Thursday, October 11, 2012

इंग्लिश विंग्लिश - एक किंचित कॉमेंट



मला ही एक सरळसोट स्टोरी वाटली. पूर्ण प्रेडिक्टेबल रस्त्याने चालणारी. एकही अनपेक्षित वळण न घेणारी, एक फील गुड कथा. उत्तम कास्टिंग हे या चित्रपटाचं सामर्थ्य आहे. काम चांगलं-वाईट असं सुचूच नये, इतके सगळे सहज वाटतात. अर्थात श्रीदेवीचा अभिनय थोर. बोलका चेहरा आणि तेवढीच बोलकी देहबोली, यांच्यामुळे शब्दांचं काम कमी झालं आणि इंग्लिश - हिंदी अशा उड्या मारणारा हा चित्रपट शब्दबंबाळ झाला असता, तर नक्की नीरस ठरला असता.
आपण उद्योजक आहोत, हे ऐकल्यावर आणि उमजल्यावर तिच्यात आत्मविश्वास येतो हे नीट दाखवलं आहे. मी तर म्हणेन, शशी या 
पात्राचा ग्राफ - सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिच्यात होणारा विकास - बटबटीत न करता फार शांतपणे आणि तरीही स्पष्ट दाखवला आहे. 
राधा judgemental चा अर्थ सांगते, तेव्हा शशीचंच उदाहरण देते. काय? की तुझ्या बाह्य रूपावरून तुला conservative ठरवणं 
judgemental होईल. आणि नसतेच ती बुरसटलेली. न्यू यॉर्कच्या इंग्लिश वर्गात ती बुजत नाही. फ़्रेंच मित्राच्या वागण्याने गोंधळून जात नाही. त्याला प्रोत्साहन देत नाही पण त्याच्यापासून पळूनही जात नाही. राधा छान म्हणते, होता है कभी कभी! शशीला खरंच प्रेमाची गरज नसते. ते तिचं अंग भारतीय कुटुंबव्यवस्थेने केव्हाच ठार मारून टाकलेलं असतं. आणि त्याच कुटुंबावर ती पूर्ण dependent झालेली असते! फॅमिली म्हणजे काय, हे तिचं आकलन किती नेमकेपणाने सांगते ती. ते सांगणं जेवढं कुटुंबाला असतं, तेवढंच फ्रेंच मित्राला उद्देशूनही असतं. मला तर वाटतं, शशीला जे नीटसं कळलेलं नसतं (की कुटुंबाने, नवरेशाहीने तिला गुलामगिरीतच महासुख मानायला शिकवलेलं असतं), ते तिच्या नवर्‍याला नीट कळतं. म्हणून तो तिला शेवटी (भावनिकपणे नव्हे, अतिशय शांतपणे) विचारतो, तू अजून माझ्यावर प्रेम करतेस?

आता मला खटकलेल्या गोष्टी.
हे कुटुंब ’गोडबोले’ दाखवायची गरज होती का? पुण्यात रहाणारे पंजाबी दाखवले असते, तरी चाललं असतं. गोडबोले सकाळी ब्रेकफास्टला पराठे का खातील? हिंदी पेपर का वाचतील? शशी जे लाडू बनवते, ते मोतीचुराचे नाहीत, साधे बुंदीचेही नाहीत; ते उत्तरेतले आहेत. भारत हा एक बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देश आहे, असं विधान एनाराय आणि परदेशी प्रेक्षक यांच्यासाठी अडचणीचं, पचनी पडायला कठीण ठरेल किंवा कथेला अनावश्यक फाटा फोडेल; म्हणून हा गोलमाल का? ’हिंदी न येता तुम्ही नाही का भारतात रहाता?’ हा प्रश्न अमेरिकनाला निरुत्तर करत असेल; पण बिगरहिंदी भाषकाचा अनुल्लेखाने अपमान करणारा आहे.

तरीही ’पास’! उत्तम मार्कांनी पास.

आता पुढचं.
ही गोष्ट अर्थात इथे संपत नाही. ज्ञानाचा प्रकाश लाभलेली आणि सजग होण्याच्या रस्त्याला लागलेली बाई पुढे कुठे जाईल? कुटुंबासाठी स्वत्वाचा ती होम करेल, हे उत्तर निव्वळ male chauvinistic आहे. असा होम करणे ही घोर शोकांतिका असते, हे दाखवता येईल? तिच्या newly enlightened नवर्‍याचं काय होईल? तिच्याकडून डबा भरून घेताना त्याला त्रास होईल की नाही? की तिला लाडूंचा व्यवसाय ऑफिशियली खोलून देऊन तो सोयीस्कर सुटका करून घेईल? तिचा रस्ताही खड्ड्यांनी भरलेला आहे. तो टाळला आणि कौटुंबिक स्थैर्यासाठी मन मारून ढिम्म रहाण्याचा पर्याय पत्करला, तर मन मारण्याची हिंसा तिला अस्वस्थ करेल, त्या अस्वस्थतेला भलतीकडे वाट शोधावी लागेल. आणि एक आत्मनिर्भर व्यक्‍ती म्हणून जगात पाऊल टाकायचं ठरवलं, तरी सुरळीत प्रवासाची काहीच गॅरंटी नाही, जी कोणालाच नसते! ज्या बायका ’पूर्ण माणूस’ होण्याचं टाळून घरात अर्धांगिनी ऊर्फ बंदी होऊन रहातात, त्यांना भवसागरात गटांगळ्या खाण्याची वेळ येत नाही, त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची रहाते. शशीच्या मुठीत काय आणि किती असेल?

शिंदेबाई, सीक्वेल काढाच! 

Friday, August 10, 2012


निमित्त: राजेश खन्ना


खूप खूप वर्षं झाली. बारीकशी आठवण आहे; पण स्पष्ट स्मरते आहे. कॉलेजला चाललो होतो. एक वर्गमित्र भेटला. नुकतीच कानी पडलेली, पहिल्या सूर्यकिरणात पाकळीवरचा दवबिंदू लख्खकन चमकावा आणि त्याने उजाडल्याची हर्षभरित वर्दी द्यावी, अशी भासलेली एक चाल मी गुणगुणत होतो. वर्गमित्र गंभीर प्रकृतीचा होता. शास्त्रीय संगीतातला होता. माझं गुणगुणणं ऐकून त्याचे डोळे उजळले. "काय मस्त चाल आहे, नाही!" तो उद्‍गारला. मीही तेव्हा ’जुन्या’, म्हणजे १९५९ अगोदरच्या हिंदी गाण्यांमध्ये पूर्ण बुडालो होतो. त्याला आणि मला, दोघांना भावून जातं म्हटल्यावर मी खूणगाठ बांधली, ’मेरे सपनोंकी रानी’ हे आणखी एक लोकप्रिय गाणं रहाणार नाही; ते मोठं होणार.

झालंच ते मोठं. किशोर कुमार नावाचा सूर्योदय झाला. मास हिस्टेरियाचं पहिलं उदाहरण ठरणारा राजेश खन्ना नावाचा पहिला सुपरस्टार जन्मला. आज ’आराधना’ बघताना कळतं की नाही, माहीत नाही; पण तेव्हा त्यातली गाणी, किशोरचा आवाज, राजेश खन्नाचं प्रसन्न, दिलखुष व्यक्‍तिमत्त्व या सगळ्याने तरुणांचा ताबाच घेतला. वातावरणातली उदासीनता जणू गायब झाली आणि सर्वत्र उत्साह सळसळू लागला. हिंदी चित्रपटातल्या असल्या घडामोडी आणि देशातलं राजकीय, आर्थिक-सामाजिक वातावरण यांचा थेट संबंध लावून दाखवता येतो. १९६९ साल हे इंदिरा गांधींच्या प्रेरणेने काँग्रेसमधल्या ’तरुण तुर्कां’नी काँग्रेसमधल्या जुनाट धेंडांना धक्का देऊन काँग्रेस फोडण्याचं, बँकांचं राष्ट्रीयीकरण होण्याचं, संस्थानिकांचे तनखे बंद होण्याचं आणि ’गरिबी हटाव’ हा नारा उदयाला येण्याचं वर्ष होतं. लावणार्‍यांनी संबंध लावावा!

राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर भरपूर लिहून आलं. मेल्यानंतर एकदा, फक्‍त एकच वेळ मृत्यूलोकात डोकावण्याची मुभा मरणार्‍याला असायला हवी. स्वतःवर विलक्षण प्रेम करणार्‍या राजेश खन्नाला किती बरं वाटेल! मी त्या बरं वाटण्यात थोडी भर घालू इच्छितो. त्याच्या ज्या सिनेमांवर वाचायला मिळालं नाही, त्यांची दखल घेतो.

सफर, इत्तेफाक आणि बहारोंके सपने. सफर अगदी रोमँटिक सिनेमा होता. आनंद, नमकहराम यांच्याप्रमाणे इथेही राजेश खन्ना मेला होता. पण सगळ्यांनी (शर्मिलाने सुद्धा तिला जमेल तितका) अंडरप्ले करणारा अभिनय केला होता. फिरोज खानची चांगली म्हणावी अशी भूमिका त्यात होती. आम्ही कॉलेजातली मुलं तर त्यातल्या राजेश खन्नावर पागलच झालो. चित्रकार. ’जीवनसे भरी तेरी आँखे मजबूर करे जीनेके लिये’ हे साधंसुधं आणि हिंदी सिनेमातल्या सहजसोप्या शब्दरचनेला न जुळणारं गाणं जो तो गुणगुणत होता. गुरु शर्ट तेव्हाच आला की काय? अत्यंत नाटकी घटनांचा हा सिनेमा अ-भडक सादरीकरणामुळे पसंत पडला.

इत्तेफाक. एका रात्रीत घडतो. पात्रं दोन. राजेश खन्ना आणि नंदा. पोलिसांच्या ताब्यातून की वेड्यांच्या हॉस्पिटलातून पळालेला तो तिच्या बंगल्यात घुसतो. भल्या मोठ्या बंगल्यात ती एकटी. हा वेडसर. तिच्या नवर्‍याचा खून झालेला. वगैरे. बारीक तपशील आठवत नाहीत. आठवतं ते हे की सिनेमात एकही गाणं नव्हतं. भरीव नंदा सिनेमाभर घट्ट साडीत. आणि कसलीही वेडीबागडी लकब न पांघरता डोक्याने सटकलेला दिसणारा राजेश खन्ना. हा वेडा नसावा, अंगावर कोसळलेल्या परिस्थितीमुळे बिघडलेला असावा, असा संशय येत रहातो. सिनेमाभर सस्पेन्स आणि ताण बर्‍यापैकी टिकून रहातो. शेवट तर मस्तच. बरं वाटलं होतं की एक टॉपचा हिरो असला अनग्लॅमरस रोल करतो.

बहारोंके सपने तर ब्लॅक अँड व्हाइट होता. गिरणीकामगारांवर होता. जुन्या, नया दौर, उजाला, वगैरे सिनेमांच्या पठडीतला होता. यातही राजेश खन्ना मरतो. पण सिनेमात नायक-नायिका बागेत जाऊन एकही प्रेमगीत म्हणत नाहीत. यातली गाणी वेगळीच होती. आर डी बर्मनची प्रायोगिकता. ’आजा पिया’ हे गाणं खटकत चालतं. ’चुनरी संभाल गोरी’ हे समूह गीत. मन्ना डे आणि लता. मला सतत मधुमतीतल्या ’बिछुआ’ची आठवण येत रहायची आणि राग यायचा. ’क्या जानू सजन’ या गाण्यात तर लता गात असताना मागे लताच्याच आवाजातली आलापी!

यातला गिरणी कामगाराचा मुलगा आवडला. बेकार. चटकन डोक्यात राख घालून घेणारा. संपूर्ण सिनेमाप्रमाणे राजेश खन्नाही साफ अनग्लॅमरस.

मी राजेश खन्नाचा फॅन नव्हतो (तेव्हा डोक्यात जुनी गाणी आणि राज-दिलीप-देव यांचा माहोल असे). तरी आराधनासकट दो रास्ते, बंधन, आपकी कसम असे मुमताजबरोबरचे आणि वर उल्लेख केलेले त्याचे सिनेमे मी पाहिले. नंतर त्याची स्टाइल खटकू लागली. पुढे जंजीर, दीवार आले आणि राजेश खन्ना पाचोळा होऊन उडून गेला. मला दुःख झालं नाही. पण नंतर नंतर वाढत्या प्रमाणात कृतक होत गेलेल्या या सुपरस्टारबद्दल एक आपुलकी वाटत राहिली. एका मुलाखतीत ’टिना मुनीम आणि तुम्ही किती जवळ आहात’ अशा किंवा तत्सम प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, ’आम्ही एकच टूथब्रश वापरतो!’ यातली उद्धट फिरकी आवडली आणि लक्षात राहिली. तेव्हाची आघाडीची फिल्मी पत्रकार देवयानी चौबळ ऊर्फ देवी खूप आठवली. तिची आणि त्याची घट्ट मैत्री होती. डिंपलला मुलगी झाली, तेव्हा तिचं नाव काय ठेवणार, हे ती सांगणार होती. नाव ठरलं होतं ’चिनार’. पण तेवढ्यात चिनार नावा़ची सिगारेट आली आणि मुलीचं नाव बारगळलं. कसं वाटलं असतं ट्विंकलला चिनार म्हणायला?

