Showing posts with label जुनी गाणी. Show all posts
Showing posts with label जुनी गाणी. Show all posts

Wednesday, October 3, 2018

धन्यवाद, पपू!



मित्र द्वारकानाथ उर्फ पपू संझगिरी महिन्याभरात एखादा गाण्यांचा कार्यक्रम करतो, हे आता सर्व मित्रांना माहीत आहे. अलीकडच्या काळात त्याने शंकर जयकिशन, हेमंत कुमार, यांच्यावर कार्यक्रम केले. ते मी पहिले-ऐकले नाहीत. त्याचा गुरुदत्तवरचा कार्यक्रम मी पाहिला होता. जास्तीत जास्त लोकांना कसं खूष करता येईल, हा हिशेब करत तो कार्यक्रम करतो. त्याच्या लताची 'वेगळी' गाणी सदर करणाऱ्या कार्यक्रमात तर मी सहभागीच झालो होतो. मजा आली होती.

असले कार्यक्रम करण्यासाठी तो भरपूर रिसर्च करतो, हे मला माहीत आहे. हा रिसर्च गाण्यांविषयी असतो; तसाच गाणारे, संगीतकार, तेव्हाची एकंदर सिनेसृष्टी, अशा अनेक अंगांनी केलेला असतो. तो किस्से सांगतो, बारीक सारीक खुब्या वर्णन करतो; पण त्यातल्या प्रत्येक गोष्टीला आधार असतो. उगीच इकडल्या तिकडल्या वावड्या तो उगाळत बसत नाही. त्याचंप्रमाणे एखाद्या किश्शाचं पितृत्व तो ज्याचं त्याला देतो; ढापत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आख्खा कार्यक्रम तो 'डिझाईन' करतो. त्याचं 'स्क्रिप्ट' तयार करतो. फारच कमी भाग extempore असतो. हे स्क्रिप्ट बनवताना सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. गाणं वादकांना अजिबात अपरिचित असून चालत नाही. गायकाला तर नाहीच नाही. ते गाणं बहुसंख्य श्रोत्यांना माहीत नसलेलंसुद्धा त्याला चालत नाही. लोक नाराज होतात, असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा या विषयातला दीर्घ अनुभव लक्षात घेता हे बरोबर असावं. या सगळ्या हवं-नकोतून कुठली गाणी घ्यायची, कुठली नाही; हे बरंचसं ठरतं; पण पूर्ण ठरत नाही. कारण सगळी गाणी मूडच्या दृष्टीने एकीकडे कललेली असून चालत नाही. दुःखी, संथ गाणी जास्त असूनही चालत नाही. जास्तीत जास्त संगीतकारांना सामावून घ्यावं लागतं. 'चांगलं' किंवा 'अत्यंत थोर' गाणं हा एकमेव निकष तर कधीच होऊ शकत नाही.

आणि एवढं सगळं झाल्यावर निवडलेल्या गाण्यांना एका सूत्रात ओवावं लागतं. सभागृहातला प्रत्येक श्रोता जरी स्वतःला संगीतातला, गाण्यांमधला दर्दी मानत असला; तरी तसं नसतं, हे भान आपण बाळगायचं पण तसं श्रोत्यांना वाटू द्यायचं नाही, ही कसरत तर करावीच लागते. त्यासाठी नुसती चांगली गाणी एकामागून एक सादर करून चालत नाही. काहीतरी रचावं लागतं. त्या रचनेत वळणं असावी लागतात, सुखद धक्के योजावे लागतात, वगैरे. दोन गाण्यांमधलं बोलणं कार्यक्रमाची रंगत वाढवणारं असावं, रसभंग करणारं नसावं; त्या बोलण्याने कधीही, कधीही प्रत्यक्ष गाण्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये, हे पथ्य अत्यंत दक्षपणे पाळावं लागतंच लागतं!

आपण जातो आणि प्रत्यक्ष कार्यक्रम बघतो. कधीतरी कोणीतरी गायलेली लोकप्रिय गाणी सादर करणे, हे किती दुय्यम काम आहे, असं नाकही काही जण मुरडतात. पण हे 'दुय्यम' काम सफाईदार करण्यासाठी भरपूर विचार आणि कष्ट करावे लागतात!


