Tuesday, November 15, 2022

राहुल गांधीं यांची भारत जोडो यात्रा. कशासाठी? कोणासाठी?

 देशात यापूर्वी दोन मोठ्या पदयात्रा झाल्या. गांधींनी केलेली दांडीयात्रा आणि विनोबांची भूदान यात्रा. या दोन्ही यात्रांमागे स्पष्ट उद्देश होता. गांधींना मिठावर लावलेल्या कराचा निषेध करायचा होता. विनोबा दानात जमिनी मिळवून भूमीहीनांमध्ये त्यांचं वाटप करण्यासाठी चालले होते. राहुल गांधींच्या पदयात्रेमागे असलं काही स्पष्ट उद्दिष्ट-मागणी-अपेक्षा नाही.

राहुल गांधीं यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात, म्हणजे नांदेड जिल्ह्यात शिरली. ही पदयात्रा आहे. राहुल गांधींनी कन्याकुमारीला चालायला सुरुवात केली आणि गेले तीन महिने ते चालत आहेत. महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमधून ती पुढे मध्य प्रदेशात जाईल. महाराष्ट्रात राहुल गांधी एकूण ३८२ किलोमीटर चालतील. यात्रा काश्मीरमध्ये श्रीनगरला संपेल, जिथे भारताचा तिरंगा फडकवण्याचा त्यांचा इरादा आहे. पाच महिन्यांमध्ये एकंदर साडेतीन हजार किलोमीटर चालण्याचा संकल्प राहुल गांधींनी केला आहे.

अगदी कन्याकुमारीपासून त्यांच्याबरोबर सव्वाशे साथी चालताहेत, ज्यांची निवड खास राहुल गांधींनी केली आहे. हे सगळे जण श्रीनगरपर्यंत जाणार आहेत. यांच्याशिवाय जागोजागी स्थानिक काँग्रेस पुढारी आणि कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे सभासद, उत्साही तरुण, यात्रेच्या उद्दिष्टांशी सहमत असलेले कुठल्याही क्षेत्रातले कुणीही काही काळ सोबत चालताहेत. एवढं मोठं अंतर चालणे हे किती अवघड काम आहे हे कळणारे, यात्रा म्हणजे नेमकं काय आहे, याविषयी कुतूहल असणारे कितीतरी लोक यात्रामार्गाच्या दुतर्फा उभे राहून माहोल अनुभवत आहेत. यांच्याबरोबर कालपर्यंत ‘पप्पू’ म्हणून हेटाळणी झालेल्या राहुल गांधी यांनी हे अवघड काम कसं अंगावर घेतलं आहे आणि त्यांना ते किती झेपतं आहे, ते कसे चालत आहेत, हे प्रत्यक्ष बघायला आलेलेसुद्धा अनेक आहेत.

या यात्रेचा मार्ग विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांना स्पर्श न करता जातो आहे. यात्रेची वेळही निवडणुकीला सोयीस्कर नाही. यात्रेचा उद्देश या निवडणुकांवर थेट प्रभाव टाकण्याचा नाही, हे उघड आहे. यात्रा जाणार असलेल्या राज्यांमधल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारीच्या प्रचारार्थ भाषण देण्याची इच्छासुद्धा दिसत नाही. महाराष्ट्रात नांदेड आणि शेगाव या दोन ठिकाणी राहुल गांधींचं भाषण आहे. तसे ते प्रत्येकच मुक्कामी बोलतात. पण कमी बोलतात आणि जास्त ऐकतात. जेव्हा बोलतात तेव्हा पक्षाचा प्रचार केल्यासारखं बोलत नाहीत. या यात्रेमुळे काँग्रेसची स्थिती सुधारण्याची शक्यता जरी असली तरी राहुल गांधींच्या बोलण्यात प्रचारकी थाटापेक्षा देशाच्या गंभीर अवस्थेवर भाष्य करण्याचा भाग जास्त असतो. ते कमी बोलत असल्याने आपोआपच स्थानिक नेत्यांना स्वत:च्या वक्तृत्वाला आवर घालावा लागतो. एकूणच भाषणबाजी कमी होते.