असो. हिंदी चित्रपटसृष्टीतला तो एक मैलाचा दगड. दुरून दिसणारा. एक तरुण घाबरून म्हणाला, "जुने, म्हातारे जातात; पण राजेश खन्ना जातो म्हणजे मृत्यू आपल्यापर्यंत येऊन पोचल्यासारखं वाटतं यार!" या उद्‍गारांमध्ये त्याला मोठी श्रद्धांजली आहे, असं वाटतं.


Friday, August 3, 2012


मृणाल गोरेच्या निमित्ताने


  माझ्या आईचा जन्म १९२६ सालचा. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ती २१ वर्षांची होती. म्हणजेच, स्वातंत्र्यलढा, बेचाळीसची चळवळ, वगैरे अनुभव तिने हळव्या, संस्कारक्षम वयात घेतले. सहाजिक जेपी, अच्युतराव, अरुणा असफ‍अली हे लोक तिचे आयडॉल. त्यांच्याबद्दल ती भरभरून बोलायची. ती अभ्यासू, महत्त्वाकांक्षी नव्हती आणि लढ्यात पुढाकार घेणं तिला सुचलंही नाही. पण गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिने शाळा सोडली. आईचा मार खाल्ला; पण शाळा सोडून लाठ्या खायला गेली. (नंतर पुन्हा शाळेत ऍड्मिशन घेतली पण मॅट्रिक राहिलं ते राहिलंच!)

तिच्या कौतुकाचा आणखी एक विषय होता: समाजवादी पुढारी बायका. राष्ट्र सेवा दलात गेल्यामुळे त्या सगळ्या बायांचा उल्लेख ती एकेरी करत असे. अहिल्या, प्रमिला, सुधा आणि मृणाल, असा. सगळ्यांशी कधी तरी तिची भेटही झाली असणार. शक्य आहे, त्यांनी कधी काळी एकत्र कामही केलं असेल. त्यांना भेटायची इच्छा कधी तिने व्यक्‍त केली नाही, की त्यांच्याशी असलेला खरा खोटा संबंध वापरून कुठे प्रौढी मिरवली नाही. त्यातही तिला जास्त कौतुक हे, की यातल्या बहुतेक बाया सीकेपी आणि त्यांनी जातीबाहेर लग्नं केली! मृणालचं तर विशेष कौतुक. बंडू गोरेशी लग्न करते म्हणाल्यावर म्हणे कोणी कुचेष्टेने म्हणालं, हिला मेडिकल झेपत नाही म्हणून अर्धवट सोडून लग्न करायला निघाली. तर मृणालने जिद्दीने पुढची परीक्षा अत्यंत उत्तम मार्कांनी पास होऊन दाखवली आणि मग शिक्षण सोडून बंडूबरोबर चळवळीत उतरली!

मृणाल गोरेची प्रतिमा माझ्या मनात ही अशी, ग्लॅमरस आहे. तिने पाणीवाली बाई म्हणून जे अचाट कर्तृत्त्व दाखवलं, ते माझ्या जाणिवेत नाही. ’नागरी निवारा’ हे नाव तर मला कडू वाटतं. वर्षानुवर्षं झगडून, नोकरशाहीशी कायद्याची बाचाबाची करून तिने आणि बाबुराव सामंतांनी हजारो सर्वसामान्यांना अत्यंत स्वस्तात घरं मिळवून दिली आणि घर मिळताच तिथल्या मराठी माणसांनी तिला, तिच्या पक्षाला मत द्यायचं बंद केलं! तिच्या आदर्शवादाची गरज संपली, आणि त्यांना सौदेबाज शिवसेना जवळची झाली.

पुन्हा मागे जाऊ. समाजवाद्यांच्यात फूट पडल्यावर माझे वडील प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते झाले तर मृणाल समाजवादी पक्षात गेली. त्यामुळे तिच्याविषयीच्या आपुलकीला माझ्या अपरिपक्‍व मनात एक बारीक अढी होती. आणीबाणी येईपर्यंत ती अढी जाण्याएवढा मी वाढलो होतो. आणीबाणीला ’दुसर्‍या स्वातंत्र्याचा लढा’ असं काही जण म्हणतात. माझा मित्र नंदू धनेश्वर तुरुंगात होता. अरुण केळकर बिहारला गेला होता. मी चळवळ्या कधीच नव्हतो. सुबोध जठार तुरुंगातल्या, भूमिगत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी नेमाने पैसे गोळा करत असे, तेव्हा त्याने मागितले की मी देत असे. शक्य होईल तिथे भांडत असे. बाकी आपण सार्वजनिकपणे काय करावं हे मला समजत नव्हतं. अरुण एकदा दादरला भेटला आणि आम्ही कॅफे स्विमिंग पूलवर बसलो. तेव्हा अनेकांनी त्यालाच काय, मलाही ओळख देण्याचं टाळलं हे मला जाणवलं. अरूणसारख्या कृतिवीरांविषयी मला आदर वाटे, पण भावनेच्या भरात स्वतः काही करणं खुळचट वाटे.

मग आणीबाणी उठली आणि निवडणुका जाहीर झाल्या. तो काळ मात्र रोमांचकारक होता. शिवाजी पार्कच्या जेपींच्या सभेला जमलेली अफाट गर्दी, बँकेत युनियनने आंदोलन सुरू करताच त्याला केलेला जोरदार विरोध, ’त्या हरिभाऊ गोखल्याला पाडा!’ अशी पु ल देशपांड्यांनी केलेली भाषणं, इंडियन एक्स्प्रेसने उघडलेली काँग्रेसविरोधी मोहीम ... वातावरण एकदम इलेक्ट्रिक होतं.

मग निवडणूक पार पडली. दादरची मतमोजणी रुपारेल कॉलेजमध्ये चालू होती. पहिल्या बुलेटिनची वेळ झाली तेव्हा मी गेटबाहेर होतो. दुपारची वेळ. काही शे माणसं गोळा झाली होती. लाउडस्पीकर खरखरला. कोणीतरी उमेदवारांची नावं आणि त्यांना मिळालेली मतं सांगू लागलं. अहिल्या रांगणेकरची मतं सांगून झाली: बहात्तर हजार. दोन तीन नावांनंतर आर डी भंडारे यांची मतं जाहीर झाली; छप्पन हजार. त्याच क्षणी संपूर्ण जमावातून उत्स्फूर्त आनंदाचा उद्‍गार उमटला. त्या उद्‍गारात हर्ष होता, थोडा उन्माददेखील होता. मी चकित झालो. माझ्या मनातली भावना गर्दीतल्या सगळ्यांच्या मुखातून! मला ते पार अनपेक्षित होतं. मग रात्रभर मी सतीश तांबेबरोबर दादर ते अंधेरी चालत भटकलो. सगळे रस्ते माणसांनी भरले होते. सगळ्यांचे चेहरे उजळले होते. आनंदी आनंद गडे! आम्ही स्वातंत्र्यलढा अनुभवला नाही; पण दुसर्‍या स्वातंत्र्याचा अनुभव अवश्य घेतला!

इंदिरा, संजय दोघेही हरले. मुंबईतल्या, कोकणातल्या सगळ्या जागा जनता पक्षाला मिळाल्या. एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावर मध्यभागी मृणाल गोरेचा फोटो. ट्रकवर उभी आणि लोकांना हात करते आहे. काय तो फोटो होता. रंगीत नसलेल्या त्या फोटोतल्या तिच्या त्या आडव्या हातात रुबाब होता, आत्मविश्वास होता, आत्मसामर्थ्याची जाणीव होती. मी त्या फोटोच्या पूर्ण प्रेमात पडलो. आणीबाणीला, इंदिरेच्या दडपशाही राजवटीला गारद केल्याचा जो भाव त्या फोटोतल्या तिच्या त्या आडव्या धरलेल्या हातात व्यक्‍त होत होता, त्यात मला माझ्या हृदयात उचंबळलेल्या आनंदाचं मर्म फ्रीज झालेलं दिसलं. अनेक वर्षं तो वर्तमानपत्री फोटो मी जपला होता. त्या फोटोचं आकर्षण जराही कमी झालं नाही. पुढे केव्हा तरी घर बदलताना तो हरवला. मग स्मृतीतून देखील वजा झाला.
 
मृणालताईंच्या निधनाची बातमी वाचताच हे सगळं आठवलं. आई, आणीबाणी आणि तो फोटो. आणि हो, नागरी निवारा.

Saturday, July 14, 2012


आमचा रुस्तमेहिंद


      दारासिंग. दारासिंगचं चित्रपटसृष्टीला योगदान काय? त्याच्या मृत्यूनंतर पंतप्रधानांपासून महेश भट ते बिपाशा बसूपर्यंत लहानथोरांनी प्रतिक्रिया नोंदवली. अमिताभ बच्चनसकट. तो एक सत्शील मनुष्य होता, तो सेटवर असला की कोणाचीही मोठ्याने अपशब्द उच्चारण्याची हिम्मत होत नसे. ’रामानंद सागरच्या रामायणात त्याने साकारलेला हनुमान आमच्या मनात कायमचा घर करून आहे,’ असं तर अनेकांनी सांगितलं. त्याच्या रेसलिंगची आठवण निघाली. तो कसा हसरा, आनंदी होता, हे काही जणांनी नोंदवलं.

मिळतील तेवढ्या सर्व प्रतिक्रिया वाचूनही माझं समाधान झालं नाही. वाटलं, हे सगळं फार गुळगुळीत, गुळमुळीत होतंय. त्याने असं नेमकं काय केलं की इतक्या प्रमाणावर त्याच्या मृत्यूची नोंद घेतली जावी, हे यातून कळत नाही. त्याचा उल्लेख सर्वांनी जसा आदराने ’दारासिंगजी’ असा केला; तशाच गुडी गुडी शब्दात सगळ्यांचं म्हणणं व्यक्‍त झालं.

नको, असं नको. इतरांचं विश्लेषण नको. माझं समाधान झालं नाही कारण दारासिंगच्या निधनाने मलाही काही तरी गमावल्यासारखं, आपल्या एकूण घडणीतला एक हिस्सा निखळल्यासारखं झालं. दारासिंग नायक असलेला एकही सिनेमा मी पाहिलेला नाही. त्याला कुस्ती खेळताना पाहिलेलं नाही. म्हणजे मी दुरून न्याहाळणारा, बाहेरचा आणि त्यामुळे कमी दृष्टीस पडलेला प्रेक्षक. हे सिनेमावाले, कुस्तीवाले आतले. त्याला जास्त जवळून ओळखणारे. ते मला त्याच्या अंतरंगाचं, त्याच्या ’अपील’चं तुकड्यातुकड्याने पण सजीव, जिव्हाळ्याचं दर्शन घडवतील; अशी माझी काहीशी भाबडी, बालिश अपेक्षा होती. ती पुरी झाली नाही. रुखरुख लागली. मग वाटलं, दारासिंगला आपण जवळून नाही पाहिला तरीही तो जवळचा वाटतो, असा आपला दावा आहे ना; मग आपणच का प्रयत्न करू नये? त्याची कुस्ती आणि त्याचे सिनेमे संपल्यानंतरही त्याला इतकं महत्त्व मिळालं, याचा बारीक अंश आपल्याला मांडता येतो का,  हे बघूच करून.

’रुस्तमेहिंद’ दारासिंगच्या कुस्त्या वरळीच्या वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये होत. संध्याकाळी कुस्त्या सुरू होत; पण सुरुवात लहान कुस्तीगिरांपासून होत असे. दारासिंगचा आयटेम म्हणजे क्लायमॅक्स! तो सगळ्याच्या शेवटी. काळोख पडल्यावर प्रखर दिव्यांच्या प्रकाशात. तसा तो काही रोज लढत नसे. त्याची लढत असे, तेव्हा गर्दी वाढत असे. फ्रीस्टाइल कुस्ती! किंगकाँग आणि इतर चित्रविचित्र नावाचे, रूपाचे आणि वेषभूषेचे परदेशी पैलवान रोज एकमेकांशी लढत. एकेकाची लढण्याची स्टाइल वेगळी, त्यातल्या बड्या पैलवानांचे स्वतःचे असे विशिष्ट डाव आणि पेच. दारासिंगबरोबर त्याचा लहान भाऊ रंधावा असे. इतरही लहानमोठे भारतीय पैलवानसुद्धा असत; पण त्यांना ग्लॅमर नव्हतं. ग्लॅमर होतं, दारासिंगला आणि त्या अक्राळविक्राळ परदेशी पैलवानांना.

रोज त्या कुस्त्यांची रसभरीत वर्णनं वर्तमानपत्रात छापून येत. शिवाय रोजच्या जाहिराती! मला त्या जाहिराती फार आवडत. त्यांची भाषा, त्यातले फोटो; एक अद्‍भुत मायथॉलॉजी साकारत असे. आज टीव्हीवर WWF चालतं ना, तसंच. पण ते ’देशी’ होतं. ते प्रत्यक्ष बघून आलेले आमचे वडील मित्र आम्हाला त्या कुस्त्यांची हकीकत सांगत. पुढे कित्येक वर्षं बसने वल्लभभाई पटेल स्टेडियमवरून जाताना मला साक्षात कुरुक्षेत्राचं दर्शन घेतल्यासारखं धन्य वाटत असे.

त्या कल्पनावास्तवात दारासिंग अजेय होता. मोठमोठे दैत्य इतरांना लोळवत वाढत्या श्रेणीने कीर्ती मिळवत आणि शेवटी दारासिंगशी लढत. त्याला झुंजवत, त्याचं रक्‍तही काढत. पण शेवटी त्यांची हार होई. दारासिंग कधीही हरणार नाही, ही आपल्या अंतर्मनाने दिलेली ग्वाही खरी ठरताना दर वेळी आनंद होई. तेव्हा टेलिव्हिजन नसला तरी सिनेमा होता. आम्हा लहानांचे आवडते जाड्यारड्या होते; पण ते सगळं शेवटी पडद्यावर. हा खरा! हाडामांसाचा! येवढा पराक्रमी असूनही गोंडस चेहर्‍याचा. उग्र, खुनशी नव्हे; तर हसर्‍या मुद्रेचा.

हे सगळं लुटुपुटुचं, बेगडी आहे, हे कळायला लागेपर्यंत दारासिंग सिनेमात गेला होता. मी पण ’मोठा’ झालो होतो. फौलाद, डाकू मंगलसिंग, टारझन कम्स टू दिल्ली यांसारख्या त्याच्या चित्रपटांमधली त्याची नायिका मुमताज डोळ्यात भरत होती. काय तिचं नाक! अंगांगात सेक्स ठासून भरलेलं असूनही चेहेर्‍यावर मादकतेचा लवलेश नाही. मुमताज वाढत वाढत थेट दिलीप कुमार आणि देव आनंदची नायिका झाली. राजेश खन्ना आणि शशी कपूरची तर झालीच. आणि ती जेव्हा मोठी झाली; तेव्हा तिच्या प्रवासाचं वर्णन हमखास ’दारासिंगपासून सुरुवात करून ...’ असं व्हायचं! दारासिंग सरळ सरळ देमार चित्रपटांचा प्रतिनिधी होता.
पण तो ज्या चित्रपटांचा प्रतिनिधी होता, ते आजच्या बी ग्रेड सी ग्रेड चित्रपटांसारखे मुळीच नव्हते. ते सामान्य होते. बाळबोध होते. त्यांची तांत्रिक बाजू कमकुवत होती. त्यांच्यातला अभिनय ढोबळ होता. ते ग्राम्य, बीभत्स, ओंगळ अजिबात नव्हते. आईला ’जातो’ सांगताना दारासिंग जेव्हा ’माँ, बंदा चला,’ म्हणतो तेव्हाही श्वास आत घेत दंडातली बेटकुळी फुगवतो; अशी टिंगल व्हायची; पण त्यातही एक निरागसता होती. जी आज बनेल दिसणार्‍या रितेश देशमुखमध्ये वा बावळट तुस्‌शार (असंच स्पेलिंग तो करतो) कपूरमध्ये असल्याचा आरोप कोणी करणार नाही. दारासिंगला म्हणूनच ’सिकंदर-ए-आझम’ सारख्या चित्रपटात पृथ्विराज कपूर आणि प्रेमनाथबरोबर चक्क सिकंदराचीच भूमिका मिळाली (तिथेही त्याची नायिका मुमताज!). राज कपूरने त्याच्या ’मेरा नाम जोकर’मध्ये छोटासा रोल दिला. आणि त्याच्या जीवनाच्या अखेरीस ’जब वी मेट’ मध्ये इम्तियाज अलीने त्याला कौतुकाचा हारच घातला. त्याने रंगवलेल्या करीनाच्या आज्ज्याला काही कळत नाही; पण आत्मविश्वास केवढा! फार हिंडता फिरता किंवा बोलता येत नाही; पण मान केवढा!

दारासिंगच्या प्रतिमेचं मर्म हेच होय, असं म्हटल्याने त्याचा अधिक्षेप होईलसं वाटत नाही. रामानंद सागरने त्याला हनुमान केला. हनुमानाची गंमतच आहे. त्याचं वर्णन पुराणात ’बुद्धिमान’ असं केलं आहे आणि त्याच वेळी त्याच्या मठ्ठपणाच्या कहाण्याही प्रचलित आहेत. दारासिंगचा हनुमान अर्थातच मठ्ठ होता. तो इमानी होता, बलवान होता आणि आज्ञाधारक होता. बस्स, आणखी काय पाहिजे? मारुती असा दाखवलेला चालतो पण ’मारुतीच्या हाती शँपेन’ हे नाव चालत नाही; तर अशी मूल्यं बाळगणार्‍यांबद्दल काय बोलावं?

असो. तो विषय वेगळा. दारासिंग गेला; बालपणाचा एक दुवा निखळला. केव्हातरी बालपणीचे सगळेच दुवे निखळलेले असतील आणि स्वतःमधलं पोरपण, झोपी गेलेला आडमुठा आशावाद जागवण्याची चावी स्वतःमधूनच शोधावी लागेल.

Tuesday, June 26, 2012


दिल्ली

मध्यंतरी दिल्लीला जाण्याचा योग आला. विमानाने गेलो, दुसर्‍या दिवशी विमानाने आलो. आता विमानप्रवास खूप वेळा करून झाला; पण अजूनही ’आपला या जगाशी काही संबंध नाही - I don't belong here' असं वाटत रहातं. बुजल्यासारखं नाही होत; पण उपटसुंभ असल्यासारखं वाटत रहातं. अजूनही बोर्डिंग पास घेताना मी गप्पपणे तिकीट पुढे करतो. आणि अजूनही मला न चुकता खालचं काहीही न दाखवणारी पंखावरची सीट मिळते.
तर, दिल्ली. बैठक होती इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये. बघितलंय? विमानतळावर परकेपणा वाटणार्‍या मला इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये काय चैन पडणार? नशिबाने चर्चा करणारे आणि चर्चेचा कंटेंट, यातलं काहीच अप्रामाणिक नव्हतं. त्यामुळे नंतर परिसर जाणवेनासा झाला. पण लक्ष दिलं, तर काय ते लोक, काय ते पाहुणे, किती त्यांच्या भ्रू उच्च. खरा स्नॉब अजिबातच आखडू नसतो, तेवढीही किंमत तो तुम्हाला देत नाही; याचा प्रत्यय देणारे मोठ्या मनाचे उदारमतवादी चेहरे तर किती दिसतात.
कोण जाणे. असं काही नसेलही. माझ्या टवकारलेल्या मनाचे खेळ असतील. नेमाडेच्या पांडुरंग सांगवीकरला नाही का पुण्यात सर्वत्र वेश्या दिसतात. प्रॉब्लेम पुण्याचा नाही; पांडुरंगच्या न्यूनगंडाचा आहे. तसंच.
दिल्ली विमानतळावरून मुक्कामी आणि तिथून इंडिया हॅबिटॅट सेंटरला जाताना वाटेत राष्ट्रपती भवन आणि दुनियाभरच्या एम्बस्या बघत गेलो. दिल्ली भयंकर प्रॉब्लेम करते. दिल्लीचा तो भाग बघताना मुंबई कशी भिकारी, भिकारडी आहे, मुंबईत कशी घाण आहे - अगदी श्रीमंत, उच्चभ्रू वस्तीतदेखील ’तसा’ रुबाब नसतो, वगैरे सुचत रहातं. पण म्हणून मुंबई सोडून दिल्लीला जवळ करण्याचा विचार अजिबात पटत नाही. दिल्लीची मेट्रो. उत्तम सेवा. स्वच्छता, कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी, सगळ्या बाबतीत उत्तम. पण मेट्रोत ’जनता’ आढळत नाही! सगळे रूलिंग क्लासमधले. पटत नाही. मुंबईतल्या लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये हल्ली फक्‍त अमीर लोक मुळीच नसतात. तिथले सगळे खाऊन पिऊन सुखी, त्यामुळे गुबगुबीत असतात, असं एक वेळ म्हणता येईल. तसं जरी म्हटलं, तरी गाडीत चढण्याअगोदर प्लॅटफॉर्मवर अगदी भांडवलशाही समाजवाद असतो. ’भांडवलशाही’ कारण जवळपास सगळेच आपापल्या कामाच्या विचारात गर्क असतात. संपत्ती निर्माण करण्याची त्यांना घाई असते. आणि ’समाजवाद’, कारण गरीब-श्रीमंत एकच स्पेस शेअर करतात. तिथे मात्र सैल वाटतं! तरी मनात एक खुटखुटत रहातं: दिल्लीच्या वर्गभेदाला नाक मुरडताना; हॅबिटॅट सेंटरमधल्या कॅफेत ताजी भाजलेली, गरमागरम बिस्किटं खात खात ’या गरीब देशात इतका थाट?’ असा प्रश्न मनात उभा करताना, खरंच आपल्याला दिल्लीच्या रूलिंग क्लासचा दांभिकपणा टोचतो आहे; की ही विशुद्ध असूया आहे, हे मात्र नक्की सांगता येत नाही!

Saturday, April 21, 2012

मार्केट इकॉनॉमीत पुस्तकाचा शोध

आजचा अनुभव लिहावाच. त्यात अन्याय होण्याचा संभव आहे; पण ते सांभाळत लिहावाच.

देवेंद्र गावंडेने नक्षलवादावर लिहिलेलं पुस्तक हवंच म्हणून घेतलं, तर ते कधी कोणी ढापलं, कळलंसुद्धा नाही. आता त्याच विषयावरचं माझं पुस्तक पूर्णत्वापर्यंत पोचल्यावर गावंडे वाचलेला असणे अत्यंत आवश्यक झालं. त्यात महेश भागवत यांनी ’त्यात मला म्हणायचंय ते मी नीट मांडलं आहे,’ असं म्हटल्यावर गावंडेचं पुस्तक पुन्हा घेणं अपरिहार्य झालं.
वाशीला मराठी पुस्तक मिळेलच, याची खात्री नाही. दादरला गेलो. तिथे तीन दुकानं मराठी पुस्तकांची. नक्की मिळणार.
"प्रकाशकाकडून कॅटलॉग आला, की आम्ही पुस्तकं मागवतो. साधनेने अजून कॅटलॉग पाठवलेला नाही. त्यामुळे तुम्हाला हवं ते पुस्तक आम्ही अजून मागवलेलंच नाही."
असो. आणखी दोन दुकानं आहेत की. याला काय सोनं लागलंय?
’’देवेन्द्र गावंडे यांनी नक्षलवादावर लिहिलेलं पुस्तक नुकतंच आलंय बाजारात. ते द्या.’
"नाव काय पुस्तकाचं?"
’नाव लक्षात नाही. प्रकाशक साधना आहे बहुतेक.’
"नाव पाहिजे. त्याशिवाय सांगता येणार नाही."
लेखकाचं नाव, प्रकाशकाचं नाव, पुस्तकाचा विषय यातलं काहीही उपयोगाचं नाही. पुस्तकाचं नाव पाहिजे!
म्हणजे स्टॉकमधली पुस्तकं कॉम्प्युटरवर चढवलेली नाहीत, हे उघड आहे. पण, असं म्हणू की नाही घातली; कॉम्प्युटरला आम्ही कागदाचा वैरी समजतो म्हणून नाही घातली.
पण पुस्तकाचं नाव माहीत नसेल, तर पुस्तक आहे की नाही हे सांगता येत नाही, हे कसं? पुस्तकाच्या नावावरून एखादा साक्षर हमालही देईल की काढून. पुस्तकाच्या दुकानातला नोकरवर्ग साक्षर हमालाच्या वरच्या पातळीचा असेल, ही अपेक्षा चुकीची काय?
तिसर्‍या दुकानात पुस्तकाचं नाव माहीत होतं!. "आव्हान नक्षलवादाचे". एका फटक्यात नाव सांगितलं आणि दुसर्‍या फटक्यात "आमच्याकडे नाही!" असं ऐकवलं.
एण्ड ऑफ स्टोरी. आता परत फोर्टात, पीबीएचला जायला पाहिजे. गोपाळ काढून देईल नाही तर तात्काळ मागवेल. असली उत्तरं मिळणार नाहीत. आपला, आपल्या संस्कृतीचा अपमान झाल्यासारखं होणार नाही.

पण संस्कृतीला मध्ये ओढू नये. दांडग्या दांडग्या मॉलमधली क्रॉसवर्डसारखी ऐसपैस दुकानं बघून कसं गार गार वाटलं होतं. वाटलं, आपली गरीब मराठी कधी अशी सुबत्ता गाठणार?
तर एका क्रॉसवर्डमध्ये एकदा चांगल्या नामांकित इंग्रजी लेखकाचं पुस्तक मागितलं. उंच आणि लहानपणापासून इंग्रजी आणि मॉल यांच्यातच वावरलेला दिसणारा तो समोरचा मुलगा गोंधळला. त्याला लेखक आणि पुस्तक, दोन्ही अपरिचित. ही उथळ, खळखळाटी पिढी, असं म्हणत मी चरफडलो. निघणार तेवढ्यात काय वाटलं, मी त्याच्या समोरच्या स्क्रीनमध्ये डोकावलो. त्याला लेखक आणि पुस्तकाचं नाव, माहीत नव्हतं म्हणजे त्यांची स्पेलिंगं माहीत नव्हती, हेसुद्धा आलंच की!. कॉम्प्युटर वेगवान पण माठ मशीन. स्पेलिंग नीट देताच पुस्तक मिळालं!
म्हणजे तिथला स्मार्ट, तरतरीत तरुणही साक्षर हमालच होता की.
आणि हा अनुभव अपवाद नाही, नियम आहे. स्मार्टपणा हा दुर्गुण आहे, या माझ्या धारणेवर एक शिक्का आणखी बसला.

