Saturday, March 30, 2013

विश्वास


माझा एक मित्र वारला. गेली काही वर्षं आजारी होता आणि त्याच्या आजारावर उपाय नव्हता हे मला, त्याला, सर्व संबंधितांना माहीत होतं. तेव्हा तो गेला यात अनपेक्षित काहीच नव्हतं. त्याची प्रकृती गेल्या महिन्या दोन महिन्यात झपाट्याने बिघडत गेलेली मी पहात होतो. आमच्या इतर मित्रांना त्याला भेटायला जाण्याची सूचना करत होतो. म्हणजे तो जेव्हा गेला, ती वेळही अनपेक्षित नव्हती.

तरी तो गेल्याची खबर ऐकली तेव्हा पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. काही सुचेनासं झालं. असं वाटलं, वडील गेले, आई गेली, सुधीर गेला; आता हा. स्वतःची ओळख आपण एकेका संदर्भातून ठरवत असतो. बहुधा ते सगळे संदर्भ कोणा ना कोणा व्यक्‍तीशी जोडता येतात.  त्या व्यक्‍तींच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत आलेले असतात. ती माणसं जगातून नाहीशी होणं म्हणजे आपली ओळख, आपला जगाशी असलेला संबंध पातळ, विरळ होत जाणं. असं करत करत केव्हा तरी आपण नुसते शरिराने उरणार. दत्तो वामन पोतदार गेले तेव्हा अत्र्यांनी लिहिलं, ’आम्हाला बाबुराव म्हणणारा शेवटचा माणूस गेला.’ चमत्कारिक वाटलं म्हणून हे विधान अजून लक्षात राहिलं; पण आता कळतं, अत्र्यांची ओळख ठरवणारा एक पैलू पोतदारांबरोबर लोपला. अत्रे अपूर्णांकात उरले. बुटल्या गेला आणि मी अपूर्णांकात उरलो.

त्याचं नाव विश्वास. बुटका होता म्हणून कॉलेजात केव्हा तरी ’बुटल्या’ झाला, तो आम्हा मित्रांच्यात कायमचा. त्याची जवळीक कुठून झाली हे मला नीट आठवतं. सीनियर बीएससीच्या शेवटी रीडिंग रूममध्ये वाचत बसलो असताना बाळू जोगळेकरने बाहेर बोलावलं आणि विचारलं, ’पुण्याला येतोस का?’ मी आनंदाने ’हो’ म्हणालो. तर बाळूने खुलासा केला, ’तसं नाही; चालत.’ मी हुरळूनच गेलो. काय भारी आयडिया आहे! जाऊया की. ’कोण कोण?’ विचारल्यावर बाळूने जी नावं घेतली त्यात हा होता. वर्गातच होता पण मी त्याला जेमतेम ओळखत होतो. एकदा तो डोक्याला पट्टी बांधून आल्याचं आठवत होतं. हाइकला डोक्यात दगड पडला आणि खोक पडली, त्याचं ते चिन्ह होतं. मी स्वतः होऊन काहीही न करणारा; हाइकला गेलो नाही की मराठी वाङ्‍मय मंडळाच्या कुठल्या उपक्रमाला. त्यामुळे ’माझ्याप्रमाणे वर्गात मागे बसणारा मुलगा’, यापलिकडे मला त्याची फारशी माहिती नव्हती. खरं म्हणजे असायला हरकत नव्हती. मी जसा पीरियडपेक्षा कॉलेजसमोरच्या पायरीवर जास्त असणारा, तसाच तोही. त्याचे माझे काही मित्र समानही होते. पण माझे बहुतेक मित्र रूढ सांस्कृतिक उतरंडीत ’वरचे’ होते; त्याच्या मित्रांच्यात आउटलाइनवाल्यांचा भरणा जास्त होता.

आम्ही पुण्याला चालत कधी गेलोच नाही. त्याने नंतर मुंबईहून निघून किनारपट्टीने महाराष्ट्र पार करण्याची कल्पना मांडली. वाटेत किती खाड्या लागतील आणि त्या कशा पार करायच्या, हे सगळं त्याने वर्णन करून सांगितलं. तेही आम्ही केलं नाही. पण त्याच्याबरोबर मी पुष्कळ हाइक केल्या. इतक्या, की माझ्या व्यक्‍तिमत्त्वात कशाचं योगदान मोठं आहे, हे ठरवताना मी जुनी हिंदी गाणी आणि शहरापासून दूर डोंगर-दर्‍या–जंगल; साध्या शब्दांत ’हाइक’, असं मला सुचलं होतं.

आणि माझ्यासाठी हाइक आणि तो हे एकच होतं. त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा जेव्हा बाहेर पडलो आणि गाव मागे पडल्यावर जो एक उल्हास येतो, त्यात त्याने तोंड उघडून ’पीपल छइयाँ, बैठी पलभर, भरके गगरिया,’ असा सूर काढला तेव्हा त्याच्यापेक्षाही मोठा आ वासून ’हाय रे!’ ओरडताना मला मेलेमे खोया हुवा भाऊ भेटल्यासारखं वाटलं. ’बिछुआ’ हे गाणं सर्वांना माहीत असलेलं तरी; पण त्याचं दुसरं आवडतं गाणं जे तो आळवून आळवून गायचा, ते होतं ’आदमी’तलं रफी-तलत डुएट: ’ऐसी हसीन रात’. आणि प्रेमपुजारीतलं ’यारों नीलाम करो सुस्ती’.