मात्र, जे कोणी राहुल गांधींना भेटतात, त्यांचं बोलणं ते गंभीरपणे ऐकून घेतात. आई सोनिया गांधींसारखे राहुल गांधीदेखील बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देतात, असं मत लोकांच्यात पक्कं होऊ लागलं आहे.

यात्रेने महाराष्ट्रात, म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात प्रवेश केला तिथपासून, म्हणजे ७ तारखेपासून तीन दिवस मी यात्रेच्या आसपास होतो. यात्रेचं वातावरण अनुभवणं, यात्रेत सहभागी झालेल्यांशी संवाद साधणं, यात्रा बघायला आलेल्यांशी बोलणं मला करायला मिळालं. यात्रेच्या या तीन दिवसांच्या अनुभवावरून एकूण यात्रेविषयी, राहुल गांधींविषयी, यात्रेच्या आयोजनाविषयी आणि अखेरीस यात्रेच्या फलिताविषयी निर्णय दिल्यागत मतप्रदर्शन करणं बरोबर होणार नाही. पण जी काही मतं झाली ती मांडली तर वावगं ठरू नये.

मी का गेलो? मला निखिल वागळेने विचारलं आणि मी तात्काळ ‘हो’ म्हणालो. म्हणजे माझ्या जाण्याचं श्रेय निखिलचं. तरीही माझी इच्छा होती, यात्रेला जाण्यामधून मला काहीतरी मिळेल, असं वाटत होतं म्हणून मी गेलो, हेसुद्धा खरंच. देशाची सद्यस्थिती गंभीर आहे आणि दिवसेंदिवस ती बिघडत चालली आहे, असं माझ्यासारख्या अनेकांना वाटत आहे. ही यात्रा निवडणूकलक्ष्यी नाही, देशस्थितीकडे लक्ष वेधणारी आहे, असं वाटल्याने आणि मग यात्रा खरोखर कशी आहे, हे स्वत: जाणून घेण्यासाठी मी गेलो. अर्धवट कुतूहल म्हणून, काही प्रमाणात यात्रेशी सहमत होतो म्हणून.


१.

 राहुल गांधींना देगलूरला पोचायला उशीर झाला. तेवढा वेळ आम्हाला यात्रेच्या मार्गावर जमलेल्यांशी बोलायला मिळाला. बोलल्याबरोबर एक गोष्ट फाडकन स्पष्ट झाली: देशाची काळजी वाटणे ही नंतरची गोष्ट आहे, लोकांना स्वत:विषयीच चिंता वाटते आहे.

काही तरुण भेटले. एक जण म्हणाला, मी एमफार्म आहे. हैद्राबादची अमुक कंपनी आम्हाला पिळून घेते. वर्षाला तीन लाखाचं पॅकेज देतात; पण तीन वर्षांचा बाँड लिहून घेतात. तीन लाखाचे वर्षाने साडेतीन होतील, मग चार होतील; पण दुसरी नोकरी घेतली तर दुप्पट होईल पॅकेज. एमफार्मला बाकी काही ओपनिंगच नाही. स्वत:चं औषधाचं दुकान काढलं तरच काही कमाई होऊ शकते. देगलुरात औषधांची दीडशे दुकानं आहेत! पण दुकान काढायचं तर भांडवलापासून बरंच काही लागतं.

दुसरा म्हणाला, मी सिव्हिल इंजिनियरिंग केलं. पण तिथे काहीच स्कोप नाही हे लक्षात आल्यावर आयटीत शिरलो. आता मला पंधरा लाखांचं पॅकेज आहे; पण माझ्या सिव्हिलमधल्या मित्राला त्यापेक्षा खूपच कमी मिळतात. ही विषमता कमी झाली पाहिजे.

