Friday, March 25, 2022

काश्मीर आणि मी

 १.

खूप वर्षांपूर्वी इम्प्रिंट नावाच्या मासिकात मला काश्मीरवरचा एक प्रदीर्घ लेख वाचायला मिळाला. लेखकाचं नाव होतं, जैन. इनिशियल्स, वगैरे विसरलो. त्या लेखाने माझ्या मनावर खोल परिणाम केला. एक म्हणजे काश्मीरबद्दलच्या माझ्या कल्पना पार उलट्या पालट्या होऊन गेल्या. दुसरं असं की लेख अजिबात भावनिक नव्हता. घटना, आकडेवारी, पत्रव्यवहार अशा सज्जड पुराव्यांवर आधारलेला होता. त्यामुळे लेखातल्या प्रतिपादनाला धुडकावणं कठीण होतं. माझ्यासारख्या अपरिपक्व वाचकाला तर अजिबात अशक्य होतं.

एक परिणाम असाही झाला की मी त्यानंतर काश्मीर या विषयावर मिळेल ते वाचू लागलो. बरंच उलट सुलट वाचनात आलं. पुराव्यानिशी मांडणी करणाऱ्या लिखाणाला मी माझ्या ‘डेटाबेस’मध्ये ॲड केलं, बाकीचं सोडून दिलं. काश्मीर हा जणू माझ्या अभ्यासाचा विषय झाला.

कधीतरी कोणाशी तरी याचा मी उल्लेख केला आणि त्याने मला ‘काही लोकांसमोर हे सगळं सांगशील का?’ असं विचारलं. निमित्त होतं, कलम ३७०. ‘नाही’ म्हणणं म्हणजे पळून जाण्यासारखं होतं. पण तिथे जाण्याअगोदर मी मला माहीत होतं त्याअगोदरचा काश्मीरचा इतिहास चाळला. काश्मीरात मुसलमान बहुसंख्या कशी आणि केव्हा झाली, हे त्यात मला कळलं. तिथल्या सूफी प्रभावाची माहिती झाली. तोपर्यंत माझी जी मतं होती, त्यांना नीट आधार मिळाला. मी जाऊन मांडणी केली. मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरं मला खरं तर माहीत नव्हती; पण विचारणाऱ्यांची माहिती, तयारी माझ्यापेक्षा खूपच कच्ची असल्याने मला अडचण झाली नाही.


योगायोग असा की माझी मुलगी इरावती अभिषेक मुजुमदार या तिच्या मित्राबरोबर नाटकं करत असताना त्याने काश्मीर प्रश्नावर एक नाही, दोन नाटकं लिहिली. काश्मिरी पंडितांची बाजू मांडणारं आणखी एक नाटक त्यात असावं, असं त्याला वाटलं आणि ‘‘हे काम करायला तुला आवडेल का?’’ असं त्याने तिला विचारलं. ती ‘हो’ म्हणाली. मग ते काश्मीरला जाऊन राहिले. अनेकांशी बोलले. मुलाखती घेतल्या. वाचन केलं. अशी सगळी तयारी करून आणि अनेक खर्डे काढून तिने तिचं नाटक लिहिलं: गाशा. अर्थात हिंदी. या नाटकाचे भारतभर प्रयोग झाले. दिल्लीला होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या महिंद्र एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड (META) स्पर्धेत हे नाटक झालं. तिथे सर्वोत्तम प्रयोग  आणि सर्वोत्तम लिखाण अशी दोन पारितोषिकं ‘गाशा’ला मिळाली. बहुधा २०१३ साली. मी ‘गाशा’ दोनेक वेळा तरी पाहिलं आहे.

असं सगळं असल्याने काश्मीरविषयी माझी समज चांगली आहे, असं मला वाटतं.

२.

काश्मीर फाइल्स पाहिलास का, अशा विचारणा चोहीकडून होत आहेत. मी बघितलेला नाही आणि बघणारही नाही.

एक छोटं कारण म्हणजे मोदीजींनी त्याची शिफारस केली आहे. मोदीजींना इतिहास, भूगोल, विज्ञान, कला यातलं काहीही कळत नाही, असं वारंवार समोर आलं आहे. तेव्हा हा चित्रपट पहाण्यासाठी त्यांच्या शिफारशीला शून्य वजन आहे. आणि दुसरं असं की मागे मोदीजींनी पेटीएमसाठी मॉडेलिंग केलं होतं. त्यानंतरच्या काळात पेटीएमच्या मालकाचं नशीब असं काही उजळलं की तो कोट्याधीश, अब्जाधीश झाला. त्याचं भलं झालं पण आज पेटीएमच्या भागधारकांचं कसं चाललं आहे, याची चौकशी अवश्य करा. मोदीजींच्या शिफारशीचा लाभ कोणाला होईल आणि कोणाला नाही, हे जरा गडबडीचं आहे.

काश्मीर फाइल्स बघण्याचा आग्रह करणारे त्याच्या मेरिटबाबत कमी बोलतात. त्याचा विषय त्यांना जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणजे काश्मिरी पंडितांवर कोसळलेलं संकट, हा विषय नाही! तसं असतं, तर त्याची कारणं सांगताना तेव्हा दिल्लीत सरकार व्ही पी सिंग यांचं होतं आणि त्याला भाजपचा पाठिंबा होता, हे सांगितलं असतं. काश्मीरमध्ये तेव्हा राष्ट्रपती राजवट होती आणि राज्यपाल संघवाला होता, हे सांगितलं असतं. हे घडलं त्याला आता तीस वर्षं उलटून गेली; तर आता ते पंडित कशा परिस्थितीत आहेत, हे सांगितलं असतं. २०१४ साली ‘नवं स्वातंत्र्य’ मिळून सात वर्षं होऊन गेली, तर या काळात त्या पंडितांचं पुनर्वसन किती प्रमाणात झालं, हेसुद्धा सांगितलं असतं.

पंडितांवरच अत्याचार झाले, ते मुसलमानांनीच केले आणि यच्चयावत सर्व मुसलमानांचा द्वेष करणं हेच प्रत्येक हिंदूचं आद्य कर्तव्य आहे, हे ठासून सांगितलं जातं. त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी उठा, असं सांगितलं जातं.

हे काय आहे? मुसलमानांचा द्वेष करणे आणि बेशरमपणे खोटं बोलणे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूलभूत शिकवण आहे, हेसुद्धा वारंवार सिद्ध झालं आहे. पण आज २०२२ साली असं काय झालं की देशापुढे हीच सर्वात मोठी समस्या असल्याचं लोकांना पटवून देण्यासाठी एक चित्रपट काढला जातो आणि पंतप्रधान मोदीजी त्याची शिफारस करतात?

३.

स ह देशपांडे हे उजवीकडे कललेले, हिंदुत्ववादी विचारांचे; पण मन मोकळं असलेले विचारवंत म्हणून ओळखले जात. काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो असताना बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, ‘‘अहिंसा काय गांधींनी शोधली? दोन मनुष्यप्राणी जेव्हा एकमेकांबरोबर विश्वासाने राहू लागले, तेव्हा अहिंसा जन्माला आली. अहिंसा हा समाज घडण्याचा पाया आहे!’’

‘अहिंसा’ हे तत्त्व, हा शब्द गांधींना जोडला गेला आणि गांधीसमर्थक, तसंच गांधीविरोधक यांनी तो इतक्या वेळा वापरला की तो अगदी गुळगुळीत होऊन गेला आहे. आज ‘अहिंसा’ असा नुसता उच्चार केला तरी ‘हे आलं काहीतरी गांधीवादी फॅड!’ अशी प्रतिक्रिया मनात उमटण्याची शक्यता आहे. स ह देशपांडे म्हणाले ते बरोबरच आहे: ज्यांना एकमेकांपासून हिंसेची भीती नाही, तेच एकत्र राहू शकतात. कसलंही शारीरिक बळ नसताना मानवजात पृथ्वीवरची सर्वात बलिष्ठ जात झाली, यामागे परस्परसहकार्याचा, म्हणजेच अहिंसेचा मोठा हात आहे. अहिंसा जीवनाचा, सामाजिक जीवनाचा सर्वात मोठा आधार आहे.

जेव्हा संकटांचा मुकाबला करण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी, दुबळ्या लहानग्यांचं रक्षण आणि संगोपन करण्यासाठी एकमेकांवर विसंबण्याची गरज होती; तेव्हा सहकार्य, म्हणजेच अहिंसा या गोष्टीला अपार महत्त्व होतं. अहिंसा हे माणसांना एकत्र आणणारं, एकत्र बांधणारं प्रभावी ‘अवजार’ होतं.

आणखी एक अवजार, हत्यार, शस्त्र माणसांना एकत्र आणू शकतं. ते म्हणजे द्वेष. सामायिक शत्रूचा द्वेष करणारे एकत्र येणं सहाजिक आहे. तो शत्रू जर अतिबलाढ्य असेल, तर आपापसातले मतभेद विसरून एकत्र येणं आवश्यकही ठरेल. (गांधींना हे कळत होतं पण पटत नव्हतं. ‘माझा विरोध ब्रिटिशांना नाही, माझा विरोध ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीला आहे,’ असं ते म्हणत आणि तसंच ते वागत. दक्षिण आफ्रिकेत त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या जनरल स्मट्ससाठी त्यांनी तुरुंगातच स्वत:च्या हाताने बूट शिवले आणि त्याचं हृदय जिंकून घेतलं! हा चमत्कार अहिंसा करू शकते, जो द्वेषाच्या कुवतीबाहेरचा आहे.)

पण द्वेषाचा वापर हत्यार म्हणून करणारे शत्रू आणि द्वेष यांचा क्रम उलट करतात. ‘अन्याय करणाऱ्या बलाढ्य शत्रूचा द्वेष’ याऐवजी अगोदर द्वेषाची पेरणी करून शत्रुत्वाची निर्मिती करतात. मग त्या द्वेषाचा विषय असलेला तथाकथित शत्रू बलाढ्य नसला आणि अन्याय करण्याच्या स्थितीत नसला तरी बिघडत नाही. एकदा द्वेषाने मनाचा ताबा घेतला की माणूस विवेक विसरतो. स्वत:चं हित विसरतो. द्वेषातून अन्यायाचं परिमार्जन होत नाही, द्वेषामधून नवीन अन्याय घडतो.

आणि ‘आता द्वेषाचं काम झालं, आता द्वेष विसरून जा,’ असं म्हणता येत नाही! द्वेषाला मग नवनवीन सावजं शोधत रहावं लागतं.

४.

जुनी गोष्ट आहे. एकदा मी सत्यदेव दुबेंना भेटायला गेलो असताना गोविंद निहलानी भेटले. आम्ही दोघेच तिथे दुबेची वाट पहात होतो. ऐकायला तिसरा नाही, याचा फायदा घेत मी माझ्या मनातलं एक निहलानींकडे बोलून गेलो. त्यांना सांगितलं की ‘‘अर्धसत्य चांगला सिनेमा आहे पण त्यातली हिंसा बघताना माझ्या आत हिंसा जागली. खूप एक्साइट झालो. तुम्हाला हे अभिप्रेत होतं का?’’ त्यांना आश्चर्य वाटलं.


पुढची चर्चा महत्त्वाची नाही. मलाच नंतर कळलं, की दोष चित्रपटाचा नाही. इन्स्पेक्टर वाकणकरशी मी तद्रूप झालो आणि तो करू लागलेल्या हिंसेने चेतावलो. मन असमाधानी, ॲसिडिक, चिडचिडलेलं असलं की मनात हिंसा तयार होते आणि ती व्यक्त होण्यासाठी वाट शोधते. मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर पाकिटमार सापडला की गर्दी त्याला बेदम मार देताना मी पाहिलं आहे. कसलाही संबंध नसलेले लोक आत घुसून दोन गुद्दे लाथा घालून येत. आपलंसुद्धा तसं होऊ शकतं की काय, या शंकेने तेव्हापासून मी स्वत:च्या विचारांवर आणि कृतीमागच्या प्रेरणांवर बारीक लक्ष ठेवू लागलो.

इंग्रजीत म्हण आहे, कॉल अ डॉग मॅड अँड शूट हिम. कुत्रा पिसाळलेला हवाच असं नाही. गोळी घालायची आहे, हे मात्र नक्की. मग आपणच ठरवायचं की कुत्रा पिसाळला आहे. असं ठरवल्यावर गोळी घालताना मनाला त्रासही होणार नाही!

अस्वस्थ मनं असं काहीतरी स्वीकारायला तत्पर असतात. पाकिटमार वाईटच असतो. त्याला लाथ घालताना सुखच मिळणार. साउथच्या चित्रपटातले हिरॉइनला छळणारे गुंड किती वाईट असतात! मग त्यांना जेव्हा हिरो तुडवू लागतो, तेव्हा प्रेक्षक सुखी होणारच. हिंसा होताना बघितली तरी सुख मिळतं अशावेळी.

मात्र यापुढे एक सांगायला हवं की एकेकट्याने हे सुख घेणाऱ्यांचा जमाव तयार झाला की जमावातल्या प्रत्येकाचे हात हिंसा करायला शिवशिवू लागतात.

बरोबर?

2 comments:

  1. "परस्परसहकार्य म्हणजेच अहिंसा!". तेव्हा हा "one way traffick" नाही. It is founded on mutuality. ती प्रत्येकाने पाळली तरच उपयोग. हे कसे होऊ शकेल?

    दुर्बलांच्या तोंडून अहिंसेचा उपदेश काय कामाचा? हिंसा करू शकणार्‍या बलवानांनी अहिंसा पाळायला हवी, अहिंसेचा प्रसार करायला हवा, हिंसकांना जरब बसवायला हवी, व त्यासाठी जरूर ती शक्ति मिळवायला हवी.

    ReplyDelete
  2. अगदी नि:संशय बरोबर!!!

    ReplyDelete