यावरून वाचनसंस्कृती, साहित्याभिरुची असल्या गोष्टींविषयी अनुमान काढू नये. पुस्तकाचं दुकान आणि बुटांचं किंवा साड्यांचं किंवा अंडरवेअरचं, यात मूलभूत फरक असावा की नसावा, हा खरा (पोस्ट मॉडर्न वा मार्केट इकॉनॉमीतला) प्रश्न आहे.

Wednesday, March 28, 2012

ग्रेस

हे लिहावं की नाही, या विचारात पुष्कळ वेळ गेला. लिहून टाकावं, असा निर्णय झाल्यावर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
मी गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय बंग यांच्या सर्च या संस्थेच्या शोधग्राम या वसाहतीत रहात असतानाची गोष्ट. तिथे चालणार्‍या कामाविषयी लिहिणे, लिहून आणणे, हे माझं काम होतं. एके दिवशी लायब्ररीत मी काँप्युटरवर काही तरी लिहीत असताना अभयभाऊंचं बोलावणं आलं. मी गेलो. अभयभाऊ म्हणाले, "आपल्याकडे कवी ग्रेस आले आहेत. काही दिवस रहाणार आहेत. तू त्यांच्याबरोबर रहा. त्यांना कंपनी दे."
ग्रेस! मी ग्रेसच्या कविता वाचल्या होत्या. ’राजपुत्र आणि डार्लिंग’ हे पुस्तक एकदा, दोनदा, तीनदा, अनेकदा वाचलं. न थांबता, शेवटचं पान संपवलं, की ताबडतोब पहिल्या पानावर सुरुवात करून वाचलं. सगळं लक्ष एकवटून, मन एकाग्र करून वाचण्याचा प्रयत्न केला. काहीही कळलं नाही. शेवटी ’हे हवेवर काढलेलं चित्र आहे, थेट मराठी वाटणारे ध्वनी ऐकवत केलेली भ्रमिष्ट बडबड आहे,’ असं ठरवून बाजूला केलं. संदिग्धता हा कलेचा दुर्गुण नाही, तर ते कलेचं सामर्थ्य आहे, हे मान्य असूनही ग्रेसची दुर्बोधता मला कधी आवडली नव्हती.
पण त्याची शब्दकळा भुरळ घालत होती. या ओळीनंतर ही दुसरी ओळ कशी कोणाला सुचू शकते, याचा विलक्षण अचंबा वाटायचा. टोकदार प्रतिमा, तीव्र भाव; पण एकुणात काही तरी सांगण्यापेक्षा लपवण्यावर जास्त भर, असं वाटायचं. हा कवी मराठी कोळून प्यायला आहे, त्यामुळे विधानांमागून विधानं करूनही वाचकाला आशयाचा लाभ करून देण्याऐवजी संभ्रमित करून टाकणं याला लीलया जमतं. याच्या भाषावैभवामुळे ’आपल्या हाती काहीएक आशय लागलेला नाही,’ हे वाचकाला शेवटपर्यंत उमगतच नाही, असंही सुचलं होतं. ग्रेसबद्दल वाईट मत नाही झालं (आशय सांगण्याऐवजी आशय लपवणारी कविता करण्यामागे कवीकडे काहीतरी कारणं असतीलच; ग्रेस बुद्धिमान आहे, यात तर तिळमात्र शंका नाही); पण ’ग्रेस माझा आवडता कवी आहे,’ असं म्हणणार्‍यांच्या नावापुढे एक फुली मारू लागलो.
ग्रेसचं गद्यही तसंच. चर्चबेल आणि स्नोफॉल. जणू हा कवी काही वर्षं युरोपात राहिला आहे. ग्रेसने नूरजहानवर एक लेख लिहिला आहे. त्यात त्याच्या (ग्रेस मरेपर्यंत एक तरुण कवी होता, यात वाद नसावा. व्यक्‍ती म्हणून उल्लेख करताना जरी आदरार्थी अनेकवचन वापरणं योग्य असलं, तरी लिखाणाचा संदर्भ असताना ग्रेस, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर आणि नंतरच्या पिढीतले सगळे; यांचा उल्लेख ’अमुक कवितेत कवी म्हणतात,’ असा करणंच उलट अनैसर्गिक वाटतं.) पद्धतीनुसार भावगर्भ विधानं आहेत. पण नूरजहानच्या थोर गाण्यांपैकी फारच कमी गाण्यांचे उल्लेख आहेत. याने नूरजहानची मोजकीच गाणी ऐकून केवळ शैलीवर एक उत्कट लेख घडवला की काय, असा संशय यावा.
तर अशी माझ्या मनातली ग्रेसची प्रतिमा. आणि ती प्रतिमा बनवणारे जवळपास सारे तपशील स्मरणात अस्पष्ट झालेले. ’ती गेली तेव्हा’ यासारखी गाणी सोडली, तर ग्रेसची एक ओळ मनात जिवंत नाही. ग्रेसशी मी बोलू काय! मी लटपटलो. पण शोधग्राममध्ये मराठी साहित्याशी सलगी असलेला मीच होतो.
प्रसंग कठीण होता. काही दिवस दारूच्या पूर्ण अधीन झालेल्या त्यांना गाडीत टाकून त्यांचा एक मित्र शोधग्रामला घेऊन आला होता. अभयभाऊंनी तात्काळ त्यांची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना तपासून औषधं चालू करून आणि सुरुवातीला झोपेची गोळी देऊन अभयभाऊंनी काम सुरू केलं. ग्रेसना अजिबात एकटं वाटू न देण्याचं काम माझ्यावर होतं. खरं तर मी त्यांच्याशी, ते माझ्याशी काय बोलले, मला आठवत नाही. पण आम्ही खूप गप्पा केल्या. साहित्यावर केल्या, शोधग्रामबद्दल केल्या. तिथला परिसर, निसर्ग यांच्यावर केल्या. त्या काळात त्यांनी कधीही दारूची मागणी केली नाही की आठवण काढली नाही. गप्पांमध्ये आमचा दिवस सुरळीत पार पडत असे. मराठी, इंग्रजी, वैश्विक साहित्याचे दाखले ते देत. उतारे पाठ म्हणून दाखवत. काय लय!