आज हे सांगण्याचं कारण म्हणजे परवा पपूने सादर केलेला तलत महमूदवरचा कार्यक्रम. तसं पाहिलं तर लता, आशा, रफी यांच्या तुलनेत तलतच्या गाण्यांची संख्याच कमी आहे. म्हणजे तलतची गाणी निवडणं तुलनेने सोपं आहे. शिवाय यच्चयावत सगळ्या पार्श्वगायकांमध्ये खराब गाण्याचं प्रमाण सर्वात कमी असलेला गायक पुन्हा तलत. कुठलंही गाणं निवडा, ते चांगलं असण्याची शक्यता जास्त! यावरून असं भासतं की तलतवर कार्यक्रम करणे सोपं असणार. पण तसं नाही. एक कारण, तलतच्या गाण्यांमध्ये 'ब्लू मूड'वाल्या गाण्यांची संख्या खूप जास्त. हॉलमध्ये माणसं बसवून त्यांच्यासमोर रडक्या, उदास गाण्यांच्या मालिकेचा कार्यक्रम रंगतदार होत नाही! दुसरं असं की वागाबोलायला एकदम अदबशीर असलेल्या तलतचे 'किस्से' कमी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तलतच्या जगावेगळ्या आवाजाच्या जवळ जाणारा आवाज शोधणे! 



तरी कार्यक्रम चांगला झाला. तलतच्या आवाजाला गौरव बांगियाने बऱ्यापैकी 'न्याय दिला'. सुरुवातीला तो चुकला. गातानाही तलतची नक्कल करतो आहे, असं वाटत राहिलं. पण नंतर त्याचा आवाज 'लागला'. 'हमसे आया न गया' उत्तम गायला. सगळ्यात चांगलं हेच गाणं गायला, असं म्हणायला हरकत नाही. पण मी त्याला शेवटच्या 'गमकी अंधेरी रातमें' या गाण्यासाठी सर्वात जास्त मार्क देईन. हे गाणं तलत-रफी द्वंद्वगीत आहे. दोघांच्या तोंडी असलेले शब्द विरुद्ध मूडचे आहेत. आणि या गाण्यात रफीने कमाल केली आहे. मला तर कधी म्हणावसं वाटतं, रफीने या गाण्यात तलतवर मात केली आहे! गौरव एकटाच दोघांचे आवाज काढत गायला. तसं करताना रफीचा पुरुषीपणा (कधी उथळपणा) अधोरेखित कर; तलतचा मुलायम कंप ठळक कर, असलं काही त्याने केलं नाही. दोघांच्या गायकीतला फरक धरून तो गायला. शब्दांना प्रामाणिक रहात गायला. या गाण्यात त्याची maturity दिसली.

कार्यक्रमात चारेक बाई-बुवा ड्यूएट्स होती. त्यासाठी प्राजक्ता सातर्डेकर होती. ही लहानशी मुलगी भयंकर महत्त्वाकांक्षी असावी. ती गाताना तिचा 'attitude' नाही प्रोजेक्ट होत. सगळं लक्ष गाण्यावर केंद्रित करून ती गाते. लतासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करावाच लागतो, लोकांना वेगळ्या जातीचा आवाज चालत नाही; पण ही मुलगी लताची गायकी पकडू बघते! एक गाणं होतं, 'दिलमें समा गये सजन'. सज्जादच्या या गाण्याची सुरुवात तलत नाही तर लता करते. ती सुरुवात अचाट आहे. लताला झिंदाबाद करावं की 'सज्जाद अमर रहे' अशी घोषणा द्यावी की सज्जादच्या अद्भुत orchestration च्या पाया पडावं, असं सगळं एकाच वेळी वाटायला लावणारी गाण्याची सुरुवात आहे. पण लता जे काही करते, त्यानेच घायाळ व्हायला होतं. आणि प्राजक्ताने तोंड उघडून हा अनुभव जसाच्या तसा दिला! बापरे! ऐकताना अंगावर काटा आला. 'प्राजक्ताला आवाजाची दैवी देणगी आहे,' असं म्हणणे हा तिचा अपमान आहे. लता-सज्जाद ही जादू नेमकी पकडणे, हुकमी पकडणे, orchestra सुरूच झालेला नसताना, त्याच्या आधाराविना पकडणे, यासाठी प्राजक्ताने किती कष्ट घेतले असतील! पुढे 'समा' आणि त्याला समांतर अशा प्रत्येक शब्दोच्चारात लता जी फिरकी लीलया घेते, ती प्राजक्ताने हुबेहूब घेतली, हे मग सांगायला नको.

