Friday, August 10, 2012


निमित्त: राजेश खन्ना


खूप खूप वर्षं झाली. बारीकशी आठवण आहे; पण स्पष्ट स्मरते आहे. कॉलेजला चाललो होतो. एक वर्गमित्र भेटला. नुकतीच कानी पडलेली, पहिल्या सूर्यकिरणात पाकळीवरचा दवबिंदू लख्खकन चमकावा आणि त्याने उजाडल्याची हर्षभरित वर्दी द्यावी, अशी भासलेली एक चाल मी गुणगुणत होतो. वर्गमित्र गंभीर प्रकृतीचा होता. शास्त्रीय संगीतातला होता. माझं गुणगुणणं ऐकून त्याचे डोळे उजळले. "काय मस्त चाल आहे, नाही!" तो उद्‍गारला. मीही तेव्हा ’जुन्या’, म्हणजे १९५९ अगोदरच्या हिंदी गाण्यांमध्ये पूर्ण बुडालो होतो. त्याला आणि मला, दोघांना भावून जातं म्हटल्यावर मी खूणगाठ बांधली, ’मेरे सपनोंकी रानी’ हे आणखी एक लोकप्रिय गाणं रहाणार नाही; ते मोठं होणार.

झालंच ते मोठं. किशोर कुमार नावाचा सूर्योदय झाला. मास हिस्टेरियाचं पहिलं उदाहरण ठरणारा राजेश खन्ना नावाचा पहिला सुपरस्टार जन्मला. आज ’आराधना’ बघताना कळतं की नाही, माहीत नाही; पण तेव्हा त्यातली गाणी, किशोरचा आवाज, राजेश खन्नाचं प्रसन्न, दिलखुष व्यक्‍तिमत्त्व या सगळ्याने तरुणांचा ताबाच घेतला. वातावरणातली उदासीनता जणू गायब झाली आणि सर्वत्र उत्साह सळसळू लागला. हिंदी चित्रपटातल्या असल्या घडामोडी आणि देशातलं राजकीय, आर्थिक-सामाजिक वातावरण यांचा थेट संबंध लावून दाखवता येतो. १९६९ साल हे इंदिरा गांधींच्या प्रेरणेने काँग्रेसमधल्या ’तरुण तुर्कां’नी काँग्रेसमधल्या जुनाट धेंडांना धक्का देऊन काँग्रेस फोडण्याचं, बँकांचं राष्ट्रीयीकरण होण्याचं, संस्थानिकांचे तनखे बंद होण्याचं आणि ’गरिबी हटाव’ हा नारा उदयाला येण्याचं वर्ष होतं. लावणार्‍यांनी संबंध लावावा!

राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर भरपूर लिहून आलं. मेल्यानंतर एकदा, फक्‍त एकच वेळ मृत्यूलोकात डोकावण्याची मुभा मरणार्‍याला असायला हवी. स्वतःवर विलक्षण प्रेम करणार्‍या राजेश खन्नाला किती बरं वाटेल! मी त्या बरं वाटण्यात थोडी भर घालू इच्छितो. त्याच्या ज्या सिनेमांवर वाचायला मिळालं नाही, त्यांची दखल घेतो.

सफर, इत्तेफाक आणि बहारोंके सपने. सफर अगदी रोमँटिक सिनेमा होता. आनंद, नमकहराम यांच्याप्रमाणे इथेही राजेश खन्ना मेला होता. पण सगळ्यांनी (शर्मिलाने सुद्धा तिला जमेल तितका) अंडरप्ले करणारा अभिनय केला होता. फिरोज खानची चांगली म्हणावी अशी भूमिका त्यात होती. आम्ही कॉलेजातली मुलं तर त्यातल्या राजेश खन्नावर पागलच झालो. चित्रकार. ’जीवनसे भरी तेरी आँखे मजबूर करे जीनेके लिये’ हे साधंसुधं आणि हिंदी सिनेमातल्या सहजसोप्या शब्दरचनेला न जुळणारं गाणं जो तो गुणगुणत होता. गुरु शर्ट तेव्हाच आला की काय? अत्यंत नाटकी घटनांचा हा सिनेमा अ-भडक सादरीकरणामुळे पसंत पडला.