त्याच्या प्रेमात पडण्याची प्रोसेस बराच काळ चालू राहिली. तो कल्याणला रहायचा. मी नवीन नवीन चुनाभट्टीला गेलो होतो. हायवेला लागून आमची सोसायटी, पण तेव्हा बस हायवेवर थांबत नसे. सायनवरून सुटली की थेट अमरमहाल. चुनाभट्टीला जाण्यासाठी सायनला उतरून ३७१ पकडावी लागे. ती फाटकातून जात असे (अजूनही तशीच जाते). अत्यंत बेभरवशाची फ्रीक्वन्सी. त्यापेक्षा दादरहून कुर्ल्याला जाऊन हार्बर लाइनवरून चुनाभट्टी, हे मला जास्त बरं वाटलं. हा रेल्वेवाला. एखाद्याने मामाच्या गावाबद्दल बोलावं तसा हा रेल्वेबद्दल कौतुकाने, अभिमानाने बोलत असे. शेवटपर्यंत. त्याने मला त्याच्यासारखा रेल्वेवाला बनवलं. दादर आमची वावरण्याची जागा. घरी जायला आम्ही स्टेशनवर आलो, की तो आठ पाच बदलापूर सोडत असे कारण ती कुर्ल्याला थांबत नसे. त्यानंतर आठ दहा कर्जत, सव्वा आठ कल्याण, मग एकदम पावणे नऊ कसारा, नऊ पाच कल्याण अशा गाड्या आम्ही गप्पांच्यात आणि सिगारेटचे दम मारण्यात सोडत असू. त्यानंतर मात्र तीन नंबरवरून एक नंबरवर यावं लागे, कारण फास्ट गाड्या संपल्या.

एकदा काय झालं मला आठवत नाही (दारूत नाही, हा दारूतला अजिबात नव्हे. आणि ग्रॅजुएशननंतरच्या त्या बेकारीच्या काळात दारूची चैन करायला कोणाचकडे पैसे नव्हते. दारूची ओळख खूप नंतरची.); पण दादरला एकची कर्जतसुद्धा गेली. आम्ही रात्र स्टेशनवरच काढण्याचा निर्णय घेतला. सुखाने इकडे तिकडे केल्यावर पुढची गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाकडे घरी जायला जरी रेल्वे पास असला तरी दोघांकडे मिळून सतरा पैसे होते. नो प्रॉब्लेम. आम्ही जमेल तेवढा उशीर करून तेरा पैशांचा एक चहा आणि त्यावर एक चार पैशांची चारमिनार शेअर केलं आणि चार नंबर प्लॅटफॉर्मवर आडवे झालो. सकाळी मला जाग आली तर हा कोणाशी तरी बोलत होता. आमच्या एका मित्राचा मित्र मेडिकल कॉलेजला चालला होता. पायाने ढोसून याने मला उठवलं आणि त्या मित्राच्या मित्राकडून दोघांसाठी चहा काढला. मी नंतर विचारलं, ’कोण रे हा? नाव आठवत नाही.’ तर म्हणाला, ’मलासुद्धा. चहा प्यायलास ना?’

याचा चेहेरा विलक्षण मोबाइल, बोलका. आणखी एका मित्राचा चेहेरा तसाच बोलका असल्याचं लक्षात आल्यावर मी विचार केला आणि जाहीर केलं की या दोघांचा चेहेरा बोलका आहे; पण त्याच्या चेहेर्‍यावर त्याला नको ते सर्व व्यक्‍त होतं; हा याला हवं ते दाखवू शकतो. याच्या चेहेर्‍यावर मिश्किलपणाची किंचित छटा, तर बाळू जोगळेकरचा चेहेरा साफ सभ्य. बाळू आणि हा ट्रेनमध्ये ’इट्रा मना शबॅत्तले’ नामक भाषेत संभाषण करीत. एकमेकांच्या मुलाखती घेत, भांडणंसुद्धा करत. आम्ही बाकीचे सहसा मधे पडत नसू. त्यांचं हे इतकं बेमालूम चाले की एकदा एका बायकोने नवर्‍याला हळूच विचारलं, ’काय झालंय?’ तर नवर्‍याने लक्षपूर्वक ऐकून तिला हळूच समजावून सांगितलं की ’याने त्याचे पैसे बुडवलेत म्हणून तो भडकला आहे.’ मी शेजारीच होतो.

पहिल्या ओव्हरनाइट हाइकला आम्ही सात की आठ जण होतो. त्यात एक अगडबंब विनय धुमाळे. सगळ्यांना हा कल्याणला त्याच्या घरी घेऊन गेला. तर घर म्हणजे आठ बाय पाच वा तत्सम आकाराची बैठ्या चाळीतली खोली. संडास मागे. संडासाचं दार छातीइतक्या उंचीचं (’बसून करणार ना? मग वरपर्यंत कशाला हवं दार?’ इति घरमालक). त्याची आई मंद हसली. हा निवांत. सकाळी निघालो तर त्याच्या आईने रात्री भातातच विरजण लावून झालेला अप्रतिम दहीभात दिला. पुढे आम्ही तिघे मित्र त्याच्या दापोलीच्या घरी गेलो. तिथेही भाड्याचीच खोली. घरात शिरल्याशिरल्या याने आईला प्रश्न केला, ’बॉप कुठाय?’ तीर्थरूपांचा उल्लेख ’बाप’ म्हणून करण्याचं आमच्यात कोणाला अप्रूप नसलं, तरी थेट आईलाच असं विचारणं दचकावून गेलं. तिथे आम्ही हर्णै, मुर्डी, आसूद अशा मुलुखात हिंडलो. साहित्यातली स्थानं अशी खरोखर बघण्याची मला सवय नव्हती. बापू आणि राधा आणि हॉटेलवाला रावज्या यांच्या आठवणी काढत मी मस्त रमून गेलो.

त्याच्याबरोबर फिरताना आणखी एक व्हायचं. मी केमिस्ट्री-फिजिक्स; तर हा केमिस्ट्री-बॉटनी. चालता चालता एखादं पान तोडायचा आणि त्यातली बॉटनी सांगायचा. ’पुस्तकात ज्ञानाचा पत्ता दिलेला असतो, ज्ञान नसतं,’ हे मला खूप उशीरा शब्दात आणता आलं; पण सायन्स हे असं चोहीकडे असतं, याची जाणीव जागी असणारे इतके कमी भेटतात की मला त्याचं विलक्षण अप्रूप वाटलं.

यात माझं शिक्षण होत होतं. मी घरचा मुळीच श्रीमंत नव्हतो. आमच्यातलं कोणीच नव्हतं. कोणाला गरिबीबाबत लाज नव्हती, की गंड नव्हता. पण तरी हा सोडून बाकी आम्ही मुंबईकर. शहरी. आपोआप स्मार्ट. हा प्रचंड गरिबीतून आलेला. उपाशी रहात वाढलेला. पण कुठेही कडवटपणा नाही. दोन्ही हातांनी जीवन लुटणारा. त्याला मुळी गरीब- बिनगरीब अशी काही जाणीवच नव्हती. म्हणजे, दुसर्‍या कुठल्यातरी संदर्भात असेलही. मैत्री, हिंडणे, नवीन काही शोधणे-सापडणे या बाबतीत पैशाची समृद्धी इर्रेलेव्हंट असते, हे त्याला आतून माहीत होतं. इतकं की या संदर्भातला विचारही त्याच्या मनात आला नसावा. "हे असं असतं; कपडे, रहाणी, चैन, असल्या गोष्टी जगण्याची मजा संपूर्णपणे लुटण्याच्या आड झाटसुद्धा येत नाहीत," हे त्याने मला शिकवलं. एका शब्दाने उच्चार न करता. नुसतं असण्यातून.

पुढे आम्ही नोकरीला लागलो. तो आणि मी एकाच दिवशी एकाच बँकेत जॉइन झालो. मेन ब्रँचला. लग्नं झाली. मी प्रमोशन घेऊन यूपीला गेलो. परत आलो. वय वाढलं. पण फिरण्याची हौस फिटली नाही. डोंगरात जाणं कमी झालं. हा निर्णयदेखील माझा नव्हेच. त्यानेच ठरवलं की आता आपण धरणं हिंडू. बारवी, भिरा, वैतरणा, भातसा, किती. यातलं भातसा तर उभं होताना आम्ही पाहिलं. पावसाळ्यात आकाशभर आवाज करत डोळे फिरतील असा उसळत मती गुंग होईल अशा प्रलयरूपात पाण्याचा अवाढव्य धोद्या समोर आदळताना बघत आम्ही तिथे बसलो आहोत. धरणावर चाललो आहोत. धरणाच्या आत आत शेकडो पायर्‍या उतरलो आहोत. भिर्‍याला ऐंशी अंशातल्या उतारावर चालणार्‍या हॉइस्टमधून खाली आलो आहोत. ही सगळी त्याची कृपा. पूर्वी आम्ही गाडी पकडून कर्जतला यायचो आणि कुठल्यातरी ग्रूपला जॉइन होऊन हाइक करायचो. आम्हा मित्रांची ओळखच मुळी ’बाळू-बुटल्याचा ग्रूप’ अशी होती. त्याची कुणाशी तरी ओळख निघेच. हा बँकेतही कॅश डिपार्टमेंटला लागला. हे बँकेतलं स्वायत्त संस्थान. कल्याणपर्यंत कुठल्याही ब्रँचमध्ये कॅशमधला कुणी रजेवर चालला की त्या ब्रँचचा कुणी त्या जागी बसत नसे, मेन ब्रँचहून माणूस पाठवला जाई. यालाही कुठे कुठे जायची वेळ आली. परिणामी भारतभर कुठेही बँकेची शाखा दिसली की हा रुबाबात आत. इकडल्या तिकडल्या चौकशा करून काहीतरी बादरायण संबंध जोडता आला की याला समाधान. कॉलेज, मग रेल्वे आणि मग बँक. आधुनिक निधर्मी जगातलं जात आणि गोत आणि कूळच जणू.

कुठलाही माणूस पूर्ण सद्‍गुणी नसतो. हाही नव्हता. पण मी इथे त्याची चित्रगुप्‍ताकडली खातेवही उघडायला बसलेलो नाही. माणसाच्या जास्त जवळ गेलं की त्याच्या घामाचा वास येतो, त्याच्या चामखिळी दिसतात, एकेक गोष्ट खटकायला लागते. याच्या बाबतीतही हे झालं. त्याचंही माझ्या बाबतीत झालं असेल. मुद्दा याचे पाय किती मातीचे होते, हे सांगून व्यक्‍तिचित्रण संतुलित करण्याचा नाही. आठवतील ते सगळे किस्से सांगण्याचा नाही. ’गुण गाईन आवडी’ हा तर मुळीच नाही. मुद्दा असा आहे, की आता हा नाही तर माझंच काहीतरी तुटून, सुटून गेलं आहे, असं मला सारखं जाणवतं आहे. ते भरून काढण्याची निकड जाणवते आहे. माझ्या वयातले एके काळचे बर्‍यापैकी ’सिनिक’ मित्र नातवंडांच्यात का रमतात, हे मला आता कळू लागलं आहे. ढासळत जाणारी ओळख भरून काढण्याचे हे नेणिवेच्या पातळीवरचे प्रयत्न आहेत, असं आत्ता, या क्षणी मला वाटतं आहे. उद्या कदाचित वेगळं वाटेल. पण मला निदान या क्षणी तरी स्वतःची ओळख ठरवणारा एक पैलू निखळल्यावर निर्माण झालेली पोकळीच धरून ठेवायची आहे. 

Saturday, March 23, 2013

आपण आपली पायरी ओळखावी


थोडा उलट्या हाताने घास घेतो.

एपीजे अब्दुल कलाम हे आपले राष्ट्रपती होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशात प्रवेश करताना त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली होती. अलिभाई प्रेमजी हे भारतातील विप्रो या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष असताना त्यांनाही हा अनुभव आला. त्यांचे उद्‌गार आहेत, “अमेरिकन कस्टमवाले म्हणतात की विमानप्रवाशांपैकी कोणाची कसून तपासणी करायची, हे ते स्वैरपणे ठरवतात, त्यामागे नियम नसतो. पण माझी निवड हमखास होतेच!” हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार शहारुख खानही यातून सुटला नाही. परवाच्या ऑस्कर प्रदान समारंभाला सन्मानाने आमंत्रित केलेल्या पॅलेस्टीनच्या डॉक्युमेंटरी मेकरवर विश्वास ठेवायला अमेरिकन कस्टमवाल्यांनी नकार दिला. त्याला उलट पाठवायची तयारी केली. मायकेल मूरने अकॅडमी अध्यक्षांना कळवलं आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे तो पॅलेस्टिनी दिग्दर्शक वाचला.

अशा प्रकरणांमध्ये नंतर कुणी तरी रीतसर दिलगिरी वगैरे व्यक्‍त केली; पण हे प्रकार थांबले नाहीत. आजतागायत थांबलेले नाहीत. म्हणजे तपासणीचं धोरण तसंच राहिलेलं आहे. दिलगिरी तोंडदेखलीच ठरली आहे.