सिनेसंगीताच्या गाण्यांचा कार्यक्रम समर्थ वाद्यमेळाविना यशस्वी होऊ शकत नाही आणि अजय मदन यांच्या टीमचा उल्लेख न करणे अडाणीपणाचं ठरेल. 'आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये' हे गाणं काय उचललं त्यांनी! ठेका आणि वाद्य, कुठेच काही कमी पडलं नाही. हे जेव्हा कमी पडतं, तेव्हा कार्यक्रमाचा विचका होतो. अजय मदन यांच्यावर पपू पूर्ण विसंबू शकतो.

या वाद्यमेळाचा कमीपणा म्हणून नाही; तर विलायत खान यांची कलाकारी म्हणून एक उल्लेख करावासा वाटतो. 'मेरी यादमें तुम ना आसू बहाना' या गाण्यामध्ये सतार वाजते. तलत पुन्हा  गाऊ लागण्याअगोदर एक नाजुक छोटासा आलाप आहे. तो काही या कार्यक्रमातल्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांवर उमटू शकला नाही. विलायत खान यांची सतार मनातच वाजली!

कार्यक्रमाबद्दल पपूला धन्यवाद. आणि एक कबुली. मला गतकातरता – nostalgia – हा रोग नाही. मागचं फार आठवतही नाही; त्या 
आठवणींचे कढ येणं दूर राहिलं. 'जुनी गाणी' आजही गुणगुणतो, प्रेमाने ऐकतो, एन्जॉय करतो; पण त्या गाण्याचं कसलं असोसिएशन भूतकाळातल्या कसल्या घटनेशी, आठवणीशी नाही. गाणं गाणं म्हणून एन्जॉय करतो; त्यातून रम्य भूतकाळ जागा होतो म्हणून नाही. पण च्यायला एका मागून एक तलत ऐकताना गडबड झाली. कॅफे स्वीमिंग पूलचे दिवस आठवले! आभाळभर ब्लू मूड पसरल्यासारखं झालं. अत्यंत अस्वस्थ वाटलं.

तलतराव, तुमचं लेबल आमच्या त्या दिवसांवर लागलं आहे, हे नव्याने कळलं हो!

Saturday, April 27, 2013

शमशाद: ’हिला पटवून धन्य व्हावं!’


मला कान तसा उशीरा आला आणि जसा आला, तसा मी लताच्या आवाजात पूर्ण बुडालो. तेव्हा नाकातोंडात गेलेलं पाणी अजून नीटसं निघालेलं नाही. परिणामी मला कायम वाटत आलं आहे की वेडा होऊन गाणी ऐकण्याच्या काळात मी आशा, गीता, शमशाद यांना समरसून एन्जॉय करू शकलो नाही. थोडा अपवाद नूरजहानचा. शमशादला तर नायिकेचा आवाज म्हणून स्वीकारणं जडच गेलं. त्यात शमशाद सुरुवातीला ऐकली, ती नौशादची. ’बैजू बावरा’ आणि ’दीदार’. दूर कोई गाये आणि बचपनके दिन भुला न देना. दोन्ही लता-शमशाद ड्युएट्स. काय काय सुचायचं. ’बचपनके दिन भुला न देना’ हे गाणं बालवयातले नर्गिस आणि दिलीप कुमार गातात. घोड्यावर बसलेले तबस्सुम आणि परिक्षित सहानी. मोठी झाल्यावर नर्गिसचा आवाज फुटतो आणि लताऐवजी ती शमशादच्या आवाजात गाऊ लागते. दिलीप कुमारचाही आवाज फुटतो आणि शमशादचं रूपांतर रफीमध्ये होतं!

