Sunday, May 3, 2015

महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे



बाबासाहेब पुरंदर्‍यांशी माझी ओळख पु ल देशपांड्यांनी करून दिली. ’गणगोत’मधून. पु लंच्या ’गणगोत’मध्ये बाबासाहेबांचं व्यक्‍तिचित्र आहे. वाचून अनेक वर्षं लोटली; पण दिनेश, ऋग्वेदी, रावसाहेब ही व्यक्‍तिचित्रं नीट आठवतात. तसेच बाबासाहेब. ते वाचून मला कळलं, बळवंत मोरेश्वर पुरंदरे तरुणपणातच ’बाबासाहेब’ झाले. वयपरत्वे नाही.

त्या वेळी दादरच्या अमर हिंद मंडळात वसंत व्याख्यानमाला होत असे. तिथे केव्हातरी बाबासाहेबांना शिवाजीवर बोलताना ऐकलं. इम्प्रेस झालो. मग त्यांची शिवचरित्राची व्याख्यानं ऐकणं भाग होतं. दहाएक व्याख्यानं ओळीत असत. सगळी ऐकली. एकापेक्षा जास्त वेळा ऐकली. शिवाजी माझ्या प्रेमाचा विषय. (अजून आहे.) बाबासाहेब ज्या रसाळ शैलीत धडाधड तारखा, नावं आणि स्थळं यांचे तपशील फेकत; त्याचं अपार कौतुक वाटे. त्यांच्या तोंडून शिवाजी ऐकताना अंगावर रोमांच उठत. आपल्यातला एक जण उठतो आणि स्वराज्याची स्वप्नवत्‌ संकल्पना नुसती मांडत नाही; तर प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा जागवतो; कसं झालं असेल शिवाजीच्या सोबत्यांना! तानाजी, बाजी प्रभू, मुरारबाजी यांसारखे लोक कसे स्वतःच्या जिवावर उदार झाले असतील, याचं चित्र माझ्या मनात रंगू लागे. शिवाजीचा भक्‍त मी होतोच; बाबासाहेबांबद्दलही प्रेम निर्माण झालं.

मग ’राजा शिवछत्रपति’ विकत घेणं भागच झालं. चांगले हार्ड बाउंड दोन जाडजूड खंड. त्याची पारायणं केली. शिवाजीचं चरित्र मला पाठ झालं. शाळकरी वय, पौगंडावस्था ओलांडली तरी शिवाजीबद्दल वाचत राहिलो. जे वाचायला मिळालं, त्यातून या राजाबद्दल आदर वाढत गेला. त्याच्या लढाया, त्याचे डावपेच, त्याचा मुत्सद्दीपणा, त्याची दूरदृष्टी, त्याची न्यायबुद्धी, त्याचा मनसबदारीला असलेला विरोध, प्रजेच्या हितासाठी त्याने वेळोवेळी प्रसृत केलेले आदेश ... माझ्या मुलखात शिवाजीसारखा एक लोकनेता होऊन गेला, याचा मला प्रचंड अभिमान वाटत असे. नंतर कितीतरी वर्षं कुणी अमराठी भेटला, गप्पा झाल्या की मी त्याला शिवाजीचं अचाट कर्तृत्व सांगण्याचा प्रयत्न करत असे. पुढे देशभर कुठे कुठे हिंडताना शोध लागला की शिवाजी आणि आंबेडकर, या दोन मराठी माणसांचे पुतळे भारतभरच्या गावागावात आहेत. सारा देश त्यांना ओळखतो.

शिवाजीचं नाव ठाउक नाही, तो मराठीच नव्हे. पण मला शिवाजीच्या लोकोत्तर व्यक्‍तिमत्वाची नीट ओळख करून दिल्याबद्दल मी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा कायमचा ऋणी राहीन. अर्थात मी शिवाजीची भजनं गात समाधान पावणार्‍यातला नव्हतो. एक शिवाजी घेऊन बसायचं आणि त्याचा उदो उदो करायचा; तर तसं कालच्या आजच्या कुणाही गावगुंडाबद्दल करता येईल! महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या इतर थोर व्यक्‍तींची माहिती करून घेऊन मग त्यांच्या संदर्भात शिवाजी किती, कसा थोर, हे ठरवलं पाहिजे. नाही तर मी म्हणणार, शिवाजी थोर; समोरचा म्हणणार, अलेक्झांडर थोर. किंवा हनिबाल थोर. किंवा रोमेल थोर. मला ते नाव माहीत नाही, त्याला शिवाजी माहीत नाही. हा वाद नाही आणि संवादही नाही.

वाचन वाढत गेलं, तसे बाबासाहेब मात्र दूर होत गेले. त्यांचं काही काही खटकू लागलं. उदाहरणार्थ, ’राजा शिवछत्रपति’ची सुरुवात होते राम दंडकारण्यात येतो, तिथपासून. तिथेच ते एक प्रकारे ’ही शाहिरी आहे, हा इतिहास नव्हे,’ असं बजावतात. पुढे प्रकरण येतं ’साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. देवगिरीच्या यादवांचा पराभव करून अगोदर अल्लाउद्दिन खिलजी आणि नंतर त्याचा सेनापती मलिक कफूर यांनी दक्षिणेत मुसलमानी सत्ता स्थापन केली, तिथून सुरू होते ही ’साडेतीनशे वर्षांची काळरात्र’. तोपर्यंत इतिहास म्हणजे लढाया आणि राजघराणी नव्हे आणि राजाचा धर्म काय यावरून प्रजेचं सुखदुःख ठरत नाही, हे समजण्याइतकी अक्कल मला आली होती. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं यांचा छळ वाईट म्हणायचा आणि ज्या काळात तो छळ झाला, ते यादवराज्य चांगलं म्हणायचं, यातला विरोध मला जाणवू लागला होता. मी शिवाजीचा भक्‍त होतो म्हणून शिवाजीची हरेक गोष्ट मला थोर वाटत होती, असं नव्हतं. शिवाजी जरा अतीच थोर होता म्हणून तो मला इतका प्रिय झाला. बाबासाहेबांची शाहिरी पुढच्या वयात मला भावेनाशी झाली. जसं ’गर्जा महाराष्ट्र माझा’ ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे रहायचे थांबले, तसंच.