का? अशा प्रकारांना प्रसिद्धी मिळून, त्यांचा जगभरातून निषेध होऊन आणि चूक स्वीकारण्याची वेळ वारंवार येऊनही अधिकार्‍यांच्या वर्तनात फरक पडला नाही. का?

मला वाटतं, या प्रकारांना प्रसिद्धी मिळावी, अशीच अमेरिकेची इच्छा आहे. कारण यातून एक स्पष्ट संदेश प्रक्षेपित होतो आहे: आम्ही या ’हाय प्रोफाइल’ लोकांना सोडत नाही, त्यांच्या मान-अपमानाची पर्वा करत नाही; तेव्हा इतरांना सोडू, असं मनात चुकूनही आणू नका! माणूस पैशाने, कर्तृत्वाने, मानाने कितीही मोठा असो; मुसलमानाला वा मुसलमानी नाव असलेल्याला आमच्या देशात सुखासुखी प्रवेश नाही!

आता याचा संबंध ताज्या घडामोडींशी लावू.

वेगाने गाडी चालवल्याच्या गुन्ह्याखाली दंड केल्यावर जर लाथाबुक्क्यांचा मार मिळत असेल तर उद्या खून, बलात्कार, दरोडा, अफरातफर असल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली कारवाई केलीत, तर काय होईल हा विचार करा!

महाराष्ट्राचे आमदार खुनी, बलात्कारी, दरोडेखोर, अफरातफर करणारे आहेत, असं मला मुळीच सुचवायचं नाही. पण खून, बलात्कार, दरोडेखोरी, अफरातफर असल्या गुन्ह्यांचे आरोप असलेले कुणी आमदार होत नाहीत किंवा होणार नाहीत, याची गॅरंटी कोण देईल? मागे मुंबईतल्या एका खुन्याने अशीच काही तरी आयडिया लढवली होतीच की, की लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिलं, तर आपोआप जे अधिकार मिळतात, त्यांचा फायदा घेऊन स्वतःला तपासापासून मुक्‍त राखायचं!

म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो. दहशतवादी कृत्यं करण्यासाठी आणलेल्या एके ५८ पैकी एक स्वतःकडे ठेवल्याच्या गुन्ह्यासाठी संजय दत्तला शिक्षा झाली; तर
एक. त्याचे आईबाप थोर होते म्हणून
दोन. त्याने शिक्षेच्या टेन्शनखाली वीस वर्षं काढली म्हणून
तीन. त्याची शिक्षा एक प्रकारे त्याच्या कुटुंबालाही भोगावी लागेल म्हणून
चार. त्याच्यावर चित्रपट उद्योगाचे करोडो रुपये लागलेले आहेत म्हणून
त्याला माफी मिळावी, त्याची शिक्षा कमी व्हावी, अशी भावना चित्रपटसृष्टीतले दिग्गज व्यक्‍त करत आहेत. संजय दत्तला शिक्षेतून सवलत मिळावी, यासाठी जी कारणं दिली जात आहेत, त्यात आपण आणखी एका कारणाची – केवळ तार्किक मांडणी म्हणून – भर घालूया.
पाच. समजा ’तो आमदार आहे म्हणून’.

आणि प्रश्न विचारूया: असल्या प्रकारच्या कारणांसाठी कोणकोणत्या गुन्ह्यांना माफी वा सवलत असावी? वेगाने गाडी चालवणे, खुनशी हत्यार घरात लपवणे आणि नंतर ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, अंगावरून गाडी घालून फूटपाथवर झोपलेल्यांना ठार करणे, खून, बलात्कार, दरोडा, अफरातफर?

आणखी एक प्रश्न मला त्रास देतो आहे. विधिमंडळात – ’विधि’ म्हणजे कायदा, बरं का. कायदे करणारं ते विधिमंडळ. आपण त्याला कायदेमंडळच म्हणू. तर कायदे करणार्‍या कायदेमंडळात तेच कायदे जसेच्या तसे लागू होत नाहीत, हे तर उघडच आहे. कारण मग अनेक कायदेमंडळ सदस्यांच्या समक्ष कोणाला तरी लाथाबुक्क्यांनी तुडवणार्‍या व्यक्‍तींवर लगेच गुन्हा दाखल झाला असता. कायदेमंडळाच्या सदस्यांना असणार्‍या खास अधिकारांमुळे तिथे त्यांना संरक्षण मिळतं. तर प्रश्न असा आहे, कायदेमंडळातील सदस्यांना कायदेमंडळात मारहाण सोडून आणखी कोणकोणते गुन्हे करण्याची मुक्‍त मुभा असावी? खून? बलात्कार? शिवीगाळ? चोरी?

हे प्रश्न कायदेमंडळाच्या सदस्यांचा, पर्यायाने कायदेमंडळाचा अपमान करणारे आहेत, असं कुणी म्हणेल. मला तसं वाटत नाही. हे प्रश्न कायदेमंडळाच्या संदर्भात उपस्थितच होत नाहीत, असं मी अजूनपर्यंत समजत होतो. तशी आशा अजूनही आहे. पण वाटतं, एकदा स्पष्ट विचारून खात्री करून घ्यावी. म्हणजे आपल्या लोकशाहीत कोणापासून भयंकर धोका आहे, लोकशाहीने दिलेले नागरिकाचे हक्क नाकारण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना किती प्रमाणात आहे, हे एकदा जाणून घ्यावं.

आणि या देशात एक मतदाता नागरीक या नात्याने आपली पायरी ओळखून जगायला शिकावं.

Thursday, March 7, 2013

महिला दिनानिमित्त सौंदर्यसाधना


    फेसबुकावर अनुजा विचारते, बायकांचं ब्यूटी पार्लर असतं; तर पुरुषांचं का नाही? त्यांचं नुसतं ’मेन्स पार्लर’ का?

    याचं पहिलं आणि प्रामाणिक उत्तर असं की, मला माहीत नाही. मी कधी मेन्स पार्लरमध्ये गेलो नाही आणि बायकांच्या ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा या दोनात फरक आहे की नाही आणि असला तर नेमका काय, हे मला सांगता येणार नाही.

