Wednesday, April 28, 2021

कोरोनाने हलवून बळकट केला देवाचा खुंटा

 

देव आणि ज्ञानाची भूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवप्राण्याच्या एकाच गुणवैशिष्ट्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत.

.

पँडेमिकसाठीमहामारीअसा मराठी प्रतिशब्द वापरात आहे; पणजगभर पसरत गेलेली साथ’, असा त्या शब्दाचा खरा अर्थ आहे.  पृथ्वीवरच्या मानववस्ती असलेल्या पाचही खंडात कोरोना व्हायरस इतक्या वेगाने पसरला, की देशाच्या संदर्भात डोकं शांत ठेवून विचार करण्याऐवजी काहींनी घाईघाईत कमीअधिक मुदतीचे आणि कमीअधिक कडक लॉकडाऊन जाहीर केले. देशोदेशीचे लॉकडाऊन आणि मृत्यूचे आकडे यांनी सुरुवातीला गरगरून टाकलं. मग हे लोण आपल्याकडे आलं आणि इथेसुद्धा बस, ट्रेन, दुकानं, सगळं बंद झालं. लागण असलेला एक जण इतर अनेकांना बाधित करू शकतो, असं सांगण्यात आल्यावर जिथे जिथे गर्दी होऊ शकते, ते सगळं बंद करण्यात आलं. यात जसे मॉल आणि सिनेमा-नाटकांची थेटरं बंद झाली; तशीच देवळं, मशिदी, चर्च इथल्या सार्वजनिक प्रार्थनासुद्धा बंद झाल्या.

हे शेवटचं वेगळं वाटलं. वस्तूंची खरेदी-विक्री आणि करमणूक यांसारखे ऐहिक कारभार बंद होणे, हे शरिरावर हल्ला करून प्राणच धोक्यात आणणाऱ्या नव्या, अनोळखी रोगासाठी सय्युक्तिक आहे; पण परमेश्वराची प्रार्थना बंद? देव आणि देवाची भक्ती या गोष्टी ऐहिक जगण्याशी संबंधित नाहीत. आणि कितीही उलटसुलट वाद घातला तरी धर्म ही गोष्ट समूहाचीच आहे, सार्वजनिकच आहे. समूहाने एकत्र येऊन सण किंवा व्रत, काहीही साजरं केल्याखेरीज धर्म आविष्कृत होत नाही. मनातल्या मनात प्रार्थना करणे, हे श्रद्धाळू असेल; पण ते अजिबात धार्मिक नाही.

जेव्हा देवळं-प्रार्थनास्थळं बंद झाली आणि जेव्हा सामुदायिक प्रार्थना बंद होण्याला सामाजिक मान्यता मिळाली आणि पालख्या- वाऱ्या- मिरवणुका बंद होण्याचा समाजाने स्वीकार केला; तेव्हा एक विचार मनात आला: ‘यातून देव ही संकल्पना डळमळीत होईल का?’ कारण कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या कोविड या रोगाची साथ झपाट्याने पसरू लागल्यावर लोकांच्या मनात ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या, त्यात देवाबाबत काही आंदोलनंसुद्धा असायला हवीत. लोकांना थोडंसं तरी वाटायला पाहिजे की हा रोग आटोक्यात ठेवण्यासाठी देऊळ आणि सामूहिक पूजाअर्चा बंद ठेवाव्या लागतात आणि हे बंद होण्याचा आपण बिनतक्रार स्वीकार करतो. म्हणजे; आपल्या या सामूहिक कृतींचा वास्तविक अर्थ केवळ श्रद्धा व्यक्त करणे, इतकाच होता. त्यातून परमेश्वराला आवाहन किंवा परमेश्वराशी संवाद किंवा परमेश्वराच्या चरणी समर्पण यातलं काहीच होत नव्हतं. आणि समजा काही प्रमाणात होत असलंच तरी त्याचं वजनमाणसं नको तितक्या निकट एकत्र येणेया निखळ भौतिक कृतीपेक्षा कमी होतं.

आणि हे सगळं न केल्याने परमेश्वराचं आणि परमेश्वरभक्ताचं काही बिघडलं नाही. अनेकांनी एकत्र येण्याची भौतिक कृती धोकादायक ठरल्यावर एकत्र येऊन प्रार्थना, वगैरे करण्याची श्रद्धादर्शक कृती निलंबित करायला फार कोणाची हरकत दिसली नाही.

हे झालं देव आणि भक्ती आणि धर्म यांबद्दल. त्यांनी आपापलाधर्मसोडला. पण विज्ञानाने आपला धर्म सोडला नाही. वेगाने पसरलेल्या या रोगाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं (आणि अजून आहे) की यावर उपाय नाही. तरीही रोग्यांच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर कमीअधिक उपचार करायला वैद्यकक्षेत्र कामाला लागलं. या रोगावर उपाय शोधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. हे प्रयत्न कसे, कुठे कुठे होत आहेत, त्यांचं फळ कधी हाती येईल, तोपर्यंत ही साथ कशी आटोक्यात ठेवता येईल, अशा चर्चा केवळ प्रशासनिक जबाबदारी असलेल्या वर्गातच नाही, तर सर्वसाधारण नागरिकांच्यात जोरदारपणे झडू लागल्या. आपल्या परंपरेतल्या काही खऱ्याखोट्या आरोग्यवर्धक चालीरीतींचा, बुडत्याने काडीचा घ्यावा तसा, आधार घेण्याचा निकराचा प्रयत्नही होताना दिसू लागला.


यातून असा अर्थ काढता येतो की आपलं भलं, आपल्या जगण्याची शाश्वती या गोष्टी विज्ञानाचा कमीजास्त आधार घेणाऱ्या वैद्यकशास्त्राच्या हाती आहेत, हे सर्वसामान्य लोकांना पटलं आहे. त्यांना ते मान्य तर आहेच; शिवाय त्यावर त्यांचं आतुर लक्ष आहे. वर्तमानपत्र, सोशल मीडिया यांच्यावरील चर्चांमध्ये कोविडविषयी संशोधनाने जेवढी जागा व्यापली, त्याच्या दशांशसुद्धा जागा देवादिकांना विविध प्रकारे आवाहन करण्याच्या प्रार्थनेसारख्या सामुदायिक कृती बंद होण्याच्या अभूतपूर्व घटनेला मिळताना दिसत नव्हती. जणू काही अनेकानेक वर्षांच्या परंपरा अचानक मोडून पडल्या, हे समाजमनाला तितकसं धक्कादायक वाटलं नाही.

एवढे क्रांतिकारक बदल समाजाने स्वीकारल्यावर सर्वसाधारण मनुष्याने एक पाऊल पुढे जायला हरकत नव्हती.  सर्वसाधारण मनुष्य स्वत: निर्णय घेऊन स्वत:च्या भविष्याची दिशा ठरवत नसतो

, तो परंपराधीन असतो,’ असं कितीही म्हटलं, तरी दैनंदिन व्यवहारांमध्ये काहीतरी लहानमोठे निर्णय घेण्याची वेळ त्याच्यावर सदोदित येत असते. हे निर्णय घेताना अनुभव आणि तर्क यांचाच आधार तो घेत असतो. अशा वेळी, त्या तर्क आणि अनुभव यांच्यामधून देव ही संकल्पना कुचकामी आहे, तमाम मानवजातीवर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी देव, श्रद्धा, भक्ती, अनुष्ठानं, पूजाअर्चा, व्रतवैकल्य यांचा उपयोग होण्याची शक्यता क्षुल्लक आहे; त्यांच्यावर विसंबणे म्हणजे तर जिवाशी खेळण्यासारखंच आहे’, अशा प्रकारच्या विचारांना सामान्य माणसाच्या मनी प्रवेश मिळण्यास हरकत नसावी. एका बाजूने श्रद्धा, देव ही संकल्पना यांचा फोलपणा स्पष्ट होत असताना वैज्ञानिक प्रयत्नांच्या फलितावर आशा ठेवणारी धारणा बाळगण्याच्या संयुक्त परिणामी देवावरचा विश्वास कमकुवत व्हायला हवा. सरसकट सगळ्यांमध्ये अशी प्रतिक्रिया नाही झाली तरी विवेकाला पूर्ण रजा दिलेले लोक सोडून बाकी सर्वांच्यात तशी प्रतिक्रिया कमीजास्त प्रमाणात उमटायला हवी.