बाजूला थोड्या मोठ्या वयाचा एक जण उभा होता. तो म्हणाला, राहुल गांधी येणार म्हणून इथल्या हॉस्पिटलचा रस्ता विटांचे तुकडे टाकून सपाट केला. कारण हॉस्पिटलशेजारी राहुल गांधी शिवाजी पुतळ्याला हार घालणार! अगोदर तो रस्ता आपण आता उभे आहोत, तिथे आहे तसा खडबडीत होता. राहुल गांधींनी दर सहा महिन्यांनी देगलूरला यावं, म्हणजे इथले रस्ते नीट होतील! पंधरा दिवसांतून एकदा आले तर गावच स्वच्छ होऊन जाईल!

आणखी एक जण म्हणाला, ते येणार पण गावात जाणार नाहीत. नाक्यावरच्या पुतळ्याला हार घालून बाहेरच्या बाहेर निघून जाणार. ते गावात आले, तर जास्त बरं होईल.

काही मुसलमान बायका भेटल्या. म्हणाल्या, इथे येण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करून आलो. त्यांना विचारलं, कसली प्रार्थना? उत्तरल्या, राहुल गांधींचा पक्ष निवडून यावा म्हणून प्रार्थना केली!

पुढे एक शेतकरी तरुण भेटला. तो म्हणाला, आम्ही सोयाबीन घेतो. पण भाव मिळत नाही. चार महिन्यातून एकदा माझ्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होतात, हे खरं आहे; पण त्यांचा काही उपयोग नाही. ते न मिळता सोयाबीनला भाव मिळाला, तर जास्त बरं होईल.

तो असंही म्हणाला, मी २०१४ला पहिल्यांदा मतदान केलं. तेव्हाच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा खूप राग आला होता म्हणून मोदींना मत दिलं. २०१९मध्ये वाटलं, या सरकारला अजून पुरेसा वेळ मिळालेला नाही, अजूनही ते काहीतरी चांगलं करतील; म्हणून पुन्हा मोदींनाच, म्हणजे भाजपला मत दिलं. आता देणार नाही. ते मोठ्या गोष्टी करतात, पण शेतकऱ्याच्या भल्याचं काही करत नाहीत.

बेकारी, महागाई यांनी चिंतित झालेले बरेच जण भेटले. लक्षात असं आलं की ‘देशामधील वातावरण’ अशा विशाल दृष्टिकोनातून विचार करणारे आणि त्यातून भारत जोडो यात्रेकडे आकर्षित झालेले फार थोडे लोक आहेत. बहुतेकांना आपापल्या जगण्याची भ्रांत आहे. दिवसेंदिवस स्थिती बिघडत चाललेली आहे, हे जाणवून हे लोक अस्वस्थ झाले आहेत. हिंदू-मुसलमान, प्राचीन परंपरा यांचं त्यांना आकर्षण वाटत नाही. उलट, यातून काहीच साध्य होत नाही, हे आता त्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे. सध्याच्या सरकारवर ते नाराज आहेत आणि आपोआप राहुल गांधींकडून त्यांना आशा वाटते आहे.

यांच्या नाराजीमधून भाजपची मतं कमी होतील का? काँग्रेसची मतं वाढतील का? मनातल्या भावनांचं रूपांतर मतदानाच्या आकड्यांमध्ये होईल का?

२.


 यात्रेचे सर्वसाधारणपणे तीन भाग दिसले. पहिला भाग राहुल गांधी आणि त्यांनी निवडलेले त्यांचे मोजके सहकारी. यांची विश्रांतीची, पहुडण्याची जागासुद्धा वेगळी. तिथे इतरांना प्रवेश नाही. त्यांना वेगळे पास दिले होते.

