Saturday, March 30, 2013

विश्वास


माझा एक मित्र वारला. गेली काही वर्षं आजारी होता आणि त्याच्या आजारावर उपाय नव्हता हे मला, त्याला, सर्व संबंधितांना माहीत होतं. तेव्हा तो गेला यात अनपेक्षित काहीच नव्हतं. त्याची प्रकृती गेल्या महिन्या दोन महिन्यात झपाट्याने बिघडत गेलेली मी पहात होतो. आमच्या इतर मित्रांना त्याला भेटायला जाण्याची सूचना करत होतो. म्हणजे तो जेव्हा गेला, ती वेळही अनपेक्षित नव्हती.

तरी तो गेल्याची खबर ऐकली तेव्हा पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. काही सुचेनासं झालं. असं वाटलं, वडील गेले, आई गेली, सुधीर गेला; आता हा. स्वतःची ओळख आपण एकेका संदर्भातून ठरवत असतो. बहुधा ते सगळे संदर्भ कोणा ना कोणा व्यक्‍तीशी जोडता येतात.  त्या व्यक्‍तींच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत आलेले असतात. ती माणसं जगातून नाहीशी होणं म्हणजे आपली ओळख, आपला जगाशी असलेला संबंध पातळ, विरळ होत जाणं. असं करत करत केव्हा तरी आपण नुसते शरिराने उरणार. दत्तो वामन पोतदार गेले तेव्हा अत्र्यांनी लिहिलं, ’आम्हाला बाबुराव म्हणणारा शेवटचा माणूस गेला.’ चमत्कारिक वाटलं म्हणून हे विधान अजून लक्षात राहिलं; पण आता कळतं, अत्र्यांची ओळख ठरवणारा एक पैलू पोतदारांबरोबर लोपला. अत्रे अपूर्णांकात उरले. बुटल्या गेला आणि मी अपूर्णांकात उरलो.

त्याचं नाव विश्वास. बुटका होता म्हणून कॉलेजात केव्हा तरी ’बुटल्या’ झाला, तो आम्हा मित्रांच्यात कायमचा. त्याची जवळीक कुठून झाली हे मला नीट आठवतं. सीनियर बीएससीच्या शेवटी रीडिंग रूममध्ये वाचत बसलो असताना बाळू जोगळेकरने बाहेर बोलावलं आणि विचारलं, ’पुण्याला येतोस का?’ मी आनंदाने ’हो’ म्हणालो. तर बाळूने खुलासा केला, ’तसं नाही; चालत.’ मी हुरळूनच गेलो. काय भारी आयडिया आहे! जाऊया की. ’कोण कोण?’ विचारल्यावर बाळूने जी नावं घेतली त्यात हा होता. वर्गातच होता पण मी त्याला जेमतेम ओळखत होतो. एकदा तो डोक्याला पट्टी बांधून आल्याचं आठवत होतं. हाइकला डोक्यात दगड पडला आणि खोक पडली, त्याचं ते चिन्ह होतं. मी स्वतः होऊन काहीही न करणारा; हाइकला गेलो नाही की मराठी वाङ्‍मय मंडळाच्या कुठल्या उपक्रमाला. त्यामुळे ’माझ्याप्रमाणे वर्गात मागे बसणारा मुलगा’, यापलिकडे मला त्याची फारशी माहिती नव्हती. खरं म्हणजे असायला हरकत नव्हती. मी जसा पीरियडपेक्षा कॉलेजसमोरच्या पायरीवर जास्त असणारा, तसाच तोही. त्याचे माझे काही मित्र समानही होते. पण माझे बहुतेक मित्र रूढ सांस्कृतिक उतरंडीत ’वरचे’ होते; त्याच्या मित्रांच्यात आउटलाइनवाल्यांचा भरणा जास्त होता.

आम्ही पुण्याला चालत कधी गेलोच नाही. त्याने नंतर मुंबईहून निघून किनारपट्टीने महाराष्ट्र पार करण्याची कल्पना मांडली. वाटेत किती खाड्या लागतील आणि त्या कशा पार करायच्या, हे सगळं त्याने वर्णन करून सांगितलं. तेही आम्ही केलं नाही. पण त्याच्याबरोबर मी पुष्कळ हाइक केल्या. इतक्या, की माझ्या व्यक्‍तिमत्त्वात कशाचं योगदान मोठं आहे, हे ठरवताना मी जुनी हिंदी गाणी आणि शहरापासून दूर डोंगर-दर्‍या–जंगल; साध्या शब्दांत ’हाइक’, असं मला सुचलं होतं.

आणि माझ्यासाठी हाइक आणि तो हे एकच होतं. त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा जेव्हा बाहेर पडलो आणि गाव मागे पडल्यावर जो एक उल्हास येतो, त्यात त्याने तोंड उघडून ’पीपल छइयाँ, बैठी पलभर, भरके गगरिया,’ असा सूर काढला तेव्हा त्याच्यापेक्षाही मोठा आ वासून ’हाय रे!’ ओरडताना मला मेलेमे खोया हुवा भाऊ भेटल्यासारखं वाटलं. ’बिछुआ’ हे गाणं सर्वांना माहीत असलेलं तरी; पण त्याचं दुसरं आवडतं गाणं जे तो आळवून आळवून गायचा, ते होतं ’आदमी’तलं रफी-तलत डुएट: ’ऐसी हसीन रात’. आणि प्रेमपुजारीतलं ’यारों नीलाम करो सुस्ती’.

त्याच्या प्रेमात पडण्याची प्रोसेस बराच काळ चालू राहिली. तो कल्याणला रहायचा. मी नवीन नवीन चुनाभट्टीला गेलो होतो. हायवेला लागून आमची सोसायटी, पण तेव्हा बस हायवेवर थांबत नसे. सायनवरून सुटली की थेट अमरमहाल. चुनाभट्टीला जाण्यासाठी सायनला उतरून ३७१ पकडावी लागे. ती फाटकातून जात असे (अजूनही तशीच जाते). अत्यंत बेभरवशाची फ्रीक्वन्सी. त्यापेक्षा दादरहून कुर्ल्याला जाऊन हार्बर लाइनवरून चुनाभट्टी, हे मला जास्त बरं वाटलं. हा रेल्वेवाला. एखाद्याने मामाच्या गावाबद्दल बोलावं तसा हा रेल्वेबद्दल कौतुकाने, अभिमानाने बोलत असे. शेवटपर्यंत. त्याने मला त्याच्यासारखा रेल्वेवाला बनवलं. दादर आमची वावरण्याची जागा. घरी जायला आम्ही स्टेशनवर आलो, की तो आठ पाच बदलापूर सोडत असे कारण ती कुर्ल्याला थांबत नसे. त्यानंतर आठ दहा कर्जत, सव्वा आठ कल्याण, मग एकदम पावणे नऊ कसारा, नऊ पाच कल्याण अशा गाड्या आम्ही गप्पांच्यात आणि सिगारेटचे दम मारण्यात सोडत असू. त्यानंतर मात्र तीन नंबरवरून एक नंबरवर यावं लागे, कारण फास्ट गाड्या संपल्या.

एकदा काय झालं मला आठवत नाही (दारूत नाही, हा दारूतला अजिबात नव्हे. आणि ग्रॅजुएशननंतरच्या त्या बेकारीच्या काळात दारूची चैन करायला कोणाचकडे पैसे नव्हते. दारूची ओळख खूप नंतरची.); पण दादरला एकची कर्जतसुद्धा गेली. आम्ही रात्र स्टेशनवरच काढण्याचा निर्णय घेतला. सुखाने इकडे तिकडे केल्यावर पुढची गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाकडे घरी जायला जरी रेल्वे पास असला तरी दोघांकडे मिळून सतरा पैसे होते. नो प्रॉब्लेम. आम्ही जमेल तेवढा उशीर करून तेरा पैशांचा एक चहा आणि त्यावर एक चार पैशांची चारमिनार शेअर केलं आणि चार नंबर प्लॅटफॉर्मवर आडवे झालो. सकाळी मला जाग आली तर हा कोणाशी तरी बोलत होता. आमच्या एका मित्राचा मित्र मेडिकल कॉलेजला चालला होता. पायाने ढोसून याने मला उठवलं आणि त्या मित्राच्या मित्राकडून दोघांसाठी चहा काढला. मी नंतर विचारलं, ’कोण रे हा? नाव आठवत नाही.’ तर म्हणाला, ’मलासुद्धा. चहा प्यायलास ना?’