ते असो. स्वतः बाबासाहेबांनी कधी स्वतःला इतिहासकार म्हटलं नाही. त्यांची प्रसिद्धी शिवशाहीर म्हणून. आता शाहीर पोवाडेच गाणार! तसंच बाबासाहेब शिवाजीचे पोवाडे गात. त्यांची स्टेजवर हत्तीघोडे नाचवणारी ’जाणता राजा’ नावाची सर्कस बघण्याची इच्छा मला झाली नाही. पुढे त्यांनी कोल्हापूरजवळ शिवकाल जिवंत करायचा महाप्रकल्प जाहीर केला. तिथे शिवकालीन समाजजीवन प्रत्यक्ष बघायला मिळणार होतं. शालिनीताई पाटीलही त्या प्रकल्पाशी संबंधित होत्या. त्याचं पुढे काहीच झालं नाही.

आपल्याकडे बहुतेक पुरस्कार हे उतारवयात एकूण कारकीर्दीचा गौरव म्हणून दिले जातात. त्यांना विशिष्ट फोकस असा नसतो. राजकीय गणितं मात्र असू शकतात. ’महाराष्ट्रभूषण’सुद्धा याला अपवाद नाही. तेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना ’महाराष्ट्रभूषण’ हा सन्मान देऊन महाराष्ट्र सरकारने काही वावगं, विसंगत केलं असं मला मुळीच वाटत नाही. उलट, या संधीचा लाभ घेऊन मी त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्‍त करतो.

Monday, April 27, 2015

कोर्ट: एक ’आंतरराष्ट्रीय’ मराठी सिनेमा



कोर्ट पाहिला. समोर घडणार्‍या गोष्टीपलिकडे बरंच काही सांगणारे चित्रपट इथे फार निघत नाहीत. ’एलिझाबेथ एकादशी’ तसा होता. ’कोर्ट’देखील आहे. पण क्रांतिकारक म्हणावा, इतका वेगळा आहे.

अगोदर माझी सिनेमा बघण्याची पद्धत काय आहे, हे सांगणं इथे आवश्यक आहे. कोणत्याही कलाविष्काराप्रमाणे चित्रपट कलावंत ’कला’ या त्याच्या माध्यमाद्वारे माझ्याशी संवाद साधतो आहे, असं मी मानतो. हा संवाद अर्थातच एकतर्फी असतो. कलावंत काहीतरी सांगत असतो आणि मी ते ग्रहण करत असतो. आणि कलाकृती, ही एकमेव अभिव्यक्‍ती त्या एकतर्फी संवादाला सिद्ध करत असते. कलावंताच्या मनातील आशय कलाकृतीमधून मूर्तरूप घेतो.

कलाकृती ही जरी कलावंताची निर्मिती असली, तरी निर्मिती पूर्ण झाल्याबरोबर ती स्वायत्त होते. मग कलाकृतीमधून ज्याप्रमाणे कलावंताला अभिप्रेत असलेला आशय व्यक्‍त होतो; तसंच त्या कलावंतावरील संस्कार, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्याची कलाभाषेची जाण, वगैरे गोष्टीसुद्धा व्यक्‍त होतात. त्यामुळे कलावंताला काय म्हणायचं आहे आणि कलाकृती काय सांगते आहे, या दोन गोष्टी तंतोतंत एकरूप असतीलच, असं नाही.

एक आस्वादक म्हणून माझ्यासमोर कलाकृती असते. ती काय म्हणते आहे, हे मी जाणून घेत असतो. त्यालाच मी कलास्वाद म्हणतो. कलावंताची वेगळी मुलाखत घेऊन त्याच्या कलेतील घटकांचा नेमका आशय समजावून घेणे, हे माझ्या मते कलास्वादाच्या बाहेर आहे. (म्हणजे ते चूक आहे वा तसं करू नये, असं मुळीच नाही!)

याचा एक परिणाम असा होतो की माझ्या कलास्वादाला माझ्या आकलनशक्‍तीच्या, माझ्या संदर्भचौकटीच्या मर्यादा पडतात. मग ’तू जरी अमुक म्हणत असलास, तरी तो कलावंत वेगळा, तमुक खुलासा देतो आहे,’ असं मला सुनावलं जाण्याची शक्यता निर्माण होते. पण त्यामुळे मी आणि त्या विशिष्ट कलावंताची कलानिर्मिती वा एकूणच कला, यांमधल्या नातेसंबंधावर परिणाम होत नाही.  माझ्या आकलनशक्‍तीचा विकास, संदर्भचौकटीचा विस्तार, या माझ्या कुवतीनुसार, गरजेनुसार होत जाणार्‍या प्रक्रिया आहेत.

आता खरंच ’कोर्ट’.

चित्रपटात प्रसंग संपल्यावर कॅमेरा तसाच राहणे, पात्रं निघून गेली तरी कथानकाशी संबंधित नसलेल्या घटना त्या स्थळी घडताना दिसत राहणे, असं बर्‍याचदा होतं. आणि अशावेळी कॅमेरा बहुधा वाइड अँगलने काहीशा अंतरावरून घटना न्याहाळत असतो. मग दृष्य रस्त्याचं असेल, कोर्टाचं असेल किंवा हॉटेलच्या वा इमारतीच्या आतलं असेल. जणू ’दृष्यचौकट’ याच वास्तवाकडे लक्ष वेधायचं आहे. काही काळ तिथे कथानक घडत असतं; ज्याच्या बरोबर आपण  रहाणार असतो, त्यातून साकारणार्‍या कहाणीचा माग घेणार असतो. पण कहाणी अमुक इकडे गेली, तिच्यातून अमुक असं तात्पर्य निघालं; तरी ते दुय्यम होय. ज्या चौकटीत कहाणी आकार घेत आहे, तिची जाणीव सुटता कामा नये!

एक कोर्ट असतं. तिथे न्यायाधीश, सरकारी वकील, आरोपीचा वकील, कारकून, वगैरे लोक काम करत असतात. तिथे खटले चालतात आणि उलट (आणि अर्थातच सुलट) तपासण्या होतात, साक्षींच्या नोंदी होतात, वगैरे. यातला एकेक जण आपापल्या घरी रहात असतो. त्याचं त्याचं एक विश्व असतं. ती विश्वं सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिक बाबतीत एकमेकांपेक्षा अगदी वेगवेगळी असतात. या वेगवेगळ्या विश्वांना एकमेकांशी जोडणारा दुवा म्हणजे कोर्ट. प्रत्येकाचं जगणं या पोटसिस्टिमा आणि कोर्ट ही त्या पोटसिस्टिमांना एकत्र आणणारी जणू विशाल सिस्टीम. असं ते ’कोर्ट’.

आणि हे लोक तिथे पोट भरण्यासाठी नोकरी करतात. बँकेतल्या कारकुनाने जशी बेरीज करताना बेरजेतले आकडे म्हणजे रक्कम होय, हे विसरून जावं; तसंच या लोकांचं होतं. सरकारी वकील बाईला आरोपीवरील आरोप सिद्ध करण्याचं काम नेमून दिलं आहे. ते काम निष्ठेने करताना कायदा, पुरावे, साक्षी या सगळ्याच अर्थ ती स्वतःच्या कामाला सुसंगत असाच लावते. इतकंच नाही, ’कशाला लांबण लावायची, काय दहा वर्षांसाठी डांबायचं ते डांबा आणि संपवून टाका,’ असं सहज म्हणून जाते. तो एक माणूस आहे, आपण आपल्या कामात यशस्वी होण्याचा अर्थ एक माणूस काही वर्षं खितपत पडणे, असा होईल; हे तिला सुचत नाही.

न्यायाधीशही वेगळा नाही. तोसुद्धा एकूण कामकाजाकडे तशाच निर्विकारपणे पाहतो. सरकारी वकील बाई बाहेर जे जीवन जगते; त्यात जसा कोर्टाचा, कोर्टातील कामकाजाचा काहीही संदर्भ नसतो, तसंच न्यायाधीशाच्या जगण्यातही कोर्टरूमच्या आतील घटना बेदखल असतात. डुलकी घेत असताना त्याला दचकून जागं करणार्‍या मुलांना शिक्षा देताना तो नेमका आवाज करू न शकणार्‍या मुक्या मुलाच्या कानशिलात वाजवतो! तसं करताना वा तसं केल्यावर त्याच्या मनात ’न्यायभावना’ जागी होत नाही. बाहेरचा माणूस बाहेर राहतो आणि कोर्टातला न्यायाधीश कोर्टात.

(इथे ’असा असतो न्याय!’ असं म्हणण्याला वाव आहे. इतकंच नाही, ’थोबाडीत मारण्याचा अन्याय करून न्यायदेवता पुन्हा झोपी जाते,’ असंही नाट्यपूर्ण विधान इथे केलं तरी ते चूक ठरणार नाही. पण मला कोर्टाबाहेरचा माणूस पूर्ण वेगळा असणे, बाहेर कंगोरेदार व्यक्‍तिमत्त्वं असणारी माणसं व्यवस्थेच्या आत कार्यरत असताना भावनाशून्य असतात, हा आशय जास्त मोठा दिसतो.)

काय असतात त्यांची ’नॉर्मल’ आयुष्यं? न्यायाधीश लठ्ठ पगाराच्या नोकर्‍यांविषयी उपदेश करतो. न्यूमरॉलॉजी आणि अंगठीतले खडे यांचं समर्थन करतो. सरकारी वकील बाई कायदा हातात घेण्याचा प्रचार करणारं, भडक, उथळ नाटक बघते. कष्टकरी, गरीब लोकांमध्ये जागृती निर्माण करू पाहणार्‍या आरोपीचा वकील श्रीमंत गुजराती असतो. त्याचे आईवडील त्याच्यामागे लग्नाचा लकडा लावतात. त्याचा मित्र म्हणून घरी आलेला सरळ सरळ ’खालच्या वर्गातला’ दिसत असताना त्याच्याशी जराही वावगं वागत नाहीत (याच संस्कारांमधून हा सामाजिक जाणिवेचा वकील झाला का? पण एक लाख रुपयांचा जामीन भरणारा हा वकील कोर्टाच्या सिस्टीमसमोर अगदी पडतं घेतो. तरी त्यातल्या त्यात याच पात्राच्या निकट चित्रपट जातो. कुठल्याशा पंथाचे लोक त्याला काळं फासतात हे दाखवतो आणि मग त्याला रडतानाही दाखवतो.)

पिकनिकला जाऊन भेंड्या खेळणे ही न्यायाधीशाची मौजेची कल्पना, नाटक पाहणे ही सरकारी वकील बाईची; तर पबमध्ये मित्रमैत्रिणींसोबत बियर पिणे, ही गुजराती वकिलाची.

कोर्टातला खटला आणि या तिघांचं जगणं यात किती तफावत आहे! आरोपी शाहीर आहे. एका ठिकाणी सामाजिक अन्यायाची उदाहरणं देऊन मग ’आम्हाला कलाकार न म्हणण्याची कृपा करा’ या उद्‌वेग व्यक्‍त करणार्‍या शब्दांवर गाणं संपवल्यावर त्यामागोमाग पंधरा वर्षांखालील मुलींचा अंग हलवत नाच सुरू होतो गरिबांनी जीव द्यावा, अशी ही व्यवस्था आहे, असं गायल्याबद्दल त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खटला भरला जातो. त्याला शेदीडशे वर्षांपूर्वीच्या पारतंत्र्यातल्या कायद्याची जोड दिली जाते. म्हणून विचारावंसं वाटतं, हा चित्रपट म्हणजे अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध कडवटप प्रतिक्रिया आहे का?

यात एक इन्स्पेक्टर आहे, ज्याने या प्रकरणाचा तपास केलेला आहे. माणूस अजिबात गुर्मीवाला नाही. अदबशीर वागतो. कोर्टात आणि त्याच्या चौकीतही. पण काम चोख करतो. कोणतं काम? जनजागृती करणार्‍याला जनतेपासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न करणे, हे काम. ’इन्स्पेक्टर उद्धट असो की नम्र; तो शेवटी त्याच व्यवस्थेचा भाग आहे आणि ती व्यवस्था गरिबाला नाडणारी आहे,’ असं म्हणतो का हा चित्रपट?

ज्याने आत्महत्या केली, असं आरोपात म्हटलं आहे, त्याची बायको साक्ष देते. तिचा चेहरा दगडी आहे. ती खोटं, गुळमुळीत बोलत नाही; पण एका शब्दात उत्तरं देऊन पुढे खुलासे अजिबात करत नाही. हे मी आदिवासींमध्ये पाहिलं आहे. आणि त्यांची शब्दसंपत्ती तुटपुंजी असते, हे त्यामागचं कारण नाही. त्यांना ही व्यवस्था आपली वाटतच नाही. इथल्या व्यवस्थेमधल्या एखाद्या प्रेमळ, सहानुभूतिदार व्यक्‍तीशी फार तर तोंडी संवाद होईल; मनामनांचा होणार नाही ही खात्री त्यांना असते. ज्याप्रमाणे अदबशीर इन्स्पेक्टरसुद्धा अहितच करणार; तसाच व्यवस्थेच्या आतली व्यक्‍ती वरवरच कन्सर्न दाखवणार. त्यामुळे ते त्यांच्यातल्या नसलेल्या व्यक्‍तीशी औपचारिक सभ्यपणा दाखवतात; पण मन उघडं करत नाहीत. आरोपीचा वकील मृताच्या पत्नीला घरपर्यंत लिफ्ट देतो आणि गाडी चालू झाल्यावर सीट बेल्ट लावायला सांगतो! त्यात त्याचं चूक नाही, तो शहरी जगण्यातली दक्षता घेत असतो. पण त्यातून दोघांच्या जगण्यातलं, दोघांच्या ’कन्सर्न्स’मधलं अंतर अधोरेखित होतं. मग तिने त्याच्याकडे काम मागण्याचा अर्थ औपचारिक उपचार पाळणे, इतकाच उरतो.

खुनाचा आरोप असलेला शाहीरसुद्धा बोलत नाही. त्याच्या गाण्यांमध्ये, सादरीकरणामध्ये कळकळ जाणवते; पण कोर्टात वा इतर कुठे ती कळकळ वा तिच्याबरोबर येणारा क्षोभ व्यक्‍त होत नाही. तो क्रांतिकारी विचारांची पुस्तकंसुद्धा लिहितो आणि छापून घेतो. वकिलाने जामीन भरला, हे कळल्यावर कृतज्ञतेने गदगदत नाही; हे पैसे परत कसे करता येतील, याचा विचार करू लागतो.

हा मनुष्य पूर्णपणे कर्मयोगी आहे. तो जरी ’सनदशीर’ मार्गांचा पुरस्कर्ता असला (संपूर्ण चित्रपटात कुठेही त्याचा कसल्याही प्रकारच्या हिंसक पर्यायाकडे कल असल्याचा, त्या पर्यायाला जवळ करणार्‍यांशी संपर्क असल्याचा सूचकही उल्लेख नाही. आहेत ते केवळ आरोप. फुटकळ पुराव्यांच्या तकलादू आधाराने केलेले आरोप.) आणि आपला संदेश गाऊन, पुस्तकं छापून प्रसारित करत असला तरी ’हाती शस्त्र घ्या’ असं तो कधी सुचवत नाही. गाण्यातूनही तो जीव द्या, असंच सांगतो! व्यवस्थेविरुद्ध हिंसेची चिथावणी देण्याचा जोड आरोप जरी ओघाओघाने त्याच्यावर होत असला, तरी मुख्य खटला आत्महत्येला प्रवृत्त करण्यावरून आहे!

चित्रपट जरी दोन वकील आणि न्यायाधीश,यांच्या जगण्याकडे काहीसं जवळून  निरखून पहात असला तरी मृताची पत्नी, आरोपी शाहीर यांच्या जगण्याच्या खोलात शिरत नाही. तिच्या रहाण्याच्या जागेपाशी किमान जाणं होत: शाहिराच्या बाबतीत तेही नाही. त्याचे कार्यक्रम तेवढे दिसतात. त्याचा सहकार्‍यांशी होणारा संवादही दिसत नाही. का?
कारण शाहीर, मृत सफाई कामगार आणि त्यांचं जग, हा मुळी चित्रपटाचा फोकसच नाही. संख्येने ते मोठे असले तरी प्रस्थापित समाज’चौकटी’च्या ते बाहेर आहेत. आणि चित्रपट चौकटीच्या आत जे घडतं वा घडत नाही, त्यावर लक्ष केंद्रित करतो. शेवटी सगळं होऊन गेल्यावर चौकट रिकामी होते, कोर्टरूमची दारं खिडक्या लावल्या जातात, दिवे बंद होतात आणि काळोख होतो. त्यानंतर जणू ’न्यायव्यवस्थेवरील टिप्पणी’चा उपसंहार म्हणून न्यायाधीश त्याच्या सग्यासोयर्‍यांबरोबर निवांत मौजमजा करताना दिसतो.

इतक्या कोरडेपणाने, भाष्याविना तपशील दाखवत, भावना ठळक करण्यासाठी पार्श्वसंगीताचा वापर करण्याचा मार्ग पूर्ण टाळत हा चित्रपट प्रचलित व्यवस्थेवर अत्यंत दाहक भाष्य करतो.

एक म्हणता येईल की लोक मराठी, गुजराती बोलतात तेव्हा इंग्रजी सबटायटल्स येतात; पण इंग्रजी भाषणाच्या वेळीदेखील सबटायटल्स इंग्रजीच रहातात! यातून निघणारा अर्थ दोन प्रकारे मांडता येईल. एक, चित्रपट इंग्रजीतून आस्वाद घेणार्‍यांसाठी, घेऊ शकणार्‍यांसाठी बनवला आहे, ज्या वर्गाविषयी सहानुभूती दाखवतो, त्यांच्यासाठी नाही. हे जरी खरं असलं, तरी जे दिसतं, त्यामागचा आशय कुणाही संवेदनशील मनाला भिडणारा आहेच. म्हणजे, जो मरतो त्याच्या मृत्यूची जबाबदारी व्यवस्था स्वतःवर घेत नाही.  त्याचं काम व्यवस्थेचा भाग आहे; पण त्याच्या जिवाला कवडीमोल मानत व्यवस्था स्वतःचे दाखवण्यापुरते असलेले नियम पाळत नाही. उलट, त्याच्या मृत्यूची जबाबदारी अशा एकावर लादते, जो नेमका  व्यवस्थेबाहेरच्या तसल्याच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी झटत असतो.

इंग्रजी सबटायटल्सबद्दलचं हे म्हणणं असंही मांडता येईल की या चित्रपटाचा रोख रुंद आहे, स्थलकालदेशाच्या सीमा ओलांडणारा आहे. यातून पुन्हा असं ध्वनित होतं की सदा वाइड अँगलने विस्तारित दृष्य दाखवणार्‍या या चित्रपटाचा विषय भारत, मुंबई, मराठी लोक, इथली न्यायव्यवस्था नसून जगभरची प्रस्थापित व्यवस्था, हा आहे!

यात संगीत नाही पण साउंड उत्तम आहे, यात प्रमुख तीन पात्रं सोडली, तर बाकी सार्‍या भूमिका व्यावसायिक नट नसणार्‍यांनी केल्या आहेत, यात सॉफ्ट कट जवळपास नाही, दिग्दर्शकाने ’क्राफ्टिंग’ नाकारण्याचा प्रयत्न केला आहे, दिग्दर्शकाचं लहान वय हेच त्याचं सामर्थ्य ठरलं की काय, वगैरे तांत्रिक बाबींमुळे कसा काय कमी जास्त परिणाम साधला गेला आहे, हे सोदाहरण सांगणं तज्ज्ञांचं काम आहे. चित्रपट या माध्यमात मला तेवढी गती नाही.

पण माझ्या कलास्वादाला असलेल्या मर्यादा रुंदावण्यासाठी ’कोर्ट’ पुन्हा बघणं मला आवश्यक वाटतं.

Sunday, March 22, 2015

शाहीर साबळे आणि माझा पिंड

शाहीर साबळे यांच्याविषयी दोन शब्द लिहिणं भाग आहे.
मला कान तसा उशीरा आला, मी सतरा वर्षांचा होऊन गेलो, तेव्हा. कान आला आणि मी लतामध्ये आख्खाच्या आख्खा बुडून गेलो. रोग म्हणावं इतका. त्यातून बाहेर यायला वीसेक वर्षं लागली असतील. जास्तच. बाहेर आलो तेव्हा मला स्वतःच्या आवडीनिवडींकडे, अभिरुचीकडे चौकसपणे निरखून बघता येऊ लागलं. मला गजल आणि गजले आवडत नाहीत. कानाला सहनच होत नाहीत. मला वाटायचं, लताचा अपवादात्मक सुरेलपणा माझ्या कानात जाऊन बसला आहे आणि म्हणून गजल्यांचं कणसुरं गायन मला  खटकतं. नीट मोकळेपणाने गातच नाहीत!  अगदी एखाद्‌दुसरा अपवाद सोडला, तर मला गजल ऐकताना ताबडतोब कंटाळा येतो. अर्थात, तलत नाही. कारण तलत कणसुरा गात नाही.

सतराव्या वर्षानंतर आपण बर्‍यापैकी ’जागे’ झालेलो असतो. बुद्धी काम करू लागलेली असते, भावनेचे लगाम सांभाळू लागलेली असते. ज्याला पिंड असं म्हणतात, तो याअगोदरच बनतो आणि त्याचा आणि बुद्धीचा संबंध नसतो आणि तो तयार होण्यात बुद्धी फारशी भाग घेत नाही. गजल आवडणे, हा माझा जर पिंडच नसेल, तर ही नावड नक्कीच सतराव्या वर्षाअगोदर विकसित झाली असणार. (लता आवडण्याचा संबंधसुद्धा बुद्धीशी लावता येणारच. पण लता मला वामनाच्या तीनही पावलांमिळून इतकी मोठी वाटते, कसला पिंड आणि कसली बुद्धी!) संगीत असं काहीतरी जगात आहे आणि त्याचा आपला फार निकटचा संबंध आहे, हे कळणं म्हणजे कान आल्याची जाणीव. हे जरी सतराव्या वर्षानंतर झालं असलं, तरी त्याअगोदर मला गाणी ऐकू येत होती. ऐकू येत होती आणि मेंदूत शिरून संस्कारसुद्धा करत होती. वेगळे शब्द वापरायचे, तर पिंड घडवत होती.

त्यामुळे मला गजले - म्हणजे गजल गाणारे - न आवडण्याचं कारण लता हे आहे, असं आता मी म्हणत नाही. ते ’श्रेय’ मी शाहीर साबळे यांना देतो. कारण मी शाळकरी वयापासून शाहिरांची गाणी ऐकत आलो आहे. काय त्यांचा दाणेदार आवाज. तेजस्वी. गोळीबंद. कुठल्या सुरात कंगोरा, खडबडीतपणा नाही. बद्दू मऊपणा नाही. माझं बालपण नायगावात, कामगारवस्तीत गेलं. सणासुदीला ठणठणीत आवाजात लाउडस्पीकरवर गाणी वाजवणे, हा तिथला शिरस्ता. तेव्हा घराघरात रेडिओ नव्हता. कानात हेडफोन (इयरफोन आणि हेडफोन यांच्यात फरक काय? की एकच ते? एक छोटा आणि दुसरा मोठा?) घालून भोवतालाला (यात ’ताल’ का आहे?) वजा करून टाकण्याची तेव्हा सोय नव्हती, रीत असण्याची तर गोष्टच नाही. जे वाजतंय ते ऐकावं लागायचं. माझी आई काम करताना सतत मोठ्याने गायची. तिच्या गाण्यात अमरशेख यायचा, कारण अमरशेख तिच्या तारुण्याचा साक्षीदार होता. अमरशेखची गाणी कधी मधी मुंबई ब वर लागायची कामगार सभेत, वगैरे. (मुंबई ब हे रेडिओ स्टेशन आहे, कामगार सभा हा त्या रेडिओ स्टेशनवरचा एक गाण्यांचा कार्यक्रम. च्यायला, हे आता सांगायला पाहिजे, नाही का!) अमरशेखच्या आवाजातला पहाडीपणा मला थरारून टाकायचा. पण त्याचमुळे मला शाहीर साबळ्यांचा आवाज पहाडी वाटला नाही. टणटणीत गोळीबंद वाटला. एकेक सूर परिपूर्ण!

कुठली गाणी? अर्थात लोकगीतं. ’सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा हा डोंगर, अडवा हा डोंगरह तयाला माजा नमस्कार’ हे गाणं मी प्रथम ऐकलं, तेव्हा वाच्यार्थ आणि लक्षणार्थ हा फरक मला माहीत नव्हता. मला ही कल्पना फॅसिनेटिंग वाटली. डोंगर आडवा येतो आणि काय होतं? तर ’अगगगगग विंचू चावला!’ केवढा? तुझ्याएवढा! मजाच. हे गाणं कधीही सुरू झालं की त्याची उंच सुरुवात पुरी होऊन ते ’अगगगगग’ वर येईपर्यंत मी लक्ष देऊन ऐकायचो. काय तो जोश, काय सुस्पष्ट उच्चार. आणि काय लोकगीताचा लहेजा!

’या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो’ हे बहुधा मी पाठ केलेलं - किंवा मला पाठ झालेलं - पहिलं गाणं असावं. ते मी कधी विसरलोच नाही. आत्ता दोन चार वर्षांपूर्वी कामवालीला म्हणून दाखवलं, तर ती खूष. "आमचं गाणं हे. तुम्हाला कसं ठाऊक?" तिने कौतुकाने विचारलं. अत्यंत चित्रमय गाणं. शब्दात असलेलं सगळं दिसतं. शेवटी ’उडविले दारूगोले!!!’ कसं खटक्यात वर चढतं! त्या लहान वयातही मला जाणवलं होतं, हे गाणं असंच, एक्साइट होऊन संपणार. नाहीतर नुसतं विरून गेलं असतं न संपता.

पुढे केव्हातरी ’नवरा दांड्यावरून म्हणजे कुठून येतो आणि तिथून का येतो,’ या विषयावर एक गंभीर निबंध वाचनात आलेला आठवतो.

त्या काळात सेवंटीएट आरपीएमच्या रेकॉर्ड्स असत. या गाण्याच्या मागे ’रुणझुण वाजंत्री’ होतं. ही दोन गाणी एकामागोमाग एक वाजायची. ’या गो दांड्यावरना’ इतकं दुसरं फटाकडं वाटलं नाही; पण नवरा नवरीपाशी येईपर्यंतचं वर्णन खास लोकगीतांच्या ढंगात आहे. शिवाय या दोन गाण्यातला कोरस. त्या वयात मला ’कोरस असतो आपला गाण्याला दागदागिने चढवायला’ असं सुचलं नाही. मला मनापासून त्यात आशय ऐकू यायचा. शाहिरांच्या आवाजाला तो किरटा बायकी कोरस वेगळाच काँट्रास्ट द्यायचा.

किती गाणी. पह्यलं नमन, आरे क्रिश्ना आरे कान्हा, आई माझी कोनाला पावली, .... या गाण्यांनी माझा पिंड घडवला! कसा मी ऐकणार गजल! मस्त तापलेल्या ढोलकीवर टण्ण बोल वाजावा, तसा शाहीर साबळ्यांचा आवाज. शिवाय मोकळा ढाकळा. कृत्रिमतेचा लवलेश नाही. हृदय दुःखाने भरून आल्याचा आव नाही. आणि कितीही वेगात जोशात गायलं तरी शब्द आणि शब्दांमधला आशय पोचणारच. ’काट्याच्या अणीवर वसले तीन गाव’ हे गाणं मला वेडा करून गेलं. हे लिहिणारे ज्ञानेश्वर? बरा माणूस असणार! ’आठशे खिडक्या नऊशे दारं’ हे गाणं जगात सगळ्यांना माहीत आहेच, असं मानून मी एकदा आमच्या ’अबब हत्ती’ या लहान मुलांच्या मासिकात अंककोड्यात सुगावा म्हणून वापरलं होतं. अनेकांना ते माहीत नाही, हे कळून आश्चर्य वाटलं होतं. शाहीर साबळे हा महाराष्ट्राचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे, हे काय सिद्ध करण्याचं विधान आहे? ते तर स्वयंसिद्ध आहे! शाहीर साबळे यांना महाराष्ट्राच्या अमुक एका भागापुरतं मर्यादितदेखील करता येत नाही. ते सगळीकडचे!

