Friday, June 17, 2022

छावणी: विद्रोहाचा एकसुरी पण जळजळीत हुंकार


 प्रेमानंद गजवी हे नाव मराठी नाट्यक्षेत्राला चांगल्यापैकी परिचित आहे. त्यांच्या मांडणीबाबत मतभेद होऊ शकतात; पण त्यांच्या बांधिलकीविषयी नाही. त्यांच्या वयाला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या ‘छावणी’ या दीर्घांकाचा प्रयोग बघण्याची संधी मिळाली. प्रयोग लक्षणीय वाटला. का वाटला, ते सांगण्याचा हा प्रयत्न. मी जे पाहिलं, मला जे प्रतीत झालं, त्याची संगती लावण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रेमानंद गजवी लिखित आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज दिग्दर्शित ‘छावणी’ हे नाटक म्हणजे मी म्हणतो तेच, असा माझा दावा नाही.

१. १.      प्रयोगात सर्व पात्रं एका जागी उभं राहून आपापले संवाद म्हणतात. कधी ते एकमेकांशी बोलतात, तर कधी प्रेक्षकाकडे अर्धवट वा पूर्ण वळून आपापलं म्हणणं ऐकवतात. दोघांनाही माहीत असलेल्या गोष्टी तपशिलात जाऊन एकमेकांना सांगण्याचा ढोबळपणा जो मराठी नाटकाच्या सुरुवातीला बऱ्याचदा असतो, तो इथे अनेकदा आहे. पात्रांची, त्यांच्यातल्या संबंधांची माहिती एके काळी सूत्रधार प्रेक्षकांना पुरवत असे; आता बिनसूत्रधाराच्या सादरीकरणामध्ये पात्रं स्वत:च हे काम करतात. प्रतिभेला अजिबात ताण न देता पार्श्वभूमी सांगण्याची जबाबदारी चटकन पार पाडता येते.

‘छावणी’मधला वेगळेपणा असा की रंगमंचाची लांबी रुंदी अजिबात न वापरता खणखणीत आवाजात आणि चढ्या सुरात भाषण दिल्यागत सर्व काही प्रेक्षकांना ऐकवलं जातं. या शब्दांमधून ‘संवाद’ कमी घडतो, संभाषणही जेमतेमच होतं. होते ती विचारांची, युक्तिवादांची देवघेव. किंवा एका विशिष्ट भूमिकेची आव्हानात्मक मांडणी. यातून नाटक ‘वैचारिक’ आहे, असं बजावलं जातं. एरवीच्या नाटकांमध्ये रंगमंचावर समोर येणाऱ्या सहज हालचाली टाळल्यामुळे आणि ‘उच्च रवातील’ सुस्पष्ट उच्चारांमुळे शब्दांमधल्या आशयाकडेच प्रेक्षकाचं लक्ष खेचलं जातं. प्रत्यक्ष पात्रं कमी महत्त्वाची होऊन जातात.

मराठीत शुद्ध वैचारिक नाटकं आली नाहीत, असं मुळीच नाही. ‘उद्‌ध्वस्त धर्मशाळा’ हे सर्वात ठळक उदाहरण. ‘…धर्मशाळा’मध्ये अशा तऱ्हेचा आवेश नाही. पण तिथल्या वैचारिक संघर्षाचा इथे अभाव आहे. एका भूमिकेचे विविध पैलू विशद करण्यासाठी फुटकळ आक्षेप घेतले जातात, इतकंच. आवेशामुळे ती भूमिका प्रेक्षकाला गर्जना करून बजावली जाते. यातून या विचाराची मांडणी प्रचारकी थाटाची होते. ती मांडणी मान्य असणाऱ्याला बळ देणारी होते. तटस्थ मानसिकतेसमोर वैचारिक घुसळण मांडली जाण्याचा प्रयत्न होत नाही.

२. २.      ‘छावणी’ म्हणजे नक्षलवाद्यांची जंगलातली छावणी. समोर येणारे सर्व कमांडो बायका आहेत. त्यांची प्रमुखही बाईच आहे. पुरुष कमांडोंचे उल्लेख आहेत; पण दर्शन नाही. एक लक्षणीय पुरुषपात्र आहे; पण कमांडो असलेल्या बायका सतत लढ्याचा, हिंसेचा उच्चार करत असताना हा पुरुष समन्वयाची भाषा करतो! यातून नाटकाला काय अभिप्रेत असावं? की हा लढा भूमीचा आहे, म्हणजे बाईला जवळचा आहे, तिला निर्वाणीची भूमिका घेण्याला भाग पाडणारा आहे, असं? नाटकातला प्रश्न थेट जगण्याची, जीव बचावण्याशी संबंधित आहे म्हणून बाईला शस्त्र उचलणं अपरिहार्य झालेलं आहे,असं? की जगण्याच्या लढाईत / आधुनिक काळात / व्यक्ती म्हणून पहाता बाई आणि पुरुष हा भेद अनावश्यक ठरला आहे, असं?

३.  ३.   यात चक्क शंकराचार्य हे एक पात्र आहे. एका हिंदू धर्मपीठाचा प्रमुख, या नात्याने तो त्याची भूमिका मांडतो. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जाते; पण तो उत्तरादाखल जरी शौर्याचे डायलॉग मारत नसला, तरी स्वत:ची भूमिका सोडत नाही. नाटकाच्या वैचारिक प्रकृतीशी हे सुसंगतच आहे: भीतीपोटी एक भ्याड व्यक्ती होऊन तो ‘शंकराचार्य’ या विचाराशी बेईमान होत नाही, की भ्रष्ट होत नाही.

४.      ४. नाटक उघडपणे विद्रोही आहे. एके काळी, जेव्हा मुंबई-महाराष्ट्रावर काँग्रेसचं निरंकुश राज्य होतं, त्या काळी, मुंबईत कामगारांच्या आंदोलनांमध्ये कम्युनिस्ट, सोशालिस्ट दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून ‘‘… जो सरकार निकम्मी है, उसे हमे बदलनी है’’ अशी घोषणा मोठ्या आवेशाने दिली जाई आणि लोकनियुक्त सरकार पाडण्याचं आवाहन म्हणजे राष्ट्रद्रोह, अशी समजूत नसल्याने घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होत नसे. हे नाटक या घोषणेच्या दोन पावलं पुढे जातं. सरकारच नव्हे, तर साऱ्या व्यवस्थेलाच टक्कर देऊ बघतं. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी हिंसेचा पुरस्कार करतं. राष्ट्र या मूल्यापेक्षा, समाजस्थैर्य या मूल्यापेक्षा आत्मप्रतिष्ठा हे मूल्य मोठं असल्याचं ठामपणे मांडतं. आत्मप्रतिष्ठेला माणुसकी या वैश्विक मूल्याशी जोडतं.

विवेकानंदांनीच राष्ट्रापेक्षा माणुसकी मोठी, असं म्हटलं आहे हे विसरून चालणार नाही.

५.      ५. नाटकाच्या अगदी अखेरच्या भागात ‘नक्षलवादातून राष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका’ मांडला जातो. आणि त्याला ‘संविधान’ हे उत्तर असल्याचं सांगितलं जातं. या काहीशा गुळमुळीत उल्लेखामधून नाटकभरातल्या प्रखर विद्रोहाचा प्रभाव पातळ होत नाही. या उल्लेखामुळे नाटकात नक्षलवाद विरुद्ध आंबेडकरवाद असा विरोध मांडल्याचा आभास निर्माण होतो; पण तसंही नाही. नाटकात चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे; तिथलं जंगल, तिथले आदिवासी आणि नक्षलवादी असे उल्लेख असले तरी नक्षलवादी तात्त्विक भूमिका सुस्पष्टपणे समोर येत नाही. पात्रांचं बाह्य रूप सामान्यजनांच्या मनातल्या नक्षलवादी प्रतिमेला जवळचं आहे, इतकंच. त्याचबरोबर आंबेडकरवाद किंवा संविधानातील तरतुदी यांचंसुद्धा विवेचन आढळत येत नाही. जे समोर येतं, ते नक्षलवादाचा मार्ग नाईलाजाने स्वीकारणाऱ्या आंबेडकरी दलित जनतेच्या विद्रोही भावनेला दिलेलं प्रातिनिधिक रूप.

एकूण, स्वत:ला आंबेडकरी मानणाऱ्यांच्या अस्मितेला शब्दकळेच्या माध्यमातून जोरदार पाठबळ देण्याचं काम हे नाटक, या नाटकाचा हा प्रयोग यांच्याकडून होतं. या परिघाबाहेरच्या मनाला आवाहन करण्याचा इरादा कुठेही व्यक्त होत नाही.

No comments:

Post a Comment