इत्तेफाक. एका रात्रीत घडतो. पात्रं दोन. राजेश खन्ना आणि नंदा. पोलिसांच्या ताब्यातून की वेड्यांच्या हॉस्पिटलातून पळालेला तो तिच्या बंगल्यात घुसतो. भल्या मोठ्या बंगल्यात ती एकटी. हा वेडसर. तिच्या नवर्‍याचा खून झालेला. वगैरे. बारीक तपशील आठवत नाहीत. आठवतं ते हे की सिनेमात एकही गाणं नव्हतं. भरीव नंदा सिनेमाभर घट्ट साडीत. आणि कसलीही वेडीबागडी लकब न पांघरता डोक्याने सटकलेला दिसणारा राजेश खन्ना. हा वेडा नसावा, अंगावर कोसळलेल्या परिस्थितीमुळे बिघडलेला असावा, असा संशय येत रहातो. सिनेमाभर सस्पेन्स आणि ताण बर्‍यापैकी टिकून रहातो. शेवट तर मस्तच. बरं वाटलं होतं की एक टॉपचा हिरो असला अनग्लॅमरस रोल करतो.

बहारोंके सपने तर ब्लॅक अँड व्हाइट होता. गिरणीकामगारांवर होता. जुन्या, नया दौर, उजाला, वगैरे सिनेमांच्या पठडीतला होता. यातही राजेश खन्ना मरतो. पण सिनेमात नायक-नायिका बागेत जाऊन एकही प्रेमगीत म्हणत नाहीत. यातली गाणी वेगळीच होती. आर डी बर्मनची प्रायोगिकता. ’आजा पिया’ हे गाणं खटकत चालतं. ’चुनरी संभाल गोरी’ हे समूह गीत. मन्ना डे आणि लता. मला सतत मधुमतीतल्या ’बिछुआ’ची आठवण येत रहायची आणि राग यायचा. ’क्या जानू सजन’ या गाण्यात तर लता गात असताना मागे लताच्याच आवाजातली आलापी!

यातला गिरणी कामगाराचा मुलगा आवडला. बेकार. चटकन डोक्यात राख घालून घेणारा. संपूर्ण सिनेमाप्रमाणे राजेश खन्नाही साफ अनग्लॅमरस.

मी राजेश खन्नाचा फॅन नव्हतो (तेव्हा डोक्यात जुनी गाणी आणि राज-दिलीप-देव यांचा माहोल असे). तरी आराधनासकट दो रास्ते, बंधन, आपकी कसम असे मुमताजबरोबरचे आणि वर उल्लेख केलेले त्याचे सिनेमे मी पाहिले. नंतर त्याची स्टाइल खटकू लागली. पुढे जंजीर, दीवार आले आणि राजेश खन्ना पाचोळा होऊन उडून गेला. मला दुःख झालं नाही. पण नंतर नंतर वाढत्या प्रमाणात कृतक होत गेलेल्या या सुपरस्टारबद्दल एक आपुलकी वाटत राहिली. एका मुलाखतीत ’टिना मुनीम आणि तुम्ही किती जवळ आहात’ अशा किंवा तत्सम प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, ’आम्ही एकच टूथब्रश वापरतो!’ यातली उद्धट फिरकी आवडली आणि लक्षात राहिली. तेव्हाची आघाडीची फिल्मी पत्रकार देवयानी चौबळ ऊर्फ देवी खूप आठवली. तिची आणि त्याची घट्ट मैत्री होती. डिंपलला मुलगी झाली, तेव्हा तिचं नाव काय ठेवणार, हे ती सांगणार होती. नाव ठरलं होतं ’चिनार’. पण तेवढ्यात चिनार नावा़ची सिगारेट आली आणि मुलीचं नाव बारगळलं. कसं वाटलं असतं ट्विंकलला चिनार म्हणायला?

असो. हिंदी चित्रपटसृष्टीतला तो एक मैलाचा दगड. दुरून दिसणारा. एक तरुण घाबरून म्हणाला, "जुने, म्हातारे जातात; पण राजेश खन्ना जातो म्हणजे मृत्यू आपल्यापर्यंत येऊन पोचल्यासारखं वाटतं यार!" या उद्‍गारांमध्ये त्याला मोठी श्रद्धांजली आहे, असं वाटतं.


1 comment: