Friday, December 9, 2011

अमेरिकन लोकांना जशी कलेचं विज्ञान करून टाकण्याची जबर हौस, तसं भारतीयांचंसुद्धा आहे; पण वेगळ्या संदर्भात.

कलेचं विज्ञान करणे म्हणजे काय? म्हणजे कला कलावंताची असते, विज्ञान अभ्यासाने कोणालाही साध्य असतं. उदाहरणार्थ, हौ टू विन फ़्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल. पुस्तक वाचून जगमित्र व्हा. समाजात बदल घडवून आणायचाय? त्यासाठी कळकळ, बांधिलकी, अशा व्यक्‍तिनिष्ठ गुणांची आवश्यकता नाही; MSW कोर्समध्ये BCC शिकून घ्या. MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क (पेशा, व्यवसाय म्हणून समाजकार्य करा). आणि BCC म्हणजे बिहेविअयरल चेंज कॉम्युनिकेशन (विशिष्ट तंत्रं वापरून संदेश प्रक्षेपित केला, की संदेशग्रहण करणार्‍याचं - करणारीचं - वर्तन अपेक्षित बदलासाठी अनुकूल बनतं). थोडक्यात, आत काही नसलं तरी बाहेरून सगळं परिधान करता येतं. आणि ते खर्‍याइतकंच प्रत्ययकारी ठरतं.

अशापैकी भारतात आहे ते काय? तर आपली कर्मकांडं. ती एकेका व्यक्‍तिगत अनुभवाला सामाजिक, सार्वजनिक करून टाकतात. मग माणसाची आत्मनिष्ठा पातळ होऊन तो समाजघटक बनतो. "आम्ही यापुढे एकत्र राहून सर्व काही शेअर करायचं ठरवलं आहे," अशी घोषणा करावीशी पशुपक्ष्यांना वाटत नाही; मनुष्यसमूहातल्या सदस्याला वाटते. तेव्हा लग्न हा विधी सामाजिकच. पण कोणा निकटच्या व्यक्‍तीचा मृत्यू? एरवी पाळली नाहीत, दिसली नाहीत; तरी रक्‍ताची नाती मृत्यूच्या वेळी ऑपरेशनल होतात. आणि आपल्याकडे नाती तरी किती. सगळे आप्‍तस्वकीय सांत्वनाला येतात. जावंच लागतं. ते येणार म्हणून मरणार्‍याच्या कुटुंबियांना तयार रहावं लागतं. कामासाठी, कशाहीसाठी बाहेर न जाता घरी थांबावं लागतं. सांत्वन करून घ्यावं लागतं. एक नाही, दोन नाही; म्हणे बारा दिवस. यात अंतर्मुख होण्याची संधी नाकारली जाते. जाणारी व्यक्‍ति नसण्याने आपल्या अस्तित्वात होणार्‍या पोकळीच्या परिमितीकडे न्याहाळायला मिळत नाही. आत खळबळ न होताच बाहेरच्या कर्मकांडांनी पोकळी भरली जाते.

कर्मकांडं लगेच ताबा घेतात. ती ताटी, तोंड या दिशेला की पाय? मडकं, त्याला दगडाने भोक पाडणे, ओठांवर पालथी मूठ आपटत बोंब मारणे. मंत्रपठण. काही लोकांच्यात मयताला आंघोळ घालतात. तो विवाहित पुरुष असेल, तर त्याच्या बायकोच्या हातातल्या बांगड्या विशिष्ट पद्धतीने फोडतात. या जात/जमातविशिष्ट रीतीभाती माहीत असलेले लोक भराभरा प्रॉम्टिंग करतात आणि गोष्टी घडत जातात. आतल्या पोकळीतली खळबळ गुदमरवून नष्ट केली जाते.

समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हे अर्थातच आवश्यक आहे. मृत्यूचं दर्शन माणसाला ठार एकटं करू शकतं. सगळे बुद्ध होत नाहीत; पण प्रोसेस तीच असते, ज्याच्या त्याच्या संवेदनशीलतेच्या मर्यादेतल्या ज्ञानप्राप्‍तीची. असा एकटा होणारा माणूस समाजासाठी, समाजस्वास्थ्यासाठी अधिकाधिक कुचकामी होत जातो. कर्मकांडं या प्रोसेसला बांध घालतात.

असो.

No comments:

Post a Comment