शाहिरांनी माझ्यावर मोठेच उपकार केले. आई गाणी म्हणायची आणि रेडिओवर ’आपली आवड’ लावायची. भावगीतांचा भरीव संस्कार त्यामुळे माझ्या कानांवर झालेला आहे. ती बहुतेक आवडतातच; पण गीतातला भाव म्हणजे तोच भावगीतांमधला; काव्य म्हणजे तेच, कोमटी, मचूळ चवीच्या भावना व्यक्‍त करणारं; या मानसिकतेतून मी बुद्धीच्या सहाय्याने मुक्‍त झालोच असतो; पण शाहीर साबळ्यांचे उपकार की तो झगडा मला करावा लागला नाही. एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर असे संतकवी आणि त्यांच्या आणि इतरांच्या अस्सल मराठी मातीतल्या रचना शाहीर साबळे यांच्यामुळे माझ्या आत जाऊन बसल्या. ’महाराष्ट्राची लोकधारा’ हे त्यांचं लोकोत्तर काम आहे.

इतकं लिहिलं तरी त्यांची लोकनाट्यं राहिलीच. ’यमराज्यात एक रात्र’ आलं तेव्हा मी फार लहान होतो. ’आंधळं दळतंय’ पाहिलेलं आणि आवडलेलं आठवतंय. मुंबईतल्या मराठी माणसाची परवड त्यांनी त्यात मांडली होती. शाहिरांसारखा इथल्या मातीतला माणूस इतर मराठी नागर गायनसंस्कृतीपासून लांब आणि शिवसेनेच्या जवळ जाणं अटळ होतं. पण शिवसेनेचा प्रचारक होऊन जाण्याइतके ते लहानही नव्हते. त्यामुळे यथावकाश बाळासाहेबांपासून ते लांबही गेलेच. त्यांची कला काही राजकारणातून जन्मली नव्हती की राजकारणासाठी घडलेली नव्हती.

असो. ते गेले आणि त्यांचं ‌ऋण व्यक्‍त करायचं राहून गेलं आहे, हे आठवलं.

Saturday, March 21, 2015

हिंदु नववर्ष नामक विनोद

हॅपी गुढीपाडवा!

पण हॅपी न्यू इयर नाही.

तीनेक वर्षांपूर्वी माझ्या परिचयाच्या एका तरुण माणसाने गुढीपाडव्याला शुभेच्छा देणारा संदेश पाठवला: हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा! तोपर्यंत त्याच्याशी माझा जो संबंध आला होता, त्यावरून माझं त्याच्याबद्दल बरं मत झालं होतं. म्हणून मी त्याला थोडं समजावलं, की हिंदु नववर्ष असं काही नसतं, गुढीपाडवा हा मराठी सण आहे, बाहेर फारसा साजरा होत नाही, वगैरे. पण त्याला ते किती पटलं आणि पुढच्या पाडव्याला मला नववर्षाच्या शुभेच्छा नाही दिल्या, तरी इतरांना दिल्या की नाहीत, याची मला शंका आहे. हे खूळ दर वर्षी वाढतच चाललं आहे. सनातन संस्थावाले अर्धवट अकलेचे लोक तशी पोस्टरं लावतात, हे ठीक; पण त्याची लागण इतरांच्यात का होत चालली आहे? हिंदु नववर्ष म्हणे!

एक तर शिवसेनेसकट सर्व मराठी माणसांना हे मान्य आहे की मराठी भाषा हिंदीची, मराठी संस्कृती उत्तर भारतीय संस्कृतीची आणि महाराष्ट्र उत्तर भारताची - दिल्लीची म्हणूया हवं तर - बटीक आहे. उदाहरणार्थ, मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक माँसाहेब म्हणतात. उच्चार मासाहेब, असा करतात. मराठीत ’मॉ’चा उच्चार मॉल, मॉड असा होतो. त्यात त्या अर्धचंद्रात अनुस्वार आला, तर माँजिनी, माँटेक, यातला होतो. म्हणजे तो अर्धचंद्र आणि त्यावरची बिंदी अर्थातच त्यांनी हिंदीवरून उचलली आहे. साक्षात बाळासाहेबांच्या पत्नीच्या उपाधीत जर सरसकटपणे मराठीपेक्षा हिंदी रीत मानली जात असेल, तर त्यातून या दोन भाषांमधलं नातं स्पष्ट होतंच की.

मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे, की ज्याला आपण निर्विवादपणे श्रेष्ठ मानतो, आपल्यावरचं स्थान देतो, त्या उत्तर भारतीय संस्कृतीत ’हिंदु’ नववर्ष सुरू होऊन पंधरवडा लोटला देखील. तिथे पौर्णिमेला महिना संपतो. होळीलाच वर्ष संपलं आणि होळीच्या दुसर्‍या दिवशी - धुळवडीला (ज्या प्रतिपदेला आता रंग’पंचमी’ म्हटलं जातं) - नवीन वर्ष सुरू झालं. ’हिंदु नववर्ष’ असं जर काही साजरं करायचं असेल, तर महाराष्ट्राने गुढी पाडवा विसरून धुळवडीला केशरी / भगवे फेटे घालून तुतार्‍या वाजवाव्यात.

पण त्यातही गडबड आहे. मारवाडी, व्यापारी लोकांची. यात गुजराती किती प्रमाणात येतात, माहीत नाही; पण असतील, तर आता त्यांच्या नववर्षाचा वरचष्मा दिल्लीतही सुरू होऊ शकतो. हे लोक विक्रम संवत पाळतात. त्य़ांचं नवं वर्ष दिवाळीत, बलिप्रतिपदेला सुरू होतं. वह्या बदलणे, नव्या वर्षाच्या बोहनीचे वायदे करणे, वगैरे प्रकार तेव्हा होतात. मोठ्या गाजावाजाने होतात. तेव्हा ते एकमेकांना, त्यांच्या गिर्‍हाइकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, भेटीदेखील देतात. तशी कार्डं पाठवतात. बँकेतला कुणीही याची साक्ष देईल, कारण मुंबईतल्या बँकांच्या शाखांमधले नोकरदार कुणीही असोत, बहुसंख्य कस्टमर्स - म्हणजे बँकेला पैसे देणारे, बँकेकडून कर्ज घेणारे कस्टमर्स - गुजराती असतात. परिणामी मुंबईत धंद्याची भाषा गुजराती आहे. मी ज्या बँकेत नोकरी करत होतो, तिथले काही फॉर्म्स एके काळी इंग्रजी आणि गुजराती, या दोनच भाषांमध्ये असत. 

सध्या सर्व भारतीयांना हिंदु मानण्याची चलती आहे. म्हणून आपण मुसलमान आणि पारशी (सर्वच हिंदु तर हे कोण, असं विचारू नये.) नवीन वर्षं सोडून देऊ. पण धार्मिक, सांस्कृतिक परंपरा सोडल्या, तर एक जानेवारी हा न्यू इयर डे असतोच. नवीन वर्षाचे संकल्प गुढीपाडव्याला किंवा बलिप्रतिपदेला सोडल्याचं उदाहरण मला माहीत नाही. तो मान एक जानेवारीचाच. शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता. त्याहूनही भारी म्हणजे टीव्ही वाहिन्यांची मान्यता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं इतर देश ऐकतील ही स्थिती; ज्या प्रकारे आपण सर्व शोधांसाठी, तंत्रज्ञानासाठी इतरांवर अवलंबून असतो ते पाहता;  तुमच्या आमच्या आयुष्यात येणं कठीण. म्हणून किमान टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत तरी गुढीपाडव्याच्या प्रतिष्ठापनेसाठी चळवळ व्हायला हवी. प्रॉब्लेम असा, की तिथे मराठी भाषेला कोणी धूप घालत नाही. गुढी पाडव्याची डाळ तिथे शिजेल, ही शक्यता नाही. मराठी अनाउन्सर आणि अँकर नथी आणि गुढघ्यापर्यंत शेरवान्या घालतात, ते आपण गोड मानून घ्यावं.

आणखी एक नवं वर्ष आहे. वित्तीय वर्ष एकतीस मार्चला का संपतं, याला नक्कीच सज्जड कारण असेल. पण संपतं हे खरं. कंपन्या, सोसायट्या आपापले अकाउंट्स बनवतात आणि कर भरतात. मुख्य म्हणजे कर भरतात. करासाठी एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वर्ष धरल जात असल्यामुळे काय काय होतं. मार्च महिन्यात गाडी खरेदी करून घसारा ऊर्फ डिप्रिसिएशनची किंवा घर घेऊन हप्त्याची वजावट मिळवण्यासाठी धडपड होते आणि म्हणून गाड्या, घरंवाले स्किमासुद्धा जाहीर करतात. हे नवं वर्ष पैशाशी संबंधित, म्हणून त्याला मोजणं आवश्यक. आणि आता ’उदारीकरणा’नंतर वीस वर्षांनी आणखी अच्छे दिन येऊ घातल्यावर जास्त आवश्यक झालं आहे. 

त्यापेक्षा मी आपला माझ्यापुरता जून महिना, हाच नवीन वर्षाचा पहिला महिना, असं मानून चालतो. एक कारण, जूनमध्ये पाऊस सुरू होतो. केरळात तो मेमध्ये येत असेल, उत्तरेत जुलै उजाडत असेल; माझ्या मुंबईत तो जूनमध्ये अवतरतो आणि जीवनसातत्याची, आणखी एका वर्षाची शाश्वती देतो. म्हणून तो वर्षाचा पहिला महिना. दुसरं कारण जुनं झालं, पण संपलं नाही: सर्व शाळाकॉलेजं जूनमध्ये सुरू होतात. नवी पुस्तकं, नवा वर्ग, नवे शिक्षक! आणखी काय हवं नवं?

तरुणपणी मी पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पहात असे. तसं डोंगरात कधीही जावं फिरायला; पण पाऊस आला की हाइकचा मोसम ऑफिशियली आला! तो वारा, तो चौफेर झोडपणारा वर्षाव, ते पायांना अडवणारं गवत, ते खळाळ झरे, ती हिरवाई, तो तृप्‍त दिसणारा निसर्ग! सौंदर्याचा, आनंदाचा, देहभान विसरण्याचा, देव मानण्याच्या अगदी जवळ जाण्याचा य़ापेक्षा उत्कट अनुभव मला माहीत नाही. माझ्यासाठी तेच नवं वर्ष. गुढीचा अर्थ लिंगपूजेतून लावायचा की आणखी कसा लावायचा, याच्याशी मला देणंघेणं नाही. 

तरीपण ते ’हिंदु’ नववर्ष म्हटलं की हसू येतंच. या चित्रविचित्र चालीरीतींच्या देशात सर्वांना एका गाठोड्यात बांधायचा कशाला हा फुकाचा आटापिटा! देशातल्या सगळ्यांना हिंदू म्हणायचं असेल, तर हिंदुपणाची एकमेव ओळख संघप्रणित ’विश्वहिंदु’ हीच आहे, असं घोषित करून बाकीच्यांना धर्माबाहेर काढावं लागेल. नाहीतर हिंदू असा काही एकसंध धर्म नाही, त्यात सत्रा ते सत्राशे पंथ, रीती आणि परंपरा आहेत, हे मान्य करून ’हिंदु नववर्ष’ ही संकल्पना मोडीत काढावी लागेल. दोन्ही चालणार नाही.