्याचा कसलाही खुलासा होत नाही. ही मुलगी एकटी का? कोणी दिलेलं आइसक्रीम, वगैरे ती खाते; पण तिच्याकडे खायला काहीच नसतं, असं का? तिच्या घराचा काहीही खुलासा नाही, पण एकदा ती छोट्या बाहुल्या घेऊन कुटुंबियांची घेतल्यासारखी नावं घेते.  ती कविता म्हणते; त्या ती कुठे शिकली?


 

लहान मुलांचं जग. एरवीच्या जगात जसे झाडं-प्राणी-पक्षी-वस्तू असतात, तसंच इथे काही वेळा मोठी माणसं असतात. पण जग लहान मुलांचंच, विशेष करून तिचंच. निरागसता म्हणजे काय याचा वस्तुपाठ. कावलेल्या मनासाठी उत्तम औषध.

आपल्याकडेअसा सिनेमा होऊ शकेल? अमेरिकेत लहान मुलांना असं एकटं सोडत नाहीत, अनोळखी बालकाला कुरवाळणं चक्क संशयास्पद मानतात, असं ऐकून आहे. आपल्याकडे? मुंबईसारख्या शहरात रस्त्यावरच रहाणारी, वाढणारी मुलं कुठल्याही सार्वजनिक बागेत, मैदानात, रस्त्यावरबऱ्याघरातल्या बालकांशी मिसळू कतील, अशी कल्पना करता येत नाही.

पण काही प्रश्न पडू लागतात. ती मुलगी एकदाही कॅमेऱ्यात बघत नाही, हे कसं जमवलं असेल? बाकी मुलामोठ्यांपैकीसुद्धा एखाद्दोन जर कॅमेऱ्यात बघतात. ते एडिट केलं असेल, तर फारच नीट केलं आहे.

३.

फनी बॉय

हा चित्रपट श्रीलंकेत घडतो. तिथे तमिळ विरुद्ध सिंहली ही यादवी सुरू होण्याच्या काळात. कॅनडामधून परत येऊन कोलंबोमध्ये राहू लागलेलं एक तमिळ कुटुंब. श्रीमंत. घर भलं मोठं, तोंडात सहज इंग्रजी, वगैरे; पणआपण तमिळी आहोत, सिंहली नाही,’ ही अस्मिता कायम फणा काढून. एक सर्वसाधारण सिंहली म्हणतो तसं: A minority with a majority complex!

अर्थात त्यांच्यातही समस्या आहेत. एकीला एक सिंहली मुलगा आवडू लागतो, तर ते प्रकरण मोडून काढलं जातं. एकाला शाळेच्या वयापासूनच मुलींसारखं रहायला, मुलींमध्ये वावरायला आवडत असतं आणि पुढे मोठा होऊन तो गे होतो. या समस्यांना तोंड देत असताना तमिळींविरुद्ध प्रचंड हिंसा उसळते आणि संपूर्ण कुटुंब त्यात होरपळून निघतं. शेवटी सगळं सोडून कॅनडाला निघून जातं.

दीपा मेहता दिग्दर्शितफनी बॉयएका कादंबरीवर आधारित आहे. सरळसोट आहे. तरलता शक्यतो दूर राखली आहे. एकरेषीय प्रवास करताना एका वेळी दोन विषयप्रवाह एकमेकांत मिसळू दिलेले नाहीत. अभिनसुद्धा तसाच, एकरेषीय आहे


 

आणखी एक. संपूर्ण निवेदन तमिळ दृष्टिकोनामधून आहे. सिंहली हे खलप्रवृत्तीचे आणि बिचारे तमिळ छळ भोगणारे, असा स्पष्ट रोख आहे. कदाचित कादंबरी तशीच असेल. पण दिग्दर्शकाने त्याचा इतका स्वीकार करावा का, असा प्रश्न पडतो. कारण अशा एकांगी चित्रणावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. चित्रपटात, साहित्यात एक मध्यवर्ती व्यक्तिरेखा असते आणि वाचकाला त्या व्यक्तिरेखेशी समरस होऊन जग दाखवण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक करत असतो. पण थोडा इतिहास, थोडी पार्श्वभूमी माहीत असल्यावर प्रेक्षक/वाचक एका तटस्थ चौकटीची अपेक्षा ठेवतो. ती इथे पुरी होत नाही. जेव्हा गोष्ट कुण्या एकाच्या मानसिक अनुभूतीची असते, तेव्हा तटस्थ चौकट नसलेली चालते. तसंही इथे नाही.