याचा चेहेरा विलक्षण मोबाइल, बोलका. आणखी एका मित्राचा चेहेरा तसाच बोलका असल्याचं लक्षात आल्यावर मी विचार केला आणि जाहीर केलं की या दोघांचा चेहेरा बोलका आहे; पण त्याच्या चेहेर्‍यावर त्याला नको ते सर्व व्यक्‍त होतं; हा याला हवं ते दाखवू शकतो. याच्या चेहेर्‍यावर मिश्किलपणाची किंचित छटा, तर बाळू जोगळेकरचा चेहेरा साफ सभ्य. बाळू आणि हा ट्रेनमध्ये ’इट्रा मना शबॅत्तले’ नामक भाषेत संभाषण करीत. एकमेकांच्या मुलाखती घेत, भांडणंसुद्धा करत. आम्ही बाकीचे सहसा मधे पडत नसू. त्यांचं हे इतकं बेमालूम चाले की एकदा एका बायकोने नवर्‍याला हळूच विचारलं, ’काय झालंय?’ तर नवर्‍याने लक्षपूर्वक ऐकून तिला हळूच समजावून सांगितलं की ’याने त्याचे पैसे बुडवलेत म्हणून तो भडकला आहे.’ मी शेजारीच होतो.

पहिल्या ओव्हरनाइट हाइकला आम्ही सात की आठ जण होतो. त्यात एक अगडबंब विनय धुमाळे. सगळ्यांना हा कल्याणला त्याच्या घरी घेऊन गेला. तर घर म्हणजे आठ बाय पाच वा तत्सम आकाराची बैठ्या चाळीतली खोली. संडास मागे. संडासाचं दार छातीइतक्या उंचीचं (’बसून करणार ना? मग वरपर्यंत कशाला हवं दार?’ इति घरमालक). त्याची आई मंद हसली. हा निवांत. सकाळी निघालो तर त्याच्या आईने रात्री भातातच विरजण लावून झालेला अप्रतिम दहीभात दिला. पुढे आम्ही तिघे मित्र त्याच्या दापोलीच्या घरी गेलो. तिथेही भाड्याचीच खोली. घरात शिरल्याशिरल्या याने आईला प्रश्न केला, ’बॉप कुठाय?’ तीर्थरूपांचा उल्लेख ’बाप’ म्हणून करण्याचं आमच्यात कोणाला अप्रूप नसलं, तरी थेट आईलाच असं विचारणं दचकावून गेलं. तिथे आम्ही हर्णै, मुर्डी, आसूद अशा मुलुखात हिंडलो. साहित्यातली स्थानं अशी खरोखर बघण्याची मला सवय नव्हती. बापू आणि राधा आणि हॉटेलवाला रावज्या यांच्या आठवणी काढत मी मस्त रमून गेलो.

त्याच्याबरोबर फिरताना आणखी एक व्हायचं. मी केमिस्ट्री-फिजिक्स; तर हा केमिस्ट्री-बॉटनी. चालता चालता एखादं पान तोडायचा आणि त्यातली बॉटनी सांगायचा. ’पुस्तकात ज्ञानाचा पत्ता दिलेला असतो, ज्ञान नसतं,’ हे मला खूप उशीरा शब्दात आणता आलं; पण सायन्स हे असं चोहीकडे असतं, याची जाणीव जागी असणारे इतके कमी भेटतात की मला त्याचं विलक्षण अप्रूप वाटलं.

यात माझं शिक्षण होत होतं. मी घरचा मुळीच श्रीमंत नव्हतो. आमच्यातलं कोणीच नव्हतं. कोणाला गरिबीबाबत लाज नव्हती, की गंड नव्हता. पण तरी हा सोडून बाकी आम्ही मुंबईकर. शहरी. आपोआप स्मार्ट. हा प्रचंड गरिबीतून आलेला. उपाशी रहात वाढलेला. पण कुठेही कडवटपणा नाही. दोन्ही हातांनी जीवन लुटणारा. त्याला मुळी गरीब- बिनगरीब अशी काही जाणीवच नव्हती. म्हणजे, दुसर्‍या कुठल्यातरी संदर्भात असेलही. मैत्री, हिंडणे, नवीन काही शोधणे-सापडणे या बाबतीत पैशाची समृद्धी इर्रेलेव्हंट असते, हे त्याला आतून माहीत होतं. इतकं की या संदर्भातला विचारही त्याच्या मनात आला नसावा. "हे असं असतं; कपडे, रहाणी, चैन, असल्या गोष्टी जगण्याची मजा संपूर्णपणे लुटण्याच्या आड झाटसुद्धा येत नाहीत," हे त्याने मला शिकवलं. एका शब्दाने उच्चार न करता. नुसतं असण्यातून.

पुढे आम्ही नोकरीला लागलो. तो आणि मी एकाच दिवशी एकाच बँकेत जॉइन झालो. मेन ब्रँचला. लग्नं झाली. मी प्रमोशन घेऊन यूपीला गेलो. परत आलो. वय वाढलं. पण फिरण्याची हौस फिटली नाही. डोंगरात जाणं कमी झालं. हा निर्णयदेखील माझा नव्हेच. त्यानेच ठरवलं की आता आपण धरणं हिंडू. बारवी, भिरा, वैतरणा, भातसा, किती. यातलं भातसा तर उभं होताना आम्ही पाहिलं. पावसाळ्यात आकाशभर आवाज करत डोळे फिरतील असा उसळत मती गुंग होईल अशा प्रलयरूपात पाण्याचा अवाढव्य धोद्या समोर आदळताना बघत आम्ही तिथे बसलो आहोत. धरणावर चाललो आहोत. धरणाच्या आत आत शेकडो पायर्‍या उतरलो आहोत. भिर्‍याला ऐंशी अंशातल्या उतारावर चालणार्‍या हॉइस्टमधून खाली आलो आहोत. ही सगळी त्याची कृपा. पूर्वी आम्ही गाडी पकडून कर्जतला यायचो आणि कुठल्यातरी ग्रूपला जॉइन होऊन हाइक करायचो. आम्हा मित्रांची ओळखच मुळी ’बाळू-बुटल्याचा ग्रूप’ अशी होती. त्याची कुणाशी तरी ओळख निघेच. हा बँकेतही कॅश डिपार्टमेंटला लागला. हे बँकेतलं स्वायत्त संस्थान. कल्याणपर्यंत कुठल्याही ब्रँचमध्ये कॅशमधला कुणी रजेवर चालला की त्या ब्रँचचा कुणी त्या जागी बसत नसे, मेन ब्रँचहून माणूस पाठवला जाई. यालाही कुठे कुठे जायची वेळ आली. परिणामी भारतभर कुठेही बँकेची शाखा दिसली की हा रुबाबात आत. इकडल्या तिकडल्या चौकशा करून काहीतरी बादरायण संबंध जोडता आला की याला समाधान. कॉलेज, मग रेल्वे आणि मग बँक. आधुनिक निधर्मी जगातलं जात आणि गोत आणि कूळच जणू.

कुठलाही माणूस पूर्ण सद्‍गुणी नसतो. हाही नव्हता. पण मी इथे त्याची चित्रगुप्‍ताकडली खातेवही उघडायला बसलेलो नाही. माणसाच्या जास्त जवळ गेलं की त्याच्या घामाचा वास येतो, त्याच्या चामखिळी दिसतात, एकेक गोष्ट खटकायला लागते. याच्या बाबतीतही हे झालं. त्याचंही माझ्या बाबतीत झालं असेल. मुद्दा याचे पाय किती मातीचे होते, हे सांगून व्यक्‍तिचित्रण संतुलित करण्याचा नाही. आठवतील ते सगळे किस्से सांगण्याचा नाही. ’गुण गाईन आवडी’ हा तर मुळीच नाही. मुद्दा असा आहे, की आता हा नाही तर माझंच काहीतरी तुटून, सुटून गेलं आहे, असं मला सारखं जाणवतं आहे. ते भरून काढण्याची निकड जाणवते आहे. माझ्या वयातले एके काळचे बर्‍यापैकी ’सिनिक’ मित्र नातवंडांच्यात का रमतात, हे मला आता कळू लागलं आहे. ढासळत जाणारी ओळख भरून काढण्याचे हे नेणिवेच्या पातळीवरचे प्रयत्न आहेत, असं आत्ता, या क्षणी मला वाटतं आहे. उद्या कदाचित वेगळं वाटेल. पण मला निदान या क्षणी तरी स्वतःची ओळख ठरवणारा एक पैलू निखळल्यावर निर्माण झालेली पोकळीच धरून ठेवायची आहे. 

2 comments:

  1. अनेकांच्या मधून आपण अख्खे असतो. जवळचे गेले की अवयव गळून पडल्यासारखं वाटतं. किंबहुना जवळचे जात चालले की आपण आधी जोडून अख्खे झालेलो होतो याची जाणीव होते.
    बुटल्याची आठवण येते.


    ReplyDelete
  2. मी बुटल्याला ओळखत नाही. पण तुझं वाचल्यावर वाटलं आता ओळखेन मी त्याला. रेल्वेत किंवा बॅंकेत मला भेटून तो नक्की विचारणार,"वाचलंस का हेमू ने काय लिहिलंय?"

    ReplyDelete