Saturday, March 23, 2013

आपण आपली पायरी ओळखावी


थोडा उलट्या हाताने घास घेतो.

एपीजे अब्दुल कलाम हे आपले राष्ट्रपती होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशात प्रवेश करताना त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली होती. अलिभाई प्रेमजी हे भारतातील विप्रो या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष असताना त्यांनाही हा अनुभव आला. त्यांचे उद्‌गार आहेत, “अमेरिकन कस्टमवाले म्हणतात की विमानप्रवाशांपैकी कोणाची कसून तपासणी करायची, हे ते स्वैरपणे ठरवतात, त्यामागे नियम नसतो. पण माझी निवड हमखास होतेच!” हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार शहारुख खानही यातून सुटला नाही. परवाच्या ऑस्कर प्रदान समारंभाला सन्मानाने आमंत्रित केलेल्या पॅलेस्टीनच्या डॉक्युमेंटरी मेकरवर विश्वास ठेवायला अमेरिकन कस्टमवाल्यांनी नकार दिला. त्याला उलट पाठवायची तयारी केली. मायकेल मूरने अकॅडमी अध्यक्षांना कळवलं आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे तो पॅलेस्टिनी दिग्दर्शक वाचला.

अशा प्रकरणांमध्ये नंतर कुणी तरी रीतसर दिलगिरी वगैरे व्यक्‍त केली; पण हे प्रकार थांबले नाहीत. आजतागायत थांबलेले नाहीत. म्हणजे तपासणीचं धोरण तसंच राहिलेलं आहे. दिलगिरी तोंडदेखलीच ठरली आहे.

का? अशा प्रकारांना प्रसिद्धी मिळून, त्यांचा जगभरातून निषेध होऊन आणि चूक स्वीकारण्याची वेळ वारंवार येऊनही अधिकार्‍यांच्या वर्तनात फरक पडला नाही. का?

मला वाटतं, या प्रकारांना प्रसिद्धी मिळावी, अशीच अमेरिकेची इच्छा आहे. कारण यातून एक स्पष्ट संदेश प्रक्षेपित होतो आहे: आम्ही या ’हाय प्रोफाइल’ लोकांना सोडत नाही, त्यांच्या मान-अपमानाची पर्वा करत नाही; तेव्हा इतरांना सोडू, असं मनात चुकूनही आणू नका! माणूस पैशाने, कर्तृत्वाने, मानाने कितीही मोठा असो; मुसलमानाला वा मुसलमानी नाव असलेल्याला आमच्या देशात सुखासुखी प्रवेश नाही!

आता याचा संबंध ताज्या घडामोडींशी लावू.

वेगाने गाडी चालवल्याच्या गुन्ह्याखाली दंड केल्यावर जर लाथाबुक्क्यांचा मार मिळत असेल तर उद्या खून, बलात्कार, दरोडा, अफरातफर असल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली कारवाई केलीत, तर काय होईल हा विचार करा!

महाराष्ट्राचे आमदार खुनी, बलात्कारी, दरोडेखोर, अफरातफर करणारे आहेत, असं मला मुळीच सुचवायचं नाही. पण खून, बलात्कार, दरोडेखोरी, अफरातफर असल्या गुन्ह्यांचे आरोप असलेले कुणी आमदार होत नाहीत किंवा होणार नाहीत, याची गॅरंटी कोण देईल? मागे मुंबईतल्या एका खुन्याने अशीच काही तरी आयडिया लढवली होतीच की, की लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिलं, तर आपोआप जे अधिकार मिळतात, त्यांचा फायदा घेऊन स्वतःला तपासापासून मुक्‍त राखायचं!

म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो. दहशतवादी कृत्यं करण्यासाठी आणलेल्या एके ५८ पैकी एक स्वतःकडे ठेवल्याच्या गुन्ह्यासाठी संजय दत्तला शिक्षा झाली; तर
एक. त्याचे आईबाप थोर होते म्हणून
दोन. त्याने शिक्षेच्या टेन्शनखाली वीस वर्षं काढली म्हणून
तीन. त्याची शिक्षा एक प्रकारे त्याच्या कुटुंबालाही भोगावी लागेल म्हणून
चार. त्याच्यावर चित्रपट उद्योगाचे करोडो रुपये लागलेले आहेत म्हणून
त्याला माफी मिळावी, त्याची शिक्षा कमी व्हावी, अशी भावना चित्रपटसृष्टीतले दिग्गज व्यक्‍त करत आहेत. संजय दत्तला शिक्षेतून सवलत मिळावी, यासाठी जी कारणं दिली जात आहेत, त्यात आपण आणखी एका कारणाची – केवळ तार्किक मांडणी म्हणून – भर घालूया.
पाच. समजा ’तो आमदार आहे म्हणून’.

आणि प्रश्न विचारूया: असल्या प्रकारच्या कारणांसाठी कोणकोणत्या गुन्ह्यांना माफी वा सवलत असावी? वेगाने गाडी चालवणे, खुनशी हत्यार घरात लपवणे आणि नंतर ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, अंगावरून गाडी घालून फूटपाथवर झोपलेल्यांना ठार करणे, खून, बलात्कार, दरोडा, अफरातफर?

आणखी एक प्रश्न मला त्रास देतो आहे. विधिमंडळात – ’विधि’ म्हणजे कायदा, बरं का. कायदे करणारं ते विधिमंडळ. आपण त्याला कायदेमंडळच म्हणू. तर कायदे करणार्‍या कायदेमंडळात तेच कायदे जसेच्या तसे लागू होत नाहीत, हे तर उघडच आहे. कारण मग अनेक कायदेमंडळ सदस्यांच्या समक्ष कोणाला तरी लाथाबुक्क्यांनी तुडवणार्‍या व्यक्‍तींवर लगेच गुन्हा दाखल झाला असता. कायदेमंडळाच्या सदस्यांना असणार्‍या खास अधिकारांमुळे तिथे त्यांना संरक्षण मिळतं. तर प्रश्न असा आहे, कायदेमंडळातील सदस्यांना कायदेमंडळात मारहाण सोडून आणखी कोणकोणते गुन्हे करण्याची मुक्‍त मुभा असावी? खून? बलात्कार? शिवीगाळ? चोरी?

हे प्रश्न कायदेमंडळाच्या सदस्यांचा, पर्यायाने कायदेमंडळाचा अपमान करणारे आहेत, असं कुणी म्हणेल. मला तसं वाटत नाही. हे प्रश्न कायदेमंडळाच्या संदर्भात उपस्थितच होत नाहीत, असं मी अजूनपर्यंत समजत होतो. तशी आशा अजूनही आहे. पण वाटतं, एकदा स्पष्ट विचारून खात्री करून घ्यावी. म्हणजे आपल्या लोकशाहीत कोणापासून भयंकर धोका आहे, लोकशाहीने दिलेले नागरिकाचे हक्क नाकारण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना किती प्रमाणात आहे, हे एकदा जाणून घ्यावं.

आणि या देशात एक मतदाता नागरीक या नात्याने आपली पायरी ओळखून जगायला शिकावं.

No comments:

Post a Comment