    पण हा प्रश्न तपशीलरूपी वास्तवासंबंधी चौकशी करणारा नसून तत्त्वाकडे बोट करणारा आहे, हे लक्षात घेतलं, तर पुढे जावंसं वाटतं. खरंच, का हा फरक? विचार करायला लागलं, की काय काय़ सुचतं. उदाहरणार्थ, सौंदर्य हेच स्त्रीचं सामर्थ्य आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य! तिने पार्लरमध्ये जाऊन, केसांना शाम्पू आणि तोंडाला कसली कसली क्रीमं लावून, हेअर रिमूव्हरचा हा नाहीतर तो प्रकार वापरून सौंदर्याचं अस्त्र उगारावं आणि त्या सामर्थ्यानिशी या भवसागरात उडी घ्यावी. पुरुषाने जिममध्ये जाऊन वा घरीच वॉकर वा तत्सम काहीतरी वापरून ऍब्स, बायसेप्स आणि ट्रायसेप्स कमवावेत आणि त्यातून सजलेल्या त्याच्या रूपावर बाईने भाळावं.

    किंवा तिने मोहक हसून, मंजुळ बोलून, वरिष्ठांना सुखावणार्‍या सेवावृत्ती अंगी बाणवून स्वतःची उन्नती साधावी. त्यासाठी ब्यूटी पार्लरसम ग्रूमिंग एजन्सीकडे जावं. त्याने शिकून वा अनुभवातून समाजोपयोगी हुन्नर आत्मसात करावेत आणि त्यांच्या उपयोगातून संपत्ती, प्रतिष्ठा यांची कमाई करावी. त्यासाठी त्याने विद्याध्ययन करावं. आणि त्यातच त्याचे अलंकार ठरावेत.

    ज्यांना चाकोरीतच वाटचाल करायची आहे, त्यांचा प्रश्नच नाही. परंपरेची चाकोरी ज्यांना सोडायची आहे; जे स्वतःकडे नाही, ते मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी हे दोन समाजमान्य राजमार्ग. मीडिया आणि चित्रपट यातलं समाजदर्शन सोडलं,  तर सर्वत्र यांचीच चलती आहे. ग्रामीण, शहरी, उच्चवर्णीय, निम्नवर्णीय, गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत; सगळीकडे याच वास्तवाचा वरचष्मा आहे. आणि या वास्तवात पुरुषांचं ब्यूटी पार्लर असू शकत नाही.

    पण मग नुसतं मेन्स पार्लर हे तरी काय? त्याचं प्रयोजन काय? ते कसं या वास्तवचित्रात बसवायचं?

    माझा एक अनुभव सांगतो. महिन्या दोन महिन्यातून एकदा मला हेअर कटिंग सलूनमध्ये जावं लागतं. केस कापून झाले, की ’साब दाढी?’ असं विचारण्याचा प्रघात तिथे आहे. केस घरी कापण्याचं प्रमाण जितकं कमी, तितकं दाढी बाहेर करण्याचं नसलं, तरी या प्रश्नाला मेजॉरिटी उत्तर ’नाही’ हेच असतं. गेल्या काही वर्षांमध्ये यात बदल झाला आहे. माझा एक असा ठरलेला न्हावी नसल्याने मी जिथे असेन तिथल्या सलूनमध्ये जातो. त्यामुळे मी जनरल विधान करू शकतो. सगळीकडे केस कापल्यावर ’साब, मालिश?’ असं विचारतात. कधी ’साब, फेशियल?’ असंही. एकदा ’साब, स्टीम?’ असं विचारलं. दर वेळी नाही म्हणण्याचा कंटाळा येऊन एकदा मी ठरवलं, ’साब, हो गया!’ असं ऐकू येईपर्यंत प्रत्येक प्रश्नाला हो म्हणत रहायचं. तर मालिश, मग स्टीम, मग शांपू, मग चेहर्‍याभर व्हायब्रेटर, मग आणखी काही ... चालूच! त्याचं संपेचना. शेवटी मीच कंटाळून आता पुरे म्हणालो आणि निघालो.

    तर कवळी लावणे, केस काळे करणे यांच्याबरोबर पुरुषलोक आणखी बरंच काही करून घेऊ लागले आहेत, असं माझ्या लक्षात आलं. केस कापणारी सलुनं ही सेवा ऍड ऑन म्हणून देतात आणि माझ्यासारखे अ-चोखंदळ पुरुष तिथे हौस पुरवतात. चोखंदळ, विचारी आणि अभिरुचीसंपन्न पुरुष अर्थातच अशा सोम्यागोम्यांकडे जाणार नाहीत. त्यांना स्पेशलाइज्ड पार्लर्सच हवीत. ’मेन्स पार्लर्स’. त्यांना मेन्स ब्यूटी पार्लर न म्हणणे हा ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रकार आहे!

    पण याचा अर्थ असा की पुरुषाला आता बलदंडपणा आणि कारागिरी/शिक्षण यात समाधान नाही! का बरं?

    एक असं असावं, की संख्याशास्त्रीय वास्तव म्हणून जरी सुरुवातीला वर्णिलेली स्थिती खरी असली, तरी एक मूल्य म्हणून त्या स्थितीचं स्थान डळमळीत झालं आहे. यामुळे भयचकित झालेल्या काही पुरुषांना वाटतं की मीडिया आणि चित्रपट यांच्या कुप्रभावाचा हा परिणाम आहे. मला वाटतं, मीडिया आणि चित्रपट केवळ पुष्टी देत आहेत. अगोदर बदल आणि मग त्याचं या दोन ठिकाणी प्रतिबिंब, असं आहे. असो. पण ’ती’ अबला आणि ’तो’ तिचं सर्व संकटांपासून (म्हणजे इतर पुरुषांपासून) रक्षण करणारा, हे पारंपरिक चित्र आता आदर्श प्रेरणाचित्र होत नाही. बायकांना अधिकाधिक प्रमाणात मित्र, सहचर, सहकारी हवा आहे; मालक, पालक, रक्षक नको आहे. मालकाकडे कुलुप-किल्ली हवी, पालकाकडे छडी हवी आणि रक्षकाकडे बळ हवं. मित्र-सहचर-सहकारी यांच्याशी आवडनिवड, दृष्टी, वाटचालीचा वेग यांच्या बाबतीत तारा जुळायला हव्यात. अमुक एका स्त्रीला काय हवं, असा प्रश्न असेल, तर त्य़ा स्त्रीचा अभ्यास करून उत्तर काढता येईल. पण एकंदरीत स्त्रीजातीसमोर उमेदवारी करायची असेल, तर? तर काय करायचं? ’तनाने, मनाने, धनाने बलवान व्हायचं’, हे उत्तर पोपट आहे. काय चेष्टा आहे काय! भिंतीवर सुभाषित म्हणून लटकवायला बरं असलं, तरी प्रत्यक्षात कसं आणायचं?

    या यक्षप्रश्नाचं उत्तर द्यायला सरसावतात, प्रसाधनं बनवणारी मंडळी. ते म्हणतात, मनाने-धनाने राहू दे; रूपाने वरचढ होणं तुमच्या हातात आहे. कसं? तर त्याचकरता शहारुख खान पुरुषांसाठी गोरेपणाचं क्रीम विकतो! अंगाला बरावाईट वास देणारे स्प्रे तर किती लोक विकतात. जणू अचानक असं होऊन गेलंय की तिने साजशृंगार करून त्याचं चित्त वेधून घ्यायचं, ते बाजूला राहून आता तो तिच्यासाठी नटू थटू पहातोय! तीही नटते आहेच; पण ते काय, ती पुराणकाळापासून करत आलीय. टीव्हीवर अजून करतेच आहे. त्यात काय मोजण्यासारखं?

    एक बारीक पण महत्त्वाच्या गोष्टीचा नुसता उल्लेख: ’ती’ बदलली खरी; पण आता तिला रक्षणाची गरज उरली नाही का?

    एक म्हणजे, तिचा स्वतःवरचा विश्वास वाढला आहे. दुसरं म्हणजे, तिचा समाजावरचा विश्वाससुद्धा वाढला आहे. तिसरं असं की धोका पत्करायला आता तिला अनेक कारणं दिसत आहेत. आणखी एक असं, की जे गमावण्याचं संकट तिला अबला ठरवत होतं, त्याची व्याख्या बदलू लागली आहे!

    पटतं? वेगळा विषय आहे. आत्ता नको.

    हे प्रसाधनवाले हुषार आहेत. प्रचंड फायदा देणार्‍या या उद्योगाच्या जाहिराती इकडे तिकडे चोहिकडे डोळ्यात भरत रहातात. जागतिकीकरण आलं, अर्थव्यवस्था मोकळी झाली आणि अचानक भारतातल्या सुंदर्‍या जगाच्या ब्यूटी क्वीन्स ठरू लागल्या! सौंदर्य हा विषय इथल्या बायकांच्यात रुजला हे पक्कं झालं, बायका सौंदर्यसाधना करू लागल्या आणि भारतीय मुली ब्यूटी क्विना व्हायच्या थांबल्या. पुढे बायकांचं मार्केट तुडुंब झालं आणि मोर्चा पुरुषांकडे वळला. बदलत्या मूल्यजाणिवांनी सुपीक केलेल्या भूमीवर या प्रसाधनवाल्या लोकांनी भरघोस पीक घेतलं. अजून घेत आहेत.

    आता अनुजाच्या प्रश्नाचं उत्तर सोपं झालं. नटणे, हा मुळी बायकांचा प्रांतच. पैसेवाल्यांकडे इतके पैसे झाले, की नवरीला मेंदी लावायला केवढा खर्च करतात! रूप चमकवण्यासाठी केला तर काय बिघडलं! रंगरंगोटीची साधनं तीच असतात; पण आपल्याला काय चांगलं दिसेल, याचा सल्ला घेण्यासाठी तज्ञाकडे का जाऊ नये?

    आणि आकर्षक दिसू लागून टेचात हिंडू लागलेल्या तिला इम्प्रेस करण्यासाठी तो सुद्धा गेला पार्लरमध्ये, तर का चालू नये?

    पण लक्षात घ्या, रूढ वा बदलत्या मूल्यांनुसार आकर्षक ठरणारा पुरुषही मुरडत, ठुमकत नसतो. त्याचं दिसणं वेगळं, तिला बघणं वेगळं. पुरुष मॉडेल्स जरी रॅम्पवरून चालत असले, तरी अजून पुरुषांच्या सौंदर्यस्पर्धा सुरू झालेल्या नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्या.

    तेव्हा बायकांसाठी ब्यूटी पार्लर आणि पुरुषांसाठी मेन्स पार्लर, असंच सध्या असणार. पुरुषांच्या पार्लरला विशेषण लागण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल, अनुजा.

Friday, March 1, 2013

एक वाया गेलेलं नाटक


परवा ’गांधी आडवा येतो’ हे नाटक पाहिलं. लेखक शफाअत खान. दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव.

आता, अमुक नाटक आणि तमुक प्रयोग वगैरेंशी तुलना करून या नाटकाला बरंवाईट म्हणता येईल. पण इथे तसं करायचं नाही आहे. मुळात नाटकाचं परीक्षणसुद्धा करायचं नाही आहे. नाटक बघून काय वाटलं तेवढं नोंदवायचं आहे. ’बरा टाईमपास आहे’ असं, किंवा ’काय बोअर आहे’ असं, म्हणून सोडून देण्याइतकं खालच्या दर्जाचं हे नाटक नाही. शफाअत खान म्हटल्यावर प्रेक्षकाच्या संवेदना चाळवल्याशिवाय रहात नाहीत. बुद्धीला चेव आल्याशिवाय रहात नाही.

म्हणून तर हे लिहायचं आहे.

नाटकाचं नाव. ते आशयाला जवळचं आहे. पण आशयाशी नीटपणे जोडलेलं नाही. ही जोडणी म्हणजे एक जुजबी काम आहे; पण राहून गेलं, असं वाटतं! दोनदा गांधींचा उल्लेख केला की झालं, असं चालत नाही. गांधींचा प्रभाव पडून एक गुंड सुधारतो, असा जास्तीचा खुलासा केला असता किंवा तपशील त्या दिशेने थोडे वाढवून, वळवून घेतले असते, तर ’मुन्नाभाई’वरून आयडिया घेतली, असा आरोप होण्याइतकं त्या चित्रपटाच्या जवळ नाटक गेलं असतं का? तसं म्हटलं तर ’अश्रूंची झाली फुले’ हे कानेटकरांचं नाटक तर या नाटकाला जवळचं आहेच आणि ’लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाशीसुद्धा जोडायचा तर संबंध जोडता येतो. पण नाटक स्वतंत्रच आहे. आता झालंय असं की गांधी आडवा आल्याचं सांगून सर्वसाधारण कुतूहल जागं तर करायचं पण गांधींशी खरोखर जोडून घेऊन मराठी प्रेक्षकांतल्या विशिष्ट वर्गाला (जो मुळीच नगण्य नाही) नाराज मात्र करायचं नाही; अशी धंदेवाईक चतुराई तेवढी दिसते आहे.

