Wednesday, May 28, 2014

काँग्रेस ते शिवसेना : प्रश्न अस्तित्वाचा!




लोकसभा निवडणुका झाल्या, काँग्रेसचं पानिपत झालं. गुजरात, राजस्थान, वगैरे राज्यांमधून एकही खासदार नाही. देशभर मिळून चाळीस खासदार! अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

पण हे विधान गुळगुळीतपणे आलं आहे. काँग्रेसची संघटना, देशभरच्या विविध समाजघटकांमध्ये रुजलेली काँग्रेसची मुळं भाजपच्या एका झटक्यामधून नष्ट होणार नाहीत. उदाहरणार्थ स्थानिक पातळीवरचं त्यांचं जाळं आणखी काही काळ टिकून रहाणार आहे, हे आपण महाराष्ट्रापुरतं तरी निश्चित म्हणू शकतो. म्हणजे भाजपच्या बाबतीत मतदारांचा भ्रमनिरास होण्याची वाट बघणे, एवढा कार्यक्रम जरी त्यांनी यशस्वीपणे राबवला तरी काँग्रेस पुन्हा उसळी घेऊ शकते.

’प्रमुख विरोधी पक्ष ही जागा पटकावण्याची तयारी’ इतपत पोहोचण्याची महत्वाकांक्षा आम आदमी पार्टीने नक्की बाळगली होती. भाजपला स्वबळावर सत्ता राबवण्याइतकं बहुमत मिळाल्याने, ’आप’चा खरा प्रतिस्पर्धी आज काँग्रेस आहे, असंही म्हणता येईल. मात्र या पूर्वी हा पक्ष कधी नव्हताच. त्यामुळे त्यांच्या बाबतीत अस्तित्वाचा प्रश्न उभा रहाण्याची वेळ आली आहे, असं आत्ता तरी म्हणता येत नाही. राज्याराज्यात ते त्यांची संघटना कशी बांधतात आणि जातपातधर्म, आर्थिक स्तर, भाषा-प्रदेश यांच्या पलिकडे जाणारी अशी स्वतःची ओळख कशी घडवतात यातूनच त्यांच्या अस्तित्वाला आकार येणार आहे. त्यांना व्यवस्थेतच आमूलाग्र बदल हवे आहेत. त्या बदलांच्या बाजूने तरुण वर्गाला वळवणे, हे त्यांच्यापुढचं मुख्य आव्हान आहे.

पण नितीश कुमार, डावे कम्युनिस्ट यांची स्थिती आणखी गंभीर आहे. त्यांच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न उभा झालाय का? सत्ता प्राप्‍त केल्यापासून नितीश कुमारांनी बिहारच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला. तिथून येणार्‍या बातम्या त्यांच्याबद्दल सकारात्मक कल दाखवणार्‍या होत्या. मग हे काय झालं? राज्यासाठी शासनकर्ता निवडणे आणि देशाची सूत्रं कोणाच्या हाती असावीत, हा निर्णय घेणे, या संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, अशी मानसिकता असण्याइतके बिहारचे, महाराष्ट्रातले, देशभरचे मतदार सुजाण आणि सजग आहेत का? माहीत नाही. कारण तसं असेल, तर निवडणुकीच्या गणितात पैशाला आज आलंय तेवढं अमाप महत्त्व आलं नसतं. मतदानाच्या आदल्या रात्री पैसा आणि दारू धो धो वाहतात, अशा कहाण्या ऐकायला मिळाल्या नसत्या.

काहीच सांगता येत नाही. आपला देश इतका मोठा आणि इतका वैविध्यपूर्ण आहे, की दोन्हींमध्ये तथ्य असण्याचीसुद्धा शक्यता आहे!

कम्युनिस्ट? कम्युनिझमची वाताहात ही वैश्विक प्रक्रिया आहे. जागतिकीकरण आणि बाजारीकरण या दोन एकमेकात गुंतलेल्या प्रक्रियांचा तो परिपाक आहे. तपशिलात न शिरता एक म्हणता येईल की आजच्या तरुणासमोर, कमावत्या नागरिकासमोर, देशाच्या आज-उद्याच्या आधारस्तंभासमोर उन्नतीचे अनेक मार्ग नाचत आहेत. त्यातले किती त्याच्या आवाक्यात आहेत, किती मुळातच भुलभुलैया-मृगजळसम आहेत, हे वेगळं. पण त्याच्यासमोर कोणताही ’इझम’ नाही हे मात्र पूर्ण खरं. ज्या कोणा उमेदधारकाला ’समाजसेवा’ करायची असेल, त्याला ही स्वयंसेवी संस्था नाही तर ती स्वयंसेवी संस्था; फार तर स्वतःचं सामाजिक संघटन, याच आणि असल्याच पर्यायांमधून निवड करायची आहे. इझम कुठे आहे? समाजपरिवर्तनाचा विचारधाराजन्य ब्लूप्रिंट कुठे आहे? ’भौतिक आत्मोन्नती’च्या (च्यायला काय शब्दप्रयोग आहे हा!) रपाट्यात समाजवादी विचारसरणी पार दामटून गेली आहे.

या वैश्विक, देशव्यापी चौकटीतून परिचयाच्या परिसरात यायचं, तर म्हणावंसं वाटतं की आज देशभरात अस्तित्वाचा प्रश्न खरोखर कोणासमोर उभा राहिला असेल, तर तो शिवसेनेसमोर. त्यांची पार पंचाईत झाली आहे. त्यांच्या खासदारांची संख्या अकरावरून अठरावर गेली, ती मोदींच्या कृपेने; याचं भान त्यांच्या नेतृत्वाला निश्चित आहे. बाळासाहेबांच्या नावाने कितीही कढ काढले तरी विधानसभेत स्वतःची ताकद सत्तेला हात घालण्याइतकी वाढवायची असेल, तर मोदींचा हात सोडता येणार नाही, हे सत्य सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट आहे.

पण त्यात स्वतःकडे कमीपणा घेणं अध्याहृत आहे! ते मान्य होणार का? मुख्यमंत्री होण्याच्या आकांक्षेवर उद्धव ठाकरे पाणी सोडणार का?

