Showing posts with label delhi rape. Show all posts
Showing posts with label delhi rape. Show all posts
Friday, January 4, 2013
देशात अचानक बलात्कार वाढले आहेत का?
पेपर इंग्रजी असो की मराठी; स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या बातम्या ठळकपणे, चटकन डोळ्यात भरतील अशा पद्धतीने दिलेल्या आढळतायत. कधी दिल्लीत, कधी मुंबईत, कधी बंगलोरात, कधी आणखी कुठे बायकांच्या संदर्भातल्या बलात्कार, मारहाण, खून रोजच्या रोज होत असल्याचं पेपरवाले आपल्याला सांगतायत. परदेशातून इथे नवीन आलेला किंवा इथलाच नवसाक्षर घाबरून जाईल; आपल्या बायकोची, मुलीची चिंता करू लागेल; असं चित्र त्याला इथल्या पेपरात रंगवलेलं दिसेल. बातम्या सोडून वाचकांची पत्रं, संपादकीय पानावरचे लेख, विशेष पुरवण्यांमधले विषय, यातदेखील सध्या हाच विषय प्रामुख्याने हाताळला जाताना दिसतोय. चॅनेलवाल्यांचं काही वेगळं चाललेलं नाही. काही पेपरातून तर ’वेगाने वाढत चाललेले बलात्कार’ अशा आशयाचे मथळेच आढळतायत. जणू देशातल्या पुरुषवर्गात बलात्काराची साथ आलीय; भराभरा एकेका पुरुषाच्या मनावर बलात्काराचा व्हायरस कब्जा करतो आहे आणि व्हायरसचं बळ विशिष्ट मर्यादेपलिकडे गेलं, की तो पुरुष उठतो आणि लवकरात लवकर संधी साधून बाईवर बलात्कार करतो.
एक स्पष्ट करायला हवं; छापून आलेल्या किंवा सांगण्यात येणार्या बातम्या खोट्या असाव्यात, असं मला सुचवायचं नाही. लेखांमधून, चर्चांमधून व्यक्त झालेली काळजी अनाठायी आहे, असंही मला म्हणायचं नाही. मला इतकंच म्हणायचं आहे, की पूर्वी बायकांवर अत्याचार होत नव्हते का? हा देश ’इंडिया’ झाला आणि अत्याचार वाढले, यात किती तथ्य आहे? पूर्वीपासून असाच आहे हा देश. दिल्लीत अंधार पडल्यावर एकटी दुकटी बाई सुरक्षित कधीच नव्हती. उत्तरेत सर्वसाधारण पुरुष परक्या बाईला भोगवस्तूच समजत आला आहे. एकटी रहाणारी, घटस्फोटित, प्रौढ कुमारिका अशी कुठलीही नवरा, बाप, मुलगा, भाऊ यापैकी कोणा पुरुषाच्या संरक्षणात नसलेली बाई सेक्स करायला तयार, नव्हे उतावीळ असणारच; असं तिथला ’नॉर्मल’ पुरुष सर्रास मानतो. देशात इतरत्र स्थिती इतकी वाईट नसेल; पण पार उलट आहे, असं मला बिलकुल वाटत नाही. पण माहीत नाही.
विषय गंभीर आहे; तरीही फाटे फोडतो. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत ढगफुटी झाली. भूतकाळातले सगळे रेकॉर्ड तोडणारा पाऊस झाला त्याच प्रमाणात प्राणहानी, वित्तहानी झाली. देशभरच्या पेपरांमध्ये, चॅनेल्सवर मुंबईचा पाऊस, हीच मुख्य बातमी होती. याचा एक विचित्र परिणाम असा झाला, की चॅनेलवाल्यांना नवीन शोध लागला, की मुंबईत पाऊस पडतो, बरं का! त्यानंतर दर वर्षी पावसाळ्यात किमान एकदा टीव्हीवर तुडुंब भरून वहाणारा मिलन सबवे दिसायला लागला. २००५ च्या अगोदर मुंबईत पाऊस पडत नव्हता किंवा मिलन सबवे भरत नव्हता, असं मुळीच नाही. पावसामुळे वर्षात एकदा तरी लोकल गाड्या बंद पडणार, हायवेंसकट सर्व रस्त्यांवर वहातुकीची कोंडी होणार आणि घराबाहेर कुठे कुठे अडकून पडावं लागणार याची मुंबईकराला सवय आहे. त्याला यात नावीन्य नाही. पण प्रेक्षकांची आठवण कच्चीच असते, असं गृहीत धरून दर वर्षी २००५ च्या हाहाकाराचा बागुलबुवा नाचवण्याचा प्रकार चॅनेलवाले, विशेषतः हिंदी-इंग्रजी चॅनेलवाले करत असतात. ’नो न्यूज इज गुड न्यूज’ याचा अर्थ ’बॅड न्यूज इज न्यूज’ असा लावून ते या, मुंबईकरासाठी नेमेचि येणार्या घटनेला तिखटमीठ लावून खळबळजनक बातमी म्हणून सादर करत असतात.
बलात्काराचं तसंच तर होत नाही आहे? गेल्या काही दिवसांत / महिन्यांत / वर्षांत बलात्कार वाढत चाललेले आहेत, असं कुणाला खरंच वाटतंय का? ज्यांना वाटतं, ते थोर आहेत. मी जेव्हा डोळे उघडतो, तोच दिवस उजाडण्याचा क्षण, असा आत्मकेंद्री हट्ट धरण्यासारखंच हे आहे, असं मला वाटतं.
माझीच साक्ष काढतो. एक भाऊ डॉक्टर, एक आर्मी ऑफिसर, एक बडा एक्झिक्युटिव्ह, असल्या घराचं उदाहरण. ’नवरा बायकोवर रेप करतो?! हे कसं शक्य आहे? लग्न करणे याचा अर्थ तिने त्याला संभोगाची पूर्ण परवानगी देणे. मग रेप होईलच कसा?’ असा बिनतोड पेच एका भावाने माझ्यापुढे टाकला. ’सेक्स दोघे करतात, सेक्ससाठी दोघांची संमती आवश्यक असते, त्यातल्या एकाचं संमती नसेल तर ते सेक्स म्हणजे संमती न देणार्यावर रेपच होय,’ हे त्याला पटवून देणं मला शक्य झालं नाही. त्या तथाकथित सुसंस्कृत, सुशिक्षित, घरंदाज कुटुंबातल्या बायकांविषयी मला अनुकंपा वाटली.
स्वतःच्या लग्नाच्या बायकोवरही बलात्कार करायचा नसतो, हे किती पुरुषांना माहीत आहे? मान्य आहे?
तरीही एक गोष्ट खरी. आजची तरुण पिढी (अर्थात एकाच सांस्कृतिक समाजघटकात तुलना करत असताना) जास्त सहिष्णू, जास्त जाणती आहे. ’बसमध्ये शेजारी तरुण मुलगा आला, तर त्याला मॅनेज करता येतं; प्रौढ पुरुषाविषयी विश्वास वाटत नाही.’ असं मुली सर्रास म्हणतात. कदाचित व्यक्तिस्वातंत्राची जाण वाढत जाण्याच्या प्रोसेसमध्ये बायकांवरच्या अन्यायाची जाणीवही वाढत गेली असावी. कदाचित त्या प्रोसेसमधल्या या जाणिवेचा उत्कलन बिंदू नजीक येऊन ठेपला असावा. कदाचित दिल्लीतल्या घटनेमुळे प्रोसेस पूर्ण झाली आणि स्फोट झाला. दिल्लीत निदर्शनं करणारे बहुसंख्य तरुण होते. पोलिसांच्या माराला जुमानत नव्हते. एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या प्रतिष्ठेशी त्यांची निष्ठा इतकी पक्की होती (आणि आहे), की दोन दंडुके खाऊनही ते जागीच उभे रहात होते. या प्रोसेसचा अभ्यास जरूर व्हायला हवा. कारण एकदा स्वतःच्या निर्णयस्वातंत्र्याच्या अधिकाराचा साक्षात्कार झाला की आपली प्रतिष्ठा आणि दुसर्याची प्रतिष्ठा यात अंतर रहात नाही. हा अधिकार दुसर्याला नाकारणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करून घेणे, ही जाणीव आपोआप येते. बलात्काराविषयी घृणा आपोआप जागते.
मीडियाला हे कळलंच नाही. एका पिढीच्या मानसिकतेमधल्या प्रोसेसकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मीडियाने सर्व लक्ष घटनेवर एकवटलं. २६ जुलै २००५ नंतर जसे ते मुंबईत पाऊस पडतो, हा नवीन शोध लागल्यासारखे वागले; तसंच या वेळी ’देशात बायकांवर बलात्कार होतात’ हे आत्ताच लक्षात आल्यासारखं वागत आहेत.
ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू मांडण्यासाठी दुसरं, थोडं वेगळ्या आशयाचं उदाहरण घेतो. काही वर्षांपूर्वी धावत्या लोकलवर दगड मारल्यामुळे एक मृत्यू झाला. त्याला ठळक प्रसिद्धी मिळाली. त्याचाही असाच विचित्र परिणाम झाला. थोड्या थोड्या दिवसांनी लोकलवर मारलेल्या दगडाने कोणाचा डोळा फुटला, कोणाच्या डोक्याला खोक पडली. कुणी कळवळून खाली पडलं आणि जखमी झालं, अशा स्वरूपाच्या बातम्या सतत येत राहिल्या. मुंबईची स्थायी लोकसंख्या जितकी आहे, तिच्या अर्ध्याने लोक कल्याण, अंबरनाथ, कसारा, पनवेल या सभोवतीच्या मोठमोठ्या शहरांमधून मुंबईला पोटासाठी येत असतात. आणि अर्थात परत जात असतात. ही संख्या इतकी आहे की देशभरात रोज जितके लोक रेल्वेने प्रवास करतात, त्यातले अर्धे मुंबईच्या लोकलमध्ये असतात. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी गाड्यांचे दरवाजे लटकत्या माणसांनी खच्चून भरलेले असतात. अशा वेळी समजा रूळांशेजारी हातात दगड घेतलेला कुणी दिसला तरी असहाय्यपणे बघत रहाण्याशिवाय काहीही शक्य नसतं. त्यामुळे या दगडफेकीचा प्रश्न भलताच संवेदनाशील बनला.
पेपरात जवळपास रोजच्या रोज येणार्या या बातम्यांमुळे काही जण अस्वस्थ झाले. ’रोज पेपरात येतंय; पण तरीही दगड मारणारे थांबत नाहीत! म्हणजे मुद्दाम, प्रवाशांच्या नाकावर टिच्चून, त्यांना खिजवण्याचा हा क्रूर प्रकार आहे. या लोकांना तशीच क्रूर शिक्षा व्ह्यायला हवी’ अशी भावना त्यांच्या मनी जागली. आता, लोकलने प्रवास करणारे आणि पेपर वाचणारे, यांच्यात जरी सामायिकता असली, तरी दगड फेकणारे त्यात नव्हते! तेव्हा रेल्वे लायनीच्या दुतर्फा झोपड्या असत आणि तिथली काही मुलं टाइमपास म्हणून धावत्या गाड्यांवर दगड मारत. तसं करताना त्यांच्या मनी वर्गकलहाची भावना उद्भवत नसावी. त्यांच्या परिचयात रेल्वेने प्रवास करणारं कुणी नसणार, असं मला वाटतं. त्यामुळे कदाचित त्यांना रेल्वे प्रवासी हे वेगळ्या जीवजातीतले वाटत असावेत. आणि ज्याप्रमाणे टोळाच्या शेपटीला दोरा बांधताना किंवा मुंग्या चिरडताना लहानांना - आणि बर्याचदा थोरांनासुद्धा - दुःख न वाटता मजाच वाटते, त्यातलीच गंमत त्या रेल्वेशेजारच्या झोपड्यांमध्ये रहाणार्या मुलांना मिळत असावी. त्या मुलांपैकी कोणाच्याही घरी पेपर येत नसावा, याची मात्र मला खात्री आहे. त्यामुळे दगडफेकीच्या बातम्या वाचून चपापण्याचं त्यांना सुचलं नाही.
बलात्कार्यांचं असं नक्की होत नाही. कारण दगड मारणार्या मुलांचं जग आणि लोकलमधल्या प्रवाशांचं जग, स्यायत्त होती. बलात्कारी आणि त्यांचे बळी कित्येकदा एकाच समाजघटकातले असतात. अजाण बालिकेवर बलात्कार करणारा शेजारीच रहात असतो. किंवा घरातच असतो. त्यांना का फरक पडत नाही बलात्कारामुळे उठणार्या वादळामुळे?
आपल्या देशाचा आणखी एक गोंधळ असा, की काही लोक, म्हणजे स्वतःला रयत समजणारे बहुसंख्य लोक, स्वतःला ’नागरीक’ समजत नाहीत. आपल्याला (मत देण्यापलिकडे) काही अधिकार आहेत, असं त्यांना वाटत नाही. इतकंच नाही, नागरिकांसाठी असलेल्या सूचना आपल्याला लागू होतात, हेही त्यांना सुचत नाही. मग ते डावीकडून चालण्याऐवजी रस्त्याच्या मधून चालतात; त्यांना रांगेत उभं करण्यासाठी दंडुका लागतो; सरकारी कचेरीत ’उद्या ये!’ असं कुणी खेकसलं की ते निमूट मागे फिरतात; सर्वच पब्लिक सर्व्हंट्सना मालक समजतात आणि त्यांच्यापुढे गयावया करतात, वगैरे.
या रयतेला अजून ’नागरीक’ या संकल्पनेचा शोधच लागलेला नाही आणि या क्षणापावेतो ते घटनादत्त वगैरे अधिकारांच्या पुसटशा अनुभवाविनाच जगलेले आहेत; असं म्हणून आपण त्यांच्या वर्तनाचा अर्थ लावू शकतो. (म्हणजे समर्थन करतो, असं नाही.) पण कायदा आणि नियम आपल्याला लागूच होत नाहीत, असं समजणारा आणखी एक वर्ग असतो; तो म्हणजे सत्ताधीश. इथे सत्ताधीश म्हणजे कुठल्याही अधिकृत सत्तास्थानी बसलेले नव्हेत! सत्ताधीश म्हणजे जन्माने, रूढी-परंपरेने, सामाजिक संकेतानुसार स्वतःकडे सत्ता आहेच; असं गृहीत धरणारे. म्हणजे एकत्र कुटुंबातला कर्ता पुरुष, खाप पंचायतीतला पंच, नवरा-बायकोतला नवरा, सासू-सुनेतली सासू, कित्येक जाती-धर्मातले पुजारी-पुढारी, वगैरे. आणि त्या रयतेविषयीदेखील कळवळा नको! कारण ज्यांना (नागरिकाचे) अधिकार माहीत नाहीत, त्यांना (नागरिकाची) जबाबदारीसुद्धा माहीत नसते.
पोलीससुद्धा यात मोडतात. राजकीय नेते येतात. स्त्री आणि पुरुष असा संबंध आला, की तो पुरुषही यात येतो. बहुतेक छोट्या कंपन्यांमध्ये रिसेप्शनवर बसलेल्या स्मार्टशा मुलीला सांगकामे, निरोप्ये, दरवान यांच्या कामावर लक्ष ठेवण्याचं जादा काम दिलेलं असतं. ही कामं करणारे बहुधा पुरुष असतात आणि नियमानुसार ते तिच्या हाताखाली काम करत असतात. तिचे आदेश पाळणं हे त्यांचं कर्तव्य असतं. पण कुठेही असं होत नाही. ’ही कालची पोर माझ्यासारख्या बाप्याला कामं सांगते!’ यात त्या पुरुषांना अपमान वाटतो.
त्याच भावनेच्या विस्तारित रूपातून बलात्कार घडतो. एका मर्यादेपर्यंत बाईने आढेवेढे घ्यावेत, नाही म्हणावं; पण एका मर्यादेपर्यंत. त्यानंतर कोणाही पुरुषाच्या इच्छेसमोर मान तुकवणे, हे कोणाही स्त्रीचं संस्कृतीजन्य कर्तव्यच आहे, अशी त्यांची ठाम धारण असते.
आपण हे मान्य करायला हवं की आपल्या थोर भारतीय संस्कृतीची काही अंगं सडेल आहेत. नाही तर आपण आणि सौदी अरेबिया (किंवा झिया-उल-हक यांचा पाकिस्तान) यांच्यात काय फरक राहिला? ती संस्कृती बदलायला हवी.
कशी?
तो मोठा विषय आहे. लोकलवरच्या दगडफेकीबाबत रेल्वेने काय उपाययोजना केली? तर खिडक्यांना जाळ्या लावल्या! आता मारा दगड. मुळीच लागणार नाही. तसंच आजही होतंय. बायकांनी कराटे शिकावं. एकटं असताना कोणाशी तरी मोबाईलवर बोलण्याचं नाटक करावं. अंग झाकून घ्यावं. पुरुषाच्या नजरेला नजर देऊ नये. तोंडाला लागू नये. रात्रीबेरात्री मुळीच फिरू नये. ज्याप्रमाणे मुलांनी दगडच मारू नयेत, यासाठी काही करणं ही रेल्वेने आपली जबाबदारी मानली नाही; तसंच पुरुषांनी बलात्कार करूच नयेत, यासाठीची उपाययोजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी कोण घेणार?
आता स्वतःकडेच वळतो. आत्ताच मी एक ब्लॉग लिहिला: स्पेशलवाले. त्यात बाईच नव्हती. सगळी उदाहरणं कामाविना फिरतानाची होती. त्यात महत्त्वाची गोम अशी होती, की रात्री जर एकटी बाई रस्त्यात फिरत असेल आणि तिच्याकडे पास, आय-कार्ड असलं काही नसेल, तर ती समाजकंटक ठरते का? कोणावरही कसलीही बळजबरी न करता, शरीरविक्रीचा धंदा करणार्या वेश्या समाजकंटक मानाव्यात का? तिच्याशी स्पेशलवाला कसा वागेल? तिने कोणता ’इन्शुरन्स’ बाळगावा?
पुढे. पोलीस संशयितांशी कसे तारतम्याने वागतात, हे त्या ब्लॉगमध्ये आलं; पण तेच पोलीस नाडलेल्या नागरिकाशी कसे वागतात, हे नाही आलं. मीच एकदा लोकलने प्रवास करताना झोपलो आणि वरच्या बाकड्यावर ठेवलेली माझी बॅग गेली. तक्रार करायला मी सीएसटीच्या रेल्वे पोलीस ठाण्यात गेलो. "बॅग चोरीला गेली असं कशावरून म्हणता? तुम्ही पाहिली चोराने नेताना? नाही ना? मग? गहाळ झाली म्हणा!" तिथला इन्स्पेक्टर माझ्यावर खेकसला. मग त्याने विचारलं, "तुमचं लक्ष कुठे होतं?"
मी म्हणालो, "मी झोपलो होतो."
"च्यायला यांना रात्रीचे नको ते धंदे करायला हवेत आणि दिवसा गाडीत झोपून बॅग गेल्याची तक्रार करतात!" असं म्हणून त्याने मला एक सणसणीत शिवी घातली. मी तक्रार न नोंदवताच घाबरून निघून जावं, अशी त्याची इच्छा असावी. पण मी जात नाही हे बघून त्याने निरुपायाने पुढच्या चौकशा आरंभल्या. "काय करता?"
तेवढ्यात मला सुचलं की मी अधून मधून पेपरात काही बाही लिहितो. "पत्रकार आहे!" मी म्हणालो.
हे ऐकताच त्या हरामखोराने "बसा!" म्हणून माझ्यासाठी ठंडा मागवला!
तर मला सुचतं, की ’जग - ऊर्फ मानवी समाज - आणि कायदा आणि सुव्यवस्था’, हा मुद्दा सामाजिक व्यवस्थेच्या परिघावर वावरणार्यांना जास्त कळतो. उदाहरणार्थ पोलीस. फुटकळ गुन्हेगार. पत्रकार. आणि आमच्यासारखे आगाऊ वीर. या सीमेवरच्यांचं आपापसात बरं अंडरस्टँडिंग असतं. म्हणजे पोलीस आणि गुन्हेगार एकमेकांना सामील असतात, असं नाही. एकमेकांना समजून असतात. व्यवस्थेला अजिबात न जुमानणारे बडे गुन्हेगार, बडे राजकारणी पोलिसांना मुळीच प्रिय नसतात. तसंच सामान्य नागरीकही पोलिसांना प्रिय नसतात.
पण यात पुन्हा बायका कुठे बसतात? सर्व गुन्हेगार पुरुषच असतात, बायका गुन्हा करतच नाहीत, असं मानण्याचं कारण नाही. पण बाईच्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्था हा विषयच आकार, रूप बदलतो. जेण्डरनिरपेक्ष गुन्ह्यांच्या बाबतीत फरक पडतो की नाही हे बाजूला ठेवूया; काही गुन्हे जेण्डरनिगडित असतात, त्यांचं काय? बलात्कार ही शेवटची पायरी झाली; छेडछाडीचं काय?
अलिकडच्या काळात पोलिसांमध्ये बायका वाढल्या आहेत. जेण्डरनिगडित गुन्ह्यांच्या संदर्भात स्त्री पोलिसांशी बोलणं उद्बोधक ठरेल, असं वाटतं.
Wednesday, December 26, 2012
स्पेशलवाले
माझा जन्म मुंबईच्या गिरणगावात झाला आणि सोळा वर्षांचा होईपर्यंत मी तिथे राहिलो, वाढलो. त्यामुळे, नवरात्र, गणपती यांसारख्या सार्वजनिक उत्सवातला कानठळ्या बसवणारा आवाज; तसंच गोविंदा, कबड्डी सामने यांसारख्या, नंतर सार्या मुंबईचीच ओळख बनलेल्या प्रथा-संस्था यांच्याशी तिथे माझी चांगली ओळख झाली. आणखी एक ’संस्था’ मला तिथे परिचयाची झाली, जिची जान पहचान इतर मुंबईकरांना किती आहे वा होती, मला कल्पना नाही. इतकंच नाही, गिरणगाव आणि नंतर मुंबई शहर सोडून दुसरीकडे रहायला गेल्यावर मलाच ती परकी झाल्यासारखी आहे. ती ’संस्था’ म्हणजे स्पेशलवाले. त्यांच्याकडे मी किंवा माझ्या आसपासच्या कोणी कधी पोलीस खात्याचा भाग म्हणून बघितल्याचं आठवत नाही. ते तसे होते, हे कालांतराने तर्कातून सुचलं. माझ्या मनात तेव्हा त्यांना स्वतंत्र अस्तित्व होतं. आणि ग्लॅमरसुद्धा. त्यांच्या काही आठवणी आहेत, त्या सांगतो.
लहान असताना, म्हणजे शाळेत जाण्याच्या काळात ते दुरून दिसत. त्यांच्या जवळ जाण्याची वेळ कधी आली नाही. मला तशी लहान असल्यापासूनच रात्री बाहेर हिंडण्याची हौस. चाळीत आमच्या मजल्यावर अनेकांकडे गणपती येत असे. बहुतेकांकडचा गौरीबरोबर जाणारा. शेवटच्या रात्री सामुदायिक जागरण असे. त्या काळात आणि त्या वयात मध्यरात्रीचे बारा म्हणजे डोक्यावरून पाणी. ते वाजून गेले म्हणजे जागरण ’संपन्न झालं’. झब्बू खेळत बसलेली मोठी मंडळी झोपायला गेली, की आम्ही दोघे तिघे बाहेर पडायचो. त्यात जबाबदार मानला जाणारा मी. पण त्या प्रसंगी आमचा लीडर रमेश. रस्त्यावर सामसूम असे. दहा एक मिनिटांनी एखादी गाडी त्या अतिरुंद आंबेडकर रोडने जात असे. मी ऐन रस्त्याच्या मध्ये आडवा झोपत असे. दिवसाउजेडी खुळ्यासारखं वाटणारं आणि अशक्यही असलेलं ते कृत्य करण्यात मला सुख होत असे. एखादी सिगारेट किंवा कोणाचकडे पैसे नसतील तर सिगरेटचं थोटुक ओढ; पहाटेपूर्वीच्या काळोखात पाव वाटत फिरणार्या तीन चाकी गाडीवाल्याची नजर चुकवून पावाची चोरी कर; नाही तर नुसतंच निर्मनुष्य रस्त्यावरून दादर टीटी ते लालबाग फीर, हे उद्योग अत्यंत रोमँटिक वाटून घेत आम्ही करत असू. आम्ही पांढरपेशांची बावळट मुलं. रमेश तसा नव्हता. त्याची नजर चोहीकडे फिरत असे. आणि ’स्पेशलवाले’ असं तो पुटपुटला की आम्ही धूम ठोकत असू.
तेव्हा कळलंही नाही, पण माझ्या मनात स्पेशलवाल्यांची एक प्रतिमा रुजली. आणि हे माझ्या पुष्कळ उशीरा लक्षात आलं. खूप नंतर, नोकरी लागून जगाची, जगण्याची, मुंबईची यथायोग्य ओळख पाळख झाल्यानंतर. एकदा आम्ही ग्रँट रोड - चर्नी रोड परिसरात होतो आणि शेवटची ट्रेन चुकली. (म्हणजे रात्रीचा एक वाजून गेला होता.) दोन पर्याय होते. एक, बसने घरी जाणे. घरी जायला बस रात्रभर होती. पण आमच्यातल्या काहींना मरणाची झोप येत होती. काही दोन पावलं सरळ चालण्याच्या स्थितीत नव्हते. मग आम्ही चौपाटी गाठली आणि वाळूत विसावलो. मी आणि एक जण शेवटची सिगारेट ओढत होतो आणि मला दुरून दोघे जण डुलत डुलत आमच्या दिशेने येताना दिसले.
"उठ, चल." त्यांच्याकडे खूण करत मी सोबत्याला म्हणालो.
"का? ते आपल्याकडे येताहेत कशावरून? आणि आले तर काय झालं?" तो म्हणाला.
"एक तर इथे झोपलेल्यांना उभं रहा सांगितलं तरी रहाता येणार नाही आहे. दुसरं म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला वास येतो आहे. त्यांना इथपर्यंत यायला लावण्यापेक्षा आपण पुढे जाण्यात शहाणपणा आहे." मी.
सोबती गिरणगावात वाढलेला नव्हता. गिरगावकरसुद्धा नव्हता. "कोण आहेत ते?" तो आश्चर्याने उद्गारला.
"स्पेशलवाले." मी उत्तरलो.
त्याच्या "म्हणजे?"कडे दुर्लक्ष करून मी त्याला उठवलं आणि पुढे झालो. ते थांबले. एकाने तंबाखू काढून तळव्यावर चोळायला सुरुवात केली. त्यांनी निवांतपणे आमची चौकशी केली. कोण, कुठून आलात, इथे काय करता, वगैरे. अशा वेळी आपली पांढरपेशी बोली म्हणजे अमोघ इन्शुरन्स आहे, हे मला जाणवलं. तोंडचा वास लपवणं शक्य नव्हतं. त्यातल्या त्यात मीच जीभ जड न झालेला होतो.
आम्ही चोर, भिकारी नाही याची खात्री पटल्यावर एक म्हणाला, "इथे सुनसान जागेत झोपताय. कोण आलं लुटायला, तर काय कराल? हत्यार आहे का काही जवळ? की नुसता दीड वीत बांबू?"
मी ओशाळा हसलो.
"जा, तिथे टिळकापाशी झोपा. तिथे आमची माणसं असतात. पहिल्या गाडीने जा घरच्याला."
मी आडवे असलेल्यांच्या शिव्या खात त्यांना ओढत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी घेऊन गेलो. तिथे भगभगीत उजेड होता. पण इलाज नव्हता. स्पेशलवाल्यांची मर्जी बिघडवण्याची माझी टाप नव्हती.
याच्या अगोदरची एक गोष्ट. माहीमला, कोकण नगरमध्ये रहात असताना दिवाळीनिमित्त नाटकं, वगैरे बसवली जात. सोसायटीच्याच हॉलमध्ये नाटकाची प्रॅक्टीस चाले. प्रॅक्टीस संपली, की वडीलधारे घरी जात. दम मारायला गेटबाहेर जाऊन थोड्या गप्पा करणे, असा आमचा तरुणांचा शिरस्ता होता. एकदा असेच अर्ध्या चड्डीतले दोघे आले. एकाकडे सायकल होती. त्याने आमच्याकडे लाइट मागितला. कोणी तरी नम्रपणे दिला. त्यांची ओळख कोणीच कोणाला सांगावी लागली नाही. इतक्यात गल्लीतून एक जण एकटाच आला. सायकलवाल्याच्या ’शिळोप्याच्या’ चौकशा चालल्या होत्या: नाटक असतं का सोसायटीचं? वा. कोण बसवतं? वा. कुठलं नाटक आहे या वर्षी? वगैरे. चालत येणारा जवळ, अगदी रस्त्याच्या पलिकडल्या बाजूला समोर येईपर्यंत या दोघांचं जणू दुर्लक्ष होतं त्याच्याकडे. पण मला खात्री होती, तो असा सुखासुखी जाऊ शकत नाही. अगदी जवळ आल्यावर एकाने त्याला "ए!" म्हटलं.
तो थांबला. पण रस्ता ओलांडून जवळ आला नाही.
या दोघातला एक जण डुलत डुलत पलिकडे गेला.
"कुठून आला?"
"कामावरून."
"कंपनीचं कार्ड आहे?"
"नाही. टेम्परवारी आहे."
"रेल्वेचा पास?"
"--- "
काय होतंय कळायच्या आत त्याच्या फाडकन कानाखाली बसली. तो थेट आडवाच झाला. मला वाटलं, बेशुद्ध पडणार. कसला? तो कळवळला देखील नाही. स्पेशलवाल्यांपैकी आमच्या जवळ जो उभा राहिला होता, तो शांतपणे आम्हाला म्हणाला, "बरंय. जास्त वेळ बाहेर काढू नका. रात्र खूप झालीय."
त्याला घेऊन दोघे गेले. आम्ही गप्पा संपवून निमूट आपापल्या घरी परतलो. आमच्यात एक दोघे होते, ज्यांचे मित्र पोलीस होते. कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनात त्यांची ओळख होती, वटही होती. पण स्पेशलवाल्याशी मैत्री असल्याचं सांगणारा कुणी भेटला नाही. स्वतःकडे कुठलं ना कुठलं आयडेंटिटी कार्ड असणं किती मोलाचं आहे, हे माझ्या लक्षात आलं. आयडेंटिटी कार्ड तुम्हाला समाजात ठाक ठीक बसवतं. तुम्ही ’नागरीक’ असण्यावर शिक्का मारतं. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, की नोकरदार की नुसतेच किरकोळ व्यावसायिक; रेल्वेचा पास चालतो. कारण तुम्ही नियमितपणे कुठे तरी येजा करत असता. जगाच्या आर्थिक व्यवहारात तुमचा सहभाग असतो. म्हणजे जगात कायदा आणि सुव्यवस्था नांदण्यात तुमचे हितसंबंध गुंतलेले असतात.
तुम्ही ’समाजकंटक’ नसता. ’जनता’ असता.
एकदा अचानक मी आणि एक मित्र यांनी ठरवलं, हाइकला जायचं. तेव्हा मी चुनाभट्टीला रहात होतो. पुन्हा शेवटची कर्जत लोकल गेली होती. आम्ही चुनाभट्टीलाच होतो. चालत सायनला आलो. सर्कलमध्ये उभे राहिलो. अनुभव असा, की रात्री मुंबईबाहेर जाणार्या ट्रक्सची रीघ लागलेली असते आणि जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात, त्यातला एक थांबून लिफ्ट मिळायला. त्या दिवशी मात्र अर्धा तास उलटला तरी एक ट्रक थांबायचं नाव घेईना! वेळ नुसताच चालला होता. पावसाची चिन्हं होती आणि आम्ही मुंबईतच अडकलो होतो.
स्पेशलवाले आले. स्पेशलवाला कधीही एकटा नसतो. जोडी असते. आमच्याशी बोलून त्यांनी खात्री करून घेतली, की आम्ही कसल्या कुहेतूने निर्मनुष्य रस्त्यावर उभे नाही आहोत. मग एक म्हणाला, "इथे गेल्या आठवड्यात दोघांनी हात दाखवून ट्रक थांबवला आणि लुटला. तेव्हापासून इथे ट्रकवाला थांबत नाही. या,"
असं म्हणून ते आम्हाला थोडं पुढे घेऊन गेले. त्यांनी हात केल्यावर पहिलाच ट्रक थांबला. त्यात त्यांनी आम्हाला बसवून दिलं.
यातल्या एकाही प्रसंगी मी किंवा इतर कोणी स्पेशलवाल्याकडे नाही त्याचं ओळखपत्र मागितलं की त्यांनी दाखवलं. त्यांनी सुरुवातच दमदाटीने केलीय, असंही मला आठवत नाही. मला त्यांची भीतीही वाटली नाही. पुढची घटना स्पेशलवाल्यांची नाही, सरळ सरळ पोलिसांची आहे. सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात नवी, म्हणजे तीस वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माझं घर होतं बोरिवलीला. मस्त पार्टी करून आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. प्यायल्यानंतर ताबडतोब झोपी जायचं असेल, तर कशाला प्यायची? झोप काय, आपल्याला अशीही येतेच! पोटात जेवण आणि डोक्यात मस्त नशा घेऊन रस्त्याने वा आडवाटेने वा मनुष्यवस्तीबाहेर रानात मुक्त फिरलं कीच पिण्याचं चीज होतं, असं तेव्हाचं ठाम तत्त्व होतं. तर आम्ही फिरत फिरत फारच दूर, रस्ता संपून जेटी येते, तिथे गेलो. मुंबईच संपली! पुढे पाणी. पलिकडे जायचं असेल, तर होडी किंवा फेरीबोट. वारेवा. बोरिवली छानच प्रदेश आहे; असे सुखी होत आम्ही आसमंतात चिटपाखरू नाही, तिथे पार टोकाला बसून होतो.
जीप आली. आमच्यावर हेडलाइट्सचा झोत टाकून इंजीन बंद करून लांब रस्त्यावरच उभी राहिली. जीप पोलिसांची आहे, हे कळायला डिटेक्टिव असण्याची गरज नव्हती.
मी उठलो. जीपजवळ गेलो. वर सांगितलेली ’इन्शुरन्स’ची ढाल परजली. ती कामी आली. पण जीपमधला साहेब खमक्या होता. म्हणाला, "या, बसा जीपमध्ये!"
आलिया भोगासी असावे सादर. सगळे - म्हणजे चार जण - जीपमध्ये चढलो. मग जीप बोरिवलीभर फिरली. वेस्ट संपवून फाटकातून (तेव्हा ब्रिज झाले नव्हते) ईस्टला गेली. मधे मधे थांबत होती. थांबली, की काळोखातून एक पोलीस अवतरत असे. जीपमधल्या साहेबाला कडक सलाम ठोकून एक डायरी पुढे करत असे. डायरीत सही करता करता साहेब जुजुबी चौकशा करी. असे काही तास फिरत शेवटी आम्ही एकदाचे बोरिवली पोलीस स्टेशनात पोचलो. पोलीस स्टेशनच्या आवारात शिरून जीप थांबली.
साहेब उतरला आणि आमच्याकडे ढुंकूनही न बघता आत चालता झाला! आता? "जा!" असा हुकूम झाल्याशिवाय जायचं की नाही? "जाऊ का?" असं विचारलं, तर परिणाम ठीक होईल की होणार नाही? काही कळेना. आम्ही एक बाकडं शोधलं आणि त्यावर जाऊन बसलो. सकाळ व्हायला फार उशीर नव्हता. लख्ख उजाडलं तसं, परवानगी विचारण्याच्या अविर्भावात जीपमध्ये होते त्यातल्या एका पोलिसाला म्हणालो, "जातो!"
आणि गेलो.
’दारू प्यायली म्हणजे आपण काही पाप केलेलं नाही. अपरात्री रस्त्यात फिरताना आपण धतिंगही करत नाही आहोत. आपल्यातल्या काही जणांची जीभ जड झालीय आणि पावलं डगमगताहेत, इतकंच; आपण जनतेचाच एक भाग आहोत. आपलंच रक्षण करण्याचं कर्तव्य पार पाडण्याच्या क्रियेत असणार्या पोलिसांची आणि आपली टक्कर होते आहे,’ या तर्काला धरून मी निर्भय राहिलो. गुन्हेगार शोधणार्या पोलिसी नजरेच्या मध्ये जरी आम्ही आलो, तरी अखेरीस या पोलिसांचं स्थान आपण आणि गुन्हेगार यांच्या मध्ये आहे, असाच बुद्धीचा निर्णय झाला. रात्रीबेरात्री ही मुंबई चोराचिलटांच्या हवाली नसते, तिथे कायद्याच्या रक्षकांची गस्त असते; असा विश्वास वाटला.
तो विश्वास मी अजून धरून ठेवला आहे. मी उत्तर प्रदेशातल्या लहान शहरांमध्ये पाच वर्षं राहिलो आहे. दिल्लीतसुद्धा रात्री हिंडलो आहे. मुंबईत गुन्हेगारांना पोलिसांची दहशत वाटत असावी, असा माझा समज होता. उत्तरेत एकूणच प्रजेला पोलिसांची दहशत असते, असं मला तिथल्या सहकार्यांनी सांगितलं. उत्तरेत पोलिसांसमोर पांढरपेशेपणाचा विमा कुचकामी ठरतो, असं ते ठामपणे म्हणत. ’जनता’ या शब्दापुढे ’जनार्दन’ हा शब्द आठवतो. ’प्रजा’ या शब्दाआधी ’राजा’ हा शब्द असणार, असं मनात येतं. दिल्लीतलं बलात्कार प्रकरण आणि त्याविषयीच्या संतापाचं तेल पोलिसांवर काढण्याचा प्रकार, यातून स्पेशलवाल्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Labels:
citizens,
delhi rape,
mumbai police,
जनता,
नागरीक,
प्रजा,
मुंबई पोलीस
Subscribe to:
Posts (Atom)