ग्रेसना माणसांची आवड आहे आणि समोरच्याला खूष करण्याची कला अवगत आहे, हे माझ्या लक्षात आलं. समोर कुणी इंटेलेक्चुअल असो, की कष्टकरी; ग्रेस त्याला वा तिला सहजी सुखावून टाकत. त्यांना वेळच्या वेळी औषध द्यायला मुली येत. त्यांच्याशी तर त्यांची मैत्रीच झाली. रात्री मात्र ते बेचैन होत. झोपेची गोळी दिली तरी झोपी जात नसत. फोनवर खूप बोलत. कळवळून बोलत. "कर्णिक, मला सोडून जाऊ नका; हे इथेच बसा. किंवा या शेजारच्या कॉटवरच झोपा," अशी मला विनंती करत.
दोन गोष्टी सांगायच्या आहेत. खरं तर, त्या सांगण्यासाठीच हे लिहायला घेतलं. एक म्हणजे, त्यांच्या कवितेची तोंडदेखली स्तुती करणं मला जमेना. मी त्यांच्या कवितेचा विषय टाळतो आहे, हे त्यांच्या अर्थातच लक्षात आलं. ते मुळीच नाराज झाले नाहीत. किंवा ’माझी कविता कशी श्रेष्ठ आहे,’ असं हिरिरीने पटवून देण्याच्या मागेही लागले नाहीत. तेवढे समंजस आणि परिपक्‍व ते होते. पण त्यांनी त्यांच्या कवितेच्या पंक्‍ती म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या खणखणीत, स्पष्ट, उत्कट वाणीतून त्यांचे वजनदार शब्द ऐकणे हा रोमांचक अनुभव होता. पण ते तिथे थांबत नसत. त्या ओळींमधून एक अत्यंत सुसंगत विधान ते उलगडून दाखवत. एक प्रकारे त्यांनी माझी शाळाच घेतली. माझ्यासाठी तो फार मोठा अनुभव होता. टिपिकल ग्रेसच्या अगम्य ओळी. त्यातून पहाता पहाता एक दणदणीत विधान उभं रहात असे. मी मनातल्या मनात वरमलो. त्यांचे संदर्भ वर वर हाती न लागणारे असत. ते त्यांनी सांगितले, की आशय नीट उलगडत असे. त्यात पौराणिक, सांस्कृतिक आणि वैयक्‍तिक संदर्भ असत. पण वडाची साल पिंपळाला, असा प्रकार नव्हता. ग्रेस आवडणार्‍यांच्या नावापुढे फुली मारणं जरी मी बंद केलं नाही; तरी ग्रेस हा खोटारडा किंवा भ्रमोत्पादन करणारा कवी नव्हे; तसं म्हटलं, तर त्याचा अपमान होईल, हा धडा मात्र मी घेतला.
त्यांच्या काव्यात उघड वा छुपेपणाने आई फार आहे. ते जेव्हा स्वतःच्या काव्याबद्दल, निर्मितीप्रेरणेबद्दल बोलत, तेव्हाही आईचं नाव येई. पण त्यांची आई त्यांना त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी सोडून गेली होती! म्हणजे, त्यांच्या मनातली आई, खरी आई नव्हती; तुटपुंज्या आठवणींमधून त्यांनी स्वतःच तयार केलेली प्रतिमा होती. एकलव्याच्या समर्पित निष्ठेने त्यांनी ती प्रतिमा कायम जपली आणि तिच्यापासून प्रेरणा घेत एक अद्‍भुत प्रतिसृष्टी निर्माण केली. त्यांच्या प्रतिभेला एका इंजिनाची गरज होती, जे या प्रतिमेतून त्यांनी स्वतःसाठी बनवून घेतलं.
त्यांना गोळीविना रात्रभर गाढ झोप लागू लागली आणि त्यांनी शोधग्रामचा निरोप घेतला. जाताना एका कागदावर त्यांनी स्वहस्ते डॉ राणी बंग यांच्यावर चार ओळी लिहिल्या. जिथे ते राहिले, त्या ’बहावा’ या गेस्ट हाउसच्या भिंतीवर त्या काव्यपंक्‍तीची फ्रेम लटकवण्यात आली. आजही ती तिथे असेल.
"नागपूरला माझ्या घरी या," असं आमंत्रण मला वारंवार देऊन ते गेले. मी कधीही त्यांच्या घरी गेलो नाही. एक कारण संकोच. त्यांच्या त्या दुर्बल स्थितीत मी त्यांना सोबत केली, या कर्तव्यपालनाच्या बळावर त्यांच्या नॉर्मल, सामाजिक जगण्यावर आक्रमण करणं ठीक नाही, असं मला वाटत राहिलं. दुसरं कारणही सांगितलं पाहिजे. सर्चचा जो ड्रायव्हर त्यांना घरी सोडून आला, तो मला म्हणाला, "काका, त्यांच्या घराच्या सगळ्या भिंतींवर त्यांचेच फोटो आहेत. लहान फोटो, मोठे फोटो. किती फोटो!" हे ऐकून मी घाबरलो. ’अशा आत्मप्रेमी माणसाशी आपण किती वेळ बोलू शकणार? त्यात ते फोटो सतत समोर दिसत असताना!’ असं मला सुचलं आणि संकोचाला पाठबळ मिळालं.
पण मनात ते खुटखुटत राहिलं. नागपूरला जाण्याची वेळ अनेकदा आली. आठवण झाली, की आपण चुकतोय का, असा प्रश्न चाटून जायचा. मग एकदा ते मुंबईला आले असताना मित्राला बरोबर घेऊन मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात गेलो. त्यांचं भाषण ऐकलं. भाषण संपवून ते उतरले की भेटू, असं मनाशी म्हणत राहिलो. पण ते उतरले आणि त्यांच्याभोवती त्यांच्या चाहत्यांचा गराडा पडला. ग्रेस यांच्या कवितेवर, त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वावर प्रेम करणार्‍यांची संख्या मोठी. आणि प्रेमही अगदी दुथडी भरून. त्यात ग्रेसना प्रेम देण्याघेण्याची आवड. मी थोडा वेळ वाट पाहिली. मग लक्षात आलं, की गर्दीत घुसून ’मी अमुक अमुक. आपण शोधग्राममध्ये भेटलो होतो,’ असं म्हणावं लागेल. पुन्हा संकोच आड आला. त्यांना आठवलं नाही तर? आठवलं आणि आवडलं नाही तर? न भेटताच मी बाहेर पडलो. आता ते नाहीत. आता भेटता येणार नाही. नागपूरला गेलो, तर एका राहून गेलेल्या कामाची आठवण टोचत बसणार नाही.