त्यांना सोडावं लागेल यात शंका नाही. पण खरा प्रश्न याहून गंभीर आहे. दुहेरी आहे. शिवसेनेने मराठी माणसाचा कैवार न सोडता हिंदुत्वाचा नारा लावला आणि आपला पाठीराखावर्ग रुंद करून घेतला. शिवसेनेच्या मागे येणार्‍या ’हिंदू’ मतदारांना आकर्षण वाटलं ते शिवेसेनेच्या आक्रमक अविर्भावाचं. आज गोष्ट अशी आहे की बाळासाहेब ठाकरे नाहीत, कितीही आव आणला तरी आक्रमकता उद्धव ठाकरेंच्या स्वभावात नाही आणि प्रेझेंटेबल, प्रभावी आक्रमकता, हाच मुळी मोदींचा यूएसपी आहे! मोदींचा मुखवटा चढवून भाजप शिवेसेनेच्या मुखातून महाराष्ट्राचा घास पळवणार! शिवसेनेचा बांधील मतदार सोडला, तर बाकीच्या सहानुभूतीदारांना मोदी - पर्यायाने भाजप - जास्त जवळ वाटणार हे उघड आहे. भाजपच्या स्थानिक नेतेमंडळीलाही माहीत आहे. त्यांच्यात आत्ताच मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे. इकडे आड तिकडे विहीर. ’मराठी’ व्हावं तर पाठीराखे आकुंचन पावणार. ’हिंदू’ रहावं तर मोदींच्या मागे मागे धावणं हेच हाती उरणार. आणि असं धावता धावता भाजप सगळीच अब्रू काढून घेणार नाही, याची काय शाश्वती? आहे खरा अस्तित्वाचा प्रश्न.

आता दोन्ही भावांपुढे सारखंच संकट असल्याने ते जवळ येतील / दुसर्‍याच्या अनुयायांवर, मतदारांवर हात मारून स्वतःचं बळ वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांना लवकर संपवून टाकतील असं काही बाही सुचतं आहे. पण ते विषयांतर होईल. त्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचं समाधान शोधण्याची जबाबदारी न घेतलेली बरी.  

Saturday, May 10, 2014

मोठे कठीण दिवस येऊ घातलेत


मला खूप वर्षांपूर्वीची एक लोकसभा निवडणूक आठवते. मध्य मुंबईतून मनोहर जोशी उभे होते, अर्थात शिवसेनेच्या तिकिटावर. त्यांना, शिवसेनेला, शिवसेनेच्या पाठिराख्यांना विजयाची इतकी खात्री होती की मनोहर जोशींनी छापलेल्या प्रचाराच्या पोस्टर्सवर ठळक अक्षरात लिहिलं होतं, "मनोहर जोशी निवडून आले!" आणि खाली लहान अक्षरात पुढचा मजकूर होता, ’असं जर आपल्याला वाचायचं असेल, तर शिवसेनेला मत द्या.’

मनोहर जोशींचा ९९००० मतांनी दणदणीत पराभव झाला. ते, त्यांचे पाठिराखे आणि दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांना ही घटना इतकी अतर्क्य वाटली, की बाळासाहेब जाहीरपणे उद्‌गारले (की लिहिते झाले आठवत नाही), "हा विजय बाईचा नाही, हा विजय गाईचा (इंदिरा काँग्रेसचं निवडणूक चिन्ह) नाही; हा विजय शाईचा आहे." त्यांना म्हणायचं होतं, इंदिरा काँग्रेसने काहीतरी लांडीलबाडी करून इकडची शाई (तेव्हा उमेदवाराच्या नावा-चिन्हापुढे शाईचा एक शिक्का उठवावा लागत असे) तिकडे केली.

मी आत्ता वाटेल ती पैज लावायला तयार आहे, की उद्या मोदीचा वा भाजपचा पराभव (म्हणजे तुलनेने. भाजपला अपेक्षा आहे, त्यापेक्षा खूप कमी जागा मिळणे, म्हणजे त्यांच्या लेखी पराभवच. आणि त्यांच्या प्रचारगदारोळाचा परिणाम मतदारावर होवो न होवो; त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर निश्चित झाला आहे. त्यांच्या अपेक्षा काहीच्या काही वाढून बसल्या आहेत. त्यांच्या लेखी त्यांचा पराभव होण्याची शक्यता आपोआपच अत्यंत दाट आहे!) झालाच; तर मोदी, जेटली, राजनाथ, अमित शहा, वगैरेंपैकी कोणीही तो पराभव खिलाडूपणे स्वीकारणार नाहीत. ते थयथयाट करतील. दंगे माजवतील. आगखाऊ भाषणं करतील. निवडणूक आयोगापासून सर्व संबंधित संस्था-व्यवस्थांच्या प्रामाणिकपणाबद्दल टिपेच्या आवाजात शंका उपस्थित करतील. मोदीच्या अखिलाडूपणाविषयी मला शून्य शंका आहे. स्वतःच्या अजेंड्यासाठी बिनदिक्कत जगाला आग लावण्याच्या त्याच्या मानसिक तयारीबद्दलही मला शंका नाही. मग उरलं काय? जो कुणी राज्यकारभाराच्या दोर्‍या हाती घेईल, त्याचं मनोबल आणि त्याला संबंधित संस्था-व्यवस्थांकडून मिळणारं पाठबळ.

दिवस मोठे कठीण येऊ घातलेत.

आणि समजा मोदीच पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली तर?

इथे मला काही वेगवेगळ्या शक्यता दिसतात. एक, भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही आणि एनडीएच्या नावाखाली आणि मोदीच्या नेतृत्वाखाली एक नवीन टीम राज्यावर येईल. आता, हे जगाला माहीत आहे, की गुजरातमध्ये लागोपाठ तीन वेळा निवडणूक जिंकूनही तिथे एक पक्ष म्हणून भाजपचा विकास झालेला नाही. तिथे भाजप हे मोदीचंच दुसरं नाव आहे. ’इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया’ असं तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष बारुआ म्हणाले, कारण तोवर काँग्रेसमध्ये दरबारी राजकारण रुजू लागलं होतं. भाजपमध्ये तोंडाने तसं कुणी म्हणत नाही. पण उद्या मोदी देशपातळीवर हेच करणार नाही, याची काय गॅरंटी? मोदीची कार्यपद्धती पहाता, हीच शक्यता जास्त. जगभरचा इतिहास हेच सांगतो की हुकूमशहा सर्वात अगोदर सहकार्‍यांचा काटा काढतो. विरोधकांपासून धोका नसतो, ते गारद झालेलेच असतात. त्यांना फुरसतीने संपवता येतं. आणि गुजरातेत सर्व महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणारा, विधानसभेत वादविवादात भाग न घेणारा, तिथे फार हजरही न रहाणारा आणि जनतेशी थेट संपर्क साधून राजा-प्रजा हे नातं पक्केपणाने स्थापन करणारा मोदी हुकूमशहा नाही, तर काय आहे? जगात काय लोकनियुक्‍त हुकूमशहा झाले नाहीत की काय?

अशा या मोदीचं युतीतल्या इतर पक्षांशी कसं पटायचं? ते तर (आता देशात नीट प्रस्थापित झालेल्या रिवाजानुसार) त्यांची किंमत मागणार. मोदी देणार? मग दोन्ही बाजू एकमेकांची उणीदुणी काढणार. भावना भडकावून आणि खर्‍याखोट्या पुराव्यांवर आधारित सरळ-तिरक्या तर्काने आपापल्या मतदारांना आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करणार. ताठर मोदीचा तो स्वभाव आहे. इतरांसाठी ती अस्तित्वाची लढाई असेल. दोघेही मोठ्या चेवाने लढतील. सत्ता धरून ठेवण्यासाठी वाटेल त्या थराला जातील.
मग काय होईल, याची कल्पना मी करत बसत नाही. कठीण परिस्थिती उद्‍भवेल हे मात्र नक्की.

समजा, ही वेळ आली नाही आणि भाजपची निरंकुश सत्ता स्थापन झाली. तर?

भाजपची म्हणजे मोदीची. एक असा मनुष्य, जो ’चुकलो’ म्हणत नाही. गोध्रा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांविषयी शोक व्यक्‍त करतो, त्यामध्ये जे कुणी गुन्हेगार असतील, त्यांना सजा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, म्हणतो; पण जो नंतरच्या हत्याकांडात पोळलेल्या एका विशाल समाजभागाची एकदाही विचारपूस करत नाही. त्या हत्याकांडाला आवर घालू पहाणार्‍या शासकीय अधिकार्‍यांच्या मागे जो चौकशा आणि बदल्यांचा ससेमिरा लावतो. त्या हत्याकांडाला जबाबदार असणार्‍यांना जो सन्मानाने मंत्रिमंडळात घेतो. त्या खुन्यांना पकडून देणार्‍या अधिकार्‍यांवर जो शासकीय गुपित फोडल्याचा अधिकृत आरोप करतो.
ज्याच्या प्रचारभाषणांत विरोधकांची खिल्ली उडवणे, इतिहासाची तोडमोड करणे, स्वतःच्या हितसंबंधांना अनुकूल नसलेल्यांच्या परधर्माचा सतत उद्धार करणे आणि स्वतःचा मोठेपणा निराधारपणे मिरवणे, याची रेलचेल असते.

ज्याची दीर्घद्वेषी असल्याबद्दल ख्याती आहे.

कसे असतील याचे सहकारी? याच्या नावाने काम करणारे अधिकारी? याचे अनुयायी? कसं असेल याचं राज्य? कुठल्या कामाबद्दल पाठ थोपटली जाईल त्या राज्यात आणि कसल्या प्रकारच्या कारभाराला, वर्तनाला उत्तेजन मिळेल?

मला भीती वाटते.

आता तिसरी शक्यता. समजा, मोदी नाही झाला पक्षापेक्षा मोठा, नाही झाली त्याची राजवट एकचालकानुवर्ती. म्हणजे समजा, त्याच्या कारभारावर भाजपची नीट पकड राहिली आणि भाजप या पक्षाला हव्या त्या दिशेने राज्यकारभार, पर्यायाने देश जात राहिला, तर? ही शक्यतादेखील विचारात घ्यायला हवी.

मी असं पहातोय, की भाजपच्या वतीने बोलणार्‍या सगळ्यांचा सूर निवडणूक जाहीर झाली तेव्हा होता, त्यापेक्षा नंतर चढत गेला आहे. काही जण उग्र झाले, काही ऐकूनच घेईनासे झाले, काही तर्काऐवजी आव्हानाची भाषा बोलू लागले. तरी मी स्वतःची समजूत काढली, होतं असं. वातावरण तापलं की आवाज चढतात. आणि आपल्याला चढे ऐकूही येत असतील. पण नाही. मोदीने मतदारकेंद्रात कमळ दाखवून आचारसंहितेचा सरळ सरळ भंग केला; हे त्याचं समर्थन करणार. एका सभेला परवानगी नाकारली; हे जिल्हाधिकार्‍याची जात काढणार, त्याच्या नातेसंबंधाना बोल लावणार. मोदीने इतिहासभूगोलाची - अडाणी असल्याने अजाणता, वा जाणत असून कुटील हेतूने - विल्हेवाट लावली; हे तिथेही त्याच्या पाठीशी उभे. शरद पवारसुद्धा बोलले की, दोनदा मतदान करा, असं. पण नंतर त्यांनी वा त्यांच्या अनुयायांनी त्याचं समर्थन नाही केलं. सारवासारव केली. मोदीच्या बाबतीत त्याच्या सर्वगुणसंपन्नतेला लहानसाही डाग लावून घ्यायला एक भाजपवाला तयार नाही! यातून मला एकच अर्थ काढता येतो: आमचा नेता सर्व कायद्यांच्या, चूक-बरोबरच्या, नीती-अनीतीच्या वर आहे. इतर सर्वांना लागू होणारे नियम त्याला लागू करणं, म्हणजे घोर अधर्म होय.

च्यायला, हा आख्खा पक्षच फॅसिस्ट आहे की! संधी मिळाली तर हे लोकशाही देखाव्यापुरती ठेवतील आणि एकपक्षीय राजवट आणतील. इंदिरा गांधींच्या अनुभवाने काही लोक शहाणे झाले; वेगळ्या अर्थाने हे भाजपवाले - तेव्हाच्या संदर्भात आरएसएसवाले - सुद्धा शहाणे झाले. त्यांना कळलं, वर वर नाटक चालू ठेवणं गरजेचं आहे. पण तवा तापला की पोळी भाजून घेण्याची त्वरा केलीच पाहिजे!

