Wednesday, June 11, 2014

विभूतीपूजेचा रोग




सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी कँपाकोला या बेकायदेशीर मजले असलेल्या गृहसंकुलातील रहिवाशांना सहानुभूती दाखवली म्हणून पेपरांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र त्यांच्यावर टीका होते आहे. मागे काही प्रसंगी कसं त्यांचं वागणं चुकीचं होतं याच्या आठवणी काढल्या जात आहेत. त्यांना भारत सरकारने ’भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी गौरवाने सन्मानित केलं असल्यामुळे त्यांचं वागणं, बोलणं जास्त जबाबदारीने व्हायला हवं अशी अपेक्षाही व्यक्‍त होताना दिसते. या निमित्ताने समाजातला वर्तमानपत्र वाचणारा आणि फेसबुकावर वावरणारा एक वर्ग कसा कँपाकोलावासियांच्या सहानुभूती-प्रचार मोहिमेच्या विरोधी आहे, हे उघड होत असलं तरी एकूण टीकेचा रोख बरोबर नाही. लताबाईंचं समर्थन होऊ शकत नसलं तरी त्यांच्यावरची टीकासुद्धा चूकच आहे.

लताबाईंचा गायनातला अधिकार वादातीत आहे. त्यामुळे त्या संदर्भात त्यांच्या शब्दाला निश्चित वजन आहे. उद्या कुण्या एकाचं वा एकीचं गाणं किंवा एकूणच गाण्यांच्या बदलत्या चाली वा पद्धती यासंबंधी त्या काही म्हणाल्या आणि ते पटलं नाही; तर त्यावर टीका करणे, त्यांच्या म्हणण्याचा कीस काढणे, याला अर्थ असेल. पण बाकी कशाहीबद्दल त्यांचे उद्‌गार आणि कुणाही सोम्यागोम्याचे उद्‌गार यांत फरक काय? त्यांचं म्हणण्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याचं कारण काय? बहुतेक सर्व जनता त्यांचा शब्द झेलायला अतिउत्सुक असते, म्हणून त्या बोलतात आणि एकूण प्रसिद्धीमाध्यमं त्याची बातमी करतात. उद्या समजा एखाद्या सिव्हिल इंजीनियरला त्या बांधकामाविषयी सल्ला देऊ लागल्या; तर तो श्रद्धेने, भाविकतेने ऐकून घेईल काय? ’तुम्हाला काय कळतं यातलं?’ अशी त्याची सहजप्रतिक्रिया होईल.

खूप वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर (कर्तृत्वाने मोठाच, पण) वयाने लहान असताना त्याने एका निवडणुकीत एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केल्याचं आठवतं. त्या उमेदवाराला सचिनचा जाहीर पाठिंबा घ्यावासा वाटला कारण सचिन या महान क्रिकेटपटूचे चाहते असलेले काही मतदार या बाबतीतही त्याच्या शब्दाला मान देतील आणि आपली मतं वाढतील, असा विश्वास त्या उमेदवाराला वाटला. तो उमेदवार आणि आज लताबाईंवर टीका करणारे यांची मानसिकता एकच आहे. समाज तोच आहे. लोक आपलं फारच ऐकतात, असं आढळल्यावर भल्याभल्यांचा तोल ढासळू शकतो. त्या मानाने सचिन आणि लताबाई यांचा तोल कमीच गेला आहे.

आपल्या समाजमनातच गफलत आहे. कोणत्याही प्रकारच्या कौशल्यात एखाद्याने विशेष यश प्राप्‍त केलं की त्याला/तिला सर्वांगपरिपूर्ण ठरवण्याची आपल्याला घाई होते. मग सायना नेहवालचा शांपू आपल्याला भावतो आणि माधुरी दिक्षितच्या हातातली भांडी घासायची पावडर. शाहरुख खान आपल्याला पेप्सी प्यायचा आग्रह करतो कारण तसा आग्रह करण्याचे त्याला भरपूर पैसे मिळत असतात. एखादाच पुलेला गोपीचंद असतो, जो असल्या शीतपेयाची जाहिरात करण्यासाठी मिळणारे कोटी रुपये नाकारतो. बाकी सगळे तुमच्याआमच्यासारखे! एक प्रकारे वडाची साल पिंपळाला लावणारे.

एवढा थोर राम, मग त्याने सीतेला का टाकली, या प्रश्नाला एक उत्तर असं आहे, की रावणाला मारल्यावर रामाचं अवतारकार्य संपलं. त्याच्यातला देवाचा अंश निघून गेला. उरला तो एक स्खलनशील मानव. देवाला लावण्याची फूटपट्टी त्याच्या वर्तनाला लावणं बरोबर नाही. तसंच, क्रिकेटच्या मैदानावर महापराक्रम गाजवणार्‍या सचिन तेंडुलकरकडून तसाच पराक्रम जीवनातल्या सगळ्या क्षेत्रात व्हावा, ही अपेक्षा त्याच्यावर अन्याय करणारी आहे. लताबाईंचा फ्लॅट कँपाकोलात आहे, म्हणून त्या कँपाकोलाची बाजू घेतात, या आरोपात तथ्य असेल नसेल; पण ’एक महान गायिका असं कसं बोलू शकते?’ हा सवाल अन्यायकारक आहे.

सांगण्यासारखी गोष्ट अशी की आपल्या नागर समाजात बोकाळलेला हा विभूतीपूजेचा रोग आदिवासींमध्ये नाही. गडचिरोलीत असताना त्यांच्या पुजार्‍याची ते कशी टिंगलटवाळी करतात, हे मी पाहिलं होतं. पण देवाची पूजा करण्याची, कर्मकांड पार पाडण्याची वेळ आली की त्याच पुजार्‍यासमोर गावातला प्रत्येक जण नतमस्तक होतो, हेसुद्धा मला पहायला मिळालं. उत्तराखंडमध्ये जोशीमठजवळ ट्रेकिंगला गेलो असताना आमचा एक मोलाने वजन उचलण्यासाठी सोबत घेतलेला सोबती असाच पुजारी होता. तेव्हा देखील एका देवीची पूजा त्याच्या हातून करवून घेताना इतर सर्व स्थानिक बोजे उचलणारे त्याच्याशी नम्रपणे वागत होते. तेवढं झालं की पुन्हा तो आणि इतर एका पातळीवरचे होऊन जात होते. पद वा स्थान यांना असणारं महत्त्व ते पद वा स्थान धारण करणार्‍याला देऊ नये, ही यातून दिसणारी प्रगल्भता. जोपर्यंत एखादी व्यक्‍ती मोठ्या पदावर आहे, तोपर्यंत तिला त्या पदाचा मान मिळेल, अधिकार गाजवता येईल; तिथून उतरल्यावर ती व्यक्‍ती पुन्हा इतरेजनांपैकी होऊन जाईल, हे आपल्या अंगवळणी का पडत नाही?

हा रोग इतका दुर्धर आहे की गेली हजारो वर्षं तो या समाजात ठाण मांडून बसलेला आहे. जगात देव मानण्याच्या दोन ढोबळ पद्धती आहेत. एकेश्वर पद्धती, जिथे एकच सर्वशक्‍तिमान देव जीवनाच्या सर्व अंगांवर अधिकार गाजवतो. दुसर्‍या पद्धतीत वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळे देव असतात. पावसाचा देव वेगळा, समृद्धीचा वेगळा, झाडांचा वेगळा आणि प्रजननाचा वेगळा. भारतात तिसरीच पद्धती! इथे ढीगभर देव आणि प्रत्येक सर्वश्रेष्ठ. ब्रहदेवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. वनस्पती आणि प्राणीच काय, बाकीचे देवही ब्रह्मदेवानेच निर्माण केले. मग तो सर्वश्रेष्ठ यात काय शंका? विष्णू सार्‍या सृष्टीचा रक्षक. संकट आलं की तोच अवतार घेतो आणि धर्माचं रक्षण करतो. ब्रह्मदेवसुद्धा त्याच्या बेंबीतून उगवलेला. मग विष्णू श्रेष्ठ नाही तर कोण? शंकर? तो तर महादेव, देवांचा देव. इंद्राची गोष्टच काढू नका. तो सर्व देवांचा राजा. तरी सर्व देवांच्यात पहिला नंबर गणपतीचा, बरं का! कुठलाच देव त्याच्या क्षेत्रापुरता मोठा नाही. प्रत्येक जण इतर सर्वांहून श्रेष्ठ!

असा हा गोंधळ. किंवा सावळागोंधळ. अजून त्याच मठ्ठ उत्साहाने चालू आहे.

No comments:

Post a Comment