या संस्काराला ’किस्मत’मधल्या कजरा मुहबतवालाने हातभार लावला. या गाण्यात बबिता पुरुषाच्या वेषात आणि विश्वजित बाईच्या वेषात आहे. बबिताच्या तोंडचे शब्द जरी पुरूषाचे असले तरी तिला आवाज दिला आहे आशाने. आणि बाईच्या भावना व्यक्‍त करणारा विश्वजित गातो शमशादच्या आवाजात. संगीतकार जणू सांगतो आहे, आशाचा आवाज बघा कसा स्त्रीला शोभेसा नाजुक, लाडिक आहे; तर शमशादचा आवाज मर्दानी आहे. स्त्रीवेषातल्या पुरुषाला शोभेलसा आहे.

ओ पी नय्यरला खरंच असं वाटत होतं का? मुळीच नाही. ’किस्मत’ १९६८ चा. त्याच्या दहा वर्षं अगोदर आलेल्या ’नया दौर’मध्ये सुद्धा शमशाद-आशा यांचं द्वंद्वगीत आहे, रेशमी सलवार कुरता जालीका. या गाण्यातले शब्दही बाईचे आणि बुवाचे आहेत. मात्र चित्रपटात नाचणार्‍या दोन्ही बायाच आहेत. आणि पुरुषाच्या वेषात नाचणारी बाई आशाच्या आवाजात, तर बाईच्या वेषात नाचणारी बाई शमशादच्या आवाजात गातात. दोन्हींपैकी एकही नायिका नसताना. म्हणजे, दहा वर्षात ओ पी लतामुळे निर्माण झालेल्या धारेला लागला! कारण बाईचा आवाज किनरा हवा, हा संस्कार निःसंशय लताचाच.

म्हणून तर शमशादला नायिकेचा आवाज म्हणून स्वीकारायला जड गेलं. आणि ओ पी नय्यरने जणू या विचाराला फूस लावली. कभी आर कभी पार हे ’आरपार’मधलं टायटल साँग असेल शमशादने गायलेलं; पण ते नायिका श्यामाच्या तोंडी नाही. कहींपे निगाहें कहींपे निशाना हे नाही. ’सीआयडी’तलं बूझ मेरा क्या नाम रे नाही. लेके पहला पहला प्यारमधला शमशादचा आवाज नायिका शकीलाला नाही. शकीला तोंड उघडते, तेव्हा आशाचा आवाज ऐकू येतो.

असं करता करता जेव्हा ’जुन्या’ गाण्यांच्या विश्वात आत आत गेलो आणि मागचे संदर्भ सुटले, तसे कान मोकळे झाले आणि अमीरबाई, जोहराबाईपासून एकेका आवाजाची आपापली वेगळी लज्जत घेताना मजा येऊ लागली. मग खुर्शीदचं घटा घनघोर अत्यंत आवडतं झालं. इतकं की पावसाळ्याच्या सुरुवातीला सिलोनवर ते ऐकायला उतावळा होऊ लागलो. कभी न बिगडे किसीकी मोटर रस्तेमें मधली धापा टाकणारी सुरैया गुदगुल्या करू लागली. दूर कोई गाये हे गाणं लताचं नसून शमशादचं आहे, असं मनात आलं. मनके अंदर हो प्यारकी अग्नी या तिच्या कडव्यात शमशाद जी उफाड्याने गाते, अभीसे है ये हालच्या आगेमागे जे वळसे घेते, ते कानात साठू लागले. त्या पार्श्वभूमीवर त्यातलं लताचं मेरे अंगना लाजका पहरा मिळमिळीत भासलं. ’अंदाज’मध्ये लता नौशादसाठी प्रथम गायली. तेव्हाच्या रीतीप्रमाणे लतानेही ’अंदाज’मध्ये जाड आवाज काढला आहे. तेव्हा त्यातल्या डरना मोहबत करलेमध्ये शमशादच्या सफाईसमोर लताची सुप्‍त ताकद तेवढी जाणवून घ्यावी. लता झाली तरी ती विष्णूचा अवतार नव्हे की जन्मापासूनच तिला स्वसामर्थ्याची पूर्ण जाणीव असावी. ’अंदाज’च काय, नौशादच्याच पुढच्या ’बाबुल’मध्ये सुद्धा तिचा नवोदितपणा गेलेला नाही. पंछी बनमेंमध्ये मंदबुद्धी हातवारे करणार्‍या नर्गिसला तिचा सखी हाथोंसे हॉय म्हणणारा आवाज एकदम जुळतो. आणि किसीके दिलमें रहना था म्हणताना पातळ, किनर्‍या आवाजाला वजन येतं. या गाण्यात बसायी थी कोई मेहेफिल मधला लताचा ’ह’ खणखणीत आहे, शमशादचा गुळगुळीत आहे!

