फेसबुकावर अनुजा विचारते, बायकांचं ब्यूटी
पार्लर असतं; तर पुरुषांचं का नाही? त्यांचं नुसतं ’मेन्स पार्लर’ का?
याचं पहिलं आणि प्रामाणिक उत्तर असं की, मला
माहीत नाही. मी कधी मेन्स पार्लरमध्ये गेलो नाही आणि बायकांच्या ब्यूटी
पार्लरमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा या दोनात फरक आहे की नाही आणि असला तर
नेमका काय, हे मला सांगता येणार नाही.
पण हा प्रश्न तपशीलरूपी वास्तवासंबंधी चौकशी करणारा नसून तत्त्वाकडे बोट करणारा आहे, हे लक्षात घेतलं, तर पुढे जावंसं वाटतं. खरंच, का हा फरक? विचार करायला लागलं, की काय काय़ सुचतं. उदाहरणार्थ, सौंदर्य हेच स्त्रीचं सामर्थ्य आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य! तिने पार्लरमध्ये जाऊन, केसांना शाम्पू आणि तोंडाला कसली कसली क्रीमं लावून, हेअर रिमूव्हरचा हा नाहीतर तो प्रकार वापरून सौंदर्याचं अस्त्र उगारावं आणि त्या सामर्थ्यानिशी या भवसागरात उडी घ्यावी. पुरुषाने जिममध्ये जाऊन वा घरीच वॉकर वा तत्सम काहीतरी वापरून ऍब्स, बायसेप्स आणि ट्रायसेप्स कमवावेत आणि त्यातून सजलेल्या त्याच्या रूपावर बाईने भाळावं.
किंवा तिने मोहक हसून, मंजुळ बोलून, वरिष्ठांना सुखावणार्या सेवावृत्ती अंगी बाणवून स्वतःची उन्नती साधावी. त्यासाठी ब्यूटी पार्लरसम ग्रूमिंग एजन्सीकडे जावं. त्याने शिकून वा अनुभवातून समाजोपयोगी हुन्नर आत्मसात करावेत आणि त्यांच्या उपयोगातून संपत्ती, प्रतिष्ठा यांची कमाई करावी. त्यासाठी त्याने विद्याध्ययन करावं. आणि त्यातच त्याचे अलंकार ठरावेत.
ज्यांना चाकोरीतच वाटचाल करायची आहे, त्यांचा प्रश्नच नाही. परंपरेची चाकोरी ज्यांना सोडायची आहे; जे स्वतःकडे नाही, ते मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी हे दोन समाजमान्य राजमार्ग. मीडिया आणि चित्रपट यातलं समाजदर्शन सोडलं, तर सर्वत्र यांचीच चलती आहे. ग्रामीण, शहरी, उच्चवर्णीय, निम्नवर्णीय, गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत; सगळीकडे याच वास्तवाचा वरचष्मा आहे. आणि या वास्तवात पुरुषांचं ब्यूटी पार्लर असू शकत नाही.
पण मग नुसतं मेन्स पार्लर हे तरी काय? त्याचं प्रयोजन काय? ते कसं या वास्तवचित्रात बसवायचं?
माझा एक अनुभव सांगतो. महिन्या दोन महिन्यातून एकदा मला हेअर कटिंग सलूनमध्ये जावं लागतं. केस कापून झाले, की ’साब दाढी?’ असं विचारण्याचा प्रघात तिथे आहे. केस घरी कापण्याचं प्रमाण जितकं कमी, तितकं दाढी बाहेर करण्याचं नसलं, तरी या प्रश्नाला मेजॉरिटी उत्तर ’नाही’ हेच असतं. गेल्या काही वर्षांमध्ये यात बदल झाला आहे. माझा एक असा ठरलेला न्हावी नसल्याने मी जिथे असेन तिथल्या सलूनमध्ये जातो. त्यामुळे मी जनरल विधान करू शकतो. सगळीकडे केस कापल्यावर ’साब, मालिश?’ असं विचारतात. कधी ’साब, फेशियल?’ असंही. एकदा ’साब, स्टीम?’ असं विचारलं. दर वेळी नाही म्हणण्याचा कंटाळा येऊन एकदा मी ठरवलं, ’साब, हो गया!’ असं ऐकू येईपर्यंत प्रत्येक प्रश्नाला हो म्हणत रहायचं. तर मालिश, मग स्टीम, मग शांपू, मग चेहर्याभर व्हायब्रेटर, मग आणखी काही ... चालूच! त्याचं संपेचना. शेवटी मीच कंटाळून आता पुरे म्हणालो आणि निघालो.
तर कवळी लावणे, केस काळे करणे यांच्याबरोबर पुरुषलोक आणखी बरंच काही करून घेऊ लागले आहेत, असं माझ्या लक्षात आलं. केस कापणारी सलुनं ही सेवा ऍड ऑन म्हणून देतात आणि माझ्यासारखे अ-चोखंदळ पुरुष तिथे हौस पुरवतात. चोखंदळ, विचारी आणि अभिरुचीसंपन्न पुरुष अर्थातच अशा सोम्यागोम्यांकडे जाणार नाहीत. त्यांना स्पेशलाइज्ड पार्लर्सच हवीत. ’मेन्स पार्लर्स’. त्यांना मेन्स ब्यूटी पार्लर न म्हणणे हा ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रकार आहे!
पण याचा अर्थ असा की पुरुषाला आता बलदंडपणा आणि कारागिरी/शिक्षण यात समाधान नाही! का बरं?
एक असं असावं, की संख्याशास्त्रीय वास्तव म्हणून जरी सुरुवातीला वर्णिलेली स्थिती खरी असली, तरी एक मूल्य म्हणून त्या स्थितीचं स्थान डळमळीत झालं आहे. यामुळे भयचकित झालेल्या काही पुरुषांना वाटतं की मीडिया आणि चित्रपट यांच्या कुप्रभावाचा हा परिणाम आहे. मला वाटतं, मीडिया आणि चित्रपट केवळ पुष्टी देत आहेत. अगोदर बदल आणि मग त्याचं या दोन ठिकाणी प्रतिबिंब, असं आहे. असो. पण ’ती’ अबला आणि ’तो’ तिचं सर्व संकटांपासून (म्हणजे इतर पुरुषांपासून) रक्षण करणारा, हे पारंपरिक चित्र आता आदर्श प्रेरणाचित्र होत नाही. बायकांना अधिकाधिक प्रमाणात मित्र, सहचर, सहकारी हवा आहे; मालक, पालक, रक्षक नको आहे. मालकाकडे कुलुप-किल्ली हवी, पालकाकडे छडी हवी आणि रक्षकाकडे बळ हवं. मित्र-सहचर-सहकारी यांच्याशी आवडनिवड, दृष्टी, वाटचालीचा वेग यांच्या बाबतीत तारा जुळायला हव्यात. अमुक एका स्त्रीला काय हवं, असा प्रश्न असेल, तर त्य़ा स्त्रीचा अभ्यास करून उत्तर काढता येईल. पण एकंदरीत स्त्रीजातीसमोर उमेदवारी करायची असेल, तर? तर काय करायचं? ’तनाने, मनाने, धनाने बलवान व्हायचं’, हे उत्तर पोपट आहे. काय चेष्टा आहे काय! भिंतीवर सुभाषित म्हणून लटकवायला बरं असलं, तरी प्रत्यक्षात कसं आणायचं?
या यक्षप्रश्नाचं उत्तर द्यायला सरसावतात, प्रसाधनं बनवणारी मंडळी. ते म्हणतात, मनाने-धनाने राहू दे; रूपाने वरचढ होणं तुमच्या हातात आहे. कसं? तर त्याचकरता शहारुख खान पुरुषांसाठी गोरेपणाचं क्रीम विकतो! अंगाला बरावाईट वास देणारे स्प्रे तर किती लोक विकतात. जणू अचानक असं होऊन गेलंय की तिने साजशृंगार करून त्याचं चित्त वेधून घ्यायचं, ते बाजूला राहून आता तो तिच्यासाठी नटू थटू पहातोय! तीही नटते आहेच; पण ते काय, ती पुराणकाळापासून करत आलीय. टीव्हीवर अजून करतेच आहे. त्यात काय मोजण्यासारखं?
एक बारीक पण महत्त्वाच्या गोष्टीचा नुसता उल्लेख: ’ती’ बदलली खरी; पण आता तिला रक्षणाची गरज उरली नाही का?
एक म्हणजे, तिचा स्वतःवरचा विश्वास वाढला आहे. दुसरं म्हणजे, तिचा समाजावरचा विश्वाससुद्धा वाढला आहे. तिसरं असं की धोका पत्करायला आता तिला अनेक कारणं दिसत आहेत. आणखी एक असं, की जे गमावण्याचं संकट तिला अबला ठरवत होतं, त्याची व्याख्या बदलू लागली आहे!
पटतं? वेगळा विषय आहे. आत्ता नको.
हे प्रसाधनवाले हुषार आहेत. प्रचंड फायदा देणार्या या उद्योगाच्या जाहिराती इकडे तिकडे चोहिकडे डोळ्यात भरत रहातात. जागतिकीकरण आलं, अर्थव्यवस्था मोकळी झाली आणि अचानक भारतातल्या सुंदर्या जगाच्या ब्यूटी क्वीन्स ठरू लागल्या! सौंदर्य हा विषय इथल्या बायकांच्यात रुजला हे पक्कं झालं, बायका सौंदर्यसाधना करू लागल्या आणि भारतीय मुली ब्यूटी क्विना व्हायच्या थांबल्या. पुढे बायकांचं मार्केट तुडुंब झालं आणि मोर्चा पुरुषांकडे वळला. बदलत्या मूल्यजाणिवांनी सुपीक केलेल्या भूमीवर या प्रसाधनवाल्या लोकांनी भरघोस पीक घेतलं. अजून घेत आहेत.
आता अनुजाच्या प्रश्नाचं उत्तर सोपं झालं. नटणे, हा मुळी बायकांचा प्रांतच. पैसेवाल्यांकडे इतके पैसे झाले, की नवरीला मेंदी लावायला केवढा खर्च करतात! रूप चमकवण्यासाठी केला तर काय बिघडलं! रंगरंगोटीची साधनं तीच असतात; पण आपल्याला काय चांगलं दिसेल, याचा सल्ला घेण्यासाठी तज्ञाकडे का जाऊ नये?
आणि आकर्षक दिसू लागून टेचात हिंडू लागलेल्या तिला इम्प्रेस करण्यासाठी तो सुद्धा गेला पार्लरमध्ये, तर का चालू नये?
पण लक्षात घ्या, रूढ वा बदलत्या मूल्यांनुसार आकर्षक ठरणारा पुरुषही मुरडत, ठुमकत नसतो. त्याचं दिसणं वेगळं, तिला बघणं वेगळं. पुरुष मॉडेल्स जरी रॅम्पवरून चालत असले, तरी अजून पुरुषांच्या सौंदर्यस्पर्धा सुरू झालेल्या नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्या.
तेव्हा बायकांसाठी ब्यूटी पार्लर आणि पुरुषांसाठी मेन्स पार्लर, असंच सध्या असणार. पुरुषांच्या पार्लरला विशेषण लागण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल, अनुजा.
sagla pattay...phakta ek 'by the way' mahiti : purushanchya saundarya spardha ahet. Tyatlua ekicha mala naav mahitiye : Gladrags man of the year.
ReplyDeleteसर, पुरुषांच्या सौंदर्यस्पर्धा तर आहेतच. पण आणखी एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे बाजारात आलेले खास पुरुषांसाठीचे 'फेअर एन्ड हंड्सम' ही क्रीम का आणि कशी आली माहितीये? जेव्हा फेअर एन्ड लव्हली या क्रीमच्या कंपनीने ग्राहकांचा सर्वे केला तेव्हा असं आढळून आलं की स्त्रियांपेक्षा पुरूषच ही क्रीम जास्त घेतात. मग मार्केट डिमांड पाहून त्यांनी मुद्दाम खास पुरुषांकरिता 'फेअर एन्ड हंड्सम' ही क्रीम बाजारात आणली. थोडक्यात आता आता पर्यंत पुरुष स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनांनी आपल्या गरजा पूर्ण करत होते, आता खास त्यांच्यासाठी उत्पादनं आल्याने त्यांनी ती अगदी लगेच बिनदिक्कत स्वीकारली आहेत. आणि हे एकूणच अधिक मोकळ्या समाजाचे लक्षण आहे त्यामुळे हा बदल स्वागतार्ह आहे असं मला वाटतं.
ReplyDeleteलेख छान झालाय. फेसबुकावर शेअर करतेय.
-अनुजा
लेख आवडला.
ReplyDeleteयाच संदर्भात गेल्या काही शतकांमधे वाढलेला यंत्रांचा वापर आणि शस्त्रांमधले बदल यामुळे शारीरिक क्षमता फार महत्त्वाची राहिलेली नाही. नांगर आणि तलवार कालबाह्य झाले, त्याजागी ट्रॅक्टर आणि स्वयंचलित बंदुका आल्या आहेत.
आपल्याकडे नसलेल्या गोष्टी हव्याशा वाटतात तसाही हा प्रकार असेल का? भारतीयांना गोरी त्वचा हवीशी वाटते, गोर्यांना टॅन हवासा वाटतो. स्त्रिया पार्लरमधे जातातच, पण जिममधे मोठी वजनंही उचलतात. तशी पुरुषांची रांगही सौंदर्यप्रसाधनांकडे लागलेली असू शकते.