Wednesday, April 28, 2021

कोरोनाने हलवून बळकट केला देवाचा खुंटा

 

देव आणि ज्ञानाची भूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवप्राण्याच्या एकाच गुणवैशिष्ट्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत.

.

पँडेमिकसाठीमहामारीअसा मराठी प्रतिशब्द वापरात आहे; पणजगभर पसरत गेलेली साथ’, असा त्या शब्दाचा खरा अर्थ आहे.  पृथ्वीवरच्या मानववस्ती असलेल्या पाचही खंडात कोरोना व्हायरस इतक्या वेगाने पसरला, की देशाच्या संदर्भात डोकं शांत ठेवून विचार करण्याऐवजी काहींनी घाईघाईत कमीअधिक मुदतीचे आणि कमीअधिक कडक लॉकडाऊन जाहीर केले. देशोदेशीचे लॉकडाऊन आणि मृत्यूचे आकडे यांनी सुरुवातीला गरगरून टाकलं. मग हे लोण आपल्याकडे आलं आणि इथेसुद्धा बस, ट्रेन, दुकानं, सगळं बंद झालं. लागण असलेला एक जण इतर अनेकांना बाधित करू शकतो, असं सांगण्यात आल्यावर जिथे जिथे गर्दी होऊ शकते, ते सगळं बंद करण्यात आलं. यात जसे मॉल आणि सिनेमा-नाटकांची थेटरं बंद झाली; तशीच देवळं, मशिदी, चर्च इथल्या सार्वजनिक प्रार्थनासुद्धा बंद झाल्या.

हे शेवटचं वेगळं वाटलं. वस्तूंची खरेदी-विक्री आणि करमणूक यांसारखे ऐहिक कारभार बंद होणे, हे शरिरावर हल्ला करून प्राणच धोक्यात आणणाऱ्या नव्या, अनोळखी रोगासाठी सय्युक्तिक आहे; पण परमेश्वराची प्रार्थना बंद? देव आणि देवाची भक्ती या गोष्टी ऐहिक जगण्याशी संबंधित नाहीत. आणि कितीही उलटसुलट वाद घातला तरी धर्म ही गोष्ट समूहाचीच आहे, सार्वजनिकच आहे. समूहाने एकत्र येऊन सण किंवा व्रत, काहीही साजरं केल्याखेरीज धर्म आविष्कृत होत नाही. मनातल्या मनात प्रार्थना करणे, हे श्रद्धाळू असेल; पण ते अजिबात धार्मिक नाही.

जेव्हा देवळं-प्रार्थनास्थळं बंद झाली आणि जेव्हा सामुदायिक प्रार्थना बंद होण्याला सामाजिक मान्यता मिळाली आणि पालख्या- वाऱ्या- मिरवणुका बंद होण्याचा समाजाने स्वीकार केला; तेव्हा एक विचार मनात आला: ‘यातून देव ही संकल्पना डळमळीत होईल का?’ कारण कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या कोविड या रोगाची साथ झपाट्याने पसरू लागल्यावर लोकांच्या मनात ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या, त्यात देवाबाबत काही आंदोलनंसुद्धा असायला हवीत. लोकांना थोडंसं तरी वाटायला पाहिजे की हा रोग आटोक्यात ठेवण्यासाठी देऊळ आणि सामूहिक पूजाअर्चा बंद ठेवाव्या लागतात आणि हे बंद होण्याचा आपण बिनतक्रार स्वीकार करतो. म्हणजे; आपल्या या सामूहिक कृतींचा वास्तविक अर्थ केवळ श्रद्धा व्यक्त करणे, इतकाच होता. त्यातून परमेश्वराला आवाहन किंवा परमेश्वराशी संवाद किंवा परमेश्वराच्या चरणी समर्पण यातलं काहीच होत नव्हतं. आणि समजा काही प्रमाणात होत असलंच तरी त्याचं वजनमाणसं नको तितक्या निकट एकत्र येणेया निखळ भौतिक कृतीपेक्षा कमी होतं.

आणि हे सगळं न केल्याने परमेश्वराचं आणि परमेश्वरभक्ताचं काही बिघडलं नाही. अनेकांनी एकत्र येण्याची भौतिक कृती धोकादायक ठरल्यावर एकत्र येऊन प्रार्थना, वगैरे करण्याची श्रद्धादर्शक कृती निलंबित करायला फार कोणाची हरकत दिसली नाही.

हे झालं देव आणि भक्ती आणि धर्म यांबद्दल. त्यांनी आपापलाधर्मसोडला. पण विज्ञानाने आपला धर्म सोडला नाही. वेगाने पसरलेल्या या रोगाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं (आणि अजून आहे) की यावर उपाय नाही. तरीही रोग्यांच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर कमीअधिक उपचार करायला वैद्यकक्षेत्र कामाला लागलं. या रोगावर उपाय शोधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. हे प्रयत्न कसे, कुठे कुठे होत आहेत, त्यांचं फळ कधी हाती येईल, तोपर्यंत ही साथ कशी आटोक्यात ठेवता येईल, अशा चर्चा केवळ प्रशासनिक जबाबदारी असलेल्या वर्गातच नाही, तर सर्वसाधारण नागरिकांच्यात जोरदारपणे झडू लागल्या. आपल्या परंपरेतल्या काही खऱ्याखोट्या आरोग्यवर्धक चालीरीतींचा, बुडत्याने काडीचा घ्यावा तसा, आधार घेण्याचा निकराचा प्रयत्नही होताना दिसू लागला.


यातून असा अर्थ काढता येतो की आपलं भलं, आपल्या जगण्याची शाश्वती या गोष्टी विज्ञानाचा कमीजास्त आधार घेणाऱ्या वैद्यकशास्त्राच्या हाती आहेत, हे सर्वसामान्य लोकांना पटलं आहे. त्यांना ते मान्य तर आहेच; शिवाय त्यावर त्यांचं आतुर लक्ष आहे. वर्तमानपत्र, सोशल मीडिया यांच्यावरील चर्चांमध्ये कोविडविषयी संशोधनाने जेवढी जागा व्यापली, त्याच्या दशांशसुद्धा जागा देवादिकांना विविध प्रकारे आवाहन करण्याच्या प्रार्थनेसारख्या सामुदायिक कृती बंद होण्याच्या अभूतपूर्व घटनेला मिळताना दिसत नव्हती. जणू काही अनेकानेक वर्षांच्या परंपरा अचानक मोडून पडल्या, हे समाजमनाला तितकसं धक्कादायक वाटलं नाही.

एवढे क्रांतिकारक बदल समाजाने स्वीकारल्यावर सर्वसाधारण मनुष्याने एक पाऊल पुढे जायला हरकत नव्हती.  सर्वसाधारण मनुष्य स्वत: निर्णय घेऊन स्वत:च्या भविष्याची दिशा ठरवत नसतो

, तो परंपराधीन असतो,’ असं कितीही म्हटलं, तरी दैनंदिन व्यवहारांमध्ये काहीतरी लहानमोठे निर्णय घेण्याची वेळ त्याच्यावर सदोदित येत असते. हे निर्णय घेताना अनुभव आणि तर्क यांचाच आधार तो घेत असतो. अशा वेळी, त्या तर्क आणि अनुभव यांच्यामधून देव ही संकल्पना कुचकामी आहे, तमाम मानवजातीवर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी देव, श्रद्धा, भक्ती, अनुष्ठानं, पूजाअर्चा, व्रतवैकल्य यांचा उपयोग होण्याची शक्यता क्षुल्लक आहे; त्यांच्यावर विसंबणे म्हणजे तर जिवाशी खेळण्यासारखंच आहे’, अशा प्रकारच्या विचारांना सामान्य माणसाच्या मनी प्रवेश मिळण्यास हरकत नसावी. एका बाजूने श्रद्धा, देव ही संकल्पना यांचा फोलपणा स्पष्ट होत असताना वैज्ञानिक प्रयत्नांच्या फलितावर आशा ठेवणारी धारणा बाळगण्याच्या संयुक्त परिणामी देवावरचा विश्वास कमकुवत व्हायला हवा. सरसकट सगळ्यांमध्ये अशी प्रतिक्रिया नाही झाली तरी विवेकाला पूर्ण रजा दिलेले लोक सोडून बाकी सर्वांच्यात तशी प्रतिक्रिया कमीजास्त प्रमाणात उमटायला हवी.

तशी उमटलेली दिसली नाही, हे आपल्याला माहीत आहे. का?

देवाच्या हाती आपण एवढंच सोडलेलं नसतं. आपलं, आपल्या सुहृदांचं, या समाजाचं भलं देवाच्या हाती सोपवून निश्चिंत रहाणं चुकीचं आहे, हे ढळढळीत दिसून आल्यावर देवाचा अधिकार संपला, असं माणसाला होत नाही. मन:शांती, विश्वशांती, शांततामय सहजीवन या गोष्टी धर्माच्या माध्यमातून साध्य होतील, या श्रद्धेला धक्का यातून लागत नाही. या गोष्टी विज्ञान प्रत्यक्षात आणू शकत नाही, उलट विज्ञानामधून लागलेल्या एकेका शोधांमुळे, तथाकथित वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवजातीचं भवितव्य धोक्यातच येत आहे, हे प्रतिपादन शिल्लक रहातं.

पण या गोष्टी धर्मही प्रत्यक्षात आणताना दिसत नाही, हे वास्तवसुद्धा रहातं. धर्मामुळे मानवसमूहांच्यात एकोपा, सामंजस्य निर्माण होण्यापेक्षा संघर्षच जास्त होतो आहे, हे तर आज उघड दिसतं आहे. म्हणजे, ज्या गोष्टी विज्ञानाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, त्या धर्माच्या क्षमतेच्याही पलीकडेच आहेत. एकूणदेव ही अंधश्रद्धाच होय’, असा विचार पटण्याच्या निकट संपूर्ण समाज आला नसला, तरी काही प्रमाणात या विचाराने समाजात कुठेतरी मूळ धरलं आहे, असं व्हायला हवं होतं.

.

आता विज्ञानाच्या बाजूने पाहू.

तत्त्वज्ञानाच्या चष्म्यामधून पाहता मानव आणि इतर सर्व सजीव यांच्यात एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे ज्ञानाची भूक. म्हणजेच अज्ञाताची भीती. अज्ञाताची भीती सर्वसाधारणपणे अज्ञातही कल्पना समजणाऱ्या सर्वच प्राण्यांना वाटत असावी. पण त्या भीतीवर मात करण्यासाठी मानवाएवढी घोर धडपड दुसऱ्या कोणी केलेली नाही. मानवाच्या सर्व प्रगतीचं मूळ अज्ञाताच्या भीतीपोटी जागलेल्या ज्ञानाच्या लालसेत आहे, असंही म्हणता येईल. अज्ञाताच्या भीतीतून मानवाने परलोकाच्या कहाण्या रचल्या, पुराणं आणि मिथ्यकथांचं जंजाळ उभं केलं आणि त्यावर श्रद्धा ठेवत कर्मकांडं घडवली.

दुसरीकडे बुद्धीवर जास्त विसंबणाऱ्यांनी अज्ञाताविषयी तार्किक मांडणी करणारे तत्त्वज्ञानाचे इमले उभे केले. या चिकित्सक वृत्तीतूनच पुढे विज्ञान जन्मलं आणि जसं ते वाढत गेलं तशा विज्ञानाच्या शाखाउपशाखा निर्माण झाल्या. अज्ञाताची तपासणी हे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे विज्ञानाला शिस्त आली आणि विज्ञानातून निर्माण होणारं ज्ञानभांडार सर्वांच्या मालकीचं आहे, ते सर्वांना खुलं असलं पाहिजे, असं मूल्य प्रस्थापित होत गेलं. ज्ञानाच्या, माहितीच्या वाढत्या उपलब्धतेमुळे संशोधनाला जोर आला. विचारातून वा प्रयोगातून लागणारे भौतिक जगताविषयीचे शोध सर्वांसमोर मांडणारी व्यासपीठं निर्माण झाली आणि शोधांची पद्धतशीर छाननी होऊ लागली. त्यातून शोध सिद्धहोऊ लागले. अशा सिद्ध झालेल्या शोधांच्या पायावर एका बाजूने आणखी शोध लागत गेले तरी प्रत्येक शोधाची अनेकानेक संदर्भांत पडताळणी होणं थांबलं नाही. भीती निर्माण करणाऱ्या अज्ञाताचं निर्मूलन करू पहाणाऱ्या मानवी प्रयत्नांना विज्ञानाने एक ठोस दिशा दिली. अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर पडण्याची मोठी आशा विज्ञानाने, वैज्ञानिकांनी सर्वसाधारण माणसाला दिली.

याला तंत्रज्ञान या गोष्टीचं बळकट पाठबळ मिळालं. विज्ञानाचा उदय होण्यापूर्वीपासून माणूस जरी अवजारं, म्हणजेच एक प्रकारे  तंत्रज्ञान वापरत असला तरी विज्ञानाने लावलेल्या शोधांनी तंत्रज्ञानाला भलतीच चेतना दिली आणि एका एका शोधाच्या विविध संदर्भातल्या तांत्रिक आविष्कारांनी माणसाचं जीवन अधिकाधिक सुखद होऊ लागलं. माणसाचं आयुर्मान वाढू लागलं. जिथे असे शोध लागले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रथम अवतार घेतला, तिथे आपल्या जगण्याला सुखद करण्यामागे विज्ञान आहे, वैज्ञानिक शोध आहेत, ही जाणीव समाजात सहज झिरपली आणि सर्वसाधारण नागरिकाच्या मनात देखील विज्ञानावर एक प्रकारची श्रद्धा निर्माण झाली.

या प्रक्रियेचं शिखर विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात गाठलं गेलं आणिलवकरच विश्वाच्या रचनेचं रहस्य मानवाला ज्ञात होईल आणि मग भविष्यातील घटनांची पूर्वकल्पना करणं शक्यतेच्या कोटीत येईल,’ असा आशावाद करण्यापर्यंत काही वैज्ञानिकांची मजल गेली. या आशेला प्राणांतिक तडाखा १९२७ मध्ये हायझेनबर्गने अनिश्चिततेचं तत्त्व मांडून दिला. अणुअंतर्गत सूक्ष्म कणांच्या हालचालीचा अभ्यास करताना असल्या कणाचं स्थान ठरवण्यात जेवढी अचूकता आणावी, तेवढीच अनिश्चितता त्या कणाची गती ठरवण्यात निर्माण होईल, असं त्याने मांडलं. वेगवान कणाची गती आणि त्याचं स्थान, दोन्ही एकाच वेळी अचूक माहीत करून घेणं केवळ अशक्य आहे, या मांडणीमुळे सर्वसामान्यांच्या विज्ञानावरच्या श्रद्धेला धक्का बसला. मानवी आकलनाला चक्क भौतिक मर्यादा आहेत, या प्रतिपादनाने अज्ञाताला पादाक्रांत करायला निघालेला विज्ञानाचा अश्वमेधी घोडा अडवला.

तसं म्हटलं तर धर्म वा धर्मसंस्थापक करतात, तसा अंतिम सत्य सांगण्याचा दावा विज्ञानाने कधीच केला नव्हता आणि केलेला नाही. तरी, कोणाच्याही पडताळणीला सामोरं जाण्याची वैज्ञानिक प्रतिपादनाची तयारी आणि पद्धत, विज्ञानाचंच अपत्य असलेल्या तंत्रज्ञानाने मानवी जगण्याला पायरीपायरीने सुखद करत नेल्याचं वास्तव आणि भाषा, वंश, देश ओलांडून वैज्ञानिक मांडणीला मिळणारी सर्वमान्यता, यांच्यामुळे विज्ञानाला दिग्विजयी असल्याचं वलय प्राप्त झालं होतं. ते वलय हायझेनबर्गने नष्ट केलं. विज्ञानाने आवाक्यात आणलेल्या ज्ञानाला कुंपण आहे आणि त्या कुंपणापलीकडे अज्ञाताचा अंध:कार आहे, हेसत्यप्रस्थापित झालं.

म्हणजेच विज्ञानावर श्रद्धा ठेवण्याला आव्हान मिळालं. एका बाजूनेविज्ञान मानवी ज्ञानाच्या कक्षांचा सतत विस्तार करत आहे. अंतराळाला गवसणी घालत आहे. जिला विज्ञानाच्या नियमांचा गंध नाही, अशा व्यक्तीलासुद्धा गुंतागुंतीच्या वैज्ञानिक उपकरणांचा वापर शक्य झाला आहे. आर्थिक नाही तरी ज्ञानसमृद्धीच्या पातळीवर पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त समता प्रस्थापित झाली आहे. माहिती आणि संपर्क या गोष्टी सर्वसामान्याच्या आवाक्यात आल्या आहेत,’ असं प्रतीत होतं. पण त्याच वेळी तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्यासुधारणांमधून वेगळा संदेशही मिळतो. काल जे अत्याधुनिक होतं, वेगवान आणि बिनचूक होतं, तेच आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मंद आणि मागास ठरू लागतं. मग आज ज्याला आपण थोर समजतो आहोत, ते उद्या टाकाऊ कशावरून ठरणार नाही, हा प्रश्न बरोबर ठरतो. म्हणजेच उद्याचं जग कसं असेल, हे आज अज्ञातच आहे, हे अधोरेखित झालं.

थोडे वेगळे शब्द वापरायचे तर विज्ञान नवनवीन ज्ञान आणणार आणि त्यातून अंध:कार कमी होत जाणार. पण ज्या अर्थी विज्ञानाच्या प्रसरणाला सतत वाव मिळत गेलेला आहे, त्या अर्थी विज्ञानाने कितीही उजेड पाडला तरी पलीकडेअंधार होताच. म्हणजे तो तसा यापुढेही असणार आहेच! भौतिकशास्त्रामध्ये ज्ञानाची सीमा गाठण्याच्या वल्गना सुरू होत होत्या, त्याच सुमारास १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू आला. पण तेव्हा व्हायरस ही गोष्ट माहीत नव्हती. अँटिबायॉटिक्सचा शोध लागायचा होता. आजही सगळ्या रोगांवर उपाय ज्ञात नाही आहे. त्यात कोरोनाव्हायरससारखे संपूर्ण अज्ञात शत्रू अचानक अवतरत आहेतच. एक कोरोना येतो आणि अमेरिकेसारख्या महासत्तेला घायाळ करतो. अज्ञाताच्या अंधारात कोणती संकटं दडून बसली आहेत आणि त्यांचा हल्ला कधी, कसा, किती तीव्रतेने होईल, हे कोणीच सांगू शकत नसताना त्या अंधाराची भीती का वाटू नये? त्या भीतीवर भावनिक इलाज शोधण्याचा पर्याय का पत्करू नये? देवाला साकडं का घालू नये?

मानवाची ज्ञानाची भूक जर अज्ञाताच्या भीतीतून आली असेल; तर त्याच भीतीमधून मानवालादेवया संकल्पनेची अपरिहार्यपणे गरज भासली असणार.

देव आणि ज्ञानाची भूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवप्राण्याच्या एकाच गुणवैशिष्ट्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत.

देवही गोष्ट माणसाने निर्माण केली, हे जरी खरं असलं; तरी एक महामारी आली आणि देव या संकल्पनेला उपटून घेऊन गेली; इतकी ती लेचीपेची नाही. जोवर माणूस आहे, जोवर माणसाला इतर सजीवांपासून वेगळं काढणारं अज्ञाताची भीती/ज्ञानाची भूक हे वैशिष्ट्य आहे; तोपर्यंतदेवरहाणार आहे.

मानवाची अज्ञाताची भीती जेव्हा संपुष्टात येईल, तेव्हा ना विज्ञान उरेल, ना मानवाला देवाची गरज राहील.

 कोरोनाकाळाने दिलेलं हे ब्रह्मज्ञान.

( २०२०सालच्या जून महिन्यात लोकप्रभा साप्ताहिकात छापून आलेला लेख. तेव्हा आणि आता किती फरक पडला आहे?)


Saturday, April 17, 2021

संसदीय लोकशाही आणि भारत

हा लेख मी २०२० मध्ये ‘अक्षरनामा’ या डिजिटल अंकासाठी लिहिला. ट्रंप राज्य करत असताना.

 

लोकेच्छेला धुडकावण्याची शक्यतादेखील अध्यक्षीय पद्धतीत जास्त असते. एका माणसापाशी सत्ता केंद्रित झाली की त्याने स्वत:च्या मर्जीनुसार निर्णय घेण्याची शक्यता शेकडो प्रतिनिधींच्या संसदेतून अन्याय्य निर्णय होण्यापेक्षा कितीतरी जास्त असते.

यापेक्षा भयंकर स्थिती धोरणात्मक भ्रष्टाचार, ही आहे. व्यवहारातल्या भ्रष्टाचाराला उघड करून दोषी असलेल्यांना शिक्षा करता येते. जेव्हा शासकीय धोरणच भ्रष्ट होतं आणि लोकहिताऐवजी जवळच्या मोजक्या लोकांच्या फायद्याचे निर्णय होऊ लागतात, तेव्हा त्या भ्रष्टाचाराला कायद्याच्या पकडीत धरताही येत नाही. आणि जेव्हा निर्णय अनेक जागी न होता एकहाती होत असतात, तेव्हा धोरणात्मक भ्रष्टाचार आपोआपच सुलभ होतो.

 विषय आहे, ‘भारतात संसदीय लोकशाही नसती तर’. ‘भारतात लोकशाही नसती तरहा विषय नाही. म्हणजेभारतात सध्या प्रचलित असलेल्या लोकशाही राज्यपद्धतीऐवजी लोकशाहीचाच वेगळा प्रकार असता तरअसा विषय आहे.

जगात लोकशाही राज्यव्यवस्थेचे अनेक प्रकार तर आहेतच. भारत स्वतंत्र झाला तेव्हा अनेक देशांमध्ये लोकशाही नांदत होती. आणि हुबेहूब एका देशासारखी लोकशाही राज्यपद्धती दुसऱ्या देशात असण्याचं उदाहरण बहुधा आजही नसावं. लोकशाही व्यवस्था असलेल्या प्रत्येक देशाने आपापल्या भूगोलाला, संस्कृतीला, इतिहासाला अनुसरत वर्तमानाला साजेशी लोकशाही पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ चालवणाऱ्या काँग्रेस संघटनेच्या पुढाऱ्यांनी हेच केलं. या देशाच्या इतिहास-भूगोलाला अनुरूप आणि भविष्याला अनुकूल असं लोकशाही प्रारूप तयार केलं आणि त्यानुसार राज्यकारभार सुरू केला. हा निर्णय घेताना अर्थातच तेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचलित असलेल्या लोकशाही पद्धतींचा अभ्यास करण्यात आला होता.

आज, स्वातंत्र्य मिळून त्र्याहत्तर आणि संसदीय लोकशाहीचं एक विशिष्ट प्रारूप स्वीकारून सत्तर वर्षं उलटल्यावर तेव्हाच्या आपल्या पुढाऱ्यांचा निर्णय योग्य होता का? ("लोकशाहीच नको; आज नको आणि तेव्हाही नको होती, असं काही लोक म्हणतात"; पण आपला विषय तो नाही) ‘लोकशाहीचं आपण चालवत असलेलं प्रारूप देशासाठी योग्य आहे कायावर विचार व्हायला हरकत नाही. याचाच भाग म्हणूनभारतात संसदीय लोकशाही नसती तर?’ हा प्रश्न उभा रहातो.

संसदीय लोकशाहीचे कार्यरत पर्याय तपासण्यासाठी थोडं इकडे तिकडे बघू. जगात लोकशाहीची परंपरा असलेले, म्हणजेच आपापलं प्रारूप दीर्घकाळ सुरळीत चालवत असलेले जे देश आहेत; त्यांच्यात मुख्यत्वे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएस) आणि ब्रिटन ऊर्फ युनायटेड किंगडम (यूके) या देशांचा समावेश होतो. यूएस हे एक संघराज्य आहे. त्यात पन्नास राज्यं आहेत. कोलंबसामुळे पंधराव्या शतकात युरोपियनांना अमेरिका या खंडाची माहिती झाली आणि नशीब काढण्यासाठी युरोपातून त्या अवाढव्य खंडाकडे माणसांचा ओघ सुरू झाला. तिथल्या स्थानिकांशी संघर्ष करत त्यांनी हळूहळू आपलं बस्तान बसवलं. तसं करताना काही भूभागांना वेगवेगळी नावं मिळाली, वेगवेगळी ओळख प्राप्त झाली. त्यातल्या काही राज्यांवर ब्रिटनचं धिपत्य होतं. त्या पारतंत्र्याविरुद्ध लढा देऊन त्यांनी जेव्हा स्वत:चा देश बनवला, तेव्हा त्या देशात तेरा राज्यं सामील झाली होती. पुढे अधिकाधिक राज्यांनी या देशात सामील होण्याचा निर्णय घेतला (अलास्का हा प्रदेश रशियाच्या झारकडून विकत घेतला, हा अपवाद) आणि ही संख्या वाढत वाढत पन्नासवर पोहोचली (म्हणून यूएसच्या झेंड्यावर तेरा पट्टे आणि पन्नास तारे आहेत).

यूएसमधल्या सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने जरी इंग्रजी भाषा बोलली जात असली आणि युरोपातून गेलेल्यांची बहुसंख्या असली, तरी संघराज्यात सामील होताना प्रत्येक राज्याला स्वत:ची अस्मिता जपावीशी वाटली. त्यामुळे आजही यूएसमधल्या प्रत्येक राज्याला आपापला झेंडा आहे, (जरी नावं वेगवेगळी असली तरी) आपापलं विधिमंडळ आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपापले कायदे करण्याचा अधिकार आहे. अशा बऱ्यापैकी स्वायत्त राज्यांना एका देशात बांधायचं तर सर्वांवर सत्ता चालवणारं एक अधिकारपद हवं. ते त्यांनी अध्यक्षाच्या रूपाने तयार केलं आहे. यूएसमध्ये देशाचा अध्यक्ष देशभरच्या मतदारांकरवी थेट निवडला जातो; तसाच प्रत्येक राज्याचा गव्हर्नरसुद्धा त्या त्या राज्यातल्या मतदानाने निवडला जातो. केंद्रीय सत्ताधारी अध्यक्षाने न निवडलेला, त्याच्या राज्यातल्या मतदारांनी निवडून दिलेला गव्हर्नर यामुळे काही बाबतीत देशाच्या अध्यक्षाच्याआदेशाला धुडकावून लावू शकतो; जे वेळोवेळी झालं आहे आणि आज कोविड या महासाथीच्या संदर्भातही होत आहे. याचंच प्रतिबिंब म्हणून यूएसमध्ये अगदी व्यक्तिपातळीपर्यंत स्वत:चं स्वातंत्र्य जपण्याला काहीसं जास्त महत्त्व आहे, असं म्हणता येईल.

राज्यहे युनिट आणि अशा युनिटांनी मिळून झालेला देश, या रचनेमुळे यूएसमध्ये काही बाबतीत विचित्र म्हणावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या सीनेटमध्ये प्रत्येक राज्याचे दोन, असे एकूण शंभर सदस्य आहेत. म्हणजे व्योमिंगसारख्या सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्याला सीनेटमध्ये जवळ जवळ चार कोटी लोकसंख्या असलेल्या कॅलिफोर्नियासारख्या राज्याच्या बरोबरीचं स्थान मिळतं. कारण सगळ्या सदस्यांचे अधिकार सारखेच आहेत. अध्यक्षाची निवडणूकही कोणाला जास्त मतं, अशी ठरत नाही; ‘इलेक्टोरल कॉलेजवरून ठरते. त्यामुळे जास्त मतं मिळवणारा उमेदवार पराभूत होऊ शकतो. असं झालंही आहे. अध्यक्षावर अंकुश ठेवण्याचं काम यूएसमध्ये सीनेट व काँग्रेस करतात.

भारतातल्या संसदीय लोकशाहीत राज्याची विधानसभा आणि संपूर्ण देशाची लोकसभा, यांच्यासाठी वेगळं मतदान होतं. त्यामुळे यूएससारखी परिस्थिती निर्माण होत नाही. पण एकूण मतदारसंख्येचा लहान हिस्सा असूनही सत्ता स्थापन करणे, पक्षबदल, वगैरे गोष्टींच्या लीला आपण बघत आलोच आहोत.

तसं पाहिलं तर यूके हासुद्धा चार राज्यांनी मिळून झालेला देश आहे आणि इंग्लिश लोक आपल्यावर राज्य करतात, ही भावना स्कॉटलंड व वेल्स या दोन प्रांतांमध्ये काही प्रमाणात आहे. एक गंमतीची गोष्ट अशी की स्कॉटलंड आणि वेल्स यांची स्वतंत्र पार्लमेंट्स आहेत, नॉर्दर्न आयर्लंडची स्वत:ची असेम्ब्ली आहे; पण इंग्लंडचं वेगळं असं पार्लमेंट नाही! यूकेचेच सगळे कायदे इंग्लंडला लागू होतात. परंतु यूके हे यूएसप्रमाणे स्वायत्त राज्यांचं संघराज्य नाही. स्कॉटलंड, वेल्सला आपापला गव्हर्नर नाही. यूकेमध्येखालचंहाउस ऑफ कॉमन्स आणिवरचंहाउस ऑफ लॉर्ड्स अशी रचना आहे. पैकी कॉमन्समधले सभासद आपल्या परिचयाच्या निवडणूक प्रक्रियेतून निवडले जातात. लॉर्ड्स हे वंशपरंपरेतून, राजा वा राणी वा पंतप्रधान यांच्यापैकी कुणी केलेल्या नेमणुकीतून वा चर्चचे प्रतिनिधी असण्यातून, वगैरे ठरलेले असतात. एके काळी लॉर्ड्स हेच राज्य करत होते परंतु आता कॉमन्सच्या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार त्यांना उरलेला नाही. परंपराप्रिय ब्रिटिशांनी इंग्लिश राजघराणं टिकवून ठेवलं आहे. आज राणीला जरी पंतप्रधानावर कुरघोडी करण्याचा अधिकार नसला तरी पंतप्रधान राणीच्याच नावाने राज्य करतो.

यूकेसारख्या आकाराने छोट्या राष्ट्रामध्ये अध्यक्षीय लोकशाही जास्त सोयीची ठरली नसती का, हा प्रश्न मुळातच चुकीचा अशासाठी ठरतो की तेथील लोकशाही राज्यपद्धती ही विचारपूर्वक ठरवून बनवलेली नाही; तर राजसत्ता उलथवून स्थापन झालेल्या पद्धतीत परिस्थितीनुसार बदल होत होत घडत गेलेली आहे. तिथला राजा किंवा राणी हे रशियाच्या झारसारखे निरंकुश सत्ता धारण करणारे नव्हते; तर अनेक सरदारांमधील प्रथम, असे होते. राजसत्ता संपून लोकशाही स्थापन झाली तेव्हा लॉर्ड्सचीच सत्ता स्थापन झाली आणि जनतेचे प्रतिनिधी त्यांच्यासमोर मागण्या करत. त्या प्रतिनिधींमधून हाउस ऑफ कॉमन्स तयार झालं आणि कालांतराने हेखालचंहाउस वरच्या लॉर्ड्सपेक्षा शक्तिशाली बनलं. अनेकांनी मिळून निर्णय घेण्याची परंपरा चालू राहिली आणि अध्यक्षासारखं एकच शक्तिमान पद तयार झालं नाही. दुसऱ्या महायुद्धात ज्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे यूकेला हिटलरचा सामना करण्यास मोठं बळ मिळालं, त्या चर्चिलला अध्यक्षासारखे इतर कोणाहीपेक्षा जास्त, निर्णायक अधिकार मिळण्याऐवजी युद्धानंतरच्या निवडणुकीत चर्चिलच्या पक्षाचा पराभव झाला! यूकेमधल्या नागरिकांमध्येदेखील लोकशाही किती रुजली आहे, याचंच दर्शन त्यातून घडलं, असं म्हणायला हरकत नाही.

एक लक्षात येईल की भारताची संसदीय लोकशाही राज्यपद्धती यूकेच्या जवळची आहे. हाउस ऑफ कॉमन्स आणि हाउस ऑफ लॉर्डस यांच्या जागी लोकसभा आणि राज्यसभा आहेत. तिथे राणी आहे, तसा इथे राष्ट्रपती आहे. आपला राष्ट्रपती हा जनतेने थेट निवडून दिलेला नसतो. एका पात्र नागरिकाला एक मत, या तत्त्वावर निवडून आलेले लोकसभेतले सभासद देशासाठी निर्णय घेतात आणि त्यांनासल्लेदेण्याचं काम राज्यसभेने करावं अशी अपेक्षा असते, हेसुद्धा यूकेशी साम्य दाखवणारं आहे. मात्र, यूके आणि भारत यांच्यातला फरकही मोठा आहे. तो फरक जसा आकाराचा आहे, तसाच वैविध्याचासुद्धा आहे. काश्मीर ते तमिळनाडू आणि गुजरात ते आसाम, अशा या भारत देशात भाषा, वंश, वर्ण, चालीरीती, संस्कृती या सगळ्यांच्या बाबतीत प्रचंड वैविध्य आहे. ‘राष्ट्रया युरोपात जन्मलेल्या संकल्पनेच्या कोणत्याही व्याख्येत भारत देश बसत नाही. नुसत्या आकाराचा विचार केला तरी एका राजधानीतल्या केंद्रामधून संपूर्ण देशाचा कारभार चालवणं अशक्य आहे. आणि कारभाराला सोयीचं व्हावं म्हणून प्रांत पाडायचे तर ते प्रांत भाषावार करणं अपरिहार्य ठरतं. कारणहा आपला देश आहे,’ असं वाटण्यासाठी देशाचा कारभार नागरिकांना परिचित असलेल्या भाषेत चालणं आवश्यक आहे.

अनेक राज्यांमध्ये विभागलेला एक देश, या दृष्टीने भारत यूएसच्या जवळ जातो. पण तिथलं भाषावैविध्य भारताइतकं नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचा फरक असा, की अगोदर राज्य, नंतर देश; असं जे यूएसमध्ये झालं तसं भारतात मुळीच झालं नाही. सर्व देशातले लोक एकदिलाने स्वातंत्र्यासाठी लढले आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्यं तयार झाली. (याला काश्मीरसारखा अपवाद आहे; पण ते वेगळंच प्रकरण आहे.)

आता आपण आपल्या प्रश्नाकडे परतूया.

संसदीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्य म्हणजे संसदेत विविध हितसंबंधांचे प्रतिनिधी एकत्र येतात आणि आपापल्या हितसंबंधांचा पाठपुरावा करताना आपोआप एक प्रकारचं संतुलन निर्माण करतात. हे संतुलन कधीच स्थिर नसतं, गतिमान असतं. पण त्या गतिमानतेत आपल्याला हव्या त्या दिशेने ते नेण्याची आशा, आकांक्षा सर्व हितसंबंधांना बाळगता येते. देशभरातून संसदेत जाणाऱ्या प्रतिनिधींमध्ये आपलाही प्रतिनिधी हवा, ही इच्छा मतदानातून निवड करणाऱ्या लोकशाही पद्धतीत मतदार गटांच्या मनी यथावकाश जागते.

 हे गट एकमेकांपासून सर्व बाबतीत वेगळे, अलिप्त नसतात. उदाहरणार्थ, भाषिक अस्मितेच्या मुद्यावर एका प्रांतातले विविध हितसंबंध एकत्र येऊ शकतात. मराठी लोकांचं मराठी राज्य स्थापन झालं की त्या भाषिक समावेशक गटाचं अंशत: समाधान होतं. एका मर्यादेपर्यंत आपल्या हितसंबंधांचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्थानिक, तुलनेने आपल्या आवाक्यातील अशी एक जागा तयार झालेली असते. मग त्या हितसंबंधांमधले संघर्ष राज्य पातळीवर राहून देशाच्या एकसंधतेला बाधा पोचत नाही.

संसदीय लोकशाहीच्या जागी दुसऱ्या व्यवस्थेचा विचार करताना सर्वात मोठी अडचण भाषा, वर्ण, परंपरा, वगैरे अस्मिता घडवणाऱ्या घटकांमधल्या प्रचंड वैविध्याची होते. देशात, केंद्रस्थानी संसद नाही; त्या ऐवजी समजा, देशभरच्या मतदारांनी निवडून दिलेला अध्यक्ष आहे आणि त्याच वेळी राज्यांमध्ये मात्र केंद्रीय संसदेच्याच प्रतिमा म्हणाव्यात अशा विधानसभा आहेत, ही स्थिती अगदीच विसंगत ठरते. देशाची सत्ता एका हाती ठेवणाऱ्या अध्यक्षपदाला खोडून काढणारी ठरते. म्हणजे राज्याचा कारभारसुद्धा केंद्रातल्या अध्यक्षाने नेमलेल्या राज्यपालांद्वारे होण्याची पद्धत असायला हवी. संसदीय पद्धती नको, तर ती जशी केंद्रात नको, तशीच राज्यांमध्येदेखील नकोच, ही सुसंगती स्वीकारावी लागते.

आज राज्याराज्यांमध्ये राज्यपाल आहेत आणि त्यांची नेमणूक राष्ट्रपती केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा सल्ला स्वीकारून करत असतात. अपेक्षा अशी असते की जसं राष्ट्रपती हे पद नामधारी आहे; त्या पदावरील व्यक्ती पंतप्रधानाच्या, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांविरुद्ध जाऊ शकत नाही; अगदी तसंच स्थान राज्यपालाचं असेल. संसदीय लोकशाहीच्या जागी केंद्रीय अध्यक्षाला ठेवलं की आपोआप त्या अध्यक्षाने नेमलेला राज्यपाल अध्यक्षाच्या मर्जीने, अध्यक्षाच्या निर्देशांना अनुसरत राज्याचा कारभार चालवणार. त्यासाठी तो मंत्रिमंडळ तयार करू शकेल; नव्हे वेगवेगळी खाती सांभाळण्यासाठी मंत्रिमंडळाची गरज लागेलच; पण हे मंत्री लोकांनी निवडून दिलेले नसतील. राज्यपालाने, म्हणजेच अध्यक्षाने नेमलेले असतील.

असं असेल तर देशभरात राज्यपातळीवरच्या विविध हितसंबंधांमधल्या संघर्षांची, ओढाताणीची, बदलत्या संतुलनाची खबर केंद्रीय सत्तेला पुरेशा प्रमाणात पोचणं कठीण होईल. राज्यातल्या विधानमंडळात वा संसदेत आवाज उठवण्याचा पर्याय नसेल तर जागोजागचा असंतोष धुमसत राहील. त्यातला कोणता असंतोष खरा, लोकभावना व्यक्त करणारा आणि कोणता डावपेच म्हणून रचलेला, हे कळणं कठीण होईल.

अशा स्थितीत असंतोष निर्माण करणं हेच सुलभ झालं असतं. मात्र हितसंबंध रेटण्याच्या राजकारणापेक्षा असंतोषाचा चिथावणी देणारं राजकारण देशाच्या एकतेला, सगळ्याच नागरिकांच्या हिताला बाधक असतं.

मग यूएसमध्ये असं अध्यक्षाबरोबर सीनेट आणि हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, तशी रचना सोयीची झाली असती का? याबाबतही शंका आहे. मुळात यूएसमध्ये अध्यक्ष सर्वसत्ताधीश होण्याचा धोका जाणवून घटनेत अध्यक्षाच्या सत्तावापरावर अनेक बंधनं घालण्यात आली आहेत. तरीही हा धोका टळत नाही. इतिहासाकडे न वळता वर्तमानाचं उदाहरण घ्यायचं तर सोशल मीडियाद्वारे थेट जनतेशी संपर्क साधत विद्यमान अध्यक्ष अमेरिकन काँग्रेसवर दबाव आणतच असतात. याचबरोबर लोकेच्छेला धुडकावण्याची शक्यतादेखील अध्यक्षीय पद्धतीत जास्त असते. एका माणसापाशी सत्ता केंद्रित झाली की त्याने स्वत:च्या मर्जीनुसार निर्णय घेण्याची शक्यता शेकडो प्रतिनिधींच्या संसदेतून अन्याय्य निर्णय होण्यापेक्षा कितीतरी जास्त असते. जर्मनीमध्ये या संदर्भात कडक नियम करण्यात आले आहेत. कारण जर्मनीने एकचालकानुवर्ती सत्तेतून झालेल्या भयानक संहाराचा अनुभव घेतला आहे.

या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघता येईल. सर्व देशात लोकप्रिय असलेल्या, सर्वांना ज्याच्याविषयी विश्वास वाटतो, अशा व्यक्तीच्या हाती सत्ता सोपवण्यास देशभरची जनता तयार होऊ शकते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे असं व्यक्तिमत्व होतं. गांधी आणि पटेल यांच्यानंतर लोकमान्यतेत नेहरूंच्या जवळ येईल असा नेता राज्यकर्त्या काँग्रेस पक्षात वा विरोधी पक्षांमध्ये उरला नव्हता. संसदीय लोकशाही गुंडाळून अध्यक्ष होणं नेहरूंना शक्य होतं. पण मग नेहरूंच्या मनाविरुद्ध असलेला भाषावार प्रांतरचनेचा निर्णय झाला असता का? तो निर्णय घेण्यासाठी विलंब झाला असता, तर काय झालं असतं? संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं काय झालं असतं? नेहरू अध्यक्ष झाले नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. आणि स्वातंत्र्याची चळवळ चालवणाऱ्या नेतृत्वाचा संस्कार. नेहरूंच्या या वागण्यावरून असंही म्हणता येतं की घटना समितीच्याच निर्णयाने समजा नेहरू अध्यक्ष झाले असते, तरी त्यांनी आततायी निर्णय घेतले नसते.

याचा अर्थ असा की देशाचं हित सांभाळण्यासाठी एका माणसाच्या चांगुलपणावर विसंबावं लागलं असतं. ही शाश्वती नेहरूंच्या नंतर सत्ता धारण करणाऱ्यांबाबत देता आली नसती. आणि व्यक्तीच्या चांगुलपणावर विसंबण्यालाव्यवस्थाम्हणत नाहीत.

भारतासारख्या सांस्कृतिक ते आर्थिक बाबतीत विषमता आणि वैविध्य असलेल्या देशात देशभरच्या जनतेचे सर्व हितसंबंध सारखे असू शकत नाहीत. पाणीवाटपासारख्या विषयाप्रमाणे कित्येकदा ते परस्परांना छेद देणारे असतात. परस्परविरोधी हितसंबंध असलेले अनेक लोक जेव्हा एकत्र येऊन निर्णय घेतात, तेव्हा एकेकाचे स्वार्थ एकमेकांना छेद देतात आणि सर्व मिळून जास्तीत जास्त संख्येचं जास्तीत जास्त हित सांभाळलं जाण्याची शक्यता वाढते. संसदीय पद्धतीत भ्रष्टाचार असतोच पण त्यासाठी अनेकानेक सत्ताकेंद्रांशी संपर्क ठेवणं भाग पडतं. भ्रष्टाचार तेवढाच जास्त गुंतागुंतीचा होत जातो. अवघड बनतो.

हा झाला व्यवहारातला भ्रष्टाचार. यापेक्षा भयंकर स्थिती धोरणात्मक भ्रष्टाचार, ही आहे. व्यवहारातल्या भ्रष्टाचाराला उघड करून दोषी असलेल्यांना शिक्षा करता येते. जेव्हा शासकीय धोरणच भ्रष्ट होतं आणि लोकहिताऐवजी जवळच्या मोजक्या लोकांच्या फायद्याचे निर्णय होऊ लागतात, तेव्हा त्या भ्रष्टाचाराला कायद्याच्या पकडीत धरताही येत नाही. आणि जेव्हा निर्णय अनेक जागी न होता एकहाती होत असतात, तेव्हा धोरणात्मक भ्रष्टाचार आपोआपच सुलभ होतो. अध्यक्षीय पद्धतीतला हा मोठा धोका आहे.

हा धोका सगळ्याच देशांना जाणवतो. भारतात तो विशेष आहे, कारण भारतातल्या सर्वसाधारण जनमानसात मतदान करून राज्यकर्त्यांना निवडून देण्याचं मूल्य तरी रुजलं असलं तरी संसदीय लोकशाही मुरलेली नाही. अजूनही भारतीयांनातारणहारहवा असतो. कुणीतरी एक अवतार येईल आणि आपल्याला संकटातून बाहेर काढेल, असा अंधविश्वास भारतीयांच्या मनी वसत असतो. आणि अमुक नेता नको असेल, तर दुसरं कोण आहे?’ हा प्रश्न म्हणजे या अंधविश्वासाचं सुशिक्षित रूप आहे. कारण देश आपण चालवतो, आपण आपल्या लोकनियुक्त प्रतिनिधीच्या माध्यमातून देशाच्या धोरणांना दिशा देऊ शकतो, हा उजेड फारच कमी लोकांच्या मनी पडलेला आहे.

म्हणजे एका अर्थी भारतीय जनमानस अध्यक्षीय पद्धतीलाच मिळतंजुळतं आहे! संसदीय लोकशाही, ही त्या जनमानसासाठीविकृतीआहे. सर्व निर्णयांची जबाबदारी एका तारणहारावर सोडून आपण स्वस्थ रहावं, हा विचार धड लोकशाहीला पूरकही नाही! भारतातल्या बहुसंख्य सुशिक्षित-अशिक्षित जनतेला हुकूमशहालाच निवडून द्यायचं आहे. इथे संसदीय लोकशाही स्थापन करून घटनाकारांनी एका बाजूने लोकभावनेला अव्हेरलं आणि दुसरीकडून एकाधिकारशाहीमधून निरपवादपणे जन्माला येणाऱ्या भ्रष्टाचाराला थोपवून धरलं. भारतात जर संसदीय लोकशाही नसती, तर या देशाचे अंतर्गत असंतोषामुळे तुकडे झाले असते. आणि जर फेक बातम्या, खोटा प्रचार, सोशल मीडियाच्या आधारे एका बाजूने व्यक्तिपूजन आणि दुसरीकडून चारित्र्यहनन करून, कायद्याच्या दुरुपयोगातून असंतोषाला आवर घालून, काल्पनिक देशद्रोह्यांचा बागुलबुवा उभा करून या सगळ्यांच्या नशेत नागरिकांना गुंग करून देश एक ठेवणं शक्य झालं असतं; तर एव्हाना ज्याला बनाना रिपब्लिक म्हणतात, तसली मूठभरांचं हित सांभाळणारी भ्रष्ट राजवट इथे केव्हाच राज्य करू लागली असती.

निवडणुकीचं राजकारण करताना सामान्यांवर दबाव आणण्यासाठी भारतात सुरुवातीला राजकारण्यांनी गुंडांना हाताशी धरलं, मग गुंडांनी राजकारण्यांना हाताशी धरलं आणि आता गुंडच राजकारणी होऊ लागले आहेत. ही प्रक्रिया अध्यक्षीय पद्धतीत अधिक वेगवान झाली असती. आणि उद्या जर भारतात अध्यक्षीय लोकशाही येणार असेल, तर तिच्यापाठोपाठ धोरणात्मक भ्रष्टाचारही येईल. निवडून आलेल्याने हुकूमशहासारखे अधिकार वापरावेत, ही जर लोकांची इच्छा असेल; तर निवडून आलेल्यांना तसं वाटणं सहाजिक आहे. परिणामी सरकारला विरोध म्हणजे देशद्रोह या स्वरूपाच्या धारणा प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही. संसदीय लोकशाहीचा संकोच जसजसा होत जाईलम्हणजेच अध्यक्षीय पद्धतीच्या दिशेने कारभार सरकू लागेलतसतसे विरोध, नापसंती, वेगळं मत व्यक्त करण्याचे अधिकार संकोचत जातील. या सुरुवातीच्या लक्षणांनंतर आकाराने, लोकसंख्येने मोठ्या आणि प्रचंड वैविध्य असलेल्या या देशात अध्यक्षीय पद्धतीमधले मोठे दोषही दिसू लागतील.

 

या विषयाची मांडणी देशातल्या सद्यस्थितीमधून न करताजर ... तरया, एक प्रकारे तात्त्विक स्वरूपात केली आहे. यातील तत्त्व प्रत्यक्षात येतं, येत नाही; याची प्रचिती भविष्यावर सोडली आहे. पुन्हा बाहेर नजर टाकायची तर - इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ही संस्था जगभरातल्या एकूण १६५ देशांच्या राज्यव्यवस्थांमधल्या लोकशाहीचं मूल्यमापन करते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया व विचारवैविध्य, शासनाचा कारभार, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती आणि नागरिकांचे हक्क हे निकष वापरते. २०१९ साली भारताचा नंबर ४१वरून घसरून ५१ झाला. नागरिकांच्या हक्कांचा ऱ्हास, हे या घसरणीचं प्रमुख कारण होय, असं ही संस्था म्हणते. सार्वजनिक जीवनामधील भ्रष्टाचाराबाबत एकूण १८० देशांमध्ये २०१९ साली भारताचा नंबर ८०वा लागला. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाही धोक्यात येते, असं निरीक्षण भ्रष्टाचाराचं मूल्यमापन करणाऱ्या ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने नोंदवलं आहे.

असो.


 


Wednesday, April 14, 2021

चित्रपट महोत्सव आणि सामाजिकता

 

सगळ्या चित्रपटांचा मिळून घेतलेला हा आढावा. कधी कधी काहीतरी वेगळं, ज्यादा मिळून जातं, म्हणून.

शीर्षकातीलसामाजिकताया शब्दाबाबत थोडा खुलासा. तिथेसामाजिक जाणीवहा शब्दप्रयोग चालणार नाही, कारणसामाजिक जाणीवयाचा अर्थ समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव, असा होतो. तिथे नुसतंसमाजअसं म्हणता येत नाही कारणसमाजही संज्ञा वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते. विनासंदर्भ ते गोलमाल होईल. ‘समाजया अस्तित्वाविषयी सजगता, हा अर्थ व्यक्त करण्यासाठीसामाजिकताअसा प्रयोग करण्यात आला आहे.

चित्रपटामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये सामाजिक जाणीव कितपत असावी; कलेने व्यक्तिवादी, सौंदर्यवादी असावं की नसावं, हा वाद न संपणारा आहे. पण चित्रपटासारख्या अनेकांगी कलामाध्यमातून समाज कसा व्यक्त होतो आणि त्यातून त्या समाजाविषयीचित्रपटाच्या विषयाबाहेर जाऊनकाय अंदाज करता येतो, हा भाग रहातोच. त्या दृष्टिकोनातून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहायला मिळालेल्या चित्रपटांकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे.

हा फेस्टिवल नुकताच पार पडला. मला त्याचा ऑनलाइन विभाग पहायला मिळाला. एकूण २६चित्रपटांपैकी मी २२ बघितले. प्रत्येकाविषयी स्वतंत्रपणे लिहून झालं. सगळ्यांचा मिळून विचार करताना काही वेगळ्या गोष्टी सुचतात. उदाहरणार्थ, हॉलिवुडचा एकही चित्रपट नव्हता. पण यात आश्चर्य नाही. ‘फेस्टिवलचा सिनेमाअशी जी ओळख आहे, तिचं व्यावच्छेदक लक्षणकेवळ व्यवसाय म्हणून न काढलेला सिनेमाअसं आहे आणि हॉलिवुड व्यावसायिक आहे. हॉलिवुडचा सिनेमा वाईट असतो, सर्वसामान्य असतो, प्रेक्षकांच्या किमान पातळीवरच्या अभिरुचीला आवाहन करणारा असतो, असं मानण्याचं कारण नाही; पण तो व्यावसायिक असतो आणि व्यवसायाच्या आड येतील अशा गोष्टी तो टाळतो, यात शंका नाही. त्या गोष्टी कोणत्या या तपशिलांत न जाता आपण उलट म्हणू शकतो की अशा गोष्टी मुद्दाम न टाळणारा सिनेमा फेस्टिवलमध्ये बघायला मिळतो. किंबहुना, हेच असल्या फेस्टिवलचं आकर्षण होय.

यात भारतीय चित्रपटही नाही. गोष्ट अशी आहे, की समजा यात एखादा भारतीयकोणत्याही भाषेतलाअसता, तरी मी तो बहुधा टाळला असता. कारण भारतीय चित्रपट बघण्याची संधी एरवी मिळू शकते; त्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावण्याचं कारण नाही. तिथे असेच चित्रपट बघावेत, जे एरवी सहजासहजी समोर येणार नाहीत. चित्रपटातले दर्दी किंवा या कलामाध्यमाचे अभ्यासक जगभरचे चांगले चित्रपट शोधून मिळवतात आणि बघतात. मी त्यांपैकी नाही. मी अशा दर्दी लोकांनी निवडलेले चित्रपट बघतो. वेगळ्या शब्दांत, फेस्टिवलला जातो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियासाठी गोव्याला गेलो होतो; हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयता घरबसल्या बघायला मिळाला.

या २२ चित्रपटांपैकी नऊ चित्रपट पश्चिम युरोपातले तर पाच पूर्व युरोपातले आहेत. ‘युरोपातले तेरा (एक दोन्हीकडे घडतो, त्यामुळे दोन्हीकडे मोजण्यात आला आहे) चित्रपटअसं म्हणू नये कारण पश्चिम युरोप आणि पूर्व युरोप सामाजिकदृष्ट्या एकमेकांपासून वेगळे आहेत. हा वेगळेपणा त्यांच्या चित्रपटांतल्या तपशिलांमध्ये, सामाजिक पार्श्वभूमीत उमटतो. किमान, तो तसा उमटावा, अशी अपेक्षा असते. एकच तपशील या दोन ठिकाणी एकच अर्थ व्यक्त करेल, असं नाही. बावीसांपैकी एक चित्रपटआय नेव्हर क्रायपोलंड आणि आयर्लंड, असा दोन ठिकाणी, म्हणजे पूर्व आणि पश्चिम युरोपात घडतो. या दोन देशांमधला फरक तिथे आपोआपच स्पष्ट होतो. पूर्व युरोपातल्या पोलंडमधली गरीब मुलगी गाडी घेण्याची आकांक्षा बाळगून असते. पण ते सहजसाध्य नसतं. आयर्लंडला गेलेल्या तिच्या बापाने पैसे पाठवण्यावर ते अवलंबून असतं. तो तिथे मजूर म्हणून काम करत असतो; कारण तिथे मजुरी पोलंडपेक्षा जास्त असते आणि मजुरी देणारं कामही असतं. पण आयर्लंडमध्ये वस्तू महागही असतात! ती तिथे जाते तेव्हा तिला तिथे सिगारेट परवडत नाही.

हे कळणं काही कठीण नाही. ते दोन देश तरी आहेत; आपल्या इथे यूपी-बिहारमधून लोक मुंबईला येतात, त्यांची स्थिती नेमकी अशीच तर असते.

आणखी एक गोष्ट. आयर्लंडमध्ये अपघात होऊन बाप मरतो. त्याचं शव घरी आणून त्यावर योग्य ते अंत्यसंस्कार करणं आईला अपरिहार्य वाटतं. त्यासाठी बापाने मुलीच्या गाडीसाठी जमवलेले पैसे खर्च करावेत, असा तिचा आग्रह असतो. बापाने मुलीची गाडी घेण्याची हौस पुरवण्यासाठी मजुरीतून पैसे बाजूला काढावेत, मृत पतीवर प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची प्रबळ इच्छा पत्नीने धरावी, हे तपशील पश्चिम युरोपपेक्षाआपल्यालाजास्त जवळचे वाटतात! सहज कळतात, मान्य होतात.

ही मुलगी सतरा-अठरा वर्षांची आहे. आयुष्यात प्रथमच ती परदेशी जाते आहे. तिच्यावर ओढवणाऱ्या विविध अडचणी, हा चित्रपटाचा प्राथमिक विषय आहे. अशा वेळी तिच्यावर ओढवणाऱ्या कठीण प्रसंगांमध्ये तिच्या अब्रूवर घाला पडणे, या संकटाचा समावेश असायला हवा. तो नाही. मात्र, हे एकूण युरोपच्या सुसंस्कृतपणाशी संबंधित असावं. ‘क्वीनया हिंदी चित्रपटातली नायिका जेव्हा एकटीच (आणि प्रथमच) परदेशी, म्हणजे युरोपात, म्हणजेच पश्चिम युरोपात, जाते; तेव्हा तिच्यावरही असला बांका प्रसंग ओढवत नाही!

पश्चिम युरोपातल्या चित्रपटांतब्लू आइज अँड कलरफुल माय ड्रेसही बल्गेरियन-जर्मन डॉक्युमेंटरी येते. एका दोन-तीन वर्षांच्या मुलीचं बागेत, इमारतींच्या आवारात, फूटपाथवर हिंडणं त्यात टिपलं आहे. यालाव्हॉइस ओव्हरनाही. म्हणजे दृश्याच्या मागे काही खुलासा करणारा आवाज नाही. कॅमेऱ्यासमोर जे घडतं, तेवढं दाखवलं आहे. त्यातून निरागसता व्यक्त तर होतेच; त्याबरोबर वातावरणातली शांतता आणि सुरक्षितता यांचीसुद्धा जाणीव होते. ही मुलगी एकटी आहे. ती बहुतेकदा विविध वयाच्या बालकांशीच बोलते; पण क्वचित प्रौढांशीही तिचा संबंध येतो. कुठेही कसल्याही धोक्याची चाहूल येत नाही. बल्गेरियन शहरी समाजात असं निवांत वातावरण आहे, असा निष्कर्ष काढावा का?

अ फिश स्विमिंग अपसाइड डाउनया चित्रपटाची कथा एका कुटुंबात घडते, असं म्हणण्यापेक्षा एका घरात घडते, असं म्हटलं तर जास्त बरोबर होईल. बाप आणि मुलगा यांच्यात संवाद नाहीच, असं म्हणता येत नसलं तरी प्रत्येकाचं वर्तन कौटुंबिक नातेसंबंधांकडे डोळेझाक करूनच होत असतं. पुन्हा, यात पश्चिम युरोपमधल्या समृद्ध, व्यक्तिकेंद्रित समाजाचं प्रतिबिंब आहे, असं म्हणता येईल का? यातली नायिका तर उन्मुक्त जगणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण भासते. तिच्या प्रतिसादांमध्ये (क्षणिक वा स्थायी) मोह, आकर्षण यांचा प्रभाव असण्यापेक्षाकाय केलेलं चालतं आणि काय चालत नाहीयाविषयीची बेफिकिरीच अधिक असल्यासारखी वाटते. वेगळ्या शब्दांमध्ये म्हणायचं, तर सामाजिकतेचा अभाव दिसून येतो.

रोलां रेबेर्स कॅबरे ऑफ डेथहा जर्मन चित्रपट तर सरळ सरळ समाजात, विशेषत: बायकांच्यात दिसून येणाऱ्या तारुण्याच्या ओढीवर, आपल्याकडे लोकांचं लक्ष जात रहावं, या इच्छेवर तिरकस नजर टाकतो. हे सगळे लोक पैशाने मोठे असतात, कलावंत असतात किंवा कलेविषयी आत्मियता बाळगून असतात, वगैरे. हा चित्रपट कुण्या एकाची कहाणी नाही. तो माणसांच्या अनेक तऱ्हा न्याहाळतो. म्हणजे तो आगळ्या स्वभावाच्या मोजक्या व्यक्तींची गोष्ट सांगत नाही. कोणत्या अपवादात्मक घटनांमुळे त्यांच्यावर एखादी कृती लादली जाते, असंही वाटत नाही. हा चित्रपट जर त्या समाजाचं प्रातिनिधिक चित्र समोर आणतो, असं मानलं; तर तिथे विषमता किंवा गरिबीपेक्षा समृद्धीमागोमाग येणाऱ्या मानसिक समस्या जास्त मोठ्या दिसू लागल्या आहेत, असं म्हणावं का?

फोर्ट्रेसहा इटालियन चित्रपट पूर्णपणे तुरुंगात घडतो आणि त्यातले सगळे कलावंत तुरुंगाचे रहिवासी आहेत. विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये गणना केल्या जाणाऱ्या लेखनकृतीवर हा आधारलेला आहे. यातही तुरुंगाची, तुरुंगातील एका कैद्याची वा काही कैद्यांची कहाणी नाही. हा तुरुंग म्हणजे वाळवंटालगतचा एक किल्ला आहे. होऊ घातलेल्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी सदैव सज्ज असलेला. मात्र ते आक्रमण कधीच होणार नाही, याची जाणीव प्रत्येकाला आहे. ज्या संभाव्य घटनेशी इथलं अस्तित्व आणि इथल्या जगण्याचे तपशील जोडलेले आहेत, ती घटना कधीच घडणार नाही आहे; हे अगदीच अस्तिववादी झालं. इथे काही घडत नाही आणि तरीही ही जागा इथे आलेल्याला धरून ठेवते, ही त्याच्याही पुढची पायरी. यातून एकूण मानवी मनावर काही प्रकाश पडत असेल; पण यात भूगोलात वसलेली सामाजिकता नाही. म्हणजे पुन्हा तेच. यात समाजाअंतर्गत ताणतणाव नाहीत.

टेल्स फ्रॉम द लॉकडाउनमध्ये स्पेनमध्ये लॉकडाउनच्या काळात घडणाऱ्या काही घटनांचं चित्रण आहे. त्यात हिंसेचे विविध पैलू बघायला मिळतात. लॉकडाउनमुळे समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींवर कसे वेगवेगळे पेचप्रसंग ओढवले, हे दिसतं; पण व्यक्ती व्यक्तीच रहातात, त्यांच्यामधूनसमाजव्यक्त होत नाही. एकेका कहाणीत जे घडतं, त्याला त्या कहाणीतल्या पात्रांच्या वर्तनाशी, कहाणीतल्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेशी थेट जोडता येतं. समाज असं करेल किंवा समाज असं करायला भाग पाडेल; यातलं काही म्हणता येईलसं वाटत नाही. कथानकाला पुढे ढकलण्याची क्रियासामाजिकनाही.