’बाबुल’ची नायिका नर्गिस की मुनव्वर सुलताना? नौशादचं काही कळत नाही. ’बाबुल’मध्ये नर्गिस लताच्या आणि मुनव्वर सुलताना शमशादच्या आवाजात गातात; तर ’दीदार’मध्ये नर्गिसला शमशादचा आणि निम्मीला लताचा आवाज आहे. ’दीदार’ची नायिका काय निम्मी? कदाचित नर्गिसचा आवाज लहानपणी लताचा होता आणि नंतर फुटला, असं ठरल्यावर नौशादचा इलाज राहिला नसेल. पण त्याचमुळे शमशादच्या उंच चढलेल्या खणखणीत आवाजात चमनमें रहके वीराना ऐकताना समोर नर्गिस दिसते. शमशाद आणि नायिका एकत्र पहाण्याचा सर्वात स्ट्राँग संस्कार या गाण्याने केला.

ओपी नय्यरचं जे झालं, ते इतर संगीतकारांचं खूप अगोदर झालं. उदाहरणार्थ नौशाद. ’बाबुल’, ’दीदार’ अशा चित्रपटांमध्ये दोन नायिकांना दोन आवाज देताना नौशादने लता आणि शमशाद यांच्यात कोणाला वर-खाली लेखलं नाही. पण ’जादू’मध्ये? एकाच नलिनी जयवंतला दोन आवाज. लो प्यारकी हो गयी जीत गाताना लता आणि जब नैन मिले नैनोंसेरूपकी दुष्मन पापी दुनिया गाताना शमशाद. आणि पुढे ’अमर’मध्ये मधुबाला आणि निम्मी, दोघींनाही लताचाच आवाज. कसा प्रवास आहे! ’जादू’ हा नलिनी जयवंतचा उत्सव आहे. आणि ’जादू’तली गाणी उडती, पश्चिमी ढंगाची आहेत. लो प्यारकी हो गयी जीत गाणं चांगलं आहे; पण रूपकी दुष्मनची बेहोषी त्यात नाही. मारे अखियाँ हे शब्द एकदा खाली आणि एकदा वर, ही शमशादची खमंग गंमत ऐकूनच कळेल. इथल्या नलिनी जयवंतच्या मनमोकळ्या देहबोलीला शमशाद न्याय देते; लता नाही. लताच्या बाबतीत नौशादचा एकूणच प्रॉब्लेम असावा. चावट चालींची, उच्छृंखल गाणी काय त्याने दिली नाहीत? पण लताच्या आवाजातलं एक आठवत नाही. नौशादची लता कायम साफ, शुद्ध, सरळ. लो प्यारकी हो गयी जीतच्या पुढे त्याची मजल जात नाही. अनिल विश्वासला बरं जमलं नाचे रे गोरी जिंगू सारख्या गाण्यांमध्ये.