तशी उमटलेली दिसली नाही, हे आपल्याला माहीत आहे. का?

देवाच्या हाती आपण एवढंच सोडलेलं नसतं. आपलं, आपल्या सुहृदांचं, या समाजाचं भलं देवाच्या हाती सोपवून निश्चिंत रहाणं चुकीचं आहे, हे ढळढळीत दिसून आल्यावर देवाचा अधिकार संपला, असं माणसाला होत नाही. मन:शांती, विश्वशांती, शांततामय सहजीवन या गोष्टी धर्माच्या माध्यमातून साध्य होतील, या श्रद्धेला धक्का यातून लागत नाही. या गोष्टी विज्ञान प्रत्यक्षात आणू शकत नाही, उलट विज्ञानामधून लागलेल्या एकेका शोधांमुळे, तथाकथित वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवजातीचं भवितव्य धोक्यातच येत आहे, हे प्रतिपादन शिल्लक रहातं.

पण या गोष्टी धर्मही प्रत्यक्षात आणताना दिसत नाही, हे वास्तवसुद्धा रहातं. धर्मामुळे मानवसमूहांच्यात एकोपा, सामंजस्य निर्माण होण्यापेक्षा संघर्षच जास्त होतो आहे, हे तर आज उघड दिसतं आहे. म्हणजे, ज्या गोष्टी विज्ञानाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, त्या धर्माच्या क्षमतेच्याही पलीकडेच आहेत. एकूणदेव ही अंधश्रद्धाच होय’, असा विचार पटण्याच्या निकट संपूर्ण समाज आला नसला, तरी काही प्रमाणात या विचाराने समाजात कुठेतरी मूळ धरलं आहे, असं व्हायला हवं होतं.

.

आता विज्ञानाच्या बाजूने पाहू.

तत्त्वज्ञानाच्या चष्म्यामधून पाहता मानव आणि इतर सर्व सजीव यांच्यात एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे ज्ञानाची भूक. म्हणजेच अज्ञाताची भीती. अज्ञाताची भीती सर्वसाधारणपणे अज्ञातही कल्पना समजणाऱ्या सर्वच प्राण्यांना वाटत असावी. पण त्या भीतीवर मात करण्यासाठी मानवाएवढी घोर धडपड दुसऱ्या कोणी केलेली नाही. मानवाच्या सर्व प्रगतीचं मूळ अज्ञाताच्या भीतीपोटी जागलेल्या ज्ञानाच्या लालसेत आहे, असंही म्हणता येईल. अज्ञाताच्या भीतीतून मानवाने परलोकाच्या कहाण्या रचल्या, पुराणं आणि मिथ्यकथांचं जंजाळ उभं केलं आणि त्यावर श्रद्धा ठेवत कर्मकांडं घडवली.

दुसरीकडे बुद्धीवर जास्त विसंबणाऱ्यांनी अज्ञाताविषयी तार्किक मांडणी करणारे तत्त्वज्ञानाचे इमले उभे केले. या चिकित्सक वृत्तीतूनच पुढे विज्ञान जन्मलं आणि जसं ते वाढत गेलं तशा विज्ञानाच्या शाखाउपशाखा निर्माण झाल्या. अज्ञाताची तपासणी हे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे विज्ञानाला शिस्त आली आणि विज्ञानातून निर्माण होणारं ज्ञानभांडार सर्वांच्या मालकीचं आहे, ते सर्वांना खुलं असलं पाहिजे, असं मूल्य प्रस्थापित होत गेलं. ज्ञानाच्या, माहितीच्या वाढत्या उपलब्धतेमुळे संशोधनाला जोर आला. विचारातून वा प्रयोगातून लागणारे भौतिक जगताविषयीचे शोध सर्वांसमोर मांडणारी व्यासपीठं निर्माण झाली आणि शोधांची पद्धतशीर छाननी होऊ लागली. त्यातून शोध सिद्धहोऊ लागले. अशा सिद्ध झालेल्या शोधांच्या पायावर एका बाजूने आणखी शोध लागत गेले तरी प्रत्येक शोधाची अनेकानेक संदर्भांत पडताळणी होणं थांबलं नाही. भीती निर्माण करणाऱ्या अज्ञाताचं निर्मूलन करू पहाणाऱ्या मानवी प्रयत्नांना विज्ञानाने एक ठोस दिशा दिली. अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर पडण्याची मोठी आशा विज्ञानाने, वैज्ञानिकांनी सर्वसाधारण माणसाला दिली.

याला तंत्रज्ञान या गोष्टीचं बळकट पाठबळ मिळालं. विज्ञानाचा उदय होण्यापूर्वीपासून माणूस जरी अवजारं, म्हणजेच एक प्रकारे  तंत्रज्ञान वापरत असला तरी विज्ञानाने लावलेल्या शोधांनी तंत्रज्ञानाला भलतीच चेतना दिली आणि एका एका शोधाच्या विविध संदर्भातल्या तांत्रिक आविष्कारांनी माणसाचं जीवन अधिकाधिक सुखद होऊ लागलं. माणसाचं आयुर्मान वाढू लागलं. जिथे असे शोध लागले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रथम अवतार घेतला, तिथे आपल्या जगण्याला सुखद करण्यामागे विज्ञान आहे, वैज्ञानिक शोध आहेत, ही जाणीव समाजात सहज झिरपली आणि सर्वसाधारण नागरिकाच्या मनात देखील विज्ञानावर एक प्रकारची श्रद्धा निर्माण झाली.

या प्रक्रियेचं शिखर विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात गाठलं गेलं आणिलवकरच विश्वाच्या रचनेचं रहस्य मानवाला ज्ञात होईल आणि मग भविष्यातील घटनांची पूर्वकल्पना करणं शक्यतेच्या कोटीत येईल,’ असा आशावाद करण्यापर्यंत काही वैज्ञानिकांची मजल गेली. या आशेला प्राणांतिक तडाखा १९२७ मध्ये हायझेनबर्गने अनिश्चिततेचं तत्त्व मांडून दिला. अणुअंतर्गत सूक्ष्म कणांच्या हालचालीचा अभ्यास करताना असल्या कणाचं स्थान ठरवण्यात जेवढी अचूकता आणावी, तेवढीच अनिश्चितता त्या कणाची गती ठरवण्यात निर्माण होईल, असं त्याने मांडलं. वेगवान कणाची गती आणि त्याचं स्थान, दोन्ही एकाच वेळी अचूक माहीत करून घेणं केवळ अशक्य आहे, या मांडणीमुळे सर्वसामान्यांच्या विज्ञानावरच्या श्रद्धेला धक्का बसला. मानवी आकलनाला चक्क भौतिक मर्यादा आहेत, या प्रतिपादनाने अज्ञाताला पादाक्रांत करायला निघालेला विज्ञानाचा अश्वमेधी घोडा अडवला.

तसं म्हटलं तर धर्म वा धर्मसंस्थापक करतात, तसा अंतिम सत्य सांगण्याचा दावा विज्ञानाने कधीच केला नव्हता आणि केलेला नाही. तरी, कोणाच्याही पडताळणीला सामोरं जाण्याची वैज्ञानिक प्रतिपादनाची तयारी आणि पद्धत, विज्ञानाचंच अपत्य असलेल्या तंत्रज्ञानाने मानवी जगण्याला पायरीपायरीने सुखद करत नेल्याचं वास्तव आणि भाषा, वंश, देश ओलांडून वैज्ञानिक मांडणीला मिळणारी सर्वमान्यता, यांच्यामुळे विज्ञानाला दिग्विजयी असल्याचं वलय प्राप्त झालं होतं. ते वलय हायझेनबर्गने नष्ट केलं. विज्ञानाने आवाक्यात आणलेल्या ज्ञानाला कुंपण आहे आणि त्या कुंपणापलीकडे अज्ञाताचा अंध:कार आहे, हेसत्यप्रस्थापित झालं.