यातले काही जण म्हणे नाइलाजाने पक्षाची लाइन चालवतात. ’त्यांनाही त्यांचं करियर आहे’.
म्हणजे त्यांनी त्यांचा पर्याय निवडला आहे. तो पर्याय लोकशाहीचा नाही, विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरेचा नाही. तो पर्याय एक रंगछटा असणार्‍या फॅसिस्ट व्यवस्थेचा आहे. मरोत ते. त्यांच्याबद्दल कशाला सहानुभूती वाटून घ्यायची?
एकूण कठीण आहे.

आता कठीणपणाच्या दोन वेगळ्या परी.

मोदी रोज ज्या विमानाने अमदाबादेवरून निघतो आणि रोज अमदाबादला परततो, ते विमान अदानीचं आहे, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने छापली आहे. बरेच दिवस झाले, तिचा इन्कार कोणी केलेला नाही. अदानी हा उद्योगसमूह मोदीच्या कार्यकालात मोठा झाला आहे. तरीही ही सेवा ते कृतज्ञतेपोटी देत आहेत, असं मानणं अवघड वाटतं. अनिल आणि मुकेश, असा भेद न करता अंबानी लोकांच्या उद्योगांकडे बारकाईने बघितलं तर काय दिसतं?

मी अर्थशास्त्रज्ञ नाही. मी चुकत असेन. मला दिसतं, त्यात चूक काढली तर मी नक्की मत बदलेन. पण सध्या मला दिसतं, ते असं आहे:

२०१३ सालात एकूण भारतीय उद्योगाची वाढ ज्या दराने झाली, त्यापेक्षा रिलायन्सच्या वाढीचा दर कमी होता.

गॅसदराबाबत घोटाळा आहे. सरकार किंवा अंबानी किंवा दोघे खोटं बोलत आहेत. किंवा पूर्ण सत्य सांगत नाहीत. किती गॅस सापडला? त्याचं काय झालं? त्याचा दर डॉलरशी निगडित का? निवडणूक झाल्याबरोबर तो दुप्पट आणि नंतर लवकरच चौपट होणार की नाही?

मुंबईच्या उपनगरात बीएसइएस ही कंपनी वीज पुरवत होती. ती अंबानीने घेतल्यावर लोक टाटांकडे का वळू लागले? वीज पुरवण्यासाठी टाटांना बीएसइएसच्याच नेटवर्कचा उपयोग करावा लागत असल्यामुळे त्याचं भाडं टाटांना लावून अंबानी स्वतःच्या नाकर्तेपणातूनही नफा उकळत आहेत की नाही?

दिल्लीत अरविंद केजरीवालने अंबानीविरुद्ध एफआयआर दाखल केली. जाहीर आरोप केले. मग अंबानीकडून केजरीवालविरुद्ध कृती न होता, ही बातमी देणार्‍या वाहिन्यांना का नोटीस पाठवली गेली?

रिलायन्सने बांधलेल्या मुंबई मेट्रोवर आता वाहतूक सुरू होईल. तिच्या उभारणीचं वेळापत्रक काय होतं? किती वर्षांचा विलंब झाला आहे? त्यामुळे खर्च किती वाढला? मेट्रोच्या तिकिटांचे दर कोणी ठरवायचे, यावर सध्या वाद चालू आहे. त्याच्या मुळाशी काय आहे? मेट्रोचं नाव ’मुंबई मेट्रो’ न ठेवता ’रिलायन्स मेट्रो’ असावं, हा रिलायन्सचा हट्ट चालू नये म्हणून कोर्टाकडून आदेश आणावा लागला की नाही? आदेश आल्यानंतरही नाव बदलण्यात कंपनीने टाळाटाळ केली की नाही?

सरकारी धोरणं स्वतःला अनुकूल करून घेऊन अंबानींनी धंदा कसा वाढवला, यावर पुष्कळ लिहून आलं आहे. प्रमोद महाजन यांनी सार्वजनिक मालकीच्या टेलीसर्वीस देणार्‍या उद्योगांना खड्ड्यात घालून अंबानीचं उखळ पांढरं करण्याचा पराक्रम कसा केला, हे लोकांच्या आठवणीत आहेच. उद्या मोदीची सत्ता आली, तर काय होईल?

कठीण आहे!

मोदी निवडून येवो, न येवो; ही निवडणूक मोदीच्या नावाने ओळखली जाईल. मला ती भारतीय निवडणूक व्यवस्थेला अमेरिकी वळणावर नेणारी म्हणूनसुद्धा लक्षात राहील. अमेरिकेचा अध्यक्षीय उमेदवार म्हणजे एक पॅकेज असतं. तो दिसणार कसा, बोलणार कसा, विनोद कशावर आणि नेमका कुठे करणार, त्याच्या बायकोची प्रतिमा कशी असणार, हे सगळं एक एजन्सी ठरवते. उमेदवार किती लायक आहे, यावर फार कमी अवलंबून असतं. मतदारांच्या मानसिकतेचा बारीक अभ्यास करून अध्यक्षीय उमेदवाराची विशिष्ट प्रतिमा प्रोजेक्ट केली जाते. एकूण, बाजारात माल विकावा, तसा अमेरिकी अध्यक्ष खपवला जातो. (ओबामाची पहिल्या वेळची निवड थोडी अपवाद. पण स्वतः बुशसाहेब म्हणून गेले, ’मी इतका अप्रिय झालो होतो, माझ्यामुळे रिपब्लिकन उमेदवार पडला!’)
मोदी हे आपल्याकडलं ’बाजारू माला’चं पहिलं उदाहरण आहे. मोदीची संपूर्ण प्रचारमोहीम एका (बहुधा अमेरिकीच) एजन्सीने आखलेली आहे. तो विजयी होवो न होवो, एका जोरदार लाटेचा आभास निर्माण झालेला आपण पहातो आहोत. हा मालाच्या पॅकेजिंगचा, प्रतिमानिर्मितीचा प्रचंड विजय आहे. आता मागे फिरणे नाही! यापुढे भारतातही प्रत्येक निवडणूक अशीच लढवली जाईल. मतदारांच्या -भावनाप्रधान, परंपरावादी, सहिष्णू, भाबड्या, कौटुंबिक, वगैरे, वगैरे वगैरे - मानसिकतेचा ’मार्केट स्टडी’ करून पक्ष वा उमेदवार यांची प्रतिमा प्रक्षेपित केली जाईल.

मग ती वास्तव असो की भ्रामक.


हे तर आपल्याला बघावं लागणार आहे. कशाकशाची तयारी करणार आपण?

Monday, April 21, 2014

तथाकथित धर्मनिरपेक्षवादि - बुद्धिवादी - प्रगतीवादी - वगैरे


काय दिवस आलेत! ब्लॉगवर काहीतरी चर्चा, विश्लेषण, रसग्रहण असायला हवं. हे करताना "माझ्या ब्लॉगवर मी कितीही वेळा ’मी’ म्हणीन!" असा पोरकटपणा करण्याची मोकळीक हवी. पण हे असलं काही तरी टाकावं लागतं.

एक मेल आली. साताठ मुसलमान पुढार्‍यांची आक्रस्ताळी आणि सवंग वक्‍तव्यं अटॅच करून
"भारतीय मुसलमानांची बाजू घेणाऱ्या  तथाकथित धर्मनिरपेक्षवादिंना या विषयी काय म्हणावयाचे आहे ?"
असा भयंकर गंभीर प्रश्न विचारणारी. कोणाला तरी विचारून मला माहितीसाठी पाठवलेली नव्हती ही मेल. फक्‍त मलाच होती. म्हणजे, तसं तिचं रूप होतं. दहा राजकीय / सामाजिक व्यक्‍तींना विचारून मला त्याची कॉपी पाठवली असती, तर मी कंटाळून दुर्लक्ष केलं असतं. पण मी सोडून आणखी कोणाचं नावच नाही! हे खोडी काढणं झालं. म्हणून त्याला उत्तर दिलं. ते हे असं:

मी स्वतःला ढोबळ अर्थाने मानवतावादी मानतो आणि मानवतावादाचा एक भाग म्हणून धर्मनिरपेक्ष असणे कर्तव्य समजतो. तेव्हा तथाकथितधर्मनिरपेक्षवादींना (हा दीदीर्घ हवा; पण होते चूक घाईघाईत किंवा कसल्याशा आवेगात. आणि ते नसलं माहीत, तरी बिघडत नाही.) केलेलं आवाहन मला लागू पडत नाही. शिवाय हे आवाहन "मुसलमानांची बाजू घेणार्‍या धर्मनिरपेक्षवादिंना" उद्देशून आहे. हा तर मी नव्हेच. तरीपण दिवसेदिवस अधिकाधिक उर्मट, उद्धट होत चाललेल्या सर्व धर्मरक्षकांना पण माझ्या दृष्टीने धर्मलंडांना (हा शब्द माझा नव्हे. माहीत नसेल, तर शब्दकोश पहावा.) काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. (वास्तविक याचा काही उपयोग नाही, कारण तेच तेच असत्य वारंवार बोलत रहाणे, या तंत्रावर उत्तरं आणि खुलासे, यांचा परिणाम होत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे: Call a dog mad and shoot him. मुद्दा shoot him असतो. त्यासाठी कुत्र्याला वेडा ठरवणं क्रमप्राप्‍त असतं. मग तो वेडा असो वा नसो. ही पुन्हा पुन्हा केली जाणारी तथाकथितवगैरे काव काव त्या माथेफिरू हिंसेचीच तयारी असते.)

१. हिंदू आणि मुसलमान, दोन्हींमधले धर्मवेडे एकमेकांचे हितसंबंध सांभाळत असतात. हिंदू धर्मवेड्यांनी डरकाळ्या फोडल्या, की सर्वसामान्य मुसलमान घाबरून एकगठ्ठा त्यांच्या धार्मिक पुढार्‍यांकडे जातात - कारण हा शिंपी आहे, की कारकून की मराठी की उंच की गोरा की स्त्री की पुरुष की गरीब की श्रीमंत या सगळ्या भेदांना बाजूला सारून त्याची एकच एक ओळख ठरवली जाते: मुसलमान. तेच उलट. कुणी धर्मवेडा मुसलमान मौलवी काही बरळला; की सर्वसामान्य हिंदूला न होता शिवाजी, तो होती सुंता सबकीअशी आचरट आणि धडधडीत खोटी भीती दाखवता येते.

२. जवाहरलाल नेहरू कधीही देवळात जात नसत. त्यांनी कुठल्याही धर्माच्या पुढार्‍याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं टाळलं. हे इंदिरा गांधींनी सुरू केलं. ते चूक होतं. राजीव गांधींनी अयोध्येच्या विवादात अडकलेल्या मंदिराचं दशकानुदशकं बंद असलेलं कुलूप उघडलं, हे सुद्धा चूक. शहाबानो खटल्याच्या निकालानंतर केलेली कायदादुरुस्ती चूकच.
हिंदू नसलेल्या कोणालाही समान नागरिकत्व मिळू नये, असं म्हणणारे गोळवलकर गुरुजी चूक की बरोबर? ते चूक नसतील, तर "सत्ता प्राप्‍त झाल्यावर आम्ही त्या आशयाची घटनादुरुस्ती करू" असं स्वच्छ न सांगणे हा भ्याडपणा नव्हे का? मग असल्या भ्याडांना "तथाकथित हिंदुत्ववादी" म्हणावं का? असल्या भ्याड कुत्र्यांची स्थिती आज ना उद्या "न घरका ना घाटका" अशी होण्याची शक्यता नाही का? (इथे "कुत्रा" हा शब्दप्रयोग म्हणीला अनुलक्षून आहे. त्या भ्याडांच्या वृत्तीला अनुलक्षून नव्हे.)

३. एखाद्या बलिष्ठ विरोधकाच्या वा प्रतिस्पर्ध्याच्या दहशतीने वा दडपणाखाली संघटना वा टोळी बांधली जाते. टोळीचा नायक सोडून टोळीतल्या सर्वांच्यात सामायिक काय असेल, तर विरोधी बळाची भीती. नायकाचे हेतू अर्थात वेगळे असू शकतात. कामगार संघटना ते शिवसेना यात मोडतात. या न्यायाने हिंदूंमधल्या काही माथेफिरूंच्या आक्रमक अविर्भावाला घाबरून काही मुसलमानांनी टोळी / संघटना बांधण्याचा प्रयत्न केला, तर ते निदान तर्काला धरून असेल; पण ८०% पेक्षा जास्त संख्या असताना सर्व हिंदूंची एक टोळी बांधण्याचं प्रयोजन काय? त्यांना घाबरवून सोडण्याचे प्रयत्न करण्याचं कारण काय? नायकाचे अंतस्थ हेतू? की नायकच paranoia चा पेशंट असणे? सा‍र्‍या हिंदूंचे हितसंबंध मुळीच एक नाहीत, हे तर (डोक्यात paranoia ने थैमान न घातलेल्या) कोणालाच अमान्य होणार नाही.

४. गेल्या कित्येक वर्षांपासून नुसता मुजराहा शब्दप्रयोग मराठी भाषेच्या बाहेर फेकला गेला आहे. तो एक तर त्रिवार मुजराअसावा लागतो नाही तर मानाचा मुजरा’. तसंच हे तथाकथित धर्मनिरपेक्षवादीअसावं. हा शब्दप्रयोग करणारे जर पोपटपंची करत नसून त्यांना खरंच नुसते धर्मनिरपेक्षवादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी यात काही फरक अभिप्रेत असेल, तर कृपया तथाकथित नसलेले धर्मनिरपेक्षवादी कोणाला म्हणावं, हे स्पष्ट होईल का? ही प्रामाणिक विनंती आहे. तिचं समाधान अपेक्षित आहे. नाही तर हिंदुत्ववाद्यांच्यात केवळ तथाकथित बुद्धिवादीच असतात, असं म्हणावं लागेल.

५. येवढं झाल्यावरही "पण यात या मुसलमानी वक्‍तव्यांचा निषेध कुठे आहे?" असा तथाकथित चतुर अविर्भाव घेता येतो. तर एक कायमची दवंडी पिटतो: तोंडी तलाक, बुरखा, एका पुरुषाला चार बायका करण्याची मुभा, वगैरे मागास प्रथा आहेत. त्यांचा संबंध प्रेषिताशी लावणे, ही लबाडी आहे. अस्पृश्यता, सती, केशवपन, अल्पवयीन मुलीशी विवाह, विधवाविवाह, पैतृक संपत्तीवर मुलीचा हक्क असणे, स्त्रीशिक्षण, वगैरे वगैरे सर्व संदर्भात रूढी मोडताना आणि प्रगतीशील कायदे करताना त्या त्या काळच्या हिंदुत्ववाद्यांनी जोरदार विरोधच केला होता. म्हणजे जे कोणी हिंदुत्ववादी स्वतःला प्रगतीशील म्हणवतात, ते इतिहासाच्या साक्षीनुसार तथाकथित प्रगतीशीलच असतात, हे काही अ-प्रगतीशील व असहिष्णू मुसलमानांच्या वक्‍तव्यांवर आक्षेप घेणार्‍यांना सांगावंसं वाटतं.

५. हे शेवटचं. मेल कुणाला तरी असते. मग तिची कॉपी आणखी कुणाला तरी असते. त्यानंतर मग हा पत्रव्यवहार कुणाच्या तरी माहितीसाठी BCC केला जातो. एकालाही न संबोधता सगळी डिलिव्हरी थेट BCC करण्याची आयडिया मला अलिकडेच कळली. हा मजकूर ज्याला ज्याला पाठवला, त्यापैकी कोणालाही तो आणखी कोणाला पाठवला, हे कळू नये, हा यामागचा उद्देश असतो. आता, हा तथाकथित वाला आक्षेप मी सोडून कोणाकोणाच्या कानावर घातला हे माझ्यापासून लपवण्याचं कारण कळू शकेल काय? इथे मात्र उत्तराची अपेक्षा नाही. न कळवण्यामागे काही तरी न सांगण्याजोगी - किंवा लपवण्याजोगी - अडचण असेल, हे मी समजून घेईन. मला मात्र यात काही खाजगी, वैयक्‍तिक दिसत नाही. उलट, स्वतःची भूमिका सार्वजनिकपणे मांडण्याची संधी दिसते. तर मुळातली मेल आणि हे माझं उत्तर, दोन्ही मी फेसबुकावर आणि माझ्या ब्लॉगवर टाकत आहे. 


Monday, March 31, 2014

तिच्यात ग्लॅमर नव्हतं


’बेबी’ नंदा


माझा काका त्याच्या जवळ जवळ हयातभर ’फिल्म इंडस्ट्री’त होता. तिकडच्या गोष्टी रंगवून सांगायचा. दोन की तीन वेळा त्याचं नाव दाखवलं म्हणून त्याने आम्हा घरच्या लोकांना पासावर सिनेमा बघायला नेलं होतं, असं मला आठवतं. त्यातला एक चित्रपट होता ’आहेर’. मराठी. नामदेव व्हटकर आणि सुलोचना त्यात होते. ’आहेर’च्या शूटिंगला मी गेल्याचं आणि कमालीचा कंटाळल्याचंसुद्धा आठवतं.

हे खूप लहानपणचं आहे. मी प्राथमिक शाळेत असतानाचं. म्हणजे १९६० च्या अगोदरचं. रमणकाकाने ’फर्स्ट लव’ हा चित्रपट दाखवायला नेलं की नाही, मला आठवत नाही; पण ’फर्स्ट लव’ची पोस्टर्स, हँडबिलं त्याने घरी आणलेली स्पष्ट आठवतात. हिरो होता मेहमूद. आणि हिरॉइन नाज. हँडबिलावर दोघांचे फोटो होते आणि तिचं नाव ’बेबी नाज’ असं लिहून ’बेबी’वर काट मारलेली होती. मी त्याला विचारलं, हे बिघडलंय म्हणून तू घरी घेऊन आलायस का? तो म्हणाला, नाही, ते तसंच आहे. त्या वयात मी सर्व मानवी व्यवस्थांच्या बाबतीत भयंकर श्रद्धाळू होतो. ’बेबी’वरची ती ठळक काट मला त्रास देत राहिली. वाटलं, हे असं पाहून कोण कशाला लक्ष देईल? काट मारली म्हणजे चूक, म्हणजे रद्द; असंच सगळे समजतील. रमणकाकाने मला समजावलं, “अरे, बेबी नाजचा (तो ’बेबी’ नाज, असंच म्हणाला) हा हिरॉइन म्हणून पहिलाच सिनेमा. यात ती हिरॉइन आहे. म्हणजे ’बेबी’ नाही! जाहिरातीत असतं असं.”

’फर्स्ट लव’ आला आणि गेला. कोणाला त्याची आठवण नाही. चित्रगुप्‍तच्या गाण्यांशिवाय त्याचं काही शिल्लक नाही. रमणकाकाच्या प्रोड्यूसरचे पुष्कळ चित्रपट बुडत. येतच नसत. पण त्याला कधीही, एकदाही फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर पडावंसं वाटलं नाही. मस्त रमला होता.

 बेबी नाज प्रमाणे नावामागे ’बेबी’ लागलेली नंदा गेली आणि हे आठवलं. तिचे पाहिलेले न पाहिलेले चित्रपट आठवले. सगळ्यात जास्त ठसलेला चित्रपट म्हणजे ’इत्तेफाक’. राजेश खन्नाबरोबरचा. आख्खा चित्रपट एका रात्रीत घडतो.
इत्तेफाक
जवळपास एका बंगल्यात घडतो. चित्रपटात गाणं नाही. दाढीचे खुंट वाढलेला राजेश खन्ना पहिल्यापासून शेवटपर्यंत वेडसर दिसत रहातो. नंदाला फारच कमी बोलणं आहे. आणि दोघांशिवाय आणखी पात्रं आहेत – नाहीत. तिचा या चित्रपटाएवढा ठळक रोल दुसरीकडे कुठे पाहिल्याचं आठवत नाही.

नंदाचा एकूण सिनेमा स्पष्टपणे दोन भागांत विभागता येतो. एक, साध्यासुध्या ओळखीच्या, एक प्रकारे दुय्यम भूमिका; आणि दोन, कमी-जास्त ग्लॅमर असलेल्या नायिकेच्या भूमिका. या दुसर्‍या प्रकारच्या एकाही भूमिकेत ती कधी ’खरी’ – म्हणजे तिथली, हिंदी चित्रपटातल्या बेगडी, लुटुपुटूच्या जगातली वाटली नाही. ’जब जब फूल खिले’ मध्येसुद्धा. तशी स्मिताही वाटली नाही. पण स्मिताचं न वाटणं इस पार, तर नंदाचं उस पार. ग्लॅमरस नायिका म्हणून नंदाला बघताना काही वाटलंच नाही. त्यामुळे ’धरती कहे पुकारके’, द ट्रेन’, ’गुमनाम’ सारख्या चित्रपटांमधल्या नंदाचं काही इम्प्रेशनच मनावर राहिलेलं जाणवत नाही. उलट, ’जब जब फूल खिले’ मध्ये ’ये समा’ म्हणत डोलताना, वादळात शशी कपूरला हाका घालत असताना, पार्टीत त्याच्या मुस्कटात देताना ती कशी खटकत रहाते, हेच आठवतं.

त्या मानाने तिला दुय्यम स्थान असलेल्या चित्रपटांमध्ये ती बरी वाटली. ते बरे आठवतात. मग ’हम दोनो’तल्या मेजर वर्माचा
हम दोनो
भांग दुरुस्त करणारी त्याची पत्नी आठवून बरं वाटतं. कॅप्टन आनंदची प्रेयसी असलेली साधना दिसते तशीच नंदासुद्धा सुंदर आणि लहान दिसते. पण साधना ’प्रेयसी’ दिसते, तर नंदा ’पत्नी’. आणि यात नंदाच्या अभिनयाचा भाग आहेच. ’काला बाजार’मध्ये लीला चिटणीसबरोबर ’ना मै धन चाहूँ’ गातानाची तिची सोज्वळ मूर्ती आठवते आणि त्या सोज्वळपणाच्या पार्श्वभूमीवर अपराधी मन घेऊन पडलेल्या खांद्यांनी जिना चढणार्‍या देव आनंदचा कोंडमारा उठून दिसतो, हे जाणवतं. (अर्थात, त्यात गाण्याच्या गोड, भक्‍तिरसपूर्ण चालीचाही मोठा 
वाटा आहे!)

’धूलका फूल’मधली राजेंद्र कुमारची बायको आठवते. माला सिन्हाशी संबंध संपल्यावर तो नंदाशी लग्न करतो. ती थोडीशी जरी ’दिल अपना और प्रीत परायी’मधली राज कुमारची पत्नी नादिरा, हिच्यासारखी असती; तर ’धूल का फूल’चा तोल कलला असता. तो कलला नाही, हे श्रेय बी आर चोप्राचं. त्याने माला सिन्हाला केंद्रस्थानावरून हलवायला बरोब्बर पूर्ण पवित्र आणि निरागस दिसणारी नंदा पकडली!

’कानून’सुद्धा आठवतो. ’कानून’मध्ये अशोक कुमार आणि राजेंद्र कुमार यांना मोठे रोल होते; पण बाकीच्या मेहमूद, पळशीकर, ओम प्रकाश, शशिकला, जीवन अशा किती तरी लोकांच्या लहानमोठ्या भूमिकांचा समर्थ हातभार चित्रपटाला लागला होता. त्यांच्यातलीच एक नंदा. तिचं कामही चित्रपटाच्या सफाईदारपणात भरच टाकतं. धनीरामचा खून केल्याची खोटी कबुली द्यायला ती कालियाला पैसे देते; पण ती नंदा असल्यामुळे हे कृत्य भ्रष्टपणाचा आविष्कार असल्याचं प्रेक्षाकाच्या मनात येत नाही. ’कानून’सुद्धा बिनगाण्याचा! दोन दोन बिनगाण्याच्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे, हा एक रेकॉर्डच असावा नंदाच्या नावावर.

मचलती आरजू

नंदा गेल्यापासून पेपरात पुष्कळ छापून आलं. चॅनेलवाल्यांनीही तिची गाणी दाखवली. कुठली कुठली इकडची तिकडची गाणी दाखवताना तिची वरच्या श्रेणीची गाणी दाखवण्याच्या आड काही तरी आलं असावं. ’अल्ला तेरो नाम’ (हम दोनो) दिसलंच नाही. ’मचलती आरजू’ (उसने कहा था) सुद्धा नाही. ’भैया मोरे’ (छोटी बहन) नाही. असं कसं? मग रेडिओ सिलोन – श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आठवतं. हल्ली सकाळचं ’पुराने फिल्मोंके गीत’ ऐकत नाही; पण पूर्ण विश्वास वाटतो, की त्यांनी नंदाला न्याय दिला असेल.