पण राहुल गांधींच्या नजरेने कुणाला टिपलं आणि त्यांनी त्याला वा तिला जवळ बोलावलं तर भेट होऊ शकते. एखाद्याने भेटीची तीव्र इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा आतल्या गटापर्यंत पोचली तरी भेट घडून येऊ शकते. एक जण होती, जी म्हणत होती, माझे आजोबा इंदिरा गांधींना भेटले होते. माझ्या वडिलांनी राजीव गांधींची भेट मिळवली होती. मला राहुल गांधींना भेटायचंच आहे! तिला भेटायला मिळालं. राहुल गांधींबरोबर तिचा फोटो निघाला आणि पुढची यात्रा ती उत्साहाने चालत राहिली. म्हणजे राहुल गांधींची भेट अवघड असली तरी अप्राप्य नव्हती. भेटल्यावर ते मोकळे वागत होते, कुण्या राजपुत्राने, विश्वगुरुने सामान्य प्रजेवर उपकार केल्यासारखा भाव त्यात नव्हता.

तरीही जे कुणी मोठ्या आशेने आले होते, ते सहजपणे राहुल गांधींना भेटू शकत नव्हते, हेसुद्धा खरं. सर्वसामान्यांशी त्यांचा संवाद आणखी जास्त प्रमाणात व्हायला हवा होता, असं वाटून गेलं. यात्रा म्हणजे समूहाने चालणे. अशा वेळी ज्या कुणाला थोड्याफार प्रमाणात यात्रेशी समरस व्हावंसं वाटत आहे, आणि त्या समरसतेच्या भावनेचं कृतिशील रूप म्हणून यात्रेबरोबर चालायचं आहे; त्यांना ते समाधान मिळवून देण्याचा काहीतरी प्रतिकात्मक मार्ग असायला हवा होता. म्हणजे, दोन मुख्य गटांमागून चालणाऱ्याला एखादा बिल्ला जरी छातीवर लावायला मिळाला असता, तरी त्याला वा तिला यात्रेत सामील झाल्याचं, यात्रेच्या उद्दिष्टांसाठी काहीतरी सांकेतिक कृती केल्याचं समाधान मिळालं असतं. यात्रेशी, पर्यायाने राहुल गांधींशी आणि मग आपोआप काँग्रेसशी तो जोडला गेला असता! तसंच, जिथे जिथे राहुल गांधी थांबत होते तिथे तिथे स्थानिकांपैकी नीट बोलता येणाऱ्यांना त्यांची भेट मिळाली तरी मोठा परिणाम होऊ शकतो, असं वाटतं.

दुसरा भाग होता, मीडियावाल्यांचा, काही काळ सोबत चालणाऱ्यांचा. आम्ही हा पास मिळवला होता. त्यामुळे विश्रांती घ्यायला किंवा दिवसभराची चाल पूर्ण झाली म्हणून यात्रा थांबली की आम्हाला तिथे जायला मिळत होतं. तिथल्या लोकांशी बोलायला मिळत होतं. उरलेल्यांची व्यवस्था काहीशी सैल होती, पण होती. यापेक्षा महत्त्वाचं ठरलं ते वातावरण. हे कसं ठरतं, हे सांगता येत नाही. कोणी घोषणा देत नव्हतं की तिथे प्रेरणादायक गाणी गात नव्हतं की भाषणं देत नव्हतं. तरी वातावरण भारलेलं होतं. इथे काहीतरी वेगळं, काळाच्या पटावर लक्षणीय ठरेल असं काहीतरी चाललं आहे, असं वातावरण होतं.

हे काय असतं? आपण इतिहासाचे साक्षी होत आहोत, असं वाटण्यामागे स्वत:च्या मनातल्या इच्छेचे पडसाद असतात, हे खरं; पण त्याची साथ येते का? एकाची लागण दुसऱ्याला होते का? कारण हालचालीत काहीसा जास्त उत्साह होता. तिथे नुसतं असण्यात आपण काहीतरी योगदान देत आहोत, असं होत होतं. या


वातावरणात मोठी भर टाकली ती ७ तारखेला रात्री झालेल्या मशाल मिरवणुकीने. हातात मशाली घेऊन लोक चालत होते, वेगाने चालत होते, चालताना घोषणा देत होते; सगळ्यांच्या पुढे चक्क एक बँड होता. हे दृश्य अत्यंत प्रभावी होतं. मिरवणुकीच्या दुतर्फा लोक उभे होते, आम्हीसुद्धा त्यातच होतो. राहुल गांधींचा चालण्याचा वेग चांगलाच होता. त्यांच्याबरोबर रहाण्याची धडपड करणाऱ्या नेतेमंडळींची तिरपीट उडत होती. मिरवणूक एक क्षण थबकत नव्हती. अगोदरच भारलेल्या वातावरणाला या मशाल मिरवणुकीने विद्युतभारितच केलं.

बघणाऱ्यांच्या, मिरवणुकीत भाग घेणाऱ्यांच्या, या सगळ्या प्रकाराला साक्षी असणाऱ्यांच्या मनात या वातावरणाने जो ठसा उमटवला, तो किती काळ राहील? तो रहावा, त्याच्या प्रभावातून देशात घडणाऱ्या घटनांचा रंग बदलावा  आणि एक वेगळं राजकीय वळण घ्यावं, यासाठी काँग्रेस काय करणार आहे? भारत जोडो यात्रेविषयी आकर्षण वाढत चाललं आहे. संघाच्या विषारी प्रचाराने राहुल गांधींविषयीचं मत कलुषित केलं होतं, त्याचा मागमूस राहिलेला नाही. उलट, आज जर कुणी त्यांच्याविषयी कुचेष्टेच्या सुरात बोलू लागला, तर त्या बोलणाऱ्याच्या हेतूमधल्या शुद्धतेबाबत लोक शंका घेऊ लागले आहेत. राहुल गांधींनी वातातरणाला जाग आणली आहे. कितीही म्हटलं, तरी ते खूप जास्त लोकांना भेटू शकत नाहीत, खूप जास्त लोकांशी संवाद साधू शकत नाहीत. चालणाऱ्या माणसाला ते शक्य नाही. म्हणून आता पुढची जबाबदारी यात्रा समर्थकांची, काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. या भारलेल्या वातावरणाचा फायदा घेण्याची काही योजना आहे का?

३.

तिथे भेटलेल्यांमध्ये स्थानिक नेतृत्वाविषयीची नाराजीसुद्धा स्पष्टपणे व्यक्त झाली. ‘आम्हाला बघून हे गाडीची काचसुद्धा खाली करत नाहीत, आता मोठे रस्त्यावरून चालतायत!’ राहुल गांधींना काँग्रेसला ऊर्जितावस्था आणायची असो की देशातल्या सामाजिक राजकीय वातावरणात परिवर्तन घडवून आणायचं असो; काँग्रेसमधली आजची नेतेमंडळी त्यात सर्वात मोठा अडथळा ठरणार आहेत. नेतृत्वामधलं सामर्थ्य लोकसंग्रहातून येतं, हे त्यांना माहीत नाही का? जनतेत असा समज आहे की या नेत्यांचा सर्वसामान्यांशी संपर्क तुटला आहे, जमिनीवर उतरून काम करणं ते विसरून गेले आहेत. हा समज खोडून काढणं कठीण आहे; कारण मंडळी जुन्या, सरंजामी मनोवृत्तीत पूर्ण मुरलेली आहेत. देगलूर ते नांदेड मार्गात राहुल गांधींचं स्वागत करणारी जी पोस्टर्स होती, त्यांवर अशोक चव्हाणांबरोबर त्यांची मुलगीसुद्धा झळकत होती! पुढे काही पोस्टर्सवर खतगावकरांची सून होती. या बायकांनी राजकारणात येऊ नये, असं नाही; पण रस्ताभर मुखडा झळकण्याचा मान त्यांना मिळतो तो घराण्याची परंपरा चालू ठेवण्यातूनच. अशोक चव्हाणांनी त्यांचे पिताजी शंकरराव यांचे इंदिरा, राजीव यांच्याबरोबरचे फोटोसुद्धा लावले होतेच. ते कदाचित राहुल गांधींवर छाप टाकण्यासाठी असावेत.आमच्या घरात राज्याच्या नेतृत्वाची जुनी परंपरा आहे, हे दाखवण्यासाठी असावेत.

राहुल गांधींना हे कळत नसेल का? त्यांच्यासोबत कन्याकुमारी ते श्रीनगर चालण्यासाठी त्यांनी निवडलेले सव्वाशे जण उद्याचे काँग्रेस नेते आहेत का? एवढं अंतर चालण्याचा मनसुबा राखणारे मनाने शरिराने तरुण तर निश्चित असणार. म्हणजेच तरुणांच्या इच्छा आकांक्षा ओळखणारे, तरुणमनाने विचार करणारे असणार. पण त्यांना प्रस्थापित करायचं असेल तर सध्याच्या नेतृत्वाला कसं काय बाजूला सारणार?

४.

पण अशोक चव्हाणांनी काही हजार लोकांच्या विश्रांतीची, झोपण्याची, खाण्यापिण्याची सोय उत्तम केली होती. जेवणाची जबाबदारी व्यावसायिक एजन्सीकडे होती. त्यांचा स्टाफ प्रत्येकाला हवं नको विचारत होता. पदार्थ चमचमीत होते. जिलबी, मूगडाळ बर्फी यांसारख्या स्वीट डिशेस होत्या. नंतर पहुडण्यासाठी गाद्या घातल्या होत्या. तिथे चक्क मोबाईल चार्ज करण्याचे पॉइंट्ससुद्धा होते! यासाठी स्थानिक काँग्रेसवाल्यांनी, म्हणजे बहुधा अशोक चव्हाणांनी खर्च केला होता आणि तयारीकडे जातीने लक्ष दिलं होतं. अर्थात, यात राहुल गांधींबरोबर असणाऱ्या त्यांच्या सल्लागारांचादेखील मोठा हात होता.


यावरून असा समज होऊ शकतो की राहुल गांधींची पदयात्रा म्हणजे ऐषारामी प्रकार असावा. तसं म्हणता येणार नाही. राहुल गांधी वेगाने चालतात. रोज सरासरी पंचवीस किलोमीटर चालतात. पंचवीस किलोमीटर हे फार मोठं अंतर नाही. चालण्याची थोडीफार सवय असलेला दिवसभरात तेवढं सहज जाऊ शकतो. पण राहुल गांधी गेले तीन महिने रोज तेवढं चालत आहेत! आणखी तीन महिने रोज तसंच चालणार आहेत! उपोषणाचं नाटक करता येतं. भिंतीवर खिडकी रंगवून शाळेत गेल्याचं नाटक करता येतं. मांडी घालून डोळे मिटून फोटो काढून घेतला की गुहेत ध्यान केल्याचंसुद्धा नाटक होऊ शकतं. पण चालण्याचं नाटक करता येत नाही! तिथे खरंच चालावं लागतं. राहुल गांधी ना कुठे लपू शकत, ना त्यांच्या वतीने दुसरं कुणी चालतंय, असं होऊ शकत. ते लोकांच्या गराड्यात असतात. त्यांच्या चालण्यात प्रचंड उत्साह दिसून येतो. चालताना ते लोकांशी बोलतात, गप्पा मारतात. नंतर पत्रकार परिषदा घेतात. यात कुठेही ते थकलेले, मरगळलेले, झोपाळलेले दिसत नाहीत.

आणि हे सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. लोक अचंबित होतात. इतर नेत्यांची दमछाक होताना पाहून करमणूक होत असली तरी राहुल गांधींविषयी आदरच वाटतो. आज, या घटकेला देशात दुसरा कुठला मोठा नेता इतका चालू शकतो? चालताना बोलू शकतो? या माणसाबद्दल जनतेला आदराबरोबर आपुलकी, जिव्हाळा वाटू लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी जे बोलतात, त्याकडे लक्ष द्यावंसं लोकांना वाटू लागलं आहे. उलटा प्रचार काहीही म्हणो, यात्रेमुळे लोकांचा ओढा राहुल गांधींकडे प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वाढतो आहे.

५.

या जनभावनेचा लाभ काँग्रेसला घेता येईल का? यात्रेच्या मार्गावर येणारे लोक ही भावना बरोबर घेऊन आपापल्या गावी, घरी जातील. तिथेही हे लोण पोहोचेल. पण त्यापलीकडे? यात्रेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असे कुठून कुठून आलेले लोक आम्हाला भेटत होते. सगळ्यांना जसं कुतूहल होतं, तसंच राहुल गांधींनी हे जे चालवलं आहे, त्याला पाठिंबा दर्शवण्याची, त्यातून स्वत:ला अनुकूल अर्थ शोधण्याची इच्छाही त्यातल्या बहुतेकांना होती. भाजप आणि संघ यांनी देशाचं जे वाटोळं करायला घेतलं आहे, त्या प्रक्रियेला थोपवण्याची सुप्त शक्ती या यात्रेतून उमलू शकेल, असा आशावाद त्यांच्या मनी होता. ठीक आहे, आलेले सगळे एक प्रकारे अनुकूलच होते. पण न आलेले? त्यातले काही विरोधक असणारच. पण न आलेल्यात बहुसंख्या इतर अवधानांमुळे येऊ न शकलेल्यांची असणार. कारण या यात्रेने भारतभरातल्या सर्वच लोकांना चाळवलं आहे. त्यातल्या काहींना, विशेषत: मीडियाला दहशतीपायी झोपण्याचं सोंग घ्यावं लागत आहे, हे खरं; पण इतर कितीतरी लोकांना यात्रेविषयी उत्सुकता आहे. त्यांच्यापर्यंत हा आशावाद नेणे, त्यांना यात्रेच्या उद्देशात सामील करून घेणे हे काँग्रेस कार्यकर्त्यांचं काम आहे. हे काम ते करतील का?

यात्रेच्या या सगळ्या अनुभवांमध्ये एक महत्त्वाची भर घालायला हवी. आम्ही जिथे गेलो, तिथे निखिलला लोक ओळखत होते. त्याच्याबरोबर सेल्फी काढत होते. त्यांच्यात तरुणांची संख्या प्रचंड होती. आयबीएन लोकमतची, मॅक्स महाराष्ट्रची, निखिलच्या एकूण पत्रकारितेची आठवण ते आवर्जून काढत होते. त्यातला न आवडलेला भाग सांगून मोकळे होत होते. हे मला आशादायक वाटलं. निखिल वागळे हा कुणी सिनेस्टार किंवा सीरियलस्टार नाही. त्याचा मुखडा सर्वज्ञात आहे म्हणून हे तरुण त्याच्याकडे येत नव्हते. निखिल एका बाजूने एका विशिष्ट विचारसरणीचा प्रतिनिधी आहे. त्यापेक्षा जास्त तो निर्भीड पत्रकारितेचं प्रतीक आहे. ‘तुमच्यासारखं आता कुणी बोलत नाही हो,’ अशी हळहळ सतत ऐकू येत होती. हे तरुण नांदेडपुरते मर्यादित नव्हते. ते महाराष्ट्रभरातले होते. निखिलच्या रोखठोक बोलण्याला, त्याच्या उघड आणि खणखणीत भाजपविरोधाला इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये पाठिंबा असेल, असं मला वाटत नव्हतं. एक प्रकारे निखिलने आणि त्याच्यासारखी पत्रकारिता करणाऱ्यांनी तरुण मनांची नीट मशागत केली आहे! उन्नती सगळ्यांनाच हवी आहे; पण सगळेच साधनशुचितेविषयी बेफिकीर नाहीत! सार्वजनिक नीतीमत्तेविषयी चाड असलेले तरुण पुष्कळ आहेत! महानगरी मध्यमवर्गातल्या मध्यमवयीन सदस्यांमध्ये दिसणारं सडेल मनोवृत्तीचं चित्र प्रातिनिधिक नाही!

योगेंद्र यादव यात्रेबरोबर आहेत. पण त्यांनी स्वत:वर एक अधिकचं काम घेतलं आहे. जिथे जिथे यात्रा थांबते, तिथे तिथे स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या बैठकी योगेंद्र यादव भरवत आहेत. या भेटीतून स्थानिक अडचणी, अपेक्षा यांचा अंदाज घेत आहेत. यातून लोकांना आज काय हवं आहे, याचा खूप मोठा डेटा त्यांच्याकडे जमा होतो आहे. योगेंद्र यादव हा शिस्तीने काम करणारा मनुष्य आहे, ज्याच्या स्वच्छ चारित्र्याविषयी आणि प्रामाणिक हेतूंविषयी कोणालाही संशय नाही. लोकांना एका उद्देशाची जाणीव करून देत असताना या यात्रेतून लोकांकडूनही संदेश मिळवला जातो आहे.

६.

या यात्रेचं फलित काय असेल?

भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी भारतात क्रांती घडवून आणणार, असं कुणालाही वाटत नाही. काँग्रेसच्या मतांमध्ये, लोकसभा-विधानसभा यामधल्या जागांमध्ये किती फरक पडेल, याचा नीट अंदाजसुद्धा या घडीला बांधता येणार नाही. सर्वसाधारण जनमानसात अस्वस्थता निर्माण होऊन भाजपच्या मताधिक्यात घट होईल, हे नक्की. पण ती घट किती असेल, देशाच्या राजकारणाला वळण देण्याइतकी वजनदार असेल का, हे प्रश्न अजून बराच काळ अनुत्तरित रहाणार आहेत. शिवाय राहुल गांधींनासुद्धा कसली घाई असल्याचं भासत नाही. हळू हळू पसरत जाणाऱ्या जललहरींप्रमाणे हे वातावरण, ही अस्वस्थता देशभर पसरेल की काही काळ खळबळ निर्माण करून विरून जाईल; भाजपची चाणक्यनीती सातत्याने ज्या भावनाप्रक्षोभाच्या लाटा सोडत असते त्यांच्यात नष्ट होईल, हे तरी कुठे कुणाला माहीत आहे?

एक जण म्हणाला, तेच खरं: काही नाही तरी सध्या देशात असलेलं दहशतीचं वातावरण कमी झालं आणि लोक त्यांचा असंतोष मोकळेपणाने व्यक्त करू लागले, तरी या यात्रेने खूप काही साध्य केलं, असं म्हणावं लागेल. कारण मग राजकारणाला योग्य दिशा तरी मिळेल आणि मग जे व्हायचं ते होईल.

2 comments:

  1. हेमंत, या यात्रेबद्दल तू जे निरिक्षण नेहमीच्या ओघवत्या भाषेत मांडलं आहेस, ते आजच्या मीडिया साठी

    ReplyDelete
  2. हेमंत या तुझ्या ब्लॉगवर जे निरिक्षण तू नेहमीच्या ओघवत्या भाषेत नोंदवलं आहे, ते आजच्या मीडिया साठी मार्गदर्शक ठरणारं आहे. एकदा बोलूच

    ReplyDelete