अक्षर दिवाळी अंकातल्या माझ्या शम्मी कपूरवरच्या लेखातून:
राज कपूर हे एक ’स्कूल’, एक ’घराणं’ होतं. सगळ्याच सिनेमांमध्ये तो आवाराप्रमाणे आईला द्यायला रोटी मिळाली नाही, म्हणून चोरीच्या रस्त्याला लागलेला गुंड, किंवा नशीब कमवायला शहरात येऊन शहरातल्या मोहमयी दुनियेत फसलेला श्री चारसोबीस नव्हता. अंदाजमध्ये तर तो जवळपास व्हिलनच होता. पण कोणीही असला, तरी तो दुबळा, व्हल्नरेबल दिसायचा. नर्गिसचं उलट होतं. (ती तर अदालत किंवा मदर इंडियामध्ये हताश, खचलेली असते; तेव्हासुद्धा दुबळी दिसत नाही.) त्याचं आणि नर्गिसचं प्रेमप्रकरण थट्टेवारी नेण्यासारखं मुळीच नव्हतं. मुळात, बहुतेक सिनेमांमध्ये तीच ती नायिका असूनही त्यांचा प्रणय जराही शिळा न वाटणे, हेच थोर होतं. त्या निष्ठावानपणाला सिनेमाबाहेर, जगण्यातलं मूल्य प्राप्त होत होतं. आणि कॉलेजचे दिवस मूल्यांचा शोध घेण्याचेच तर असतात!
देवचा नायक नायिकेशी खेळायचा; पण त्याच्या मवालीपणात एक रुबाब होता. आत्मप्रतिष्ठा होती. देव गरीब असो की श्रीमंत; त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा रुबाब तोच होता. पेइंग गेस्ट, तेरे घरके सामनेमध्ये नूतन; काला बाजार, गाइडमध्ये वहिदा; काला पानी, जाली नोटमध्ये मधुबाला; टॅक्सी ड्रायव्हर, नौ दो ग्यारहमध्ये कल्पना कार्तिक; हम दोनो, असली नकलीमध्ये साधना; कोणाशीही त्याची जोडी मस्त जुळायची. त्याच्या एका चाहत्याने त्याच्या मते निरुत्तर करणारा मुद्दा मांडताना म्हटलं होतं, "टॅक्सी ड्रायव्हर, जुगारी, गाईड, सैनिक, शराबी, काळा बाजार करणारा, ... सगळं करून दाखवलंय देव आनंदने!"
दिलीपची तर गोष्टच वेगळी. ’मला गंभीरपणेच बघा; माझा सिनेमा म्हणजे गंमत जंमत नव्हे!’ अशी त्याची दरडावणीच होती. दागमधला दारुडा असो, की आझादमधला रॉबिनहुड; दिलीपचा नायक सगळा स्क्रीन भरून टाकायचा. देवदास आणि गंगा जमना यांसारख्या दमदार रेखाटनांची गोष्टच सोडा. ट्रॅजेडी रोल करून निम्मीने दिलीपबरोबर जोडी जमवायचा प्रयत्न केला; पण जमलं नाही. नायक-नायिकेच्या प्रेमाविना चित्रपटच न बनण्याच्या त्या काळात दिलीपला स्ट्राँग जोडीदारीण असायचीच. मग तराना, मुगले आझममध्ये मधुबाला असेल; मधुमती, गंगा जमनामध्ये वैजयंतीमाला असेल; नाही तर दर रोज गर्वरूपी साबणाने नहात असल्यासारखी दिसणारी देवदासमधली सुचित्रा सेन असेल.
आणि आजच्या ’लोकमत’मधली ही देव आनंदला वाहिलेली श्रद्धांजली (मुळात मी लिहिलेली):
अमर प्रेम पुजारी
देव आनंदचा मृत्यू अकाली झाला, यात शंका नाही; काही माणसं तरुणपणातच हरपतात. त्यातलाच एक देव आनंद. त्याला भेटलेल्या प्रत्येकाला त्याच्या सळसळत्या उत्साहाचा संसर्ग व्हायचा; तरुण झाल्यासारखं वाटायचं. तरुण आणि उत्साही दिसणे, ही देव आनंदला ओळखण्याची सर्वात मोठी खूण होती. गंमत अशी की दिलीप, राज, देव या त्रिमूर्तीने सिनेमात कामं करायला सुरुवात केली, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. पण आमच्या पिढीचं ’सांस्कृतिक पोषण’ मॅटिनी शोवर झालं. म्हणजे, देव आनंद आमच्या मागच्या पिढीपासून तारुण्याचा आयकॉन होता. दिलीप हा परिपूर्ण नट; राज म्हणजे गरिबांचा, ’बिचार्यांचा’ प्रतिनिधी. पण अभिनयात कच्चाच असणार्या आणि गांवढळ, गरीब बिचारा न दिसणार्या देव आनंदच्या अचाट लोकप्रियतेचं रहस्य काय?
देव आनंद म्हण्जे काय? ’बाजी’तला जुगारी, ’जाल’मधला स्मगलर, ’टॅक्सी ड्रायव्हर’मध्ये टॅक्सी ड्रायव्हर, ’काला बाजार’मध्ये सिनेमाची तिकिटं ब्लॅकमध्ये विकायला सुरुवात करून तो वहिदा भेटल्यावर सुधारतो आणि ’सफेद बाजार’ काढतो. ’मुनिमजी’मध्ये दोन रूपांत वावरतो. बहुतेक चित्रपटांमध्ये त्याला एक तरी ज्यादा नायिका लागते; जी एकदा तरी त्याच्या रूपाची स्तुती करते. ’काला पानी’ मध्ये मधुबाला पहिल्यांदा दिसते, तो सीन आठवतो? देव आनंद एका पेपरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि समोरच्या टेबलवरची बाई प्रचंड कामात असते. शेवटी ती वळते आणि -- जग थांबतं. तो तिला आणि ती त्याला बघून अवाक् होतात. ’ज्वेल थीफ’, ’जॉनी मेरा नाम’, ’तेरे घरके सामने’, अगदी ’तेरे मेरे सपने’ सुद्धा; सर्व ठिकाणी देव आनंद साहेब स्वतःच्या विलक्षण प्रेमात असल्याचं जाणवत रहातं. इतरांनी आपल्या प्रेमात पडावं, ही त्याची अपेक्षा लक्षात येते.
ही देव आनंदची, देव आनंद या प्रतिमेची खरी ओळख.
आदर्शवादाने आणि डाव्या विचारसरणीने भारलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या त्या काळात स्वतःवरच्या प्रेमाचं असं प्रदर्शन, असं कौतुक वेगळं होतं. ते खटकायला हवं होतं. पण देव आनंदच्या व्यक्तिमत्त्वात आणखी काही होतं. त्याचं स्वतःवरचं प्रेम त्याला इतरांना तुच्छ मानायला लावत नव्हतं. तो पडद्यावर आत्मकेंद्रित, आत्ममश्गुल वाटला नाही. लव्हेबल वाटला. इतका लव्हेबल, की एक मुलगी मला म्हणाली, याला पाळावासा वाटतो. घरी ठेवावा आणि याच्याकडून प्रेम करून घ्यावं!
तेव्हाची मूल्यं खरी होती. त्या मूल्यांनुसार स्वतःवर प्रेम करणं उल्लूपणाचं लक्षण होतं. पण देव आनंद मुळीच उल्लू ठरला नाही. ’इतरांवर प्रेम करायचं, तर अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका!’ असा महान संदेश तो देत राहिला.
स्वतःवर इतका खूष असलेल्या, इतरांकडून प्रेमाची अपेक्षा असणार्या या देखणेपणामुळेच ’बम्बईका बाबू’ मधली शोकांतिका जिवंत होते. इस्टेट लाटायला खोटा वारस म्हणून जातो आणि ’बहिणी’च्या प्रेमात पडतो! त्याला खरंच भाऊ मानणार्या तिच्या मनात कसं काही येणार?
पण ’बम्बईका बाबू’ हा अपवाद. स्वतःवरच्या प्रेमातून त्याच्या एकूणच वागण्यात जो लडिवाळपणा आला, त्याचा सुंदर परिणाम असा झाला, की नायिका कोणीही असो, देवशी तिची जोडी अनुरूपच वाटली. ’पेइंग गेस्ट’ आणि त्याच्यापेक्षा जास्त ’तेरे घरके सामने’ मध्ये नूतन आणि तो, काय शोभतात, एकमेकांना! ’काला बाजार’ मध्ये ’रिमझिमके तराने लेके आयी बरसात’ गाताना कशी मस्त वाटते देव-वहिदाची जोडी! ’नौ दो ग्यारह’ मध्ये त्या मवाली कल्पना कार्तिकला बघताना वाटतं, हीच खरी याची जोडीदारीण! ’हम दोनो’ आणि ’असली नकली’. सांगा पाहू साधनाच्या जवळ दुसर्या कोणी जावंसं वाटतं तरी का? ’ओ मेरे राजा’ हे तर नाटकी ड्युएट; पण ते नाटक करायला हेमा मालिनीबरोबर देवच हवा ना? ’पलभरके लिये कोई हमें प्यार कर ले’ मध्ये तर अंगाला हात न लावता तिची इतकी चावट मस्करी आणखी कोण करणार? ’जीवनकी बगिया मेहेकेगी’ गाताना देव आणि मुमताज किती प्रेमात दिसतात एकमेकांच्या. हिरो-हिरॉइनच्या ’केमिस्ट्री’ला फार किंमत असते. देव आनंद म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट! कोणालाही विरघळवतो!
देव आनंदला कोण उल्लू म्हणेल? एक गोरा, एक काळा; एक शूर, एक भित्रा; एक सच्चा, एक झूटा; असे खूप डबल रोल झाले हिंदी सिनेमात. पण दोन्ही चिकणे, दोन्ही चांगले, दोन्ही सैन्यात; असे ’हम दोनो’ किती सापडतात? देव आनंदच्या नवकेतनने गुरु दत्तला, राज खोसलाला ब्रेक दिला. सचिन देव बर्मनला धरून ठेवला. गाइडसारखा अवघड विषयावरचा सिनेमा काढला. आणि हिंदी सिनेमाच्या इतिहासातला एक थोर दिग्दर्शक विजय आनंद नवकेतनचाच की.
’प्रेम पुजारी’ नंतर देव आनंदला दिग्दर्शक होण्याची इच्छा झाली आणि स्वतःच्या बॅनरखाली तो त्यानंतर आजतागायत सिनेमे दिग्दर्शित करत राहिला. पस्तीस वर्षं! स्वतःवरचं प्रेम विसरा; किती बांधिलकी या माध्यमाशी! देव आनंदने सिनेमातून पैसे मिळवून सिनेमेच काढले. आणि सार्या जगाला उत्साहाचे, तरुण वृत्तीचे धडे दिले. एका देखण्या, उमद्या, कामावर आणि काम करत रहाण्यावर प्रेम करणार्या अस्सल हिरोला प्रणाम!
Sunday, December 4, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment