‘माफिया क्वीन’ला मुख्य भूमिका देऊन बनवलेला चित्रपट. ज्यात बाईचं चारित्र्य
आणि पुरुषाचं सामर्थ्य या देशी जनमानसातल्या दोन मूल्यांना काळजीपूर्वक जपण्यात आलं
आहे.
हे परीक्षण नाही.
मुंबई हे एकूणच कामासाठी, रोजगारासाठी घर सोडून दूर रहाणाऱ्या लोकांचं गाव होतं, आहे. ‘लोकांचं’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, ‘पुरुषांचं’ असं म्हणायला हवं (त्यामुळे मुंबईत स्त्री-पुरुषांचं प्रमाण व्यस्त आहे.) हा सिनेमा जवळ जवळ सगळा मुंबईच्या कामाठीपुरा या वस्तीत घडतो. चित्रपटाचा काळ आजचा नाही, १९५० नंतर सुरू होऊन १९६५ च्या आसपास संपणारा आहे. त्या काळात कामाठीपुरा - फॉकलंड रोड ही प्रामुख्याने वेश्यावस्ती होती. आशिया खंडातला सर्वात मोठा वेश्याव्यवसाय तिथे चालतो, अशी ‘कीर्ती’ होती. तो कामाठीपुरा आज पूर्ण बदलून गेला आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेली लाख नव्हे, अब्ज मोलाची जमीन दरिद्री वेश्यांच्या बकाल वस्तीखाली राहणं, उदारीकरणानंतरच्या काळात अशक्य होतं. आणि इंटरनेट-मोबाइल यांनी शक्य केलेल्या सहजसंपर्कामुळे खूप जास्त वेश्या खूप कमी क्षेत्रात कोंबलेल्या आहेत, असा वेश्यांचा एक घेट्टो असण्याची गरजही उरली नाही.
‘गंगूबाई..’मध्ये तो काळ कसा पकडला आहे?
कामाठीपुरा- खरा |
रस्त्यांची रुंदी कमी आहे, ते चिंचोळे आहेत. रस्त्यांवरून फिरणाऱ्या गाड्या जुन्या मॉडेलच्या आहेत. कधी मधी व्हिक्टोरिया नावाचा टांगासुद्धा फिरतो. दोन घोडे जोडलेला चार चाकांचा आणि इच्छा झाल्यास वरून छप्पर बंद करून घेण्याची मुभा असलेला शोभिवंत टांगा, व्हिक्टोरिया! तिथल्या रस्त्यावरून चालणाऱ्या पुरुषांचे पोशाख त्या काळातले आहेत. म्हणजे काही पुरुष धोतर-कोट-टोपी घातलेले आहेत. चित्रपटात पोलीस आहेत. त्यांचे गणवेश निळे आहेत. मुंबईतले पोलीस (इन्स्पेक्टर नाही, सामान्य पोलीस) तेव्हा निळ्या अर्ध्या पँटी घालत.
सुरुवातीला पार्श्वभूमीवर अगदी बारीक आवाजात तलत महमूदचं ‘आ तेरी तसवीर बना दूँ’ हे गाणं वाजतं. हे गाणं आहे, १९५१ सालच्या ‘नादान’ या चित्रपटातलं. पुढे लग्नाच्या बँडमध्ये १९५८ मधल्या ‘अल हिलाल’मधलं प्रचंड लोकप्रिय झालेलं ‘हमें तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने’ हे गाणं वाजतं. तिथल्या चाळी, तिथली सिनेमा थिएटरं, तिथे चालू असलेल्या चित्रपटांची नावं आणि त्यांची पोस्टरं, सगळ्याचं रूप त्या काळाला अनुरूप आहे. चित्रपटात दोन तीन वेळा रेल्वे प्रवास आहे. बाहेरून आणि आतून ट्रेन दिसते. गाडीचं इंजीन वाफेचं, धूर सोडणारं आहे. झुक झुक करत जाणारं. डब्याच्या अंतर्भागात लाकडी बाकडी आहेत. मुंबईत तेव्हा चालणारी ट्राम तेवढी दाखवलेली नाही! (जी परेश मोकाशीच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या मराठी चित्रपटात आहे!)
चित्रपटात पुढे गंगूबाई पंतप्रधानांना भेटायला दिल्लीला जाते. भेटते. पंतप्रधान बंद गळ्याचा काळा कोट घालून येतात आणि त्यांच्या कोटाच्या बटनात लाल गुलाबाचं फूल असतं! जवाहरलाल नेहरूंच्या कोटात त्यांच्या पत्नीची आठवण म्हणून सदैव लाल गुलाबाचं फूल असे, हे नेहरूंविषयी थोडीफार माहिती असलेल्यांना माहीत आहे. म्हणजे चित्रपटातले पंतप्रधान काल्पनिक पात्र नसून नेहरू आहेत, असं (तसं स्पष्ट म्हटलेलं नसलं तरी) गृहीत धरायला हरकत नाही. पुन्हा तपशिलाकडे बारीक लक्ष दिल्याची, तपशिलांमधून काहीतरी सांगत गेल्याचीच ही खूण होय, असंही म्हणता येतं.
म्हणून एक बारीक माहिती नोंदवावीशी वाटते. १९२५ मध्ये जवाहरलाल नेहरू अलाहाबाद (आता प्रयागराज) म्युनिसिपल काउन्सिलचे चेअरमन होते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका स्त्रीने मध्यवर्ती वस्तीत घर घेण्यासाठी केलेला अर्ज एका अधिकाऱ्याने फेटाळला होता, तो नेहरूंपुढे आला. नेहरूंनी अधिकाऱ्याच्या शेऱ्याला धुडकावून अर्ज मंजूर केला आणि स्वत:चा शेरा लिहिला, ‘‘शहरातल्या सर्वसाधारण भागात वेश्येला घर देऊ नये, ही सूचना जर स्वीकारायची झाली, तर वेश्यांसारख्या बायकांचं शोषण करणाऱ्या पुरुषांच्या घरांसाठीसुद्धा शहरात वेगळी जागा ठरवावी लागेल; कारण वेश्याव्यवसाय चालू रहाण्याला तेसुद्धा जबाबदार आहेत.’’
(कृपया ही माहिती तपासून घ्यावी. आजकाल पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या कोणाही नेत्याच्या कार्यक्षमतेचा, कुशाग्र बुद्धीचा गौरव करणाऱ्या निनावी पोस्टी फेक फॅक्टरीतून बाहेर पडत असतात. हेदेखील त्यातलंच, असं वाटणं सहाजिक आहे.)
हे पटकथाकाराला, कथाकाराला माहीत नसावं. असतं, तर तपशिलांकडे बारीक लक्ष देणाऱ्या या चित्रपटात पंतप्रधानांच्या तोंडी याला धरून काहीतरी उद्गार नक्की आला असता!
असो. तर यामुळे चित्रपटाचा काळ १९५० ते (नेहरूंच्या निधनापर्यंत) १९६४ (किंवा थोडा पुढे) यात कुठेतरी आहे, असं आपण ठरवू शकतो. आणि तसं ठरवल्यावर चित्रपटातल्या घटना, पात्रांचं वर्तन यांमधून स्थळकाळानुरूप असा योग्य अर्थही काढू शकतो.
चित्रपटातल्या सर्व घटना, सर्व व्यक्तिरेखा ‘खऱ्या’ वाटतात. म्हणजे, वेश्यांच्या घरवाल्या, तिथला दातांचा डॉक्टर (हा चिनी आहे आणि त्या काळी मुंबईत पुष्कळ चिनी डेंटिस्ट होते. रेड लाइट एरियात तर होतेच होते), तिथला टेलर, खुद्द वेश्याव्यवसाय करणाऱ्या, तिथे फसून येणाऱ्या मुली या सगळ्यांचं रूप आणि वावर यात काही खोट नाही. हिंदी चित्रपटांच्या मुख्य धारेत रूढ असणारा कृतक अभिनय कोणीही करत नाही. आलियाला फसवणारा रमणिक (वरुण कपूर) खरा दिसतो, कव्वाली गाणारी हुमा कुरशी खरी दिसते, अगदी अजय देवगणचा लालासुद्धा खरा वाटतो. त्याची चाल, त्याचा रुबाब बघून वाटतं, त्या एरियाचा जो कोणी डॉन असेल, तो असाच दिसत असेल, असाच वावरत असेल. याचीच दहशत वातावरणात असेल आणि हाच त्या सगळ्यांना तारणहार वाटत असेल. कोणी अभिनयच करताना जाणवत नसल्याने कथानकाला आपोआप वजन प्राप्त होतं. प्रेक्षक चित्रपटात रंगून जातो. एक प्रकारे सहभागी होतो.
तरीही चित्रपट अधून मधून कंटाळवाणा होतो. का?
कारण चित्रपटाची पटकथा सैल आहे. म्हणजे, तिची वीण घट्ट नाही. एका सीनमधून पुढचा, त्यातून त्याच्यापुढचा, असं करत चित्रपटातल्या कथनाला वेग मिळतो, असं होत नाही. प्रसंग सुटे सुटे समोर येतात. एकेका प्रसंगातून काहीतरी अवश्य मांडलं जातं; पण त्यात प्रवाह तयार होत नाही. म्हणजे, गंगूबाई एकदा घरी फोन करते. इमोशनल सीन आहे. तेवढा एकच सीन बघितला, तर ‘वा! काय ॲक्टिंग तोडलीय!’ असा उद्गार बाहेर पडू शकतो. प्रेक्षक भारावून जातो. पण
त्यातून पुढे काही घडण्याला दिशा, बळ असं काही मिळतंय, असं होत नाही. ती एकदा प्रेमात पडते. तेव्हा अर्थातच तिचं प्रेम एका सीनमध्ये आटपत नाही; पण काही सीन्सनंतर ते आटपल्यावर पुढच्या कथानकात त्याचा काही संदर्भ येत नाही. तिची मैत्रीण मरते, त्याचंही तसंच. प्रत्येकच प्रसंगाचं हे असं होतं. गंगूबाईच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू प्रेक्षकासमोर उलगडत जातात; पण हे उलगडणं कथानकाच्या ओघात होत जात नाही. एकेका वैशिष्ट्याची भर पडत गंगूबाईच्या व्यक्तिमत्वाला भरीवपणा येतो, असंही होत नाही. एका सीनमागून एक असा चित्रपट ‘संपत जातो’. काहीसा कंटाळवाणा होतो.
या ‘तुकडे तुकडे’ सादरीकरणाला अपवाद म्हणजे गंगूबाई आणि रझियाबाई यांच्यातला संघर्ष. इतर सर्व प्रसंगांप्रमाणे हा भागसुद्धा नाट्यपूर्ण, भडक मेलोड्रामाने भरलेला आहे. गंभीर, संथ आवाजात धमक्या दिल्या जातात आणि पुढच्या नाट्याकडे संकेत केला जातो. आता, हे जर दोन पुरुषांमध्ये घडलं असतं, तर त्याची अपरिहार्य परिणती घनघोर मारामारीत झाली असती. इथे एक बाई, एक तृतीय जेण्डर. मग नुसत्या डायलॉगबाजीवर मारून न्यावं लागतं. म्हणून डायलॉग जास्तीत जास्त उग्र करावे लागतात. नायिका सोडून इतर सर्व पात्रं सामान्य रूप-रंगाकडे झुकत असताना रझियाबाई चांगलीच भडक रंगातली आहे, ती याचमुळे!
संपूर्ण चित्रपटात भडकही नाही आणि सर्वसामान्यसुद्धा नाही, अशी व्यक्तिरेखा अर्थात नायिकेची. पण मुख्य भूमिकेतली आलिया भट गंगूबाईच्या भूमिकेला योग्य नाही. पार्श्वभूमीच्या सगळ्या वास्तवदर्शी चित्रणात ती अजिबात बसत नाही. खटकत रहाते. बाकी सगळ्या बायका कळकट, सामान्य रूपाच्या असताना ही तेवढी नितळ कांतीची, सडसडीत देहयष्टीची, रेखीव चेहरेपट्टीची आहे. कामाठीपुऱ्यात जिंदगी घालवल्यावर तरी हे असं राहता येत नाही! ‘गंगूबाई माफिया क्वीन’ असं तिचं वर्णन केलं जातं. गंगूबाई हे पात्र कसं आहे? तिचा वावर, तिचा रुबाब, तिचा दबदबा एका सीनियर सिटिझनसारखा आहे. सुरुवातीला कोवळी असताना काही काळ ती इतरांच्या दबावाखाली असते; पण एकदा जम बसल्यावर ती पूर्ण वेळ ‘अमिताभ बच्चन’ आहे. दिसण्याच्या बाबतीत ‘मंडी’तल्या शबानाशी तुलना करणं बरोबर नाही, एकीसारखीच दुसरी असावी, असं मुळीच नाही. पण शरीरविक्री करण्याच्या व्यवसायातली स्त्री - अशी सडसडीत, कोवळी सिनेमाभर दिसत रहाणं काही बरोबर नाही. अलियाला मेकपच्या सहाय्याने वयस्क दाखवणं आजच्या सिनेमातंत्राला सहज शक्य होतं. ती दारू पिते, सिगारेट ओढते. तिच्या धंद्यात, कामात भरपूर ताणतणाव असतात. अशा परिस्थितीत तिच्यावर वयाच्या खुणा दिसायला हव्यात. अगदी शेवटचा भाग सोडला, तर आलिया तिथल्या सर्व बायकांपेक्षा गोरी, नाजुक, सरळ सरळ सुंदर आणि स्वच्छ-सोवळी दिसत रहाते.
असं म्हणावं का, की आपल्या इथल्या चित्रपटांमध्ये नायिका सर्वात उजवी असणं अपरिहार्य असतं, म्हणून हे असं आहे? तिच्या निकट येणाऱ्या सगळ्या बायकांपेक्षा गंगूबाई उंचसुद्धा आहे! वास्तवात आलिया ५ फूट २ इंच उंच आहे. म्हणजे आजच्या जगात सरासरीच्या खालीच. पण नायिका (बायकांमध्ये; पुरुषांपेक्षा कमी उंचीची असल्यास ती खटकण्याची बाब नव्हे!) कोणापेक्षा बुटकी असणं, हे मुख्य धारेतल्या चित्रपटात एक अर्थपूर्ण विधान असावं लागतं. इथे ती इतर सर्व पात्रांवर (पुन्हा एक पुरुष सोडून) वर्चस्व गाजवते. उंचीत कमी असून वर्चस्व गाजवणारी बाई हे इथल्या रूढ संकेतांनुसार एक वेगळं पात्र ठरलं असतं. ते तसं रंगवण्यापेक्षा तिला उंच दाखवून इतरांपेक्षा ती कशी भारदस्त आहे, असं सुचवणं सोपं ठरतं.
(एवढं म्हटल्यावर पुढे हेसुद्धा सांगायला हवं की आलिया भटने अचाट अभिनय केला आहे. भूमिका तिला मुळीच शोभत नाही, हे ती अभिनयाच्या जोरावर विसरायला लावते. तिची थेट बघणारी नजर, तिचा खणखणीत, जाड आवाज, तिची धीमी चाल आणि एकूणच संयमित भावनाप्रदर्शन यातून एक ‘माफिया क्वीन ऑफ कामाठीपुरा’ साकारते.)
स्थळ आणि काळ यांच्या बाबतीत तपशिलांकडे अत्यंत बारीक लक्ष देणाऱ्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेतली बाई साऱ्या ‘खऱ्या’ वाटणाऱ्या परिसराला अजिबात विसंगत असल्याचा परिणाम असा होतो की चित्रपट आपल्याच जगात केव्हातरी कुठेतरी घडलेला असा, ‘खरा’ वाटतो आणि तिथे वावरणारी गंगूबाई आपल्या मनोराज्यातली स्वर्गीय देवता वाटत रहाते. तिथे राज्य करणे, तिथल्या सगळ्यांची मनं जिंकणे, हा तिचा सहज अधिकार वाटू लागतो. ती सुपरवूमन होऊन जाते.
चित्रपट सर्रियल होतो! स्वप्नरंजनाच्या पातळीवर उतरतो.
आणखी एक. चाळी, चिंचोळे रस्ते, गज असलेले दरवाजे आणि तशाच भिंती, असं सगळं असलं तरी वास्तवात या सगळ्यावर पसरून बसलेला बकालपणा चित्रपटात नाही. ‘गंगूबाई काठियावाडी’मधलं नेपथ्य वास्तवाशी जवळीक साधणारं जरूर आहे; पण ते सुबक आहे. त्यात कळकटपणा नाही. दुर्गंध नाही, अंधारे बोळ नाहीत. विटलेल्या वेश्या नाहीत. तिथे शरीर विकू पहाणाऱ्या वेश्या काही तरुणच नसत. उताराला लागलेल्यासुद्धा असत. काही वेश्यांना मुलं होती आणि ती (चित्रपटात वेगळं दाखवलं असलं तरी) शाळेतही जात. तिथले चहावाले, तिथल्या रांडांचे यार-कम-भडवे, या सगळ्यांना सामावून घेणारं तिथे स्थिरावलेलं कल्चर, त्या कल्चरचे घटक यांना या चित्रपटात स्थान नाही. पात्रांच्या नातेसंबंधातल्या वातावरणावर बकालपणाची छाया नाही.
वेश्यांच्या जगात काही पुरुष त्यांची बांडगुळं बनून जगत असतात; पण ते पुरुष धटिंगणच असतात. गंगूबाई त्यांना वठणीवर कशी आणते? तिची उदारता दिसते; पण कमाई कुठून, हे स्पष्ट होत नाही. अशा वस्तीत जाणारे पुरुष मुख्यत: संध्याकाळी जातात. बहुधा दारूच्या अंमलाखाली असतात. धसमुसळे वागतात. त्यांच्यातले बहुसंख्य कष्टकरी असतात. त्या वस्तीला ‘मुंबईचं अधोविश्व’ म्हणण्याचं कारण केवळ वेश्या हे नाही; कुणाही स्वच्छ जगणाऱ्याला, ‘पांढरपेश्या’ला तिथे किळसच आली असती.
या चित्रपटात याचा मागमूस नाही. जणू सगळं नेपथ्य साबण लावून स्वच्छ धुवून घेतलं. जणू त्या मनोराज्यातून भूतलावर अवतरलेल्या देवतेसमान नायिकेचे पाय मळता कामा नयेत. वेश्या जेव्हा तिला नेता ठरवतात, तेव्हा ‘यानंतर तू फक्त आमची पुढारी, तू कुठल्याही पुरुषाच्या इच्छेखातर त्याची शय्यासोबत करणार नाहीस’ असं म्हणतातच!
याला संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाने प्रेक्षकाच्या मनोवृत्तीचा घेतलेला वेध म्हणावं की संजय लीला भन्साळीच्या स्वत:च्या मूल्यजाणिवांचं प्रतिबिंब म्हणावं? त्याच्या ‘देवदास’मध्ये देवदास आणि पारो हे नायक-नायिका. नायिकेचं लग्न भलत्याच कोणाशी होतं. पण भन्साळीच्या चित्रपटातला हा नायिकेवर एक प्रकारे हक्क नसलेला तिचा नवरा लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला सांगून टाकतो की ‘तुझा माझा शरीरसंबंध येणार नाही!’ म्हणजे नायिकेचं शरीर ‘परक्या’च्या स्पर्शाने कलंकित होत नाही! ‘हम दिल दे चुके सनम’मध्येही तेच. जोपर्यंत नायिकेच्या मनात वेगळा पुरुष असतो, तोवर तिच्या शरिराला तिचा नवरासुद्धा ‘मलीन‘ करत नाही! लग्नाच्या बायकोला, वेश्याव्यवसाय करणारीला शरिराने शुद्ध ठेवू बघणे, यात बाईला मालमत्ता मानण्याची पुरुषवर्चस्वाचीच भावना व्यक्त होते.
पुरुषवर्चस्व व्यक्त करणारी आणखी एक गोष्ट. कामाठीपुऱ्यावरच नव्हे, तर थेट धारावीपर्यंत जिचा दबदबा असतो, त्या बाईची पॉवर तिला एका पुरुष डॉनच्याच कृपेने मिळालेली असते! त्याच्या आश्रयाखाली राहूनच ती सत्ता गाजवते. हेसुद्धा भन्साळीचं मूल्य की भारतीय प्रेक्षकांचा - पुरुषांचा आणि बायकांचा, दोन्हींचा - कल?
तर असा हा एका ‘माफिया क्वीन’ला मुख्य भूमिका देऊन बनवलेला चित्रपट. ज्यात बाईचं चारित्र्य आणि पुरुषाचं सामर्थ्य या दोन देशी जनमानसातल्या मूल्यांना काळजीपूर्वक जपण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment