Thursday, January 16, 2014

मला अरविंद केजरीवालला मत द्यायचं आहे! कसं देऊ?


’आम आदमी पक्षाला मत दे,’ हे उत्तर मला मान्य नाही. कारण अरविंद केजरीवालला मत देणे आणि राज ठाकरेला मत देणे, यात फरक आहे. पुन्हा, आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातही फरक आहे. नवनिर्माण सेना हा पक्ष राज ठाकरे यांच्या मालकीचा पक्ष आहे. राज ठाकरे यांच्या बाहेर त्या पक्षाला अस्तित्व नाही. उद्या समजा राज ठाकरे शिवसेनेत (किंवा आणखी कुठे) गेले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या अस्तित्वाचं प्रयोजन संपेल आणि तो विसर्जित होईल. झाला नाही तर तो एक विनोद ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं एकमेव, परिपूर्ण धोरण हे राज ठाकरे यांची सर्वांगीण उन्नती घडवून आणणे, एवढंच आहे. मनसेच्या कुठल्याही उमेदवाराचं पहिलं काम या धोरणाची अंमलबजावणी, हे असल्याकारणाने (आणि मनसेत पूर्ण एकाधिकारशाही असल्यामुळे) मनसेला, मनसेच्या उमेदवाराला दिलेलं मत राज ठाकरे यांना पोचण्याची गॅरंटी आहे.

पण मला राज ठाकरे यांना नाही, तर अरविंद केजरीवाल यांना मत द्यायचं आहे. तिथे प्रॉब्लेम आहे.

अरविंद केजरीवाल हा भारतीय राजकारणाला भेटलेला मसीहा आहे, असं मला वाटत नाही. इतकंच काय, जातींची घुसळण, जागतिकीकरणाचा दबाव, व्यक्‍तीला अजिबातच सार्वभौमत्व न देणारी भारतीय परंपरा, सर्व प्रकारच्या माहितीची सहज उपलब्धता, वाढत्या तरुणाईचा वाढता उतावीळपणा, वेगाने बदलत्या सभोवतालामुळे विशिष्ट वर्गाला आणि विशिष्ट वयाला जाणवणारी असुरक्षितता, वगैरे, वगैरे घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्याची राजकीय स्थिती घडली आहे, असं मला वाटतं. समाजपरिवर्तनाच्या वाटचालीत येणारा हा एक टप्पा आहे, असं मी आजच्या स्थितीकडे बघतो.

पण म्हणजे देश चालवण्याचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक सिनिक, निबर होत चाललेल्या राजकारणी मंडळींवर सोडून द्यावं, असं मला मुळीच वाटत नाही. किंवा, हे राहिले काय नि ते आले काय, आपल्याला काय फरक पडतो? अशी एका परीने विरक्‍त आणि त्याच वेळी ’कुठलाही पक्ष आपल्या हितसंबंधांना दुखवू शकणारच नाही,’ अशी दर्पयुक्‍त अहंकारी भूमिका घेणंही मला पटत नाही. समाजात रहाण्याचे फायदे उपटायचे आणि  सामाजिक कर्तव्यात कसूर करायची, हे काही खरं नाही. म्हणून मी दर निवडणुकीत मत देतो. ७७-८० साली जनता पक्षाला दिलं, नंतर काँग्रेसला देऊ लागलो. भाजपला निर्विवाद बहुमत मिळालं, तर धर्मांध शक्‍ती माजतील आणि देशाचं पूर्ण वाटोळं करतील, अशी मला खात्री आहे. मला वाटणार्‍या या खात्रीच्या बळावर काँग्रेस मला ब्लॅकमेल करते आणि माझं मत लुबाडते, हे मला कळतं. पण पर्याय नाही.

पुन्हा सांगतो, केजरीवाल हा मसीहा आहे, मला - आणि समविचारी इतरांना - मिळालेला महान पर्याय आहे, सर्व समस्यांवरचं उत्तर आहे, असं मला मुळीच वाटत नाही. पण एका केजरीवालमुळे सर्व राजकीय पक्षांची झालेली गोची मला दिसते. प्रशासनातली पारदर्शकता, भ्रष्टाचार, उत्तरदायित्व, वगैरे, खरं तर ज्यांच्या बाबतीत सर्वसंमती व्हावी असे मुद्दे कसे आत्ता, दिल्लीच्या निवडणुकीनंतर ऐरणीवर येऊ लागलेत, हे दिसतं. उद्या केजरीवाल हा दिल्लीच्या जनतेने केलेला प्रयोग बारगळेलही; पण सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी झटकून टाकलेले हे मुद्दे अण्णा हजारे आणि मग केजरीवाल यांच्यामुळे पुन्हा प्रकाशात आले आहेत आणि ते पुन्हा कोपर्‍यातल्या कचर्‍यात लोटून द्यायला संबंधितांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत, असं मला वाटतं.

हे प्रयत्न करणं त्यांना अवघड व्हावं, ही माझी इच्छा आहे. त्यासाठी भारतीय राजकारणात इतर धंदेवाईक (म्हणजे संपत्ती-सत्ता संपादण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून राजकारण करणार्‍या, बापाची इस्टेट वारसाहक्काने घ्यावी, तशा भावनेने पक्षसत्ता ताब्यात घेणार्‍या) राजकारण्यांना जरब देत केजरीवाल आणखी काही काळ रहावेत. असं मला वाटतं. म्हणून मला केजरीवाल यांना मत द्यायचं आहे.

पण ज्या कारणासाठी केजरीवाल यांना मत द्यायचं आहे, त्याच कारणांमुळे तसं करणं अवघड होऊन बसलं आहे. उद्या समजा, मिलिंद देवरा गेले ’आप’मध्ये तर मी त्यांना मत देऊ का? नितेश राणे यांना देऊ का? कुण्या ’राष्ट्रवाद्या’ला देऊ का? राजकारणी एक खेळ खेळत असतात. कालपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या’दोपहरका सामना’ नावाच्या पायखाना फॅक्टरीचे मॅनेजर असलेले संजय निरुपम काँग्रेसमध्ये जाऊन पावन होतात. हुतात्मा स्मारक पवित्र करण्यासाठी ते धुणारे छगन भुजबळ शरद पवारांकडे गेले की धर्मनिरपेक्ष ठरतात. येड्युरप्पा भ्रष्ट म्हणून पक्षाबाहेर होतात आणि मतं आणतात म्हणून पुन्हा आत येतात. आणि हे सगळं होत असताना त्या त्या पक्षांचे प्रवक्‍ते तावातावाने स्वतःचं समर्थन आणि दुसर्‍याचा निषेध करत असतात.केजरीवालना मत म्हणजे या सगळ्याला प्रतिकात्मक विरोध.

पण म्हणूनच तर त्यांच्या पक्षाचा उमेदवार ’नीट’ हवा! तो ’शुद्ध’ हवा, शिवाय आजच्या भ्रष्ट, हिंसक वातावरणात उभा राहू शकणारा हवा. ही अपेक्षा जशी माझी आहे, तशी देशभरात लाखोंची असेल. केजरीवालना दिल्लीतल्या दिल्लीत हे जमत नाही (उदा. बिन्नी यांचा तमाशा), तर भारत नामक अब्ज लोकसंख्येच्या उपखंडात कसं जमायचं? मला माझ्या मतदारसंघात, फार तर शहरात, राज्यात एक वेळ सांगता येईल, की आम आदमी पक्षाची उमेदवारांची निवडप्रक्रिया योग्य आहे (किंवा नाही). पण दुसरीकडे मला काय माहीत?

एके काळी प्रामाणिक समाजकार्य करणार्‍या सोशालिस्टांची नंतरच्या काळात वाताहात झाली याला अनेक कारणं असतील. त्यांची वाताहात ही जागतिक प्रक्रिया असेल. पण एक स्थानिक कारण असं की प्रत्येक सोशालिस्ट स्वतःला शहाणा समजतो. काही प्रमाणात तो असतोही; पण पक्ष चालायचा, राजकारण करायचं तर संघटना हवी, संघटनेची शिस्त हवी, निर्णय झाल्यावर तो पाळायला हवा. पटत नाही म्हणून पक्ष फोडून चालणार नाही, थोडा धीर धरायला हवा. दबावाचं राजकारण जमायला हवं वगैरे, वगैरे. हे आता ’आप’बद्दलही व्हायला हवंच. नुसते स्वच्छ चारित्र्याचे आणि फर्ड्या वाणीचे (आणि अर्थात समाजासाठी काम करण्याची भाबडी इच्छा बाळगणारे) लोक कसे चालतील? काँग्रेसमधले निर्ढावलेले राजकारणी आणि कोणा कोणा उद्योगगृहाच्या मिंधेपणात अडकलेल्या वाहिन्या आणि तसलीच वृत्तपत्रं त्यांचा पोपट करायला टपलेले आहेतच. खैरनारांचं काय झालं आठवतं?

असा हा तिढा. कदाचित मला नीट मांडता आलाही नसेल. पण खरा. मला खरंच केजरीवालना मत द्यायचं आहे. पण देता येईल का, याची शंका आहे.


तरीही द्यावंच; नाही का?

1 comment:

  1. उत्तम... विचार आवडले आणि पटले सुद्धा!

    ReplyDelete