झुंड पाहताना अनेक गोष्टी जाणवतात. त्यांचा एकत्रित परिणाम काय, कसा होतो, हे कळून घेण्यासाठी जे जाणवलं ते एकापुढे एक मांडून त्या परिणामाचा अंदाज करण्याचा हा एक प्रयत्न.
हा मुख्य धारेतला हिंदी चित्रपट आहे. बघायला येणाऱ्या प्रेक्षकाचं मनोरंजन होईल, अशी खबरदारी त्याच्या निर्मितीत घेतली आहे. पब्लिकचं मनोरंजन करण्यासाठी काय करावं लागतं, याचे हिशेब मात्र ‘झुंड’मध्ये वेगळे आहेत.
गोष्ट नागपुरात, नागपूरच्या रेल्वेलाइनला लागून असलेल्या झोपडपट्टीत घडते. अधून मधून झाशी राणी चौक, नागपूर स्टेशन, बस स्टँड, फ्लायओव्हर, वगैरे परिसर दिसतात; पण मुख्य घटनास्थळ झोपडपट्टीतले चिंचोळे बोळ, तिथली बकाल वस्ती, घरं, दुकानं. तसंच सर्व पात्रांच्या तोंडी नागपुरी हिंदी आहे. नागपुरात मराठी लोक जास्त करून हिंदीच बोलतात. मुंबईतल्या हिंदीवर जसा मराठीचा खोल ठसा आहे, तसाच तिथल्या मराठीवर हिंदीचा आहे. म्हणजे मराठी बोलता बोलता नागपुरी माणूस कधी हिंदीत शिरतो आणि मग हिंदीतच मुक्काम टाकतो, हे त्याचं त्याला कळत नाही.
मुंबई हे हिंदी चित्रपट बनण्याचं मुख्य केंद्र आहे. अगदी स्वातंत्र्यापासून आहे. आणि तेव्हापासून नशीब काढायला देशभरातून लोक मुंबईला येत आहेत. यामुळे चित्रपटाची पार्श्वभूमी मुंबईची असणे, यात काही नवल नव्हतं, नाही. मात्र अलीकडच्या काळात कॅमेरे जसे वापरायला जास्त जास्त सुलभ आणि कामात जास्त जास्त सफाईदार होत गेले, तशी चित्रपटांची पार्श्वभूमीसुद्धा मुंबईबाहेर जाऊ लागली. अर्थात, नुसती बाहेर जाण्याने आणि निसर्गरम्य परिसरात शूटिंग केल्याने त्या बाहेरच्या स्थळाचा गंध-स्पर्श चित्रपटाला लाभत नाही. त्यासाठी कॅमेरा, पटकथा आणि एडिटिंग अशा कितीतरी गोष्टी सजगपणे, फोकस ठेवून वापराव्या लागतात. मग एखादा ‘कहानी’ कोलकात्याचा चित्रपट ठरतो. एखाद्या ‘दिल्ली बेली’मध्ये दिल्ली हे जणू एक पात्र असल्यागत भासतं. ‘अंदाधुंद’मध्ये पुणे दिसलं होतं. ‘झुंड’मध्ये नागपूर हे सरळ सरळ एक पात्र आहे. अर्थात, धरमपेठ, बर्डी या उच्चभ्रू वस्त्या नव्हेत; नागपूरची झोपडपट्टी आणि नागपूरची भाषा.
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ असाच ‘स्थानिक’ चित्रपट होता. ‘न्यूटन’ हा छत्तीसगडचा, मध्य भारतातल्या जंगलभागाचा चित्रपट होता. आपला भारत देश हा कसा एक उपखंड आहे आणि तिथे ठिकठिकाणी किती वेगवेगळ्या संस्कृती नांदताहेत, हे या चित्रपटांमधल्या वैविध्यामुळे स्पष्ट होतं. आपल्या भोवतीचा परिसर हाच काय तो देशाचा एकमेव अर्थ, या प्रकारच्या बालिश मानसिकतेतून हे चित्रपट मुक्ती देतात आणि राष्ट्रगीतामधल्या ‘‘पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा ...’’ या ओळींना सघन आशय प्राप्त होतो. आपल्या देशाविषयी, म्हणजे सर्वच नागरिक बंधुभगिनींविषयी प्रेम उचंबळून येतं. ‘मेरे देशकी धरती’ किंवा ‘ये मेरा इंडिया’ सारख्या ‘देश’ या संकल्पनेचा सोयीस्कर चिंचोळा अर्थ लावू पहाणाऱ्या चित्रिकरणातून हे होऊ शकत नाही.
चित्रपटात अमिताभ बच्चन असणं हेच एक मोठ्ठं विधान असायला हवं. त्याने काहीतरी भलंमोठं काम करून दाखवायला हवं. पण तसं नाही. इथल्या अमिताभचं व्यक्तिमत्व सर्वसामान्य आहे. त्याची डोळ्यात भरणारी उंची दिसू न देणारं आहे. झोपडपट्टीतल्या मुलांना उन्नतीचा मार्ग तोच दाखवत असला तरी हा ‘तारे जमींपर’मधल्या आमीरखानसारखा देवदूत नाही. प्रेक्षकांना त्याच्या अजिंक्यतेची खूण दाखवून आश्वासित करणारा नाही. शेवटी आपलाच विजय होणार, याची पहिल्यापासून खात्री असल्यासारखा तो बोलत वागत नाही. कुठेच अधिकार, अतुलनीय सामर्थ्य व्यक्त करत नाही. समाजातल्या उच्चवर्गाचा प्रतिनिधी असल्यासारखा भासत नाही. त्यामुळे ‘एक मसीहा वरच्या, शिकलेल्या, समंजस, शहाण्या, राज्यकर्त्या, एकूणच सर्व बाबतीत वरचढ असलेल्या समाजगटातला महान मनुष्य परमेश्वराने अवतार घ्यावा तसा येतो आणि गरिबीच्या, अज्ञानाच्या, अंध:काराच्या गर्तेत खितपत पडलेल्यांना हात देऊन त्यांचं उत्थान करतो,’ असं एक टक्क्यानेसुद्धा सुचवलं जात नाही. वास्तविक अमिताभकडे दोन्ही आहे: अभिनयक्षमता आणि पडदा व्यापून टाकणारं व्यक्तिमत्व. पण इथे तो लार्जर दॅन लाइफ मुळीच होत नाही. स्वत:च्या अल्पमतीने, जमेल तेवढा जोर लावत काहीतरी बरं करू बघणारा साधा मनुष्य रहातो. ही एका बाजूने अमिताभच्या अभिनयाची आणि दुसरीकडून दिग्दर्शकाच्या संयमी हाताळणीची कमाल आहे. एकदा तर तो ‘मागितली असती माफी, तर काय बिघडलं असतं? प्रत्येक वेळी जिंकायला हवं, असं नाही!’ असा अमिताभच्या प्रतिमेला अजिबातच विसंगत सल्ला देतो!
मात्र कथेच्या ओघात उल्लेख येतो त्याप्रमाणे तो निवृत्तीच्या जवळ आलेला वाटत नाही. त्यापेक्षा मोठा दिसतो. याला चित्रपटातली त्रुटी म्हणता येईल. आणखी एक त्रुटी अशी की फुटबॉलचा खेळ इथे मुलगे-मुली एकत्र खेळताना दिसतात. अगदी स्पर्धेच्या पातळीवरही तसंच आहे. हे चित्रपटाच्या आशयाला सोयीचं असलं तरी असं सर्वत्र असतं का? कल्पना नाही.
त्रुटी, तर्कविसंगत मांडणी या संदर्भात एक गोष्ट सांगायला हवी. झोपडपट्टीशेजारच्या.भिंतीपलीकडे एक उच्चभ्रू कॉलेज आहे. तिथल्या एका मर्सिडीज चालवणाऱ्या मुलीचं वागणं विसंगत म्हणावं का? तिच्या वागण्यात वर्गश्रेष्ठतेची जाणीव नाही. चक्क झोपडपट्टीतल्या मुलाकडे ती बरोबरीच्या नात्याने बघते. त्यांचं सूत जुळत नसलं तरी ती त्याला मदत करू बघते. मग वाटतं, दोन वर्ग एकमेकांपासून पूर्णपणे अलग असायलाच हवेत का? खेळांच्या संदर्भात त्यांचा परस्परसंबंध येतही असेल. क्रिकेटमध्ये हे सर्रास घडताना दिसतंच की. (आणि ज्याच्याकडे ती आकर्षित होते तो डॉन अचाट चिकणा आहे! या कलावंताचं भविष्य उज्ज्वल आहे!)
यातले कलावंत चित्रपटात काम करणारे, या माध्यमाची माहिती असणारे नाहीत. कॅमेरा कोणाच्या चेहऱ्याच्या निकट जात नाही. फ्रेममध्ये सदा परिसर येत रहातो. आणि रंग मुळीच सुंदर, प्रसन्न होण्याकडे झुकत नाहीत. प्रेक्षक झोपडपट्टी बघतो, झोपडपट्टीतलं जगणं बघतो; कोणा एकाची कथा बघत नाही. ‘झोपडपट्टीतली मुलं, तरुण हे असे जगतात.’ एवढंच नोंदवलं जातं. ती क्षुल्लक कारणावरून मारामारी करतात. त्यात निर्माण झालेलं वैर इमानाने सांभाळतात. चोऱ्या करतात, धावत्या गाडीवरून कोळसा फेकतात. बाईच्या गळ्यातली चेन हिसकतात. मोटारसायकलवरून मोबाइल खेचतात. वेगाने मोटरसायकल चालवतात. केस रंगवतात. अचकट विचकट बोलतात. - पण त्यांच्या चित्रणात याचं समर्थन नाही. याला ग्लॅमर दिलेलं नाही. उलट, कधी नाही ती मर्यादा ओलांडण्याची मिळालेली संधी निसटून जाते आहे, हे लक्षात आल्यावर ते कचरा साफ करतात, भिंतीवर लघवी करणाऱ्यांना अटकाव करतात, धूम्रपान बंद करतात. एकूण, बकालपणाकडून स्वच्छतेकडे, बेबंद जगण्याकडून जबाबदार होण्याकडे, उद्याबाबत बेफिकीर असण्याकडून उद्यासाठी कष्ट करण्याकडे त्यांचा प्रवास होतो. आणि यातून साकारतो तो एक शब्द न वापरता, गिळगिळीत गोडिळ भाव चेहऱ्यावर न आणता केलेला, आणि म्हणूनच अतिशय प्रभावी होणारा उपदेश.
‘सैराट’फेम रिंकू राजगुरु यात एक आदिवासी मुलगी आहे. तिची भाषा प्रेक्षकाला कळत नाही पण ती आणि तिचा बाप एकमेकांशी काय बोलत असतील, याची कल्पना येते. त्यांचं जगणं बिगरआदिवासी समाजाला जराही कळत नाही, हे मात्र नीट नोंदवलं जातं! आणि रिंकूची चाल! कसलेल्या फुटबॉल प्लेयरची चाल आहे. ती आदिवासी असल्याचा त्या चालीशी जराही संबंध नाही. आधुनिक समाजसेवी भाषा वापरायची तर खेळातल्या कौशल्याने कल;लं तिचं सक्षमीकरण त्या चालीतून व्यक्त होतं!
शेवटी ‘झुंड’ ही एक परीकथाच आहे. व्यवस्थेने ज्यांना संधी नाकारली आहे, अशा तरुणांची परीकथा. अर्थातच यात व्यवस्थेकडून होणारा अन्याय येणार. झोपडपट्टीतल्या तरुणांकडे इतक्या सहानुभूतीने बघणारा चित्रपट प्रस्थापित समाजव्यवस्थेला कसं विदारक स्वरूपात दाखवेल, ही अपेक्षा मात्र अजिबात सफल होत नाही. यात असलेलं व्यवस्थेचं चित्रण बऱ्यापैकी तटस्थ आहे. ही व्यवस्था नफ्फट आहे, नियमांवर बोट ठेवणारी आहे, जबाबदारी शक्यतो झटकणारी आहे; पण निर्दयी नाही. अगदी पोलीसही तसे नाहीत. वास्तवात आहे तसे इथले पोलीस इन्स्पेक्टर झोपडपट्टीतल्या रहिवाशांवर सहजपणे हात उचलतात. पण त्यामागे क्रौर्य असतं, असा निष्कर्ष काढता काढता वेगळं काहीतरी होऊन जातं. हीच गोष्ट सरकारी ‘बाबूं’ची, खेड्यातला ‘मोठा’ माणूस असलेल्या दुकानदाराची आणि शाळा-कॉलेज चालकाची. सर्वसाधारणपणे जे वर्तन सामाजिक नियमांना धरून आहे - म्हणजे ज्यात ‘खालच्या वर्गा’ला तुच्छ वागवणं हेच नॉर्मल आहे (चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा, अशी म्हणच आहे मराठीत), त्यापेक्षा वेगळं वागण्याची वेळ कधीतरी येऊ शकते, हे त्यांना पटलं की हे सगळे वेगळं वागतात. सामाजिक व्यवस्था अन्यायकारक असेलही पण ती व्यवस्था राबवणारी प्रत्येक व्यक्ती डोळसपणे, जाणतेपणी अन्याय करत असते, असं नाही! - हा अर्थ यातून निघतो.
व्यवस्थेला नावं ठेवा, माणसाला ठेवू नका. माणूस बदलू शकतो आणि माणूस बदलला की व्यवस्थासुद्धा बदलते, असा हा (गांधीवादी?) संदेश आहे. सामोपचाराचा. समंजसपणाचा. भविष्याबद्दल आशा व्यक्त करणारा. या परिकथेतली ‘झुंड’शेवटी परदेशी जाते खरी; पण तेवढंच. ते तिथे जिंकतात, इथपर्यंत चित्रपट खेचलेला नाही. म्हणजे प्रयत्नाने वर उठता येतं, इतपतच हा संदेश रहातो. (पुन्हा ‘तारे जमींपर’प्रमाणे पहिला नंबर मिळवणं नाही.)
हा चित्रपट काहीसा दीर्घ आहे आणि कोणीही कुशल एडिटर त्याची लांबी किमान अर्ध्या पाऊण तासाने कमी करू शकेल, असं म्हटलं जातं. मग या दिग्दर्शकाने का नाही केली काटछाट?
यात काही दृश्यं निश्चित अशी आहेत, जी कापून टाकली तरी मुख्य कथानकाला धक्का लागणार नाही. उदाहरणार्थ, आंबेडकर जयंतीच्या वेळचा डीजे लावून होणारा नाच. हा नाच कापला तर फार काही बिघडणार नाही. पण पुढे त्या धडाकेबाज, कर्कश्श आवाजतून ऐकू येतो ॲम्ब्युलन्सचा सायरन. अमिताभच्या चेहऱ्यावर चिंता उमटते. पण काय होतं? नाचणाऱ्यांना एका बाजूला करत ॲम्ब्युलन्सला निघून जाण्यासाठी जागा दिली जाते! मुलं ‘खालच्या’ वर्गातली असतील; त्यांना माणुसकी कळते! - हे दिग्दर्शकाला आवश्यक वाटलं असावं!
याच नाचण्याच्या कारणावरून उत्सवाला पैसे देण्याला नकार देणारा दुकानदार शेवटी परदेशी जाण्याच्या खर्चातला वाटा उचलतो. उलट उत्सवाला दिलदारपणे वर्गणी देणारा कबाडीवाला मैदानावर आक्रमण करून मुलांचं क्रीडांगण हडप करू पहातो. - हेसुद्धा दिग्दर्शकाला हवं आहे.
चित्रपटाचा शेवट वैशिष्ट्यपूर्ण आहे. विमानतळावर सिक्युरिटी चेकमध्ये डॉनला कमरेचा पट्टा, बूट, सगळं सगळं काढून ठेवावं लागतं आणि तरी मशीन त्याला ‘पास’ करत नाही. त्याच्या खिशात त्याचं हत्यार असलेली कटिंग ब्लेड असते. ती ब्लेड विमानात नेता येत नाही, हा सर्वसाधारण नियम त्याला माहीत नसतो आणि त्या घटकेच्या ताणतणावात तो ती ब्लेड विसरून गेलेला असतो.
पण इतकंच नाही. ब्लेड टाकून देण्याचं दृश्य स्लो मोशनमध्ये आहे. कॅमेरा थेट ब्लेडच्या समोर आहे. जणू ब्लेड कॅमेऱ्यातच टाकली आहे. ‘फँड्री’ आठवतो? फँड्रीत अगदी शेवटचा सीन दगड भिरकावल्याचा आहे. त्याही अगोदर श्याम बेनेगलच्या ‘अंकुर’मध्येदेखील शेवटी दगड भिरकावला जातो. पण या तीन प्रसंगांमध्ये फरक आहे. ‘अंकुर’मध्ये कॅमेरा जमीनदाराच्या घरापासून मागे मागे येतो आणि कॅमेऱ्याच्या निकट उभा असलेला लहान मुलगा दगड जमीनदाराच्या घराच्या दिशेने भिरकावतो. जमीनदाराचा अन्याय चित्रपटात शिक्षेविना, प्रतिक्रियेविना राहिला असं होत नाही. कुठेतरी एक ठिणगी पेटते. त्या ठिणगीतून वणवा उफाळेल किंवा नाही उफाळणार; पण दिग्दर्शक त्या शक्यतेकडे संकेत करतच चित्रपट संपवतो. ‘फँड्री’त वेगळं आहे. ‘फँड्री’तला दगड कुठल्या घरावर, माणसावर भिरकावला जात नाही. तो थेट कॅमेऱ्यावर येतो. प्रेक्षकावर येतो. जणू प्रेक्षकच गुन्हेगार आहे! कोणी तिऱ्हाइत जमीनदार नाही. ‘फँड्री’ थेट प्रेक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. आणि चित्रपट संपतो. पुन्हा त्या भावनेचं पुढे काय होतं, हे प्रेक्षकावर सोपवून.
‘झुंड’मधली ब्लेड कचऱ्याच्या डब्यात फेकली जाते. आता ती कॅमेऱ्याच्या दिशेनेच फेकली जाते यातून प्रेक्षक, म्हणजे समाज, हा कचऱ्याच्या डबा आहे, असा अर्थ काढावा वा काढू नये; पण ती भिरकावली जात नाही हे नक्की. अगोदरच्या दोन प्रसंगांप्रमाणे ब्लेड फेकणे हे हत्यार उगारल्यासारखं होत नाही. अगदी उलट होतं, हत्याराचा त्याग केला जातो! एक हिंसक प्रवृत्तीचा तरुण समाजाने घडवलेल्या त्याच्या पिंडाला सोडून एक सीमा ओलांडतो. (विमानतळाच्या भिंतीवर एक ठळक संदेश लिहिलेला असतो: ही भिंत ओलांडण्यास सक्त मनाई आहे!)
यापेक्षा जास्त प्रतिकात्मक काय असू शकतं?
‘झुंड’चा शेवट विद्रोहाकडे संकेत करत नाही. ‘झुंड’चा शेवट सामोपचाराकडे, उज्ज्वल भविष्याकडे, स्वत:चं नशीब स्वत: घडवण्याकडे, समाजाच्या परिघावर रहाणाऱ्या वंचित समाजातल्या सदस्याने समाजाच्या मुख्य धारेत प्रवेश करण्याकडे तर आहेच; शिवाय त्याच्यातून समाजाचा समर्थ प्रतिनिधी घडण्याकडेसुद्धा निर्देश करतो.
चित्रपट हे केवळ कलामाध्यम नाही. चित्रपटहे प्रभावी प्रचारमाध्यमही आहे, असं ओळखणारा आणि त्यानुसार अगदी ठरवून प्रचार करणारा हा चित्रपट आहे. म्हणून त्यात काटछाट केलेली नाही.
चित्रपट कशाचा प्रचार करतो? काय सांगतो, सुचवतो? कोणाला संबोधतो? हे प्रश्न अवश्य मनात ठेवावेत.
नागराज मंजुळे, तुम्हाला सलाम.
No comments:
Post a Comment