तरी श्रीलंकेतले श्रीमंत कसे रहातात, हे समजतं. एक तमिळ खाटीक म्हणतो, तुमच्याकडे पैशाचा विमा आहे, तो तुम्हाला वाचवेल; माझं तसं नाही. कृपा करून माझ्या दुकानात तमिळमध्ये बोलू नका! पण बहुतेक वेळी सगळं शब्दांमध्ये सांगितलं जातं आणि घटना त्याला पूरक असतात.

त्या मुलीचा प्रेमभंग होऊन तिला घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न करून कॅनडाला जावं लागतं. ‘ती नक्की सुखी नसेलअसा उद्गार तिच्या भावाच्या बायकोच्या तोंडी आहे, पण त्याचं दर्शन नाही. शेवटी त्या गे मुलाचाही प्रेमभंग होऊन सगळे कॅनडाला जातात, तेव्हा त्याच बाईच्या तोंडी येतं, इथे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, इथे तो त्याला हवा तसा वागू शकेल! आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटतं. पण तो नुकताच त्याच्या प्रिय मित्रापासून तोडला गेला आहे, याच्या दु:खाची छटाही त्या स्मितामध्ये नसते.

म्हणून म्हटलं, तरलता शक्यतो टाळण्यात आली आहे.

४.

द लॉयर

यातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा एक कॉर्पोरेट वकील आहे. लाघवी पुरुष आहे. लाळघोटेपणा न करता समोरच्याला न दुखावणे त्याला जमतं. तो सुसंस्कृत आहे, हुशार आहे आणि कामात चांगला आहे, या गोष्टी त्याच्या चेहऱ्यावर लिहिल्या आहेत. परिणामी त्याच्याशी संबंध येणाऱ्यांचा कल त्याच्यावर विश्वास टाकण्याकडे होतो.

आणि तो गे आहे


 

प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा असा, की पहिल्या परिच्छेदातल्या वर्णनाला दुसऱ्या परिच्छेदातलं एकमेव विधान कुठेही छेद देत नाही. त्या विधानांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तो गे असल्यामुळे त्याच्या सामाजिक वा व्यावसायिक वर्तनावर काहीही परिणाम होत नाही आणि त्याच्याशी सामाजिक वा व्यावसायिक संबंध ठेवणाऱ्यांना काही फरक पडत नाही. तो स्वत:चं गेपण लपवण्याचा प्रयत्नदेखील करत नाही.

हे विशेष आहे.

या विशेषपणाचाच एक भाग म्हणून त्याची मित्रमंडळी येतात. सगळे गे आहेत. पण प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. (जसे कुठल्याही मित्रमंडळीत असतं.) एकमेकांच्या वागण्यावर ते टीका करतात, एकमेकांची टिंगलही करतात. विचार करणाऱ्या मित्रकंपनीमध्ये व्हावी तशी त्यांची विविध विषयांवर चर्चा होते आणि ‘‘गे जोडप्यांनीएकजोडीदारव्रतपाळावं की पाळू नये,’’ हासुद्धा त्याच्या चर्चेतला एक गंभीर मुद्दा असतो.

थोडक्यात, सगळे नॉर्मल असतात. नॉर्मल वागतात. सारखे अंगचटीला जात नाहीत, स्त्रैण हालचाली करत नाहीत, द्व्यर्थी विधानं करत नाहीत.

इथून चित्रपट सुरू होतो. ही त्या वकिलाची प्रेमकहाणी आहे. प्रेमापोटी तो काय काय करतो, याची. अधून मधून प्रेमदृश्यंसुद्धा आहेत. सगळं नॉर्मल. इतकं, कीएक साधीशी प्रेमकहाणी तर आहे,’ असा शेरा मारून मोकळं होण्याची इच्छा व्हावी. लिथुआनिया वा सर्बिया इथल्या समाजात असं असतं की नाही, मला माहीत नाही. सर्बियात समलिंगी विवाहाला कायद्याची मान्यता नाही, असं चित्रपटातल्या संभाषणात ऐकू येतं; पण समाज तसा नसावा, असंही वाटतं. किमान, समाजातले जाणते लोक, निर्णयाचा अधिकार असलेले लोक गे संबंधांना नॉर्मल मानत असावेत, असा समज होतो.

कथेला मिळालेली दिग्दर्शकीय ट्रीटमेंट बुद्धिमानाच्या प्रेमकहाणीला साजेशी आहे. मुख्य पात्राच्या चेहऱ्यावर काहीसे सिनिकल, स्वत: एक विनोदाचा विषय असल्यासारखे पण संयमी भाव आहेत. त्याचे उच्चार स्पष्ट आहेत आणि आवाजाची पट्टी संथ, विनाचढउताराची आहे.

सांगण्यासारखं पुष्कळ आहे! मुख्य मुद्दा हाच आहे की गे असणं नॉर्मल आहे! ग्रेट. असं प्रथम पहायला मिळालं. सुसंस्कृत समाज म्हणजे काय, याचं जिवंत उदाहरण पहायला मिळालं.

५.

अ फिश स्वीमिंग अपसाइड डाउन

हे वरवर साधं दिसणारं अवघड प्रकरण आहे.

एका मध्यमवयीन पुरुषाची पत्नी वारते आणि त्याला नवीन मैत्रीण भेटते जिला तो घरी रहायला घेऊन येतो. घरी त्याचा टीनेजर मुलगा असतो. आणि एक मुलगी घराची साफसफाई करायला येत असते. या पात्रांमधल्या घडामोडी म्हणजे हा चित्रपट. ती मैत्रीण ही चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा. ती एका ठिकाणी जाऊन काही मंगोलम्हणजे मंदबुद्धी - मुलांना शिकवत असते, त्यांचं मन रिझवत असते. कमीजास्त वयाची ती मुलं तिच्या सान्निध्यात रमतात. शांत असतात. तीसुद्धा त्यांच्या सान्निध्यात शांतच असते. मुलांच्या मंदबुद्धीपणामुळे तिला काही फरक पडत नाही, असं वाटतं. तिचं बोलणं, तिची देहबोली यात पूर्ण सहजता जाणवते


 

वागण्याबोलण्यातली ही सहजता, हे त्या तरुण बाईचं जणू व्यावच्छेदक लक्षण असतं. आणि ती सहजताच इतर सर्वांना तिच्याकडे आकर्षित करते. ‘आकर्षित करतेअसं म्हणणं बरोबर होणार नाही; तिच्या सान्निध्यात प्रत्येकालासहजवाटतं आणि म्हणून तिचा सहवास जणू हवासा वाटतो.

अशी बाई कशी असावी? कशी दिसावी? कशी वागावी?

चित्रपटातली नटी रूढार्थाने सुंदर मुळीच नाही. तीसरळ’, सालस मात्र दिसत नाही. पण तिच्या वागण्यात कुठेही अ-सहजता नाही. ती मनस्वी जरूर आहे. एकदा पुस्तक वाचत असते आणि जणू झोप आली म्हणून पुस्तक तोंडावर पाडते. मग एका कुशीवर होत सोफ्यावरून जमिनीवर पडते. तशीच सरपटत पुढे पुढे सरकते. याला तऱ्हेवाईकपणा म्हणता येईल पण असा वेडेपणा कुठल्याही संवेदनशील आणि जगण्याचा पूर्ण अर्थ कळत नाही, हे स्वत:शी मान्य केलेल्या व्यक्तीला अधेमधे, विशेषत: आसपास कोणी नसताना करावासा वाटतो.

ती बऱ्याचदा तोकडे कपडे घालते. सगळे कपडे काढतानाही तिच्या हालचालीत संकोच जाणवत नाही. स्पर्शाचं तिला वावडं नाही. हे पात्र दॅफ्ने द्यु मॉरियरच्यामाय कझिन रॅशेलची आठवण करून देतं!

असो. (माय कझिन रॅशेलप्रमाणेच) टीनेजर मुलाला मात्र ती झेपत नाही. त्याचं जे काही होतं, त्याची जबाबदारी तिच्यावर टाकता येईल का? सांगता येत नाही. तिचं वागणं, त्या वागण्याबाबत इतरांच्या असलेल्या नसलेल्या प्रतिक्रिया, हे संस्कृतीजन्य आहे का? माहीत नाही.

ओळखीच्या प्रतिमा वापरून अमूर्त चित्र काढावं, तसं होतं. चित्रपट हे एक कलामाध्यम आहे आणि चित्रपटाचा आशय पूर्णांशाने शब्दांत पकडण्याचा सोस धरूच नये, असा संदेश मिळाल्यासारखं नक्की वाटलं.

६.

वूमन ऑफ द फोटोग्राफ्स

एक फोटोग्राफर. फोटो काढतोच, शिवायफोटोशॉपसुद्धा करतो. एक येते, तिला विवाहनोंदणी साईटवर फोटोसुधारूनहवा असो. मग तो (फोटोत) तिची जिवणी बदलतो, डोळे टपोरे करतो, छातीला उभार देतो, वगैरे. एका पुरुषाला त्याच्या लहान मुलीचं (पुन्हा फोटोत) वय वाढवून देतो. मग तो बाप त्या वय वाढलेल्या मुलीबरोबर जेवण करतो, फिरायला जातो, वगैरे. फोटोग्राफरला जंगलात जाऊन कीटकांचे फोटो काढण्याचा छंद असतो. तिथे त्याला एक मुलगी भेटते. ती जखमी झालेली असते. तिला तो त्याच्या दुकान+ घर या ठिकाणी घेऊन येतो. मग ती तिथेच राहू लागते. ती मॉडेल असते. तिच्या फोटोंना पुष्कळ लाइक्स मिळत असल्यामुळे त्या फोटोंसोबत जाहिराती येत असतात. आपल्या मानेखालच्या जखमांमुळे फोटो बिघडतील, या भीतीने ती फोटोत जखमा काढून टाकायला लावते. पण तिच्या फोटोंना मिळणारे लाइक्स कमी होत जातात आणि जाहिराती बंद होतात. मग ती जखम दाखवणाऱ्या फोटोंना अचानक लाइक्स मिळू लागतात. ती खूष होते. जग आपल्यावर भाळलं आहे, ही कल्पना तिला आवडते. म्हणून ती जखम बरी होऊच देत नाही. खपल्या काढत रहाते. असं करताना एकदा फोटोग्राफरलाच चेहऱ्यावर दाढी करताना जखम होते. दोघांच्यात एक विचित्र नातं तयार होऊ लागतं


 

या सगळ्याला साक्षीदार असतो, फोटोग्राफरने पाळलेला एकप्रेयिंग मँटिसनावाचा किडा. हा चांगला बोटभर लांब असतो. पुढचे दोन हातासारखे पाय प्रार्थना करत असल्यासारखे तोंडासमोर धरणे, हीच त्याची ओळख. तो खातो तेव्हा येणारा आवाज खरा की मनातला, हे कसं सांगणार? मेटिंग करताना ही मादी नराला खाऊन टाकत असते. हा पाळलेला नर असतो.

यातून सूचक अर्थ काढू नये. दोघे परिस्थितीत आणि एकमेकांत अडकतात आणि शेवटी सुटतात, ही प्रक्रिया बघणं हा एक सुरस अनुभव ठरतो. जपानी चित्रपटाला साजेसा शांतपणा, कमी हलणारे चेहरे, कमी हलणारा आणि फ्रेम महत्त्वाची असेल तेव्हाच क्लोजअप सोडणारा कॅमेरा यांच्याबरोबर आणखी एक गोष्ट या गूढात भर घालते; ती म्हणजे श्रीयुत फोटोग्राफर सिनेमाभर अवाक्षर काढत नाहीत. थेट शेवटच्या दृश्यात तोंड उघडतात. पण ते सुभाषितसम बोलणं अशागप्प’, तुमचा आशय तुम्ही मिळवा, अशा ॲटिट्यूडच्या चित्रपटाचं मूल्यवर्धन करतं, असं वाटत नाही.

७.

वॅलेंतिना


 

गोष्ट दक्षिण अमेरिकेत, ब्राझीलमध्ये घडते. एक वयात येत असलेली शाळकरी मुलगी. गोड. वयपरत्वे दिसायला बरीच. बांधादेखील आकर्षक. हिचं नाव वॅलेन्तिना. पण जन्माने ती राउल असते. मुलगा असते. नंतर तिने लिंगबदल करून घेतलेला असतो. गावात हा प्रकार स्वीकारला जात नाही म्हणून ती आणि तिची आई दुसरीकडे जातात. पण तिथे शाळेत किंवा कुठेही जन्माचा दाखला काय देणार? ब्राझीलमधल्या कायद्यानुसार व्यक्तीने घेतलेलं नावही चालू शकतं; पण शाळेत प्रवेश देताना आई आणि वडील, दोघांच्या सह्या लागतात. आणि वडील तर अशा प्रकारापासून पळून गेलेले असतात.