कानेटकरांच्या ’अश्रूंची झाली फुले’मध्ये एका गुंड प्रवृत्तीच्या संवेदनाशील तरुणाचा सत्‌च्या दिशेने होणारा प्रवास होता. त्याच वेळी त्याच्यावर सुसंस्कार करणार्‍या त्याच्या गुरुचा, त्याला छेद देणारा उलट प्रवासही होता. अर्थात नाट्य आणि संघर्ष ओतप्रोत होते. तोंडी लावायला वेगवेगळ्या रीतीने भ्रष्ट असणारे संभावित सभ्य जनही होते. हे जणू प्रस्थापित संस्कृतीचे प्रतिनिधी होते. शफाअत खान यांच्या नाटकाला रस आहे तो त्या प्रस्थापितांमध्ये. कानेटकरांचा लाल्या आणि शफाअत खानांचा लाल्या या दोघांचा आत्मा तोच आहे. फरक आहे तो बदललेल्या स्थळकाळ चौकटीचा. कानेटकरांच्या विद्यानंदाची जागा मात्र इथे मूळ नाटकातल्या दुय्यम पात्रांमधल्या एकाने घेतली आहे. कानेटकरांच्या कल्चरमध्ये कथानकात छत्रपती किंवा हिमालय किंवा राजा-सरदार-राजपुत्र असलं काहीतरी पात्र घेऊन त्याचा संघर्ष रंगवण्यात नाट्य होतं; शफाअतखानांच्या आधुनिक काळाला सामान्य वास्तवाला तिरकेपणाने भिडण्यात नाट्य दिसतं आहे. असो.

तिरकसपणा हाच या नाटकातला सर्वात सुसंगत भाव आहे. इतर भावांना प्रसंगी बाजूला सारण्याची दांडगाई तिरकसपणा करतो.

नाटक ही प्रवाही कला असल्यामुळे त्यात (नाटकातच असलेले सोडून) हवे तेव्हा विराम घेण्याची, मागे जाऊन आकलनाची दिशा सुधारून घेण्याची सोय नाही. म्हणजेच नाटकाने प्रारंभी आशयाची दिशा सांगायला हवी. पुढे धक्का मिळण्याचं सुख प्रेक्षकाला देण्यासाठी गोलमाल करणं वेगळं; पण नाटकाच्या प्रकृतीचा अंदाज तरी सुरुवातीला स्पष्ट व्हायला हवा. तो होत नाही. प्रोफेसर जुन्या मराठी नाटकातला, बायकोला घाबरणारा आणि बाहेरच्या व्यवहारी जगाला बिचकणारा पुरुष वाटतो. त्याची बायको तर सुरुवातीलाच ’दंगलीत कोण मेलं हे कळलं म्हणजे आपल्याला आनंद व्हायला हवा की दुःख, हे  समजतं’ असं एक तिरकस पण अंतर्वेधी विधान करते. यावरून तिच्याबद्दल काय मत करून घ्यावं? ती दुष्ट आहे किंवा धार्मिक उन्मादाच्या प्रवाहाबरोबर - सजगपणे वा नकळत - वाहणारी आहे किंवा न-नैतिकपणे निरागस (म्हणजे मूर्ख) आहे; हे किंवा यांच्या आसपासचे पर्याय सुचतात. उशीरापर्यंत झोपणारा आणि सदा पँट सुटल्याचं स्वप्न पडणारा त्यांचा तरुण मुलगा श्याम हा आत्मविश्वास गमावलेला, बिनकामाचा प्राणी आहे, असं मत होतं. मुलगी माया हे पात्र पडद्यामागे ठेवलं असतं तरी चाललं असतं; ती प्रत्यक्ष रंगमंचावर काहीच घडवून आणत नाही. पण बाकीच्या तीन पात्रांची ही तोंडओळख दिशाभूल करते. पैसा, प्रतिष्ठा वा पॉवर यांच्या मोहापायी माणूस भ्रष्ट होतो, हे मांडायचं असेल, तर हिस्टेरिकल हालचाली करणार्‍या पात्रांमधून विनोद साकारणारा आरंभ पुढच्या आकलनाला मारक ठरतो. नैतिकतेचा मुद्दा करणार्‍या नाटकाने ब्लॅक ह्यूमर जरूर मांडावा; पण नैतिकता आणि ’हा ह्यूमर पुढे काळवंडत जाणार आहे’ यांच्याकडे सूचक निर्देश सुरुवातीला व्हायला हवा. तो होत नाही. त्यामुळे आस्वादात विक्षेप येतो.

उमेश कामत (लाल्या), मिलिंद फाटक (प्रोफेसर बुद्धिसागर) आणि शैला काणेकर (सौ बुद्धिसागर) यांच्या वावरात ऊर्जा जाणवते आणि यांच्यापैकी कुणी रंगमंचावर असताना प्रेक्षक विचलित होत नाही. यातलं कुणी नसलं की नाटक लगेच घसरायला लागतं. पैकी उमेश कामत यांनी लाल्याचं सांस्कृतिक-भाषिक अंग, त्याचं निष्पाप मन, त्याचे पूर्वग्रह या सगळ्याचं बेअरिंग उत्तम सांभाळलं. आणि ते नाटकाच्या थोड्याशा स्लॅपस्टिक, थोड्याशा नर्मविनोदी, थोड्याशा सर्ररियालिस्टिक प्रकृतीशी सुसंगत राहील अशा रीतीने सांभाळलं. आता नाटकात लाल्याला ’ग्राफ’ नाही; अगोदरचा टपोरी लाल्या आणि बुद्धिसागरांच्या घरातल्या घडामोडींनी चक्रावलेला लाल्या, अशा दोन स्थितीच फक्‍त आहेत, हा कामतांचा दोष नाही. बुद्धिसागर पितापुत्रांचं जे होतं (आणि लाल्याचं जे होत नाही) ते मोजण्याची फूटपट्टी म्हणजे सौ बुद्धिसागर. लेखक आणि दिग्दर्शक दोघांनाही एकूण नाटकाच्या आशयप्रक्रियेशी संबंध नसलेला वर दिलेला जो उद्‌गार एडिट करणं जमलेलं नाही (का?), तो स्मृतिपटलावरून काढून टाकून प्रेक्षकाने या पात्राकडे बघावं. हे पात्र एक प्रकारे नाटकाचा भोज्या आहे. मध्यवर्ती आणि स्थिर. हिचं काही होतच नाही. नवरा आणि मुलगा यांच्या अधःपतनामुळे ती नैतिक वादळात सापडत नाही की लाल्याच्या सत्यनिष्ठेत ती दिलासा शोधत नाही. केवळ शैला काणेकर यांच्या वावरामुळे ती हाडामांसाची आणि विश्वसनीय वाटत रहाते.

प्रिया हे पात्र नाटकाच्या प्रकृतीविषयी संशय निर्माण करतं. हिचा बाप डेप्युटी पोलीस कमिशनर. ही त्या फद्या श्यामच्या प्रेमात. त्या श्यामसमोर पर्याय आहे आणि जरा संधी मिळताच तो अगोदर आवडत असलेल्या मुलीच्या मागे जातो. पण बड्या बापाच्या या स्मार्ट मुलीला मात्र चॉइस नाही! ही आपली श्यामच्याच मागे. का? नाटक वास्तवदर्शी नसून मानवी मनाच्या भावभावनांकडे आणि आंदोलनांकडे निर्देश करणारं, सांकेतिक पात्रांचं नाटक आहे का? आणि ही मुलगी त्यातलं एक सांकेतिक पात्र आहे का? लेखन, दिग्दर्शन, अभिनय कशात तरी कन्फ्यूजन आहे.

अत्यंत सहजपणे आलेला या नाटकातला एक उजवा भाग सांगायला हवा. कदाचित हे जाणवणं माझ्याच मागास वृत्तीचा एक आविष्कार असेल. लाल्या आणि लाल्याचा मेव्हणा श्याम याच्या प्रेमात असलेली तरुणी दोघेच एकांतात कट करतात. माझ्या मागास मनात एक बारीक आशंका: आता यांच्यात ’काहीतरी’ उगवणार! किंवा यांना असं एकत्र बघून कोणीतरी वाईट संशय घेणार! यापैकी काहीही होत नाही. त्यांच्या एकांताला नाटक मोजतच नाही. माझ्या मागास अपेक्षेला प्रतिसाद न देणारं हे नाटक मला आपोआप पुढारलेलं वाटलं.

पण हे वाटणं अगदी वैयक्‍तिक आहे. मी मागास असण्यातून निर्माण झालेलं आहे. त्याला नाटकाच्या गुणविशेषांमध्ये मोजावं का?

  प्रत्येक प्रवेशाची सुरुवात टीव्हीवरच्या बातम्यांवरून होते. बातम्या आपल्याला दिसत नाहीत; पण ऐकू येतात. मुख्य धारेतली नाटकं ’दिवाणखान्या’त घडण्याची मराठी परंपरा अजून सशक्‍त असल्याने, दिवाणखान्यात ठिय्या देऊन बसणार्‍या टीव्हीला नाटकाने मान्यता दिली; असं म्हणायला पाहिजे. ऐकू येणार्‍या बातम्यांमधून नाटकाच्या कथानकातल्या घडामोडींचा थांग लागतो. तेवढा वेळ वाचतो. एक उडी घेऊन नाटक पुढचं, सार्वजनिक बातमी न होणारं, घरातलं दाखवायला मोकळं होतं. हरकत नाही.

शेवट. आदिवासींची सेवा करायला गेलेली लाल्याची पत्नी, म्हणजेच प्रोफेसर बुद्धिसागरांची मुलगी माया परत येते. पण तिच्या परतण्यामुळे कोणाच्याच जगण्यात खळबळ माजत नाही. शहरी सुखसोयी सोडून ती आदिवासींच्यात गेली, या ठळक कृतीतून नाटकात काहीच निर्माण होत नाही. प्रेक्षकांसमोर न येणार्‍या सर्व खल पात्रांचं घर उन्हात बांधलं जातं; पण प्रोफेसर बुद्धिसागर आणि त्यांचा पुत्र श्याम यांचं नाही. का? लाल्याला ठार मारण्याची इच्छा शब्दात व्यक्‍त करेपर्यंत घसरलेले हे पितापुत्र विनापश्चात्ताप, विनासजा सहीसलामत सुटतात. प्रेक्षकांसमोर न येणार्‍या पण नाटकात खूप काही घडवून आणणार्‍या  पात्राला थेट ज्ञानपीठच मिळतं! (यात क्षुद्र मराठी संस्कृतीचा पोरकट न्यूनगंड दिसतो.) जुन्या मद्रासनिर्मित हिंदी सिनेमात असतो तसा एक ग्रुप फोटो शेवटी घडतो.

काय हे! ’देअर आर नो हीरोज एनीमोअर’ हे पन्नास वर्षांपासून वर्तमानकाळी चलनात असलेलं विधान पुन्हा करणे, ’भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई घरातून सुरू करणार?’ हा प्रश्न उभा करणे, ’गांधी हा भारतीय नैतिकतेचं प्रतीक आहे’ वा ’गांधी हे भारतीयांसाठी एक नैतिक दीपगृह आहे’ किंवा ’आजही गांधी जळजळीतपणे अर्थपूर्ण आहे’ यापैकी एक विधान करणे, शॉने इंग्लंडात केलं त्याप्रमाणे (जो मराठी नाटकाचा मुख्य प्रेक्षक आहे, त्या) मध्यमवर्गाच्या भोंदूपणावर कोरडे ओढतच त्याला गोंजारणे, ... किती छान छान शक्यता या नाटकासमोर होत्या! दुःख आणखी एक सामान्य नाटक येण्यातून कुठली तरी म्हातारी मेली, याचं नाही; दुःख लोक लफडी करतात इथपासून लोक भ्रष्ट होतात इथपर्यंत सर्व आशय बुळबुळीत करणारा काळ सोकावतो, हे आहे.