म्हणजेच विज्ञानावर श्रद्धा ठेवण्याला आव्हान मिळालं. एका बाजूनेविज्ञान मानवी ज्ञानाच्या कक्षांचा सतत विस्तार करत आहे. अंतराळाला गवसणी घालत आहे. जिला विज्ञानाच्या नियमांचा गंध नाही, अशा व्यक्तीलासुद्धा गुंतागुंतीच्या वैज्ञानिक उपकरणांचा वापर शक्य झाला आहे. आर्थिक नाही तरी ज्ञानसमृद्धीच्या पातळीवर पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त समता प्रस्थापित झाली आहे. माहिती आणि संपर्क या गोष्टी सर्वसामान्याच्या आवाक्यात आल्या आहेत,’ असं प्रतीत होतं. पण त्याच वेळी तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्यासुधारणांमधून वेगळा संदेशही मिळतो. काल जे अत्याधुनिक होतं, वेगवान आणि बिनचूक होतं, तेच आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मंद आणि मागास ठरू लागतं. मग आज ज्याला आपण थोर समजतो आहोत, ते उद्या टाकाऊ कशावरून ठरणार नाही, हा प्रश्न बरोबर ठरतो. म्हणजेच उद्याचं जग कसं असेल, हे आज अज्ञातच आहे, हे अधोरेखित झालं.

थोडे वेगळे शब्द वापरायचे तर विज्ञान नवनवीन ज्ञान आणणार आणि त्यातून अंध:कार कमी होत जाणार. पण ज्या अर्थी विज्ञानाच्या प्रसरणाला सतत वाव मिळत गेलेला आहे, त्या अर्थी विज्ञानाने कितीही उजेड पाडला तरी पलीकडेअंधार होताच. म्हणजे तो तसा यापुढेही असणार आहेच! भौतिकशास्त्रामध्ये ज्ञानाची सीमा गाठण्याच्या वल्गना सुरू होत होत्या, त्याच सुमारास १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू आला. पण तेव्हा व्हायरस ही गोष्ट माहीत नव्हती. अँटिबायॉटिक्सचा शोध लागायचा होता. आजही सगळ्या रोगांवर उपाय ज्ञात नाही आहे. त्यात कोरोनाव्हायरससारखे संपूर्ण अज्ञात शत्रू अचानक अवतरत आहेतच. एक कोरोना येतो आणि अमेरिकेसारख्या महासत्तेला घायाळ करतो. अज्ञाताच्या अंधारात कोणती संकटं दडून बसली आहेत आणि त्यांचा हल्ला कधी, कसा, किती तीव्रतेने होईल, हे कोणीच सांगू शकत नसताना त्या अंधाराची भीती का वाटू नये? त्या भीतीवर भावनिक इलाज शोधण्याचा पर्याय का पत्करू नये? देवाला साकडं का घालू नये?

मानवाची ज्ञानाची भूक जर अज्ञाताच्या भीतीतून आली असेल; तर त्याच भीतीमधून मानवालादेवया संकल्पनेची अपरिहार्यपणे गरज भासली असणार.

देव आणि ज्ञानाची भूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवप्राण्याच्या एकाच गुणवैशिष्ट्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत.

देवही गोष्ट माणसाने निर्माण केली, हे जरी खरं असलं; तरी एक महामारी आली आणि देव या संकल्पनेला उपटून घेऊन गेली; इतकी ती लेचीपेची नाही. जोवर माणूस आहे, जोवर माणसाला इतर सजीवांपासून वेगळं काढणारं अज्ञाताची भीती/ज्ञानाची भूक हे वैशिष्ट्य आहे; तोपर्यंतदेवरहाणार आहे.

मानवाची अज्ञाताची भीती जेव्हा संपुष्टात येईल, तेव्हा ना विज्ञान उरेल, ना मानवाला देवाची गरज राहील.

 कोरोनाकाळाने दिलेलं हे ब्रह्मज्ञान.

( २०२०सालच्या जून महिन्यात लोकप्रभा साप्ताहिकात छापून आलेला लेख. तेव्हा आणि आता किती फरक पडला आहे?)


No comments:

Post a Comment