या गावात तिला कोणत्या अडचणी येतात, त्यांना वॅलेन्तिना आणि तिची आई कसं तोंड देतात, शेवटी काय होतं, हे चित्रपटाचं कथानक. त्यात फार काही कल्पकता आहे, असं नाही. विशेष सांगण्यासारखं हे की वॅलेन्तिना वा तिची आई, दोघीही सर्वसामान्यांपैकी आहेत! त्या राउलला कळलं की की तो मनाने मुलगा नाही, मुलगी आहे; तेव्हा त्याने लिंगबदल करून घेतला आणि त्याच्या/तिच्या आईने तसं होऊ दिलं. झालं. नंतर दोघेही शांतपणे नॉर्मल जगू लागले. काही जणांना त्यांचं नॉर्मल जगणं सहन होत नाही आणि त्यांना प्रतिकार करावा लागतो. त्यासाठी तात्त्विक स्टँड घ्यावा लागतो. बापाला हे जमत नाही, तो सरळ गायब होतो. पण सरळ साध्या घरातल्या कुणाला असं वाटू शकतं आणि लिंगबदल करून घेणे म्हणजे नॉर्मल होणेच, असं चित्रपट सांगतो.

चित्रपट आणखी एक जोरदार फटका देतो. तिला त्रास देणाऱ्याला वॅलेन्तिना प्रश्न करते, ‘मला हवं तसं रहाण्याचं स्वातंत्र्य असण्याचा तुला इतका त्रास काय म्हणून होतो?’ हा प्रश्न लिहिलेला भला मोठा फलक शहरातल्या मध्यवर्ती चौकात टांगावा.

८.

टूवर्ड्स द बॅटल

१८६० साली मेक्सिकोत घडणारी कथा. युद्धाच्या शोधात असलेला फोटोग्राफर! बिचाऱ्याला युद्ध सतत हुलकावणी देतं. त्याला युद्धानंतरच्या विध्वंसाची दृश्यं दिसतात, पळून जाणारे सैनिक भेटतात; पण प्रत्यक्ष लढाई काही समोर येत नाही. तो फ्रेंच. प्रदेश अनोळखी. एका घोड्यावर तो आणि दुसऱ्यावर कॅमेरा व सोबतचं सामान. डोंगर-दऱ्या, मैदानं-ओसाड प्रदेश, गावं-निर्जन जागा, असं ओलांडत तो जात रहातो. लढाई फ्रेंच आणि मेक्सिकन यांच्यात. त्याच्यापाशी फ्रेंच जनरलने दिलेला परवाना असतो. फोटोग्राफर प्रामाणिक. खोटे, लुटूपुटूचे फोटो काढत नाही. त्याची कीर्ती थेट अमेरिकेपर्यंत पोचलेली असते.

त्याला वाटेत जसे सैनिक भेटतात, तसेच गावकरी भेटतात, एक लफंगासुद्धा भेटतो आणि एक मेक्सिकन त्याचे प्राणही वाचवतो. काहीसा विनोदी भासणारा हा चित्रपट शेवटी ज्ञानाकडे वळतो. युद्धामुळे मरत पडलेली साधी माणसं बघून फोटोग्राफरला साक्षात्कार होतो की आपण जीवनाच्या नाही, तर मृत्यूच्या मागे चाललो आहोत


 

युद्ध हा विषय भडक आहे आणि जगात युद्धासोबत इतरही अनेक प्रकारचा भडकपणा जोडून असतो. त्याचं दर्शन घडवत असताना परिसराचे तपशील अतिशय बारकाव्यांनी दर्शवलेले आहेत. माणसांचे प्रकार, निसर्गाचे विभ्रम दाखवत चित्रपट काहीशा भावनिक शेवटाकडे जातो. पण लक्षात रहातो.

९.

आय नेव्हर क्राय


 

पोटासाठी लोक स्थलांतर करतात, हे आपल्याला ठाऊक आहे; उद्योगनगरी मुंबई, जिथे कष्ट करण्याची तयारी असणारा सहसा निराश होत नाही आणि जात-धन यांच्या बळावर पिढ्यानपिढ्या पिचत राहिलेले लोक असणारा हा देश आहे. युरोपात पूर्व युरोप गरीब आहे, पश्चिम युरोप प्रगत, पैसेवाला आहे. मग पोलंडहून पैसे कमावण्यासाठी लोक आयर्लंडला जातात. तिथे जास्त कमावण्यासाठी स्वत:ची ड्यूटी संपल्यावर दुसऱ्याची करतात. पण दुसऱ्याची ड्यूटी करणं बेकायदेशीरच. त्या ड्यूटीवर असताना मृत्यू आला तर विमा मिळत नाही. काहीच नाही.

अशा एकाचं शव घरी नेण्यासाठी त्याची सतरा वर्षांची मुलगी तिथे जाते तिची ही गोष्ट. बापाने तिला गाडी घेण्यासाठी पैसे देण्याचं कबूल केलेलं असतं, हा त्यात तिचा एक बारीक स्वार्थ. पण तिथे गेल्यावर तिला बापाची चौकशी करावीशी वाटते. त्यात तिला त्याच्या मैत्रिणीचा शोध लागतो. तिथल्या जगण्याचे आयाम समजू लागतात.

सतरा वर्षं वयाची तरुण मुलगी! आपल्या इथल्या चित्रपटात निरपवादपणे तिच्यावर जे संकट कोसळलं असतं, तसं आयर्लंडात होत नाही. पण तरी क्षणोक्षणी निर्णय घेण्याची, कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ तिच्यावर येत रहाते. दगडी चेहऱ्याने ती एकेक अडचण पार करत रहाते. कधीहीबेचारी अबलाहोत नाही, कुठल्याही पुरुषाच्या खांद्यावर विसावत नाही. शेवटी आईला बाजूला ठेवून, स्वत:ची इच्छा विसरून एक निर्णय घेते.

चित्रपटभर आपण तिच्याबरोबर सगळं भोगत रहातो. साधी सिगारेट तिला परवडत नाही; जिथे मेहनताना जास्त असतो, तिथे रहाणीमानही उंच असतं! एकाच वेळी अपरिपक्व दिसणे आणि कृतनिश्चय दाखवणे; कडू मनाने सगळं सहन करत डोळे ओले होऊ न देणे, बापाचा मृतदेह आणण्याबरोबर गाडीसाठी त्याने जमवलेले पैसेसुद्धा ताब्यात घ्यायचे असताना अटळपणे बापाच्या जगण्याविषयी कुतूहल वाटणे, बापाचा एक प्रकारचा शोधच घेण्याची प्रबळ इच्छा होणे; हा सगळा त्या मुलीच्या अभिनयाचा भाग. अभिनय म्हणजे अमुक ठिकाणी चेहऱ्यावर प्रचंड क्षोभ व्यक्त करणे नव्हे; तर एक जिवंत, उलटसुलट कंगोरे असलेली व्यक्तिरेखा उभी करणे होय, हा धडा पुन्हा एकदा या चित्रपटात शिकायला मिळतो.

बघितल्यानंतर आपल्यात काहीतरी बदललंय, असं थोडा वेळ वाटत रहातं!

१०.

रोलां रेबेर्स कॅबरे ऑफ डेथ

एक ऑनलाइन गेम चालू आहे. एक बाई तिथल्या स्टेजवर बोलावली जाते. तिला कपडे उतरवायला लावलं जातं. नंतर एका पुरुषाला चक्क मार दिला जातो. आणि तिथे हजर असलेले, ऑनलाइन बघणारे प्रेक्षक टाळ्या वाजवतात. हा अपमान, ही मारहाण सोशल मीडियावर रहाण्याची किंमत. अशीच किंमत तारुण्याची. वयस्क बायका नाचतात, गाणी म्हणतात, गोंधळ होत रहातो.

खूप काही होत रहातं. वेगवेगळ्या कथानकांचे धागे एकमेकांत गुंतत रहातात; सगळ्यात सूत्र एकच: तारुण्याचा सोस आणि सोशल मीडिया. हे कळेपर्यंत चाचपडायला होतं. हे संभाषण धरू की तिथलं लफडं पकडू, असं होत रहातं. पण एकदा वर्तमानकाळातला हा खास लोकाग्रहास्तव चाललेला खेळ लक्षात आला, की फक्त तऱ्हेवाईकपणा स्मरणात रहातो, बाकी निसटतं. चित्रपटाला वेग आहे. तो नसता, तर कंटाळाच आला असता. थेट प्रेक्षकांना उद्देशून एक विदूषक सगळ्यावर शेरेबाजी करत रहातो, हे आपल्या तमाशासारखं


 

हा चित्रपटसुद्धा पक्का फेस्टिवलवाला. हे माँटाज नाही, एकच कथानक आहे; पण त्यात अनेक धागे आहेत. प्रेतागारातले मुडदे आहेत; एक ऑनलाइन गेम आहे ज्यात भाग घेणाऱ्यांचा यथेच्छ पाणउतारा केला जातो; शरिराला तंदुरुस्त आणि सुडौल ठेवण्यासाठी घड्याळात गजर लावून वेळच्या वेळी गोळ्या खात बसलेली बाई आहे; खूप म्हातारे रुग्ण आहेत; तारुण्य पांघरून नाच करणाऱ्या बायका आहेत; एक कवी आहे,त्याची बायको आहे, ... चित्रपटाला एक फ्रेंच, बोहेमियन लुक आहे. प्रेक्षकांशी थेट बोलणारा एक विदूषकाच्या रूपातला निवेदक आहे. खूप काही होत रहातं आणि लक्षात येतं, तारुण्याचा सोस आणि सोशल मडियावर मिरवण्याची हौस यांची ही टिंगल आहे. प्रेक्षक यात आनंदाने सामील होतो; पण खूप कमी जागेत, कमी वेळेत खूप जास्त मसाला कोंबल्यासारखं वाटतं. या गर्दीमुळे आस्वादाला बाधा येते. आणि एकदा चित्रपटाची दिशा कळली की पुढे काही होत नाही, हे जाणवत रहातं.

११.

फोर्ट्रेस

ज्या कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे, त्या कादंबरीला काहीजण साहित्यातल्या मॅजिकल रियलिझमचा विकास केल्याचं श्रेय देतात. त्या कादंबरीला विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या साहित्यकृतींपैकी एक मानतात. चित्रपटाकडे कादंबरीवरील एक भाष्यम्हणून बघितलं, तर ही एक डॉक्युमेंटरी आहे. तिचं संपूर्ण चित्रण एका तुरुंगातच केलेलं आहे. चित्रपटात काम करणारे सगळे कलावंत खरोखरच तुरुंगवासी आहेत, कैदी आहेत.

हा तुरुंग म्हणजे वाळवंटाच्या किनाऱ्यावरचा एक छावणीवजा किल्ला आहे. वाळवंटातून एक हल्ला अपेक्षित होता, त्याला प्रतिकार करण्यासाठी तिथे जय्यत तयारी ठेवलेली असते. पण त्याला खूप वर्षं झाली. आता हल्ला होणार नाही, हे सगळ्यांना अंतर्यामी ठाऊक असतं. पण जय्यततयारीला इलाज नसतो. यातला अस्तित्ववादी विरोधाभास हा चित्रपटाचा आत्मा. तुरुंग-किल्ला निरर्थक असतो पण तिथल्या अधिकाऱ्यांना तो सोडून जाववत नाही.

मला या चित्रपटाचा नीट आस्वाद घेता आला नाही. कारण या दृक्‌श्राव्य कलाकृतीत दृष्यभागाचं काम वातावरण निर्मिती, हे जास्त आहे, असं मला झालं. बाकी घटनासंवादातूनच प्रकट होतात. आणि ते इंग्रजीत नाहीत. वाचावे लागतात. पण मुळात काही न घडणे, हेच कथानकाचं मर्म आहे. ‘इथे वेळ घालवायचा नसतो, वेळ मारून न्यायचा नसतो; काळाबरोबर जगायचं असतं!’ असे उद्‌गार एका पात्राच्या तोंडी आहेत. दोन पात्रं एकमेकांशी बोलताना कॅमेरा त्यांना प्रोफाइलमध्ये दाखवतो. रंग कमी आहेत. कंटाळ्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न नाही, असं वाटतं. एक खूप महत्त्वाचं काहीतरी निसटून गेल्यासारखं झालं.

होतं असंही.


 

No comments:

Post a Comment