Thursday, March 20, 2014

’श्रीमंत’ खुशवंतसिंग आणि आमचा चार्वाक





साल आठवत नाही; पण ते महत्त्वाचं नाही.  आम्ही चार्वाक काढायला सुरुवात केली आणि दर वर्षी काही तरी नवे विषय, वेगळी मांडणी आणण्याचा प्रयत्न करायचो. तर एका वर्षी विषय निघाला, ’नॉर्मलपणा’. विषय निघाला की त्यावर एक टिपण बनवायचं काम बहुधा माझं असायचं. (सुचवणं आणि चर्चेला तोंड फोडणारा सतीश तांबे.) तर, मी टिपण बनवलं. आमचं म्हणणं थोडक्यात असं होतं:
प्रत्येकाला त्याचं जिणं, त्याचा परिसर नॉर्मल वाटतो. उदाहरणार्थ माझा जन्म चाळीत झाला. बालपण तिथेच गेलं, तर चाळीतले सार्वजनिक संडास आणि तिथल्या घरांची सदा उघडी दारं हा माझ्या सहजमूल्यांचा भाग होऊन जातो. मग मला त्यात काही वावगं वाटत नाही. त्याहीपेक्षा खरं असं की जोपर्यंत वेगळी स्थिती माझ्या नजरेत, आकलनात येत नाही; तोपर्यंत माझी असलेली स्थिती, हेच एकमेव वास्तव माझ्यासमोर असतं. त्याचा ठसा अर्थात खोल उमटतो आणि नॉर्मलपणा म्हणजे काय, हे ठरवताना मला सर्वात जास्त दिशा देतो. तर, चाळीतलं रहाणं; रस्त्यावर, झोपडीत वाढणं, एकटं असणं, वगैरे अनंत शक्यतांमध्ये ’श्रीमंतीचा नॉर्मल सेन्स’ हासुद्धा एक अतिमहत्त्वाचा मुद्दा होता. नॉर्मल म्हणजे काय, याचा शोध घेताना नॉर्मल श्रीमंत तर मोजायला हवाच.
आज पन्नाशी ओलांडलेल्या कुणालाही ’नॉर्मल श्रीमंत’ ही संकल्पना मराठीत कळायला किती कठीण, हे समजेल. एक मोठा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा आडवा आला की मराठीत नीट ’श्रीमंत’ ठरतील अशा व्यक्‍तींचा घोर तुटवडा. कोणाला शोधायचं? त्याला वा तिला लिहिण्याचं अंग नसलं तरी विषयाला धरून बोलण्याचं अंग तरी हवंच. कोण?
मला वाटतं, खुशवंतसिंग हे नाव सुनील तांबेने सुचवलं. नवी दिल्ली जिथे वसली आहे, ती बहुतेक जमीन खुशवंतसिगांच्या वडिलांची, हे सांगितल्यावर त्यांच्या श्रीमंतीचा वा ती श्रीमंती त्यांना नॉर्मल वाल्याचा आणखी खुलासा करायला नको. मी उत्साहाने आमच्या विषयाला धरून एक पत्र बनवलं. आणि ते पाठवून दिलं. फार तर नाही म्हणतील. न विचारता थोडेच हो म्हणणार आहेत?
ते हो म्हणाले! ग्रेट. पण त्यांचं म्हणणं होतं, की मी लिहिणार नाही, कोणीतरी यावं आणि मी बोलेन ते रेकॉर्ड करून लेख बनवावा. इंग्रजीत पत्र लिहिणारा मी, मग हे पुढचं काम करणाराही मीच. गेलो. तो माझा राजधानी एक्स्प्रेसच्या चेअर कारमधून केलेला पहिला प्रवास. दिल्लीत माझी रहाण्याची व्यवस्था सुनीलच्या वडिलांनी मधु दंडवतेंच्या सेक्रेटरीच्या ब्लॉकमध्ये केली. तिथे जाऊन मी खुशवंतसिंग यांचं घर शोधून काढलं. फोन करून भेटायला गेलो, तर ते कानावर हात ठेवते झाले! मी हबकलो. मग मी धीर एकवटून त्यांना विषयाची आठवण दिली. मग त्यांना आठवलं. उत्साहाने म्हणाले, होय, होय. बोलतो. गिव मी ऍन अवर. कम बॅक इन ऍन अवर अँड वी विल टॉक. मुद्दे काढलेला कागद माझ्या हातात होताच. तो मी त्यांच्या सुपूर्द केला आणि बाहेर पडलो. दिल्लीला जाण्याचीही ती माझी पहिलीच वेळ. कुठेही जाण्याचं मला सुचलं नाही की धीर झाला नाही. बरोबर एका तासाने परत गेलो. त्यांनी समोर बसवलं. टेप रेकॉर्डर नीट काम करतो आहे, याची मी खात्री करून घेतली आणि ते बोलू लागले.
मी रीतसर घेतलेली ती एक प्रकारे पहिलीच मुलाखत. त्यानंतर अनेक मुलाखती घेण्याची वेळ आली. पण खुशवंतसिंगांइतकं अस्खलित बोलणारं कोणीही भेटलं नाही. मी अधून मधून फाटे फोडत होतो; पण त्याची गरज नव्हती. ते जे म्हणाले, ते जसंच्या तसं, शब्द न्‌ शब्द उतरवून काढलं, त्याचं मराठी भाषांतर केलं आणि लेख तयार झाला. एक अक्षर एडिट करावं लागलं नाही.
लेख उत्तम झाला. खुशवंतसिंग यांनी इंग्रजी-हिंदी, फारतर पंजाबी आणि त्यांना येणार्‍या इतर भाषा, यांच्या बाहेरच्या भाषेत छापण्यासाठी किती लेख लिहिलेत, मला माहीत नाही; पण मराठीतला हा एकमेव. ’आजचा चार्वाक’ या आमच्या वार्षिक दिवाळी अंकात आलेला. मी आणलेला!