पश्चिम युरोपात असं दिसतं याचं कारण कदाचित तिथल्या सामाजिक उत्क्रांतीमध्ये असेल. माणसातले व्यक्तिगुण त्याच्या सामाजिक रूपाला झाकून टाकत असतील. प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, स्वतंत्र आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या इच्छेचा मान ठेवण्याची सहजप्रवृत्ती सगळ्यांच्यात बाणवणे हेच जर सुसंस्कृततेचं अंतिम श्रेय असेल, तर या समाजाने पुढचा पल्ला गाठला आहे, असं म्हणता येईल.

माय फादर्स स्टोरीजहा फ्रेंच चित्रपट या प्रतिपादनात बसतो आणि बसत नाही. तो बसतो, कारण इथलं प्रमुख पात्र नॉर्मल नाही. ते नॉर्मल नसण्यातूनच चित्रपटाला दिशा मिळाली आहे. ‘बसत नाही,’ असंही म्हणता येतं कारण चित्रणाचा भर त्या पात्राच्या विकृतीवर नाही तर त्या विकृतीमुळे इतर, सर्वसाधारण पात्रांच्या जगण्यावर काय प्रभाव पडतो, यावर आहे.  ही पात्रं मुख्यत: आहेत, त्याची बायको आणि त्याहीपेक्षा जास्त, त्याचा मुलगा. खटकणारी गोष्ट अशी की फ्रान्समधल्या कुटुंबातली ही स्त्री नवऱ्याचं विचित्र वर्तन सहन करते, समाजापासून त्याचा बचाव करते आणि मुलालासुद्धा तशीच शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. ती घटस्फोट घेत नाही, त्याला सोडून जात नाही! तिच्या या वागण्याचं समर्थन चित्रपट तिच्याच स्वभावातल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यावरून करताना दिसत नाही. मुलगा तर लहान आहे. आईवडील हे त्याच्या जगण्याचे, त्याच्या मूल्यचौकटीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. ती असं का करते, याला उत्तरपत्नीधर्मअसं सुचतं. कदाचित माझ्या नजरेतून काही महत्त्वाचं सुटलं असेल. पण उत्तर जर हे असेल, तर चित्रपटसामाजिकआहे, कारण पातिव्रत्य सामाजिक आहे, वैयक्तिक नाही.

हा चित्रपट काहीसा मागच्या, दुसरं महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात घडतो, असं म्हणून यातून सुटका करून घेता येईल: त्या काळात तिथली सामाजिक उत्क्रांती खालच्या पायरीवर होती!

लँड ऑफ द फरगॉटनहा आणखी एक इटालियन चित्रपट. हा १९५१ सालात घडतो. एका डोंगराळ भागातील गावाने अन्याय, पिळवणूक यांविरुद्ध दिलेला लढा, हा या चित्रपटाचा विषय. पण सामाजिक-वैयक्तिक मांडणी करण्याच्या ओढाताणीत तो ना धड इकडचा ना तिकडचा झाला आहे. समस्या सामाजिक आहे; पण तिची उकल सामाजिक कृतीतून होत नाही! आपल्या काही हिंदी आणि बऱ्याच दक्षिणी चित्रपटांतही शेवटी नायक (समाजावर अन्याय करणाऱ्या) खलनायकाला बेदम चोप देतो आणि सर्वत्र आनंदीआनंद होतो, असं असतं; पण ते इतकं बेगडी असतं कीआपल्या सामाजिक समस्या निरुत्तर करणाऱ्या आहेत,’ असाच जणू निष्कर्ष हे चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवत असतात. ‘लँड ऑफ द फरगॉटनचं तसं होत नाही. समाज की व्यक्ती, या दुविधेला चित्रपट भिडतच नाही, असं वाटतं. १९५१ सालात इटलीतल्या अत्यंत दुर्गम भागात रहाणारे खेडूत असले म्हणून काय झालं; त्यांना जर लिहिता वाचता येत असेल, तर गांधी माहीत हवेत, असं मात्र प्रकर्षाने वाटतं! मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला अशा नेत्यांना सामाजिक-राजकीय अन्यायविरोधी वाट शोधण्यासाठी गांधी उपयोगी पडले!

इंटू द डार्कनेसहा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डेन्मार्कमध्ये घडतो. त्यात युद्ध नाही कारण डेन्मार्कने जर्मनीसमोर शरणागती पत्करली होती. परंतु डेन्मार्क राष्ट्र किंवा डॅनिश लोक जर्मनीला, जर्मनांच्या युद्धखोरीला सामील झाले नव्हते. या चित्रपटाचा सगळा रोखसंघर्ष टाळून शरण गेलेल्या समाजामध्ये कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटतात,’ यावर आहे. हा समाज एकसंध नाही. जे ज्यू आहेत, त्यांचे प्राणच धोक्यात आहेत. तीच गत कम्युनिटांची आहे. स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी प्राणपणाने जर्मन वरचष्म्याला विरोध करण्यावाचून त्यांना इलाज नाही. त्यातही ज्यूंपेक्षा कम्युनिस्ट गनिमी संघर्षाला जास्त तयार आहेत. इतरांपैकी काही करियरिस्ट आहेत, काही भावनाप्रधान आहेत, काही बाणेदार आहेत, तर काही व्यवहारवादी आहेत. काही कर्तव्याच्या तागडीत हेलकावणारेदेखील आहेत. एकूण, समाजातल्या विविध प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत. मग याला सामाजिक चित्रण का म्हणू नये? परकी आक्रमकांसमोर एका समाजातील विविध विचारधारांचं काय झालं, या दृष्टीने पाहिलं, तर तसं म्हणायला हरकत नाही. पण इथे जरी एकेकाच्या वागण्यात फरक दिसत असला, तरी सगळा समाज एका बाह्य शत्रूशीप्रभावाशी दोन हात करतो आहे. स्वत:च्या गतीने चालणाऱ्या समाजातील ताणतणाव, संघर्ष, तडजोडी यांचं स्वरूप वेगळं असतं. म्हणजे, शक्तिमान शत्रूशी जळवून घेणारा शत्रू नसताना नेमस्त असेल का? शत्रूला पूर्णपणे सामील होणारा एरवी राष्ट्रद्रोही होईल का? भावनेच्या आहारी जाऊन अतिरेकी कृती करणारा शांततेच्या वातावरणात कृतिशील असेल का? या प्रश्नांना निश्चित उत्तरं देता येत नाहीत. तरी या चित्रपटाला सामाजिकतेतून बाद करता येत नाही. चुकलेल्या मुलाला वाचवण्याचा आटापिटा करणारा बाप कौटुंबिक मूल्यंच दाखवतो.

त्याहीपेक्षा जास्त साक्षात्कारी संवाद चित्रपटात आहे. उद्योजक नवरा जर्मनांच्या अरेरावीसमोर नमतं घेतो, हे पाहून त्याची बायको नाराजी व्यक्त करते. तेव्हा तो उत्तरतो, तुझ्या बापाप्रमाणे माझी संपत्ती वडिलोपार्जित नाही! या उत्तराला अनेक फाटे फुटू शकतात. स्वकष्टार्जित संपत्तीपेक्षा वडिलोपार्जित संपत्तीवर पाणी सोडणं तुलनेने सोपं असतं, हा एक विचार झाला. स्वत:च्या कमाईशी असते तशी बांधिलकी नसण्यातूनराष्ट्रासाठी त्यागकरण्याकडे तो जास्त सहज प्रवृत्त होऊ शकतो. विशेषाधिकारांची सवय हाडात मुरल्यामुळे विशेषाधिकार गमावण्याचा सुप्त संबंध राष्ट्राने स्वातंत्र्य गमावण्याशी लागून या सुप्त उद्देशाने केलेली कृती स्वत:च्याच बाह्य मनात त्या उद्देशाला जोडली जाऊ शकते! जन्मापासून सुबत्ता उपभोगणाऱ्याला सुबत्तेवर आपला निसर्गदत्त आणि अपरिवर्तनीय अधिकार आहे, असं वाटायला लागून त्याच्या वागण्यात सबुरीचं प्रमाण कमी होऊ शकतं.

खूप जास्त पैलू समोर आणण्याच्या प्रयत्नात हा चित्रपट थोडा लांबला आहे. त्याचा शेवटही सोडून दिल्यासारखा वाटतो. ‘अखंड चाललेल्या जीवनाचा एक तुकडाअसं जरी चित्रपटाच्या सादरीकरणाला म्हटलं, तरी कुठेतरी काहीतरी सुरू झालं आणि तसंच कुठेतरी ते संपलं, असं तर गोष्टीचं व्हायलाच पाहिजे! आणि चित्रपट म्हणजे वेगळ्या माध्यमातून सांगितलेली गोष्टच होय.

आता पूर्व युरोपकडे जाऊ. तिथले सर्वच चित्रपटसामाजिक वळणाचे होते, असं म्हणता येत नाही; पण तिथल्या व्यक्तिगत समस्या वेगळ्या असलेल्या दिसतात. त्याला भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक कारणं आहेत. उदाहरणार्थ, ‘द लॉयरया चित्रपटात सामाजिक समस्या हा विषय नाही. हा चित्रपट बल्गेरिया आणि सर्बिया या दोन देशांत घडतो; मात्र त्यात दोन्हीकडल्या राष्ट्रपातळीवरच्या घडामोडींचं चित्रण नाही. पश्चिम आशियातील अस्वस्थ परिस्थितीमुळे बाहेर पडलेले निवार्सित पूर्व युरोपात तुलनेने जास्त आले, याचा मात्र चित्रपटातील समस्येशी थेट संबंध आहे. म्हणजे हा चित्रपट युरोपच्या पश्चिमी संस्कृतीकडे झुकलेला आहे, असं म्हणता येईल.

इथे एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. सांस्कृतिक, सामाजिक या विशेषणांनी युक्त असलेली स्थिती भौतिकविज्ञानाप्रमाणे सुस्पष्ट सीमारेषा असलेली नसते. ज्याप्रमाणे अर्थशास्त्रातल्या नियमालास्टेटमेंट ऑफ टेण्डन्सीजम्हणतात, तसंच.  पूर्व युरोप आरि पश्चिम युरोप यांच्यातला फरक असाच आहे. एकीकडे कुटुंबसंस्था आहे आणि दुसरीकडे ती लयास गेली आहे, अशी मांडणी इथे नाही. कुटुंबसंस्थेचं प्राबल्य हा मुद्दा मात्र नक्की आहे.

स्टिचेसहा सर्बियन चित्रपट एका व्यक्तीचा, जन्मत:च बाळापासून तुटलेल्या आणि १८ वर्षं त्याला शोधण्याचा ध्यास शेवटपर्यंत न सोडलेल्या आईचा आहे. ती, तिचं कुटुंब, शेजारी, परिचित यांचं दर्शन घडत असताना इथे कौटुंबिक, सामाजिक बंध जास्त घट्ट आहेत, हे जाणवल्याविना रहात नाही; जरीआय नेव्हर क्रायप्रमाणे तारुण्य बंडखोरच असलं, तरी! सुरुवातीलाच ती मुलाच्या वाढदिवसाचा केक बनवते! तिची टीनेजर मुलगी अर्थातच नाराज होते. तिच्या मते आई कधीच नसलेल्या भावात जास्त गुंतलेली आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करते आहे. या बाईचा नवरा तिच्याविषयी सहानुभूती बाळगून असला, तरी तो तिच्या दु:खात, तिच्या विकृत म्हणावं अशा ध्यासात सहभागी नसतोच. संपूर्ण चित्रपट या बाईच्या व्यक्तिरेखेभोवती उभा आहे आणि त्या नटीच्या अप्रतिम अभिनयामुळे ताठ उभा आहे.

एका परीने ही व्यक्तीची कहाणी आहे. पण चित्रपट संपल्यावर पडद्यावर सर्बियात जन्मल्यावर लगेच पळवून विकल्या गेलेल्या बाळांची संख्या दाखवली जाते आणि संपूर्ण चित्रपटाला सामाजिक अंग मिळून जातं!

क्वो वादिस, आयदा?’ या चित्रपटात बोस्नियाची परवड समोर येते. युगोस्लावियाचे तुकडे पडत असताना वेगळे झालेल्या  देशांमधल्या लोकांत परस्परांविषयी असलेला कमालीचा विद्वेष बाहेर आला आणि त्यातून अमानुष हिंसा घडली. यात तिथल्या इस्लामधर्मीय लोकांची तर सरसकट कत्तलच झाली. बोस्नियातल्या अशाच एका गावावर सर्बियन सैनिक कब्जा करतात आणि पुढे काय होतं, याची ही गोष्ट. यूनोच्या संरक्षणाखाली असूनही गावाला धोका टाळता येत नाही. या चित्रपटाने सामाजिक आणि वैयक्तिक यात तोल सांभाळला आहे, असं वरवर भासलं, तरी यातला वैयक्तिक भाग समाजात रुजलेल्या मूल्यांकडेच निर्देश करतो. आयदा ही शिक्षिका यूनोच्या लोकांसाठी दुभाष्याचं काम करत असते. परिणामी यूनोचे अधिकारी जिथे जातात, तिथे आयदा शेजारी असते. ते जे बोलतात, ते ती भाषांतर करून सांगते. परिणामी गावातल्या सगळ्या लोकांना आयदा हीच वशिल्याची, मदतीची जागा म्हणून दिसू लागते. यूनोच्या लोकांचं तर तिच्याविना चालतच नाही.

सर्ब सेनाधिकारी तोंडाने जरी काही म्हणत असला, तरी तो शेवटी सगळ्या बोस्नियन गावकऱ्यांची कत्तलच करणार आहे, याबद्दल गावात कोणालाही शंका नसते. त्यांना यूनोचा वरवर आधार वाटत असतो; पण तो किती पोकळ असतो, हे वेळ येताच दिसून येतं. जेव्हा शेवट जवळ येतो, भीषण भविष्य स्पष्ट होऊ लागतं, तेव्हा आयदा जिवाच्या आकांताने आपला नवरा आणि दोन मुलं यांना वाचवू बघते. अचानक सर्व गावाची आयदा केवळ तिच्या कुटुंबाची होऊन जाते. माकडीण आणि तिचं पिल्लू, या गोष्टीतली ही जणू शेवटून दुसरी पायरी.

यात कुटुंब आणि समाज, यात विरोध असल्यासारखं भासत असलं, तरी यामुळे चित्रपटाची सामाजिक भीषणता जास्त ठळकपणे पुढे येते. अमुक ठिकाणी इतकी माणसं मारली, ही आकडेवारी असते; पण त्या माणसांची नावं आणि त्यांचे फोटो यांच्यामुळे मृत्यूला चेहरा मिळतो. तसाच चेहरा मग क्रौर्यालाही मिळतो आणि त्या कृत्यामधली भीषणता प्रकर्षाने जाणवते. आयदाच्या गावावरचं संकट प्रेक्षकाला कळत असतं; पण आयदाच्या तडफडीमुळे त्यातली अमानुषता बाहेर येते.

चित्रपटाच्या शेवटी पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे आणि शाळेत लहान मुलं खेळत आहेत, असं दृश्य आहे. त्याचं प्रयोजन कळलं नाही. कारण त्यानंतर पडद्यावर त्या गावातले सगळे, म्हणजे काही हजार पुरुष गोळ्या घालून ठार करण्यात आले, असं शब्दांत येतं. बालकं खेळताहेत, वातावरण शांत आहे, हे चित्र फसवं असतं, त्याच्या आगेमागे अमानुष हिंसा असते, असं चित्रपट सांगू बघतो का?

इनहेल-एक्झहेलहा जॉर्जियन चित्रपट पुन्हा एका स्त्रीच्या एकटेपणाचा आहे. नवऱ्याचा गुन्हा स्वत:च्या डोक्यावर घेऊन ती तुरुंगात जाते पण त्याबद्दल तिला शून्य सहानुभूती मिळते. मुलीला काही माहीत नसतं, मुलगा अगदी लहान असल्यामुळे  ती परत आल्यावर तिला ओळखतच नाही, नवरा स्वत:च्या जगण्यात गर्क असतो आणि त्यात तिने बदल करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी तिलाच दटावतो. बाकीचे नातेवाईक तोंडदेखले असतात. बाहेर सोबत शोधण्याचे तिचे प्रयत्न विफल होतात.

हीसमाजाची गोष्टनव्हे. पण गोष्ट घडण्याचं माध्यम समाजाचा एक घटक, म्हणजे कुटुंब, हे आहे. तिला एक प्रकारे कौटुंबिकच आधार हवा असतो. तो मिळत नाही आणि ती निराश होते. ही नैराश्याची कथा आहे. या बाईच्या वाट्याला पहिल्यापासून दुरावाच येतो, हे जाणवत रहातं. तिच्या चेहऱ्यावर उदास भाव तर आहेतच; पण चित्रपटाचं वातावरण कधीही प्रसन्न, उत्साही भासत नाही. माणसं तशी नाहीत आणि परिसरही नाही. यातले प्रसंग एकाला एक जोडून न येता तुटक आल्यासारखे वाटतात; तिचं एकटेपण जराही विसरता येत नाही. चित्रणातून, वातावरणातून आशय पोहोचवण्याचे जे प्रकार जाणवतात, त्यावरून असं वाटतं, की जॉर्जिया हा एकेकाळच्या सोवियत युनियनचा भाग होता, यापलीकडे तिथल्या सामाजिक, सार्वजनिक जीवनाची कल्पना आपल्याला फारशी नाही; त्यामुळे काही संवेदनशील तपशील निसटून जात असावेत.

महोत्सवात जगाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपट यावे लागतात. इथे दक्षिण अमेरिकेचं प्रतिनिधित्व ब्राझीलने केलं आहे. दोन चित्रपट ब्राझीलमध्ये घडतात. मेक्सिकोला दक्षिणेत मोजलं तर टुवर्ड्स द बॅटलहा तिसरा चित्रपट. हा चित्रपट फ्रेंच माणसाबद्दल असला तरी तो मेक्सिकोत घडतो आणि फ्रेंच विरुद्ध मेक्सिकन युद्धाची पार्श्वभूमी त्याला आहे. फोटोग्राफरला होणाऱ्या ज्ञानाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटातही म्हटलं तर सांस्कृतिक कॉमेंट्स आहेत. उदाहरणार्थ, लढाईच्या शोधात भटकणाऱ्या फ्रेंच फोटोग्राफरला एक दृश्य दिसतं, ज्यात सैनिक खोटे खोटे मरून पडलेले असतात आणि फोटो काढून झाल्यावर उठून आपल्या कामाला लागतात. हे खोट्या लढाईचे फोटो काढणारा अमेरिकन असतो. या फ्रेंच फोटोग्राफरची कीर्ती त्याच्या कानी पडलेली असते आणि तो त्या फ्रेंचाचा सहाय्यक म्हणून काम करायला उतावीळ असतो. तसंच, लढाई चालू असताना एक बडा मेक्सिकन अधिकारी नागड्या बायकांच्या वेढ्यात, दारू बिरू पीत रंगलेला असतो. तसंच, हा फ्रेंच मनुष्य खड्ड्यात पडलेला असताना एक मेक्सिकन गावकरी त्याला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवतो; शत्रू मानून सोडून जात नाही. पण दुसरा गोरा मैत्री करतो आणि घोडा घेऊन पळून जातो! मुळात तरुण मुलगा मृत्यू पावल्याचं दु:ख विसरण्यासाठी पॅरिसमधल्या सुखासीन जगण्याला सोडून हा फ्रेंच पुरुष लढाईचे फोटो काढण्याच्या उद्देशानेच मेक्सिकोत येऊन हाल भोगत असतो. या सगळ्यातून १. फ्रेंच माणसाने दु:ख विसरण्यासाठी सुखासीन जगणं सोडून वेगळे फोटो काढायला मिळतील म्हणून भलतीकडे भटकणे, . अमेरिकन माणसाने खुशाल खोटेपणा करून व्यवसायाशी अप्रामाणिक होणे, . मेक्सिकन सेनाधिकाऱ्याने ऐन लढाईत ऐश करणे, . सामान्य मेक्सिकन माणसाने वैर, लढाई विसरून अपरिचित माणसाचे प्राण वाचवणे, . एका गोऱ्या माणसाने मैत्री दाखवून घोडा घेऊन पळून जाणे, या कृत्यांना फ्रेंच, अमेरिकन, मेक्सिकन स्वभाववैशिष्ट्यांच्या छाया मानावं की त्या त्या व्यक्तींचे स्वभावविशेष मानावेत?

ब्राझीलमध्ये घडणाऱ्या दोन चित्रपटांपैकी एक (ऑल द डेड वन्स) गुलामगिरी प्रथा नुकतीच बंद केली असतानाच्या काळात, म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घडतो. दुसरा वर्तमानातला आहे. गुलामगिरी बंद झाल्यावर गुलामांचे (एके काळचे) मालक आणि पूर्वाश्रमीचे गुलाम, दोघेही सैरभैर होतात. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची त्रेधा उडते. मुक्त गुलामांना स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यायचा कळत नाही. आर्थिक स्थैर्य आणि नव्याने मिळालेले अधिकार यांच्यात कधी कधी रस्सीखेच होते पण मुक्त गुलामांचा कल पोटाला थोडा चिमटा घेऊन स्वातंत्र्याच्या बाजूने जाण्याचा दिसतो. जे अगोदर गुलाम होते, त्यांच्याशीसभ्यवर्तन करण्याची धडपड गोरे मालक करतात; पण त्यांना स्वत:ची कामं कुठे नीट करता येत असतात? श्रद्धा, समजुती, सवयी, सोय यांच्या गडबडगुंड्याचं चित्रण इथे सर्रियल पातळीवर केलेलं आहे. खरं काय, अतिरेकी चित्रण कुठलं, भास कोणते आणि सरळ सरळ विकृती कोणती, यांची सरमिसळ होत रहाते.

या चित्रपटाकडे सामाजिक दृष्टीतून बघून चित्रपटाचं मूल्यमापन करणं, त्याचं स्थान ठरवणं हे प्रेक्षकाच्या निवडीवर आहे. जेव्हा व्यक्तीला समाजातील अमुक प्रवृत्तीचा प्रतिनिधी म्हणायचं असतं, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तऱ्हेवाईकपणा, विकृती, खटकणारी वैशिष्ट्यं या गोष्टी किमान स्तरावर ठेवाव्या लागतात. तसं नसेल, तर घडणाऱ्या घटनांची संगती सामाजिक अंगाने न लावता व्यक्तीच्या कृतीवरून लावणं शक्य होतं. हा चित्रपट म्हणूनचसोपानाही, एक सामाजिक शेरा, असं म्हणून त्याचं स्थान निश्चित करता येत नाही. त्यातल्या पात्रांना स्वत:चे, ठळक असे स्वभाव आहेत. त्यामुळे काही चमत्कारिक व्यक्तींचं अनपेक्षित स्थितीमधलं वर्तन,’ असंही त्याकडे बघता येतं. चित्रपट सादरीकरण एकाच वेळी अनेक पातळ्यांवर होऊ शकतं, हे चित्रपट माध्यमाचं सामर्थ्य या चित्रपटात अधोरेखित होतं.

वॅलेन्तिना हा दुसरा ब्राझीलियन चित्रपट सरळ आहे, त्यात अशी गुंतागुंत नाही. लिंगबदल केल्यामुळे समाजाच्या काही भागाकडून मिळणारी कडू वागणूक, हा या चित्रपटाचा विषय आहे. ही वागणूक चुकीची होय, असं यात अगोदरच ठरलेलं आहे. त्यामुळे सर्व सूज्ञ लोक त्या वागणुकीला विरोध करतात आणि विरोध करणारे आणखीही काही चुकीचं करत असतात. इतकंच काय, शेवटीउद्याची पिढी’, म्हणजे शाळेतले विद्यार्थी बहुसंख्येनेपुरोगामीबाजू घेतात. आपोआपच विरोध करणारे खलप्रवृत्तीचे ठरतात. म्हणजे हा चित्रपट प्रचारकी आहे. एका पुरोगामी भूमिकेचा तो प्रचार करतो. पण म्हणजेच तो तटस्थपणे सामाजिक स्थिती दाखवत नाही. लिंगबदल करून घेण्याला समाजाची वृत्ती सर्वसाधारणपणे विरोधी आहे, त्या वृत्तीत बदल घडवून आणायला हवा; असा, जास्त समंजस रोख चित्रपट ठेवत नाही. सुरुवातीपासून प्रेक्षक लिंगबदल केलेल्या मुलीवषयी सहानुभूती बाळगेल, अशाच दिशेने चित्रपटाची पटकथा रचलेली आहे. ती मुलगी पूर्ण मुलगी दिसते, हे तिच्या बाजूने कल होण्याचं आणखी एक मोठं कारण (जरी ही भूमिका करणारीनेसुद्धा लिंगबदल करून घेतलेला आहे) . समाजातला एक मोठा वर्ग लिंगबदलाच्या विरोधी असेल, तर चित्रपटातली मध्यवर्ती समस्या उभी रहाते. पण त्यासाठी त्या वर्गाच्या समजुती, श्रद्धा यांनाही काही जागा मिळायला हवी. ते इथे होत नाही.

तरी या चित्रपटातल्या दोन गोष्टी आवर्जून सांगण्यासारख्या आहेत. एक म्हणजे, ती मुलगी साध्या, निम्नवर्गीय घरातली आहे. तिच्या या क्रांतिकारक म्हणता येईल अशा निर्णयाने तिची आई उद्ध्वस्त तर होत नाहीच, ती खचूनही जात नाही. उलट, मुलीच्या मागे उभी रहाते. जे होईल, ते दोघी मिळून भोगू, असा खंबीर पवित्रा घेते. (बाप मात्र पळून जातो!)

चित्रपटाचं दुसरं वैशिष्ट्य अगदी शेवटी येतं जेव्हा वॅलेन्तिना तिच्यावर धावून जाणाऱ्याला बेडरपणे प्रश्न करते, ‘‘हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य मला आहे, याचा तुला इतका त्रास काय म्हणून होतो?’’

हा प्रश्न जरी एका परीने निरुत्तर करणारा असला, दुसऱ्याच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा अधिकार परंपरेच्या नावाने कसा बळकावला जातो, हे उघड करणारा असला; तरी समाज विरुद्ध व्यक्ती या मांडणीत समाजाला सोडून व्यक्तीच्या पारड्यात  वजन टाकण्यासाठी प्रेक्षकाला प्रवृत्त करण्यासाठी ही योजना आहे, असं म्हणता येईल.

उरलेल्या चित्रपटांमध्ये हायफा या इस्रायली शहरात घडणारा आणि इस्रायलींच्या बरोबर पॅलेस्टाइनी पात्रं असलेला चित्रपट आहे. कथा उच्चभ्रू लोकांमधली आहे. त्यांच्यातल्या नैतिकतेचा सैलपणा समोर येताना त्यांच्या जगण्यातल्या समस्यासुद्धा दिसतात; पण समस्यांपेक्षा त्यांच्या जगण्यातला पोकळपणाच जास्त जाणवतो. पैसेवाल्या पॅलेस्टाइनींचं इस्रायलमध्ये फार वाईट चाललेलं नाही, असं सुचवलं जातं. एकही पात्र खंबीरपणे नैतिक भूमिका घेत नाही. चौकट बदलली की नैतिकतेचे निकषही बदलताना दिसतात.

फनी बॉयची कथा श्रीलंकेत तमिळींची यादवी सुरू होण्याच्या काळात घडते. ही गोष्टदेखील श्रीमंतांचीच आहे. पण इथे वांशिक संघर्षात संपत्ती काम करत नाही, असा संदेश आहे. (मात्र, ‘तुमच्यापाशी पैशांचा विमा आहे, अशा आशयाचं विधान एकापेक्षा जास्त वेळा आहे!) यातलं एक विधान या चित्रपटाचंच नाही, तर संपूर्ण तमिळ-सिंहली भांडणाचंच मूळ जणू सांगून जातं. तमिळींच्या वर्तणुकीबद्दल एक सिंहली संतापाने म्हणतो, ‘मायनॉरिटी पीपल विथ ए मेजॉरिटी कॉम्प्लेक्स!’ अल्पसंख्यांक असूनसुद्धा बहुसंख्यांक असल्याची मिजास! बापरे! हे विधान संदर्भ बदलून आपल्या जातींचा बुजबुजाट असलेल्या देशात कुठे कुठे आणि कोणाकोणाला लावता येईल!

वूमन ऑफ द फोटोग्राफ्सजपानी आहे. चित्रपटीय भाषा खोलवर तपासणारा आहे. समाजाशी याचा काहीच संबंध नाही, असं नाही. पण जे समोर मांडलं जातं, ते व्यक्तीच्या संदर्भात मांडलं जातं. नातेसंबंध म्हणजे काय, माणूस स्वत:ची ओळख कशात शोधतो अशा प्रश्नांमध्ये हा चित्रपट शिरतो. जपानी असल्यामुळे सावकाश सरकतो. पण रेंगाळत नाही. प्रेक्षकाला मोकळा सोडत नाही. शब्दांपेक्षा गप्पपणा, अविर्भाव, दृष्टिकोन यांच्यावर जास्त विसंबणारा आहे. सामाजिक चित्रपट असा असत नाही. हा माणसाच्या अंतरंगात शिरणारा प्रयोगच आहे.

जनप्रवृतींवर एक शेरा मात्र यात सापडतो. यातल्या मुलीच्या फोटोंना (ती मॉडेल असते) सोशल मीडियावर पुष्कळलाइक्समिळत असल्याने तिला जाहिराती मिळू लागतात. त्यातून एका बाजूने कमाई होते आणि दुसरीकडून तिची अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरण्याची भूकही भागते. पण नंतर लाइक्स कमी होतात आणि ती हवालदिल होते. पुढे जेव्हा जखम दाखवणाऱ्या फोटोंना पुन्हा लाइक्स मिळू लागतात, तेव्हा ती जखम बरीच होऊ देत नाही! इथे व्यक्तीच्या मनावर, मूल्यांवर समाज संस्कार करताना दिसतो.

एम्प्टी नेस्टहा चित्रपट चीनमधल्या एका मोठ्या शहरात घडतो. कित्येक वर्षांपासून एकटी रहाणारी आणि आता आत्महत्येचा विचार करू लागलेली म्हातारी बाई. हेल्थ प्रॉडक्ट्स विकायला आलेला एक तरुण सेल्समन लोचटपणे तिला चिकटतो आणि संबंध वाढवतो. पुढची कथा ओळखीच्या रस्त्याने जाते; पण अशी वळणं घेते की कंटाळा येत नाही. शेजाऱ्यांच्या निमित्ताने प्रेक्षकाला इतरांचं दर्शन होत रहातं; पण ते इतकं नेमकं, निवडक आहे की त्यातून समाजदर्शन होतं, असं म्हणवत नाही. अशा चित्रपटाच्या शेवटाविषयी सर्वसाधारणपणे दोनच पर्याय सुचतात; हा चित्रपट मात्र दोन्हींना खो देऊन, तरीही नीट संपतो. सकारात्मक शेवट करण्यासाठी नीतीला, सचोटीला मुरड घालण्याची गरज नाही, असं सांगून जातो!

महोत्सवातला सर्वोत्तम चित्रपट होता, इराणचानो चॉइस’. ही एकच कथा आहे; पण वेळोवेळी तिचं केंद्र तीन बायकांच्यात फिरतं. एक, अनाथ, रस्त्यावर रहाणारी, शरीरविक्री करणारी; दुसरी मानवी हक्कांच्या रक्षणासाठी इरेला पेटून काम करणारी पण विशाल चौकटीचा विचार न करणारी आणि तिसरी गरीब, नाडलेल्या बायकांबद्दल कणव वाटणारी आणि स्वत:च्या मूल्यांनुसार इतरांच्या बाबतीतही निर्णय घेणारी गायनॅकॉलोजिस्ट सर्जन. चौथं महत्त्वाचं पात्र आहे, ‘व्यवस्था’. चित्रपटात पुरुष आहेत; पण एक सोडल्यास बाकी सगळे बायकांच्या भूमिका स्पष्ट करण्याचं पूरक काम करणारे आहेत. चित्रपटाला वेग आहे: तो भावनांवरही थबकू देत नाही. एखाद्या डॉक्युमेंटरीप्रमाणे एकामागोमाग एक प्रसंग समोर येत रहातात आणि त्यावर चित्रपट काहीच शेरेबाजी जणू करत नाही. पार्श्वसंगीत तेवढं ताण निर्माण करत रहातं. मुख्य पात्रं जवळून दिसतात, बाकी सावल्या. किंवा पाठीकडून. चित्रपट निर्मम आहे आणि त्याचा शेवटही तसाच आहे; दिलासा न देणारा.

समस्याप्रधान. सामाजिक. चित्रपटमाध्यमामध्ये प्रयोग करणारा. हे प्रयोगसुद्धा असे की अनुभूतीच्या प्रक्रियेत बेरंग न व्हावा. नटनट्यांच्या अभिनयावर अवलंबून नसलेला, पूर्णपणे दिग्दर्शकाचा. चित्रपट या माध्यमाच्या शक्तीची चुणूक दाखवणारा. असा हा चित्रपट. अनेक अर्थांनी श्रेष्ठ.

यापलीकडे जाऊन या महोत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य मला जाणवलं. मी पाहिलेल्या बावीस चित्रपटांमध्ये सात चित्रपटांमध्ये गे किंवा लिंगबदल केलेली किंवा लेस्बियन पात्रं होती! ही पात्रं किंवा त्यांचा इतर पात्रांशी असलेला नातेसंबंध, हा विषय या सातही चित्रपटांच्या केंद्रस्थानी होता, असं नाही; पण इतक्या मोठ्या संख्येने जेंडरसंबंधी मांडणी असणे, यातून काहीतरी अर्थ काढावासा वाटतो. ‘फनी बॉयहा दीपा मेहता दिग्दर्शित चित्रपट जेवढा ढोबळ आहे, तितकाच तरल, संवेदनशीलद लॉयरहा चित्रपट आहे. ‘द लॉयरमध्ये गे मित्रांचा एक अत्यंत नॉर्मल, ‘बुद्धिवादीग्रूप बघायला मिळतो. त्यातला कुणीच बायकी अविर्भाव करत नाही, एकमेकांत लघळ वागत-बोलत नाही; किंबहुना त्यांचे शब्द कळले नाहीत, तर त्यांना गे म्हणण्याचं कारण दिसणार नाही. त्यांच्या बोलण्यात एकमेकांची मस्करी आहे आणि त्यात गेपणातून येणाऱ्या वागण्याची मस्करीसुद्धा आहे. एकूण, गे असणं म्हणजे पूर्ण नॉर्मल असणं, असं जोरदार लॉजिक मांडून पटवण्यापेक्षा हे बघून जास्त पटावं!

एका ऑस्ट्रेलियन चित्रपटाचा उल्लेख राहिला. यात तर एक मुलगी लिंग बदलून पुरुष होते आणि गे होऊन तरुण पुरुषाच्या प्रेमात पडते! हे कळायला आणि मान्य व्हायला जरी कठीण असलं, तरी डेटवर जाताना तो चड्डीत कृत्रिम लिंग घालतो, हे रोचक वाटलं. या चित्रपटात, तसंच इतर चित्रपटांतसुद्धा या गे किंवा लेस्बियन किंवा लिंगबदल केलेल्या व्यक्तींविषयी इतर सुजाण नागरिकांची, त्यांच्या नातेवाइकांची प्रतिक्रिया धक्का बसल्याची होताना दिसत नाही. याला अपवादफनी बॉयमधलं आपल्याला परिचित असलेलं दक्षिण आशियाई कुटुंब.

भारतीय किंवा दक्षिण आशियाई कौटुंबिक वागण्याला भोंदू म्हणून सोडून दिलं, तर लॅटिन अमेरिकेपासून पश्चिम-पूर्व युरोपसकट ऑस्ट्रेलियापर्यंतएलजीबीटीक्यूलोकांची संख्या इतकी वाढली आहे का, की त्यांचं दर्शन इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रपटांमध्ये सर्वसाधारण माणसं म्हणून व्हावं? मला वाटतं, असं झालं असावं. हॉलिवुडपटांमध्ये आफ्रिकन अमेरिकन माणसं पूर्वी अर्कचित्रांसारखी असत. त्यांच्या वागण्याबोलण्यात त्यांना वेगळे ठरवणाऱ्या विशिष्ट लकबी दिसून येत. आता तसं राहिलं नाही. विल स्मिथ, डेन्झेल वॉशिंग्टन हे नट चित्रपटात पोलिसापासून, वैज्ञानिकासकट सज्जन माणसापर्यंत कोणीही असू शकतात. अमेरिकन समाजाने आता आफ्रिकन-अमेरिकनांचा सर्वसाधारण नागरीक म्हणून स्वीकार केला आहे, याचंच हे चिन्ह. तसंच एलजीबीटीक्यू लोकांबद्दल म्हणता येईल.

आपण यापासून खूप लांब आहोत. आपला समाज लांब आहे, आणि आपल्या चित्रपटांमध्येवेगळ्यालोकांचंनॉर्मलचित्रण होण्यापासूनही लांब.