त्या, एकोणीसशे पन्नासच्या आगे मागे काळात शमशादचं अपील सणसणीत असावं. ’परदेस’मधलं मेरे घुंगरवाले बाल (गुलाम महम्मद) आणि ’आवारा’तलं एक दो तीन (शंकर जयकिशन), दोन्ही गाणी पडद्यावर कक्कू गाते. आवाज शमशादचा. तोच बेहोष, मनमुक्‍त भाव. या गाण्यांमधले, विशेषतः घुंगरवाले बालमधले, सूर कमी ऐकू येतात; त्यातली अनावर उच्छृंखलता कानातून थेट हृदयात शिरते. चाल गाता गाता पलिकडे कुठल्याकुठे फिरायला जाऊन, ज्याला जिप्सी म्हणावं असं भावदर्शन शमशाद लीलया घडवते. असं वाटतं, तिची आणि फॉर्मातल्या किशोरची जोडी बरी जमली असती. पण किशोर फॉर्मात आला तेव्हा कुणी या दोघांना एकत्र आणलं नाही. किशोर-शमशादचं बेस्ट ड्युएट अर्थात ’नया अंदाज’मधलं मेरे नींदोंमें तुम. पुन्हा हे गाणं किशोरपेक्षा शमशादचंच. किशोरला तेव्हा वजन आलं नव्हतं. आणि ’नया अंदाज’मध्ये शमशादच्या आवाजात मीनाकुमारी गाते हे चालून गेलं. याला एक कारण म्हणजे मेरे नींदोंमें तुम हे गाणं दिसतं त्यापेक्षा जास्त ऐकू येतं. किशोर दिसतो आणि ऐकूही येतो; पण गाण्याच्या मालकी हक्काचे शेअर्स मीनाकुमारीकडे किरकोळ आहेत, शमशादकडे जास्त.

आणि ओपीकडे सर्वात जास्त. शमशादची गोडी ओपीनेच लावली. नौशाद तसा चालवाला माणूस. ओपी किंवा अनिल विश्वासबरोबर जसं गाणार्‍याचं अंतरंग खुलून येतं, तसं नौशादबरोबर होत नाही. शमशादचा रगेलपणा ओपीच्या एकेका गाण्यात कसा उचंबळून येतो. बूझ मेरा क्या नाव रे गाताना त्या रे ला ती काय मस्त आत वळवते. हे शमशाद लीलया करते. करताना जराही योजून केल्यासारखं होत नाही. कजरा मोहबतवालामध्ये नाही का हाय रे मैं तेरी कुरबान मधला शेवटचा कसा तिच्या आवाजात फडफडून जिवंत होतो! लेके पहला पहला प्यार या गाण्यात रफी, शमशाद आणि आशा, तिघे आहेत. तुमनेभी देखा होगा उसको सितारों, आओ आओ मेरे संग
मिलके पुकारो, अशा विरहिणीच्या शब्दांना साजेसा आवाज आशा लावते; पण तेव्हाच्या लतामय वातावरणात आग लावून देणार्‍या ओ पी नय्यरच्या जादूचं रहस्य ज्या रसरशीत ताजेपणात होतं, तो विरहभावामध्ये नव्हता. तो होता, मुखडेपे डाले हुवे जुल्फोंकी बदली, चली बलखाती कहाँ रुक जाओ पगली अशा अवखळपणात. तो जसा रफीत जागा होत होता, तसाच शमशादमध्ये जिवंत होत होता. ओपी-शमशाद हे एक प्रकरणच आहे.

’बहार’.’जुनी’ वैजयंतीमाला शिंकली तरी ती नाचातली मुद्रा असते, इतकी ती नृत्यमय आहे.  नाचणे म्हणजे आनंद, नाच हेच जीवन, हे जणू तिचं जगण्याचं पहिलं तत्त्व असावं. आणि तिला ’बहार’मध्ये आवाज कोणाचा, तर आत्मनिर्भरतेचा प्रत्यय देणार्‍या शमशादचा. पण ’बहार’मधल्या वैजयंतीला स्वतःतल्या जादूचा साक्षात्कार झालेला नव्हता. त्यामुळे सैंया दिलमें आना रे, दुनियाका मजा लेलो, या गाण्यांमध्ये शमशादने तिचं काम चोख केलेलं असलं तरी पडद्यावर गाणी अपेक्षेइतकी रंगत नाहीत. म्हणजे, वैजयंती नाचते, छान दिसते, ठीक; पण या दोघींच्या रसायनाकडून अपेक्षाच जास्त निर्माण होतात, त्याचं काय? ’बहार’वाल्या एसडीचंच ’शबनम’मधलं गाणं ये दुनिया रूपकी चोर वैजयंतीला मिळायला हवं होतं. कामिनी कौशल नाही पटत. बंगाली, गुजराती, मराठी, अशा पॅन इंडियन भाषांमधल्या या गाण्यात वैजयंतीने काय धमाल केली असती.

एवढं झाल्यावर सांगावं लागतं की शमशादला चेहेरा कुणी दिला असेल, तर तो निगार सुलतानाने. ’नमूना’तल्या टमटमसे झाको ना रानीजी ची मजा सी रामचंद्रची आहे. पतंगामधल्या मेरे पिया गये रंगूनवरही त्याची छाप आहेच. (शमशादबरोबर आवाजच मुळी ’चितळकर’ आहे!) पण इथली निगार ’दिसते’. शमशादच्या भरदार आवाजापुढे झाकोळून जात नाही. आणि खटकतही नाही. निगार काही थोराड, पुरुषी नाही. नीट बाई आहे. पण तिच्यात विलक्षण तोरा आहे. जो नर्गिसमध्येसुद्धा सापडतो. थोडासा गीताबालीत दिसतो. सुचित्रा सेनमध्ये तो भरपूर आहे. प्रत्येकीचा वेगळा आहे, निगारचा तोरा ’शमशादी’ आहे! आणि शमशादच्या आवाजातली लखलखीत धार नजरेत उतरवणारी तेजस्वी निगार बघायची असेल, तर अर्थात ’मोगले आझम’. तेरी मेहेफिलमे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे हे गाणं कोणाकरता बघावं? कोणाकोणाकरता बघावं! दिलीपचा मुघल राजपुत्राचा रुबाब, स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाला
प्रियकरावर ओवाळून टाकलेल्या प्रेमिकेचा अप्रतिम अभिनय करणारी मधुबाला आणि प्रेम, मैत्री, कशाहीपेक्षा अस्मिता जास्त प्रिय असल्याचं शब्दांविना जाणवून देणारी निगार. गाणं लीजण्ड होतं, ते असं. मोगले आझममध्ये ग्रेट गाणी आहेत; श्रवणीय आहेत, प्रेक्षणीय आहेत. पण मला तेरी मेहेफिलमें पुन्हा पुन्हा बघताना, ऐकताना जास्त आनंद मिळालेला आहे.

शमशादच्या आवाजाचं, गायकीचं हे वैशिष्ट्य म्हणावं का? आत्मविश्वासातून आलेला मोकळेपणा. शरीर फोडून बाहेर उसळणारा उत्साह. जिचं मन जिंकणं हे एक आव्हान आहे आणि जो पुरुष तिचं मन जिंकेल, त्याचा स्वतःवरचा विश्वास उदंड वाढेल; अशा स्त्रीत्त्वाचं प्रतीक. आपल्या संस्कृतीतल्या बाईत, मुलीत हे – किमान त्या काळात – कमीच असल्यामुळे या आवाजाला नंतरच्या, लता-आशाच्या काळात आक्रमकपणाचं लेबल चिकटलं. एक गोष्ट खरी, बडी मुशकिलसे दिलकी बेकरारीको करार आया, के जिस जालिमने तडपाया उसीपर मुझको प्यार आया (’नगमा’ – नाशाद) या शब्दांना शमशादच्या गळ्यातून बाहेर येताना वरकड आशय प्राप्‍त होतो. हे जे काही प्यार आया प्रकरण आहे, ते सहजासहजी घडलेलं नाही. आणि तो जो कोण जालिम आहे, त्याने हे सीरियसली घेतलं नाही, तर गंभीर प्रसंग ओढवेल, असं सुचत रहातं.

लता आडवी आल्यामुळे आज शमशादचा विचार ’एका आत्मनिर्भर स्त्रीचा बेगुमान उद्‌गार’ असा होत नाही. पण ते तसं जाणवत रहात असणारच. म्हणून त्याचं वर्तमान इंटरप्रिटेशन काही तरी भलतंच होतं. आणि दुसर्‍या कुठल्याही गायिकेपेक्षा शमशादने गायलेल्या गाण्यांची उत्तान रिमिक्स रूपं अवतरत रहातात. समाजाच्या कानांवरचा लताचा फिल्टर विरत जाईल, तशी शमशाद